घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआत्मघातकी अट्टाहास !

आत्मघातकी अट्टाहास !

Subscribe

दिल्लीतील शाहीन बाग येथे सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आझादीचे नारे सुरू झाले, त्याची घातक परिणती झालेली दिसली. या आंदोलनातून शेवटी काय साध्य झाले. यातून वातावरण तापत गेले आणि भडका उडाला. त्यात ४२ जणांचे बळी गेले. मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. हिंदूंपासून आझादीचे नारे देऊन त्यावेळी महमदअली जिनांनी देश तोडला. तोच आझादीचा कित्ता अकबरुद्दीन ओवेसी आणि वारिस पठाण गिरवत आहेत. आम्ही संख्येने कमी असलो तरी हिंदूंवर भारी पडू, ही मानसिकता पुन्हा पुन्हा उफाळून येताना दिसते. खरे तर हा आत्मघातकी अट्टाहास आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर यांच्या विरोधात सध्या प्रामुख्याने भारतातील मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या भागांमध्ये रान उठवण्यात येत आहे. त्याला सध्या केंद्रात सत्तेत नसलेल्या आणि प्रादेशिक पक्षांकडून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे. या सीएए आणि एनआरसीचा या देशात वर्षानुवर्षे राहणार्‍या मुस्लीम बांधवांना तसेच अन्य कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही, त्यामुळे या विरोधात होत असलेली आंदोलने मागे घ्यावीत, पण केंद्र सरकारने असे शांततेचे आवाहन वारंवार करूनही अशा प्रकारची आंदोलने थांबण्याचे नाव घेत नाहीत, उलट ती देशाच्या इतर भागात पसरविण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. दिल्लीत मागील काही दिवस रहदारीचा रस्ता अडवून शाहीन बाग येथे मुस्लीम महिलांनी सीएए विरोधात आंदोलन चालवले आहे. या ठिकाणी रात्रंदिवस आझादीचे नारे दिले जात आहेत. त्यातूनच दिल्लीत भडका उडून त्यात अनेकांचे बळी गेले. या आंदोलकांना नेमकी कुठली आणि कशा प्रकारची आझादी हवी आहे, हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे.

या आझादीची मागणी करणारे हे छुपे जिहादी तर नाहीत ना, याचा देशप्रेमी नागरिकांनी बारकाईने आणि काळजीपूर्वक विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण दिल्लीतील शाहीन बाग येथून सुरू झालेला हा ‘आझादीचा जागर’ आता देशभर पसरविण्यात येत आहे. दिल्लीतील शाहीन बागच्या धर्तीवर नाशिक येथे सादिक बागचे आयोजन नाशिकमधील मुस्लीम महिलांनी केले होते. या देशात मुस्लिमांनी कुठलाही विषय उपस्थित केला आणि नामंजूरच्या घोषणा देत आक्रमक पवित्रा घेतला की, इथले सत्ताधारी नमतात हे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतात दिसून आलेले आहे.

- Advertisement -

भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासारख्या हिंदूंची बहुसंख्या असलेल्या देशात मुस्लिमांना न्याय मिळणार नाही, अशी चिथावणी महमदअली जिना आणि मुस्लीम मुल्ला मौलवी यांनी दिली. त्यामुळे मुस्लिमांसाठी वेगळा देश बनवण्याची गरज आहे, यासाठी जिनांनी द्विराष्ट्र सिंद्धांत मांडला. त्यातूनच त्यांनी या देशातील सर्वसामान्य मुस्लिमांची माथी भडकवण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यावेळी देशात मुस्लीम बहुल भागात जाऊन सभा घेऊन आक्रमक भाषणे करण्यात आली. त्यासाठी दंगली उसळविण्यात आल्या. हिंदुंसाठी हिंदुस्तान आहे. मुस्लिमांसाठी पाकिस्तान झालाच पाहिजेच्या घोषणा देण्यात आल्या. ‘लढके लेंगे पाकिस्तान’चे नारे देण्यात आले. त्यानंतर अखंड असलेल्या या देशात ठिकठिकाणी प्रचंड दंगे उसळले. जाळपोळ सुरू झाली. दोन्ही बाजूंचे अनेक लोक मारले गेले. महिलांवर अत्याचार करण्यात आले. शेवटी काँग्रेस नेत्यांचे जिनांनी पेटवलेल्या हाहा:कारापुढे काहीही चालले नाही. सीएए आणि एनआरसीच्या मुद्यांवरून सध्या जी परिस्थिती तापवण्यात येत आहे, तशीच परिस्थिती त्यावेळी तापवण्यात आली होती. महात्मा गांधीजींनी जिनांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. या देशाचे तुकडे होण्यापूर्वी माझ्या देहाचे तुकडे होतील, असा निर्वाणीचा इशारा दिला, पण जिनांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते. त्यांना मुस्लिमांसाठी वेगळा देश हवा होता. तो त्यांनी मिळवला. गांधींच्या सर्वधर्मसमभावाच्या तत्वज्ञानापुढे जिनांचा आक्रमक जहालवाद यशस्वी ठरला. भारताची फाळणी करण्यासाठी जिनांनी सुरू केलेली डायरेक्ट अ‍ॅक्शन यशस्वी झाली.

रझाकारांचा वारसा असलेल्या एमआयएमचे नेते ओवेसी बंधूंची भाषा ऐकली आणि त्यांचा भाषण करतानाचा आक्रमक पवित्रा पाहिला की, जिनांच्या डायरेक्ट अ‍ॅक्शनचे नवे संकेत तर मिळत नाहीत ना, अशी शंका आल्यावाचून राहत नाही. अकबरुद्दिन ओवेसी यांनी मागे असे विधान केले होते की, या देशातील पोलीस अर्ध्या तासासाठी काढून घ्या, वीस कोटी मुस्लीम, ऐंशी कोटी हिंदूंचा सफाया करून टाकतील. त्यांच्या या विधानानंतर चारही बाजूंनी टीकेची झोड उठली. यावरून त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे. एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी नुकतेच कर्नाटकातील गुलबर्गा येथील सभेत केलेल्या भाषणात देशातील १५ कोटी मुस्लीम, १०० कोटींना भारी पडतील, असे विधान केले. मुद्दा असा आहे की, जेव्हा या देशाची फाळणी झाली तेव्हा ज्या मुस्लिमांना पाकिस्तानात जायचे होते, ते तिकडे गेले. ज्यांना भारतात रहायचे होते, ते तिथे राहिले. जे इथे राहिले त्यांनी या देशातील अन्य समाजांसोबत मिळून मिसळून वागणे अपेक्षित होते. आता आपण या देशाचाच भाग आहोत, ही भावना त्यांच्या मनात असणे अपेक्षित होते. असे असताना आम्ही संख्येने कमी असलो तरी इथल्या हिंदूंवर भारी पडू, त्यांचा सफाया करू, ही भाषा पुन्हा पुन्हा कशासाठी वापरली जात आहे. आझादी मांगने से नही मिलती, छिन के लेेनी पडती है, अशा घोषणा देऊन ही मंडळी या देशातील मुस्लिमांना कुठल्या आझादीसाठी पेटवत आहेत. महमदअली जिनांनी हिंदू बहुसंख्येपासून आझादी मिळवण्यासाठी असे आझादीचे नारे देत जिहादसाठी इथल्या मुस्लिमांना पेटवले होते. जिहादचा अर्थ पवित्र युद्ध आहे. ते पवित्र युद्ध पुकारून त्यांनी पाक म्हणजे पवित्र अशा पाकिस्तानची निर्मिती केली. वारिस पठाण यांच्या वक्तव्यानंतर ज्येष्ठ कवी आणि विचारवंत जे धर्माने मुस्लीम आहेत, असे जावेद अख्तर यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना ही जिना प्रवृत्ती अजूनही या देशात जिवंत आहे, असे म्हटले आहे. जावेद अख्तर यांच्यासारख्या मुस्लीम विचारवंताने या अशा प्रवृत्तीचा निषेध करणे हा त्यांचा मोठेपणा आहे, पण त्याच वेळी त्यांनी या देशात जिना प्रवृत्ती जिवंत असल्याची शंका व्यक्त केली, ती मात्र सगळ्यांसाठी चिंताजनक बाब आहे.

- Advertisement -

जिनांनी अट्टाहासाने भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती केली. पुढे बांगलादेशची निर्मिती झाली. जिनांनी पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र घोषित केले. तिच परिस्थिती बांगलादेशची आहे. आज भारतातील मुस्लीम विविध क्षेत्रात पुढे आलेले दिसतात. त्यांना कुठलीही संधी नाकारण्यात आलेली नाही. पण पाकिस्तान किंवा बांगलादेश इथे पाहिले तर मुस्लीम सोडून अन्य धर्माचे कुणी कुठल्या क्षेत्रात पुढे आलेले दिसत नाही, याचा अर्थ तिथे राहणारे अन्य धर्मीय लोक अकार्यक्षम आहेत का? त्यावरून पाकिस्तान आणि बांगलादेशात अन्य धर्मीय कसे राहत असतील याची कल्पना येऊ शकते. म्हणजे उदारमतवादाचा ठेका फक्त भारताने घ्यावा आणि वेळोवेळी आक्रमक भूमिका घेऊन मुस्लिमांनी या देशाचे तुकडे पाडायचे हा कुठला न्याय? पण अट्टाहासाची परिणती विनाशात झालेली आहे. पाकिस्तान आज जागतिक अतिरेक्यांचा अड्डा बनलेला आहे. तिथे कुठल्या मोठ्या कंपन्या गुंतवणूक करत नाहीत. राजकीय नेते, लष्करी नेते, मुल्ला मौलवी आणि अतिरेकी संघटनांचे म्होरके यांच्या कचाट्यात हा देश अडकलेला आहे. तिथले सामान्य लोक आज म्हणत आहेत, क्या इसलिए बना था पाकिस्तान, हम हिंदुस्तान के साथ होते, तो उनकी तरह हमारी भी तरक्की होती. बांगलादेशातील मुस्लिमांची परिस्थिती अतिशय वाईट आहे, ते पोटापाण्यासाठी मिळेल त्या मार्गाने भारतात घुसत आहेत. मिळेल ते काम करत आहेत. आज इथे आझादीचे नारे देऊन पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारे कितीजण पाकिस्तानात जाऊन राहायला तयार आहेत? त्यामुळे सीएएच्या निमित्ताने दिले जाणारे हे आझादीचे नारे पुन्हा देशाचे तुकडे करण्याच्या जिहादीचे तर नाहीत ना, याकडे सूज्ञ नागरिकांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -