देव (खरंच) भावाचा भुकेला?

खुद्द भगवद्गीतेमध्येच जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की, मी कणाकणात आणि चराचरात वसलो आहे, तेव्हा त्यांचा अर्थ जसा मी देवळातल्या, मंदिरातल्या, तीर्थस्थानातल्या, जागृत देवस्थानातल्या मूर्तींमध्ये वसलो आहे, तसाच मी तुमच्या घरातल्या देव्हार्‍यातल्या फोटो किंवा मूर्तीमध्ये देखील वसलो आहे, असाच आहे. पण तरी देखील देवस्थानं, तीर्थस्थानं या ठिकाणी जाण्यासाठी वाट्टेल तो आणि वाट्टेल तितका आर्थिक, शारीरिक आणि मानसिक आटापिटा करण्याची तयारी भक्तांची असते. मग भलेही आपण कोरोनाचे अगदी सहज लक्ष्य ठरू शकत असलो, तरी! देवाला भक्तांकडून अपेक्षित असलेल्या ‘भावा’ची आठवण झाली ती यानिमित्ताने!

तुका बैसला विमानी । संत पाहाती लोचनी । देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी नेला ।

संत तुकाराम महाराजांच्या गाथेतला हा अभंग ईश्वर आणि भक्त यांच्यात कशा प्रकारचे संबंध असू शकतात किंवा असतात, याचं अगदी यथार्थ चित्र आपल्यासमोर उभं करतात. पण आजपर्यंत खुद्द संत तुकाराम महाराज आणि इतर अनेक संतांच्या, हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ असलेल्या भगवद्गीतेच्या शिकवणुकीलाच नाकारण्याचं काम झाल्याचं दिसून आलं आहे. ‘देव भावाचा भुकेला’ या तीन शब्दांमध्ये देवाच्या आणि देवाच्या भेटीच्या नावाखाली आज सुरू असलेली थोतांडं आणि अंधश्रद्धा किती ‘स्वार्थिक’ आणि ‘आर्थिक’ आहेत, याचा सहज प्रत्यय यावा. खुद्द भगवद्गीतेमध्येच जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की, मी कणाकणात आणि चराचरात वसलो आहे, तेव्हा त्यांचा अर्थ जसा मी देवळातल्या, मंदिरातल्या, तीर्थस्थानातल्या, जागृत देवस्थानातल्या मूर्तींमध्ये वसलो आहे, तसाच मी तुमच्या घरातल्या देव्हार्‍यातल्या फोटो किंवा मूर्तीमध्ये देखील वसलो आहे, असाच आहे. पण तरी देखील देवस्थानं, तीर्थस्थानं या ठिकाणी जाण्यासाठी वाट्टेल तो आणि वाट्टेल तितका आर्थिक, शारीरिक आणि मानसिक आटापिटा करण्याची तयारी भक्तांची असते. मग भलेही आपण कोरोनाचे अगदी सहज लक्ष्य ठरू शकत असलो, तरी! देवाला भक्तांकडून अपेक्षित असलेल्या ‘भावा’ची आठवण झाली ती यानिमित्ताने!

खरंतर या लेखाचा प्रपंच कोणतंही आध्यात्मिक विश्लेषण करणं हा नाही. पण जेव्हा राजकीय किंवा सामाजिक हेवेदावे आध्यात्मिक किंवा धार्मिकतेच्या चौकटीत घुसखोरी करतात, तेव्हा त्यातले संबंध आणि ‘हित’संबंध यांवर चर्चा करणं क्रमप्राप्त ठरतं. तसंच ते आजही ठरलंय. त्याला कारण ठरलंय कोरोनाच्या अत्यंत संवेदनशील काळात मंदिरं, देवालयं, प्रार्थनास्थळं उघडण्यासाठी चाललेल्या अट्टाहासाचं. आणि हा अट्टाहास काही फक्त एखाद्या धर्मापुरता मर्यादित नसून जसा तो मंदिरांसाठी आहे, तसाच तो मशिदींसाठी आहे. जसा तो चर्चसाठी आहे तसाच तो इतर प्रार्थनास्थळांसाठी देखील आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपप्रणीत केंद्र सरकारने अनलॉकच्या विविध पातळ्यांपैकी एकीमध्ये देशातली सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं ‘कोरोना काळात आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि काळजी’ घेऊन उघडण्याची परवानगी दिली. यानंतर देशातल्या अनेक राज्य सरकारांवरदेखील विविध धार्मिक, सामाजिक संघटनांकडून, तिथल्या काही राजकीय पक्षांकडून प्रार्थनास्थळं उघडण्याची मागणी जोर धरू लागली. तशी ती महाराष्ट्रात देखील जोर धरू लागली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला मंदिरं उघडण्यासाठी अनिच्छा दाखवली. मात्र, हळूहळू दबाव वाढू लागल्यानंतर अखेर राज्य सरकारने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं उघडण्याची परवानगी दिली. अर्थात ‘आवश्यक त्या उपाययोजना आणि काळजी’ घेऊन! मग ते सॅनिटायझेशन असो, मास्क घालणं असो, सोशल डिस्टन्सिंग असो किंवा मग एका वेळी एका प्रार्थनास्थळामध्ये किती प्रमाणात भाविक येऊ शकतात, त्याची मर्यादा असो. पण या सगळ्याचा परिणाम जो इतर सेवा किंवा सुविधांना परवानगी देण्याविषयी व्हायचा, तोच झाला. 8 महिन्यांच्या विरहानंतर आपल्या देवाला भेटण्यासाठी भाविकांचा उत्साह आणि घाई अक्षरश: शिगेला पोहोचली.

अनेक प्रार्थनास्थळांमध्ये भक्तांनी तोबा गर्दी केली. कदाचित प्रत्यक्ष देवाच्याच दारी आल्यामुळे कोरोना आपलं काहीही बिघडवू शकणार नाही, या (अति)आत्मविश्वासात भक्तमंडळी असतील. पण गर्दी केली की कोरोनाची वर्दी येतेच, हे गेल्या वर्षभराच्या अनुभवातून महाराष्ट्रच काय, भारतच काय तर आख्ख्या जगानं नुसतं अनुभवलंच नाही, तर सहन देखील केलं आहे. जगभरात १४ लाख रुग्णांना कोरोनामुळे आपले जीव गमवावे लागले आहेत. हा लेख प्रकाशित होईपर्यंत त्यामध्ये अजून काही हजारांची भर पडलेली असेल. आणि १४ लाख हा नुसता आकडा ऐकायला छोटा वाटतो. पण १४ लाखांमध्ये १४ वेळा १०० हजार येतात. १०० हजारांमध्ये १० वेळा १० हजार येतात. १० हजारामध्ये १० वेळा १ हजार येतात. १ हजारामध्ये १० वेळा १०० येतात. १०० मध्ये १० वेळा १० येतात आणि १० मध्ये १० सजीव लोकांचे जीव गेलेले असतात. आता कदाचित गेल्या वर्षभरात जगानं गमावलेल्या १४ लाख जिवांच्या भीषणतेचा अंदाज यावा!

कदाचित हा अंदाज तितक्या गांभीर्याने न घेतल्यामुळेच अशा एक प्रकारे आत्महत्याच ठरणार्‍या मागण्या केल्या जात आहेत आणि त्या मान्यदेखील होत आहेत. त्यांच्यासाठी आंदोलनंदेखील केली जात आहेत. खरंतर प्रार्थनास्थळं उघडण्यासाठी जी कारणं दिली जात होती, त्यातलं सर्वात प्रमुख कारण हे सांगितलं जात होतं की यामुळे लोकांना या संकटकाळाच आधार मिळेल आणि त्यांच्यात संकटाचा सामना करण्याचा विश्वास निर्माण होईल. वरवर पाहता त्यामध्ये तथ्य वाटत असलं, तरी त्याचा कोणताही सिद्ध करता येण्याजोगा पुरावा अस्तित्वात नाही. हे विश्लेषण काहीसं नास्तिकत्वाकडे झुकत असलं, तरी कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीषण वास्तवात या प्रकारचं विश्लेषण प्रत्येक बाबतीत करणं आवश्यक आहे. प्रार्थनास्थळं उघडल्यामुळे तिथे जाणार्‍या, दर्शन घेणार्‍या किंवा प्रार्थना करणार्‍या भाविकांमध्ये अमुक प्रमाणात आत्मविश्वास वाढला किंवा तमुक प्रमाणात कोरोनाशी लढा देण्यासाठीची प्रतिकारशक्ती वाढली, याचं कोणतंही सिद्ध होऊ शकणारं प्रमाण मागणी करणार्‍यांना देता आलेलं नाही.

आता राहिला मुद्दा श्रद्धेचा. कारण मागणी करणार्‍यांनी या संपूर्ण गोष्टीला श्रद्धेचा मुलामा दिला. पण प्रार्थनास्थळांमध्ये गर्दीत आणि त्यात कोरोना होण्याच्या भयंकर शक्यतेमध्ये जाऊनच श्रद्धा जोपासली जाऊ शकते किंवा ईश्वराशी संवाद साधता येऊ शकतो किंवा कोरोनाविरोधात लढण्याचं बळ मिळू शकतं असं कोणत्याही धर्माच्या कोणत्याही धर्मग्रंथात लिहिलेलं नाही. त्याही पुढे जाऊन असाही दावा करता येईल, की इतर वेळी घरातल्या ज्या ईश्वराच्या प्रतिकृतीपुढे नतमस्तक होऊन भक्तिभावाने नमन केलं जातं, त्याला सोडून बाहेर मंदिरातल्या प्रतिकृतीपुढेच नतमस्तक होण्याचा अट्टाहास करणं म्हणजे घरातल्या ईश्वराचा अपमानच नाही का? बरं इतर वेळी अशा प्रार्थनास्थळांना भेटी देऊन दर्शन घ्यायला कुणाचीही ना असण्याचं कारण नाही. कारण धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. पण जेव्हा ही वैयक्तिक बाब सामूहिक किंवा सामाजिक आरोग्याच्याच मुळावर उठण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा व्यापक हिताचाच विचार करणं जास्त योग्य ठरतं.

कोरोना काळात प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी करणार्‍या भक्तांमुळे अशाच प्रकारे व्यापक सामूहिक किंवा सामाजिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. आणि हे तिथे जाणार्‍या भक्तांनाही माहीत नसेलच असं नाही. पण फक्त घराबाहेरच्याच ईश्वरासमोर नतमस्तक झालो, तरच ईश्वर आपलं ऐकेल आणि आपलं भलं करेल, या गैरसमजातून या अट्टाहासाला पाठिंबा दिला गेला आणि त्याचं समर्थन केलं गेलं.

राज्य सरकारने प्रार्थनास्थळं उघडण्याची परवानगी दिल्यानंतर ज्या पद्धतीने भाविकांनी तिथे गर्दी केली, ते पाहाता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची जी फक्त चर्चाच सुरू आहे, ती फार लांब आहे असं वाटत नाही. जगभरात आज अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. युरोपातल्या काही देशांना तर पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. आणि त्याला महत्त्वाचं कारण ठरलं लॉकडाऊन उघडल्यानंतर लोकांमध्ये हरवलेलं कोरोनाचं गांभीर्य आणि त्यातून त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना दाखवलेल्या वाटाण्याच्या अक्षता! आपल्याकडे अजूनही मंडळी मास्क तोंडावर कमी आणि दाढीवर जास्त ठेवतात. सोशल डिस्टन्सिंग वगैरे तर मिथ्या असल्याचंच आता वाटू लागलं आहे. दसरा-दिवाळीला बाजारपेठा तुडुंब भरून वाहू लागल्या होत्या. असं सगळं सुखेनैव सुरू असल्याचं पाहून कोरोनाही काही क्षण स्तब्ध झाला नसेलच, हे अजिबात शक्य नाही. त्यामुळे आता हातात थाळ्या आणि घंटा घेऊन कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला आवतण देण्याचीच तयारी आपण चालवलीये असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

राज्यातल्या ९ वी ते १२ वीचे वर्ग पुन्हा सुरू करायला नुकतीच शिक्षणमंत्र्यांनी परवानगी दिली. पण तिथेही स्थानिक परिस्थितीनुसार प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले. मुंबई महानगर पालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. मुंबईत अजूनही सर्वांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळालेली नाही. लग्न-समारंभांना अजूनही ५० ते १०० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा आहे. दिल्लीत रुग्ण वाढू लागल्यामुळे महाराष्ट्र सरकार मुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमानसेवा बंद करण्याच्या विचारात आहे.

जिथे एकीकडे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना होण्याची शक्यता कमी करण्यासाठी एवढा आटापिटा सुरू असताना दुसरीकडे प्रार्थनास्थळांना परवानगी देऊन या सगळ्यावर पाणी फेरण्याचीच तजवीज आपण लावून ठेवली आहे. कोरोनाच्या काळातही प्रार्थनास्थळी गेलो तरच देवाची कृपा होईल, असा ठाम विश्वास असणार्‍या भाविकांचा देव खरंच भावाचा भुकेला आहे का? असाच प्रश्न आता पडू लागलाय. कदाचित देवालाही हाच प्रश्न पडला असावा!