घरफिचर्समायमहानगर ब्लॉगजम्बो कोविड सेंटरने माणसं अक्षरशः तडफडून मारली! एक भीषण अनुभव!

जम्बो कोविड सेंटरने माणसं अक्षरशः तडफडून मारली! एक भीषण अनुभव!

Subscribe

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन झाल्यामुळे नागिरक मोठ्या अपेक्षेने तेथे जात होते. त्याच अपेक्षेने मी माझ्या नातेवाईकांना भरती करण्यासाठी गेलो. पण, तेथे गेल्यानंतर भयानक वास्तव समोर आले. याबाबतची थोडक्यात माहिती दुसऱ्या दिवशी फेसबुक आणि ट्विटरवर लिहीली पण… तोपर्यंत वेळ निघून चालली होती. मी, माझ्या डोळ्यांनी परिस्थिती पाहिली, अनुभवली. जम्बो कोविड सेंटरने माणसं तडफडून मारली… हेच म्हणेन. पत्रकार पांडुरंग रायकर आणि माझ्या नातेवाईक रजनी खेडेकर यांना खायला न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला….

३० ऑगस्ट २०२०:

- Advertisement -

नातेवाईकांचा फोन आला. अशक्तपणा जाणवतोय. पण, सर्दी, खोकला, थंडी ताप काही नाही. घरात लहान मुले आणि वयस्कर महिला असल्यामुळे त्यांना तपासणी करायला सांगितली. नायडू रुग्णालयात जाऊन तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णालयाने पुढील उपचारासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये नेणार असल्याचे सांगितले. काही वेळातच मी जम्बो सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबलो. रुग्णवाहिकेतून त्यांना आणण्यात आले होते. रुग्णवाहिका रुग्ण भरतीच्या ठिकाणी जाऊन थांबली अन् सुरू झाला मरण यातनेचा प्रवास…

वेळ सायंकाळी ४ ची…

- Advertisement -

रुग्णाच्या हातामधील फॉर्म घेतल्यानंतर रुग्णालयाच्या आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रचंड गोंधळ. कोणाला काही कळत नव्हते. रुग्णांचे नातेवाईक एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीत, दुसऱ्या खिडकीतून तिसऱ्या खिडकीत… कोणी काही सांगायला तयार नव्हते. सांगायला कोणी नव्हतेच म्हणा. काऊंटर जवळ असलेल्या मोकळ्या जागेत अनेक कोरोना बाधित रुग्ण पडलेले होते. कोणी विव्हळत होते. कोणी धापा टाकत होते. दोघांनी तर उपचारापूर्वीच तडफडून प्राण सोडला. डेटा एन्ट्री करणाऱ्यांना की-बोर्डवरील शब्दच सापडत नव्हते. समोरील व्यक्ती अक्षरशः हतबल होत होती. तब्बल दोन-अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर रुग्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. तोपर्यंत आमचा रुग्ण रुग्णवाहिकेत तसाच बसून होता.

एक टप्पा पार केल्याचे मोठे समाधान मिळाले. रुग्णाला आतमध्ये घेऊन जाण्याची परिक्षा सुरू झाली. रुग्णाला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी कोणी नव्हते. कोणी सांगायलाही तयार होत नव्हते. काय करावे समजत नव्हते. पीपीई कीट घातलेल्या व्यक्तीला हात जोडले. कृपा करून आमच्या रुग्णाला आतमध्ये घेऊन जा हो, खूप वेळ थांबलो आहोत…. यानंतर ते म्हणाले, ‘तुम्ही माझ्यासोबत रुग्ण घेऊन चला तुम्हाला बेड दाखवतो’. रुग्णासोबत चालत बेड असलेल्या वॉर्डमध्ये घेऊन गेलो. एका मोकळ्या बेडवर त्यांना आराम करायाल सांगितला आणि मी बाहेर पडलो. बाहेर पडत असताना इतर रुग्णांची अवस्था पाहावत नव्हती. पण, लक्ष द्यायला कोणी नव्हते….

वॉर्ड पासून संडास, बाथरूम काही अंतरावर. यावेळी प्रश्न पडला की, रुग्ण तेथपर्यंत जाणार तरी कसे? पण, दुसरी व्यवस्था असेल म्हणून विषय बाजूला केला. दुसरा प्रश्न पडला… रुग्णालयात प्रवेश देताना रुग्णाची कोणतीच माहिती विचारली नाही. अगोदर काही आजार आहेत का… वैगेरे, वैगेरे. मी तीन तासांनंतर थकून गेलो होतो. घरी जाण्याचा निर्णय घेतला. बाहेर आलो तर बाऊंसर थांबू देत नव्हते. लगेच बाहेर काढले. ठीक आहे. रुग्णावर चांगला उपचार होईल, या मोठ्या अपेक्षेने घरी गेलो. रुग्णाला संध्याकाळी फोन केला तर जेवण अतिशय नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या सकाळी नाश्ता आणि अगोदरच्या गोळ्या घेऊन पाठवतो म्हणून सांगितले.

३१ ऑगस्ट २०२० :

रुग्णाशी फोनवरून सातत्याने संपर्क सुरू होते. येथे कोणी लक्ष देत नाही, बाथरूम खूप लांब आहे. पाणी प्यायला नाही. वैगेरे-वैगेरे त्यांनी सांगितले. त्यामुळे एका पिशवीत सफरचंद, पूर्वीच्या गोळ्या आणि पाणी घेऊन रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नातेवाईक गेले. पण, तेथे बाऊंसर. बाऊंसर आत प्रवेश करू देत नव्हता. काही वेळानंतर कसाबसा प्रवेश मिळाला आणि काऊंटरजवळ जाऊन आमच्या रुग्णाला पिशवी देण्यास सांगितली. आमचा रुग्ण भूक-भूक, पाणी-पाणी करत होता. क्षणाक्षणाला आवाज खाली-खाली जात होता. दुपारी एक वाजेपर्यंत फोनवरून बोलणे सुरू होते. पण, तोपर्यंत त्यांच्यापर्यंत पिशवी पोहोचलीच नव्हती.

वेळ : दुपारी १.३० ची…

दुपारी एक वाजता रुग्णाने शेवटचा फोन घेतलेला. तोपर्यंत काही खायला मिळाले नव्हते. दीडनंतर फोन घेणे बंद केले. आम्ही विचार केला की पिशवीतील पदार्थ खाल्ल्यामुळे झोप लागली असेल. सातत्याने फोन करत होतो. पण, समोरून फोन उचलला जात नव्हता. नातेवाईक पुन्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. पण, आतमध्ये सोडले जात नव्हते. हतबल होऊन बाहेरच थांबले. काय करावे, काही कळत नव्हते….

वेळः सायंकाळी ७ ची…

रुग्णालयातून एक फोन आला. तुमच्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली आहे. आम्ही सर्वजण घाबरून गेलो. काही कळेनासे झाले. तात्काळ जम्बो कोविड सेंटर गाठले. पुन्हा बाऊंसर. त्यांना विनंती केली, हातापाया पडलो. मग त्यांनी प्रवेश दिला. आमची हतबलता वाढत चालली होती. पुन्हा आलेल्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला तर फोन लागत नव्हता. काऊंटरवर गेलो तर त्यांना काही माहीत नव्हते. कोणी काही सांगायला तयार नव्हते. हातापायातला त्राण क्षीण होत चालला होता. काही वेळानंतर पुन्हा फोन आला आणि कोठे आहात? अशी विचारणा केली. ठिकाण सांगितल्यानंतर त्यांनी भेटायला बोलावले. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी रुग्ण गेल्याचे सांगितले. पायाखालची मातीच सरकली… डोळ्या समोर अंधार उभा राहिला. आम्ही सगळे गोंधळून गेलो. काय करावे समजेनाच झाले. रडारड सुरू झाली. दुपारपर्यंत बोलत असलेला रुग्ण कसा जाऊ शकतो? प्रश्न पडला. पण… उत्तर नव्हते.

वेळः रात्री ९ ची…

डॉक्टर रुग्ण गेल्याचे सांगून पुढची प्रक्रिया करण्यास सांगून निघून गेले. पुढे काय करायचे? कोणी सांगायला तयार नव्हते. बाऊंसर सतत बाजूला जायला सांगत होते. एक तर रुग्ण दगावलेला. बाऊंसर थांबू देत नव्हते. कोणी माहिती देत नव्हते. काही-काही कळत नव्हते…. थोडा वेळ थांबा म्हणून सांगण्यात आले. एका कोपऱ्यात जाऊन बसण्याशिवाय पर्याय नव्हता. वेळ पुढे-पुढे सरकत होती. आमच्याप्रमाणेच इतर रुग्णांच्या नातेवाईकांचीही परिस्थिती होती. एक रुग्ण तर सकाळी दगावलेला पण रात्री साडेदहा पर्यंत कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. दुःखाचा डोंगर घेऊन ते तसेच बसलेले….

वेळः रात्री ११ ची…

मृत्यूचा दाखल घेण्यासाठी एडमिन विभागाच्या बाहेर थांबलो होतो. कोणीतरी आता येईल, जरा वेळात येईल याची वाट पाहात होतो. पण, कोणी येत नव्हते. हतबलता वाढत चालली होती. काही वेळानंतर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. तोडफोडीचा आवाज आला. तिकडे गेलो तर मोठा गोंधळ सुरू होता. आमचा चांगला रुग्ण गेलाच कसा? असा त्यांचा प्रश्न होता. चालत-बोलत असलेला रुग्ण गेल्यामुळे ते गोंधळ घालत होते. जोरजोरत शिव्या घालत होते. परिस्थिती हाताबाहेर चालली होती… परिस्थितीचा अंदाज येत चालला होता. रुग्णांचे उपचारांअभावी जीव जात असल्याचे लक्षात आले. आमच्याही रुग्णाचे तसेच झाले होते.

वेळः रात्री २ ची..

थांबून-थांबून थकलो होतो. कोणी काही सांगत नव्हते. संयम सुटत चालला होता. अखेर, एका बाऊंसरवर आम्ही सगळे धाऊन गेलो. त्याने अधिकाऱ्यांना बोलावतो म्हणून सांगितले. यानंतर काही वेळानंतर एक महिला अधिकारी आली आणि मृत्यूचा दाखला देते म्हणून सांगितले. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जाणवले की, या महिलेला मृत्यूच्या दाखल्याबाबत काहीच माहित नव्हते. त्यांना काही समजतही नव्हते. पण, काहीच पर्याय नव्हता. त्यांच्यासमोर डोके फोडून घ्यावे की काय असे वाटू लागले. पहिला फॉर्म पाहून त्या एक-एक शब्द लिहीत होत्या. त्यांच्या पेक्षा पहिली-दुसरीमधील मुले तरी वेगाने लिहितात. पण, करणार तरी काय? असा प्रश्न पडला. दीड तासानंतर त्यांनी एक पानाचा मृत्यूचा दाखला कसाबसा पूर्ण केला.

वेळः रात्री ३.३० ची..

मृतदेह कोठून ताब्यात घ्यायचा, याबाबत कोणी सांगायला तयार नव्हते. मृतदेह कोठे असतो, हे कोणी सांगत नव्हते. काही-काही कळत नव्हते. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे नातेवाईक फक्त इकडून-तिकडे फिरत होते. सांगायला कोणी-कोणी नव्हते. अखेर, माझ्या एका मित्राने धाडस करत रुग्ण शोधण्याचे ठरवले. त्यांचे नशिब बलवत्तर असेच म्हणावे लागले. त्यांच्या ओळखीच्या एकजण देवासारख्या भेटल्या. पण, मृतदेह कोणता आहे, हे माहीत नव्हते. काही वेळानंतर त्यांनी मृतदेह शोधून काढला. दोघांनी त्यांच्यासमोरच जीव सोडल्याचे बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितले. ऐकून वाईट वाटत होते. प्रचंड धावपळ करून पहाटे पाचच्या सुमारास मृतदेह कसाबसा मिळवला आणि निघालो… स्मशानभूमीकडे.

वेळः पहाटे ५.३० ची…

एका रुग्णवाहिकेतून मृतदेह कैलास स्मशानभूमीत पाठविण्यात आला होता. तेथे गेल्यानंतर नोंद करावी लागत होती. आमच्या आगोदर नंबर लागलेले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी एकची वेळ दिली. दुपारी दीडच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले आणि मरणयातना संपल्या…

जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांना नका हो पाठवू…

आमच्या रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेत असताना एका कर्मचाऱ्यासोबत ओळख झाली. त्यावेळी त्यांनी तुम्ही काय करता? असे विचारल्यानंतर पत्रकार असल्याचे सांगितले. तात्काळ त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, ‘तुम्हाला एक विनंती करतो दादा. काही तरी लिहा. येथे येताना रुग्ण चालत येतो आणि मृतदेह ताब्यात दिला जातोय. पाहवत नाही हो. येथे कोणी लक्ष देत नाही. तुमचा रुग्ण तर गेलाच पण इतर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जरूर लिहा. घरी मरण आले तरी चालेल पण येथे येऊ नका’, असे कर्मचारी सांगत होता.

पत्रकार पांडुरंग रायकर आणि माझ्या नातेवाईक रजनी खेडकर यांचा प्रशासनाने अक्षरशः जीव घेतला. शेवटपर्यंत त्यांना खायला मिळाले नाही. ही कोणती यंत्रणा? नागरिकांना उपचार मिळणार नव्हते तर का उभारणी केली? कशासाठी एवढा घाट? अनेक प्रश्न आहेत. पण, उत्तर देणार तरी कोण? आणि मिळणार पण नाही. सर्वसामान्य नागरिकांना तडफडून मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही… का हो… कदाचित गेलेल्या रुग्णांना कधीच न्याय मिळणार नाही… पुढच्यांनी तरी काळजी घ्यावी.


लेखक पुणेस्थित पत्रकार आहेत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -