घरफिचर्समायमहानगर ब्लॉगपवारांचे मिशन बिगिन अगेन...

पवारांचे मिशन बिगिन अगेन…

Subscribe

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवारांच्या पवार पॅटर्नचे महत्व महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनाही आता चांगलेच कळून चुकले आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत, संयमी, मितभाषी आणि कमीतकमी अ‍ॅक्सेसिबल असल्यामुळे महाराष्ट्राचे सुपर मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांच्याच नावाचा बोलबाला आहे. शरद पवार यांचे जे स्थान ठाकरे सरकारच्या निर्मितीमागे आहे ते स्थान भाजपप्रणित सरकार महाराष्ट्रात आल्यास राहणार नाही हे पवार पूर्णपणे जाणून आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात पवारांचे पुन्हा मिशन बिगिन अगेन सुरू आहे.

2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक वाक्य प्रचंड गाजले ते म्हणजे ‘यापुढे महाराष्ट्रात पवार पॅटर्न संपुष्टात आलेला असेल’. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे दुर्दैव असे की याच पवार पॅटर्नने देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद तर घालवलेच. मात्र, भाजपची महाराष्ट्रातील सत्ताही घालवली. एका विधानाची देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात फार मोठी किंमत मोजावी लागली. भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर जरी सत्ता स्थापन करावयाची असली तरी ते दिसते तितके सोपे नक्कीच नाही. त्यासाठी भाजपला एक तर राष्ट्रवादी किंवा पुन्हा शिवसेना या दोघा पक्षांपैकी एकाला बरोबर घेतल्याशिवाय महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करणे शक्य नसल्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही एव्हाना लक्षात आले आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पडण्याचे विविध मुहूर्त शोधणार्‍यांना पवार पॅटर्नमध्ये याचे नेमके उत्तर सापडू शकेल. पवार पॅटर्नही राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांची ओळख आहे आणि तीच त्यांची खरी शक्ती आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे जेवढे नुकसान केले तेवढे दामदुपट्टीने वसूल केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी भाजपबरोबर कोणताही समझोता करणार नाही. शरद पवारांचे महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाले आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिकाधिक सक्षमीकरणावर आणि बळकटीकरणावर जोर दिला आहे.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या पक्षीय बलानुसार भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 तर काँग्रेस 44 आणि उर्वरित अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. यामध्ये उल्लेखनीय म्हणजे भाजपचा जो आकडा 105 वर गेला आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपची ही एवढी स्वतःची ताकद नाही. भाजपची ताकद वाढण्यामागे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामधील फुटीर नेत्यांची भाजपला मिळालेली रसद हे प्रमुख कारण आहे. राष्ट्रवादीमधून तर भाजपला तीस ते पस्तीस आमदारांचे पाठबळ मिळाले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला जणू राष्ट्रवादी मुक्त करण्याचा विडाच उचलला होता. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे भक्कम पाठबळ आणि महाराष्ट्रात भाजपच्या आणि त्यातही मुख्यत्वेकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती एकवटलेली सत्ता यामुळे राष्ट्रवादीतील भलेभले नेते भाजपच्या आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाला गेले. राज्यातील, जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील राष्ट्रवादीची मोठी संस्थाने खालसा होऊन भाजपच्या गोटात डेरेदाखल झाली. शरद पवार यांनी उभे केलेले शिक्षण सम्राट, साखर सम्राट, सहकार सम्राट हीच खरी राष्ट्रवादीची पाळेमुळे होती. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीची ही पाळेमुळेच पूर्णतः उखडून टाकली. राष्ट्रीय राजकारण कोळून प्यायलेल्या शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याच्या डोक्यात यामुळेच धोक्याचा अलार्म वाजला.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांचा घोडा असा चौखूर उधळत राहिला तर एक दिवस बारामतीतही कमळाची शेती करावी लागेल हे शरद पवारांनी अचूक हेरले. मात्र, शत्रू चहूबाजूंनी तुटून पडलेला असताना, शत्रूने आपले एक एक मातब्बर सरदार धारातीर्थी पाडले असताना आणि शत्रू विजयाच्या अत्यंत समीप असताना त्याला चारी मुंड्या चित कसे करावे आणि स्वतःच्या विजयाची पताका कशी फडकवावी हे राजकारणात शरद पवार यांच्याकडून शिकावे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील पक्षीय बलाबल बघितल्यास दोन्ही पक्षाच्या सदस्य संख्यामध्ये केवळ दोनचा फरक आहे. शिवसेनेचे राष्ट्रवादीपेक्षा दोन आमदार अधिक निवडून आलेले आहेत. तसं बघायला गेल्यास शिवसेनेची ही दोनने वाढीव असलेली सदस्य संख्या शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या राजाच्या लेखी सहजगत्या दुर्लक्ष करण्यासारखी होती. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होती आणि आघाडीचे दोन्ही पक्षांची मिळून 98 आमदार निवडून आले होते. त्यामुळे पाच वर्षे सातत्याने भाजपकडून सत्तेत अवहेलना आणि अपमान पदरी पडलेल्या शिवसेनेला खिंडीत गाठणे पवारांना काही अवघड नव्हते. मात्र, आघाडीचा मुख्यमंत्री करायचा म्हणजे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घ्यावे लागले असते. मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादा पवार हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, तेच शरद पवार यांना नको होते. शेतात पेरणी, नांगरणी, पिकाची लागवड सर्व शरद पवारांनी करायचे आणि पीक आले की मात्र त्याच्यावर भलत्यानेच डल्ला मारायचा हा धोकाही शरद पवारांना पत्करायचा नव्हता. त्यामुळेच शरद पवारांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री का होऊ दिला हेही जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

- Advertisement -

शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि त्यातही मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नावासाठी शरद पवार हे आग्रही राहिले. वास्तविक उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते त्यामुळे शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई अशी तीन नावे चर्चेत होती. त्यातही संजय राऊत म्हणजे दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत शरद पवारांचे पट्टशिष्य म्हणूनच राजकीय वर्तुळात ओळखले जातात. तर दुसरे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे नेते व फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पाच वर्षे कॅबिनेट मंत्री होते. सुभाष देसाई हेदेखील शिवसेनेचे थिंक टँक व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय नेते म्हणून ओळखले जाणारे आहेत. मात्र, शरद पवार यांनी या तीनही नेत्यांच्या नावावर काट का मारली? आणि उद्धव ठाकरे यांच्याच नावाचा आग्रह मुख्यमंत्रीपदासाठी का धरला यामागेही शरद पवार यांचा विशिष्ट असा सत्तेचा पवार पॅटर्न आहे. संजय राऊत, एकनाथ शिंदे किंवा सुभाष देसाई हे प्रशासनात आणि राजकीय डावपेचांमध्ये मुरलेले होते. त्यांच्या तुलनेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाटी कोरी होती. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रातील सत्तेचे सर्वोच्च पद हाती आल्यानंतरदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपद्रवी ठरणार नाहीत आणि आपल्या कानाखाली राहतील याची पुरेपूर कल्पना शरद पवार यांना असल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होऊ दिले.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवारांच्या पवार पॅटर्नचे महत्व महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनाही आता चांगलेच कळून चुकले आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत, संयमी, मितभाषी आणि कमीतकमी अ‍ॅक्सेसिबल असल्यामुळे महाराष्ट्राचे सुपर मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांच्याच नावाचा बोलबाला आहे. शरद पवार यांचे जे स्थान ठाकरे सरकारच्या निर्मितीमागे आहे ते स्थान भाजपप्रणित सरकार महाराष्ट्रात आल्यास राहणार नाही हे पवार पूर्णपणे जाणून आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात पवारांचे पुन्हा मिशन बिगिन अगेन सुरू आहे. हे मिशन जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर त्यावेळची राज्यातील राजकीय स्थिती, केंद्रातील मोदी सरकारची स्थिती यावर शरद पवार हे भाजपबरोबर जातील की देशात व राज्यात स्वतंत्रपणे चालतील हे दिसून येईल. राष्ट्रपतीपदाची निवडणूक 2023 मध्ये आहे. त्यावरही बरेच काही अवलंबून आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -