घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसावरकरप्रेमासोबत भाजपचे ‘टार्गेट शिवसेना’ही !

सावरकरप्रेमासोबत भाजपचे ‘टार्गेट शिवसेना’ही !

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करून हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपचा रोष ओढवून घेतला आहे. राहुल यांच्या वक्तव्याची महाराष्ट्रभर दखल घेतली जाणे स्वाभाविक आहे. एखाद्या घटनेबाबत केलेल्या वक्तव्याच्या माफीशी सावरकरांचा काय संबंध, हे फक्त राहुल जाणोत. मात्र, त्यांच्यासारख्या राजकीय चेहर्‍याच्या मुखातील टीका सावरकरांची महती लोकांच्या विस्मृतीत टाकण्याइतपत प्रबळ नाही. तथापि, महाराष्ट्रात भाजपने सावरकरप्रेम अधोरेखित करण्यासाठी रण माजवले आहे. त्यानुषंगातून राहुल यांच्या नथीतून शिवसेनेवर तीर सोडण्याची भाजपची खेळी खेळण्याची भूमिका लपून राहिलेली नाही...

देशासमोर नानाविध समस्यांचा महापूर असताना पुन्हा एकदा हिंसारूपी परिस्थितीने डोके वर काढले आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुध्द ईशान्येकडील राज्यांमध्ये रण पेटले असताना दुसरीकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीमधील रामलीला मैदानावर झालेल्या ‘भारत बचाव’ रॅलीदरम्यान राहुल यांचे भाषण झाले. त्यादरम्यान त्यांनी ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर वाढत्या महिला अत्याचाराला अनुसरून ‘रेप इन इंडिया’ अशी संभावना करून देशातील सत्ताधार्‍यांविरोधात कठोर शब्दांत टिकास्त्र सोडले. राहुल यांच्या वक्तव्याने भाजपमधील महिला नेत्यांनी त्यांच्या माफीची मागणी केली. त्यासंदर्भात थेट संसदेतही आवाज उठवण्यात आला. तथापि, आपण मरण पत्करू पण माफीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच माफी मागायला आपण राहुल सावरकर नव्हे तर राहुल गांधी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करून हिंदुत्ववादी व भाजपेयींचा राग आणखीणच ओढावून घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर हा देशभरातील हिंदुत्ववाद्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्र ही तर त्यांची कर्मभूमी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर त्याची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे.

राहुल गांधी यांनी माफी मागण्याच्या उल्लेखादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव का घेतले, हा संशोधनाचा आणि निषेधाचा भाग आहेच. त्यांनी संबंधित वक्तव्याबाबत माफी मागावी, असा सुप्त मतप्रवाह देखील आहे. तो त्यांच्याच काँग्रेस पक्षात असला तरी नवल नाही. मात्र, राहुल यांच्या या वादग्रस्त विधानाचे भांडवल करून त्याचे राजकीय लाभ उठवण्याचे भाजपने प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे. राज्यात याआधी पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने हा मुद्दा भावनिक बनवून त्याविरोधात रण पेटवण्याचे धोरण स्वीकारले. इतिहासात डोकावल्यास स्वातंत्र्यवीर सावरकर हे निर्विवादपणे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील बिनीच्या नेत्यांपैकी एक राहिलेले सेनानी होत. ब्रिटिश आमदानीत त्यांनी भोगलेली जन्मठेपेची शिक्षाही त्यांच्या असीम त्याग आणि कार्यकर्तृत्वाची आठवण करून देते. म्हणूनच सावरकर हे कोणा एका सामाजिक घटकाचे अथवा राजकीय पक्षाचे अढळस्थान न राहता त्यांची सर्वव्यापी महती सर्वश्रुत आहे. तथापि, स्थापनेपासून हिंदुत्वाची माळ जपणार्‍या भाजपला सावरकर आमच्या पक्षाच्या विचारसरणीशी समीपता राखून असल्याचा वेळोवेळी साक्षात्कार होत असतो. आताही तसेच झाले.

- Advertisement -

राहुल यांच्या भाषणातील वादग्रस्त मुद्द्यावर माफीचा उतारा योग्य मानून भाजपने राज्यभर रणकंदन सुरू केले आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना भाजपने राहुल यांच्या माफीनाम्याचा मुद्दा पुढे करून राजकीय उष्मा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भाजपला सावरकर यांच्याप्रती असलेले प्रेम समजण्याजोगे असले तरी यानिमित्त हिंदुत्व हा श्वास मानणार्‍या मात्र, सत्तेच्या साठमारीत काँग्रेससोबत सलगी केलेल्या शिवसेनेला यानिमित्त कसे कोंडीत पकडता येईल, याकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा अधिवेशनाच्या नमनाच्या दिवशी नागपूरमध्ये त्याचे पडसाद उमटले. राहुल यांनी सावरकरांच्या नावाची खिल्ली उडवली, यासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय अशी मागणी करीत भाजपने हल्लाबोल केला. शिवसेनेने याआधी सावरकर यांच्याप्रती असलेली निष्ठा अधोरेखित करून मूठ सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. राहुल यांनी सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ वाचल्यास त्यांना स्वातंत्र्यवीरांच्या कार्याची महती कळेल, असा डोस पाजत पक्षनेते संजय राऊत यांनी महाआघाडीत असलो तरी स्वत:चे विचार स्वतंत्र असल्याची एकप्रकारे ग्वाही देण्याचा प्रयत्न केला. राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी करणार्‍या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत बचावात्मक पवित्रा घेणे गरजेचे असल्याने त्यांनी तसे केले असावे.

मुळात एखाद्या वक्तव्यावर माफी मागण्याशी सावरकरांचा संबंध जोडण्याची राहुल यांना दुर्बुध्दी सुचली का, असा सवाल काँग्रेसमधील ‘थिंक टँक’ करीत असल्यास नवल नाही. राहुल यांचे बोलणे पूर्वग्रहदूषित आणि सावकरद्वेषाची अनुभूती देणारे तर नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला तरी आश्चर्य वाटू नये. सावरकर यांच्याबद्दल अनुद्गार काढण्याची काँग्रेस नेतृत्वाकडून ही पहिली वेळ नाही. २००४ मध्ये डॉ. मनमोहनसिंग सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्रिपदावरील मणिशंकर अय्यर यांनी अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये असलेल्या सावरकरांच्या काव्यपंक्ती हटवण्याचा हटवादी निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात तेव्हा भाजपपेक्षा दोन पावले पुढे राहून शिवसेनेने रान पेटवले होते. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या शिवसेनेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांनी अय्यर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारल्याचे उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. ती पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाजपने हाती आलेल्या मुद्द्यावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याचे धोरण राबवले. त्यासाठी रस्त्यावर येण्यासोबतच विधिमंडळाला रणभूमी बनवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना हा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला जाऊन त्याला हिंदुत्वाचा विसर पडत चालल्याचा भाजपने आक्षेप ठेवला आहे. स्वातंत्र्यवीरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही सावरकरांचा अवमान करणार्‍यांना जोड्याने मारायला हवे, असे आवाहन करून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गतकालीन आंदोलनाचे स्मरण करून दिले. राहुल यांच्याविरोधातील आंदोलनाचा आवाज अजून किती दिवस ऐकू येतो, हे येणारा काळ ठरवणार आहे.

- Advertisement -

मुळात, तात्विक अंगाने बघायला गेले तर सावरकरच काय कोणत्याही राष्ट्रपुरुष अथवा महनीय व्यक्तीविरोधात बोलून, त्यांची निंदानालस्ती करून, पुतळ्यांची विटंबना करून संबंधित विभूतीबाबत समाजमनाचा आदर यत्किंचितही कमी होत नाही. याआधी घडलेल्या अनेक घटनांनी ही बाब सिध्द केली आहे. कारण त्या-त्या व्यक्ती कधीकाळी आपापल्या विचारांचा, कर्तृत्वाचा ठसा उमटवून गेल्या असल्याने त्यांचा विचार संपवणे कोणासही अशक्य आहे. म्हणून एखाद्याने वादग्रस्त वक्तव्य करून ती विभूती लोकांच्या विस्मरणात जाणे अथवा त्यांचा विचाररूपी ठेवा लोप पावणे कल्पनेपलीकडे असते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची थोरवी ना राहुल यांच्या टीकेने अस्पष्ट होणार आहे ना ती तशी मणिशंकर यांच्या काव्यपंक्ती हटवण्याच्या निर्णयाने कधी झाली. राहुल यांना अशा वादग्रस्त वक्तव्यातून काहीही हाती लागणार नसल्याने भाजप अथवा तत्सम हिंदुत्ववादी संघटनांनी त्याचे विनाकारण भांडवल करू नये. केवळ निषेध करायला हरकत नाही. मात्र, त्यामुळे शिवसेनेला खिंडीत पकडून विधिमंडळाचे कामकाज रोखण्यात भाजपची ऊर्जा खर्ची पडत असेल तर मात्र तेच सामान्यजनांच्या मनातून उतरण्यास अवधी लागणार नाही. एखाद्या मुद्याची चर्चा किती करायची, तो कितपत ताणायचा याला लक्ष्मणरेषा असायला हवी, हे सर्वच राजकारण्यांना सांगण्याची आता वेळ येऊन ठेपली आहे.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारपुढे समस्या आणि आव्हानांचा ढीग पडला आहे. सुदैवाने आज विरोधात असलेल्यांना राज्याबाबतचे वास्तव इत्थंभूत ज्ञात आहे. परिणामी, राज्याच्या भल्यासाठी एकत्र येण्याची वैचारिक प्रगल्भता सत्ताधारी व विरोधक दाखवतील, असा सामान्यांचा आशावाद आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर, उद्योगांची विपन्नावस्था, बेरोजगारी, अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेली पिके व तद्नुुषंगिक मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था या सर्व बाबींची तड लावण्यासाठी सत्ताधार्‍यांची कटिबद्धता जशी गरजेची आहे, तशीच रचनात्मक भूमिका विरोधकांनी निभावणे व्यापक हिताचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या कार्याची महती कोणा राहुल गांधी यांच्या टिकेने खुजी होण्याचे कारण नाही. मात्र, त्यामधून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न दुर्दैवी म्हणण्यापलीकडे असू शकत नाही. यानिमित्त असा लाभ उठवण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्वच घटकांना सुबुद्धी लाभो, एवढीच अपेक्षा !

सावरकरप्रेमासोबत भाजपचे ‘टार्गेट शिवसेना’ही !
Milind Sajgurehttps://www.mymahanagar.com/author/milind-sajgure/
Resident Edior, Nashik Edition, Aaple Mahanagar
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -