Blog: रामदेव बाबांचे औषध आणि इम्यूनिटीची दुकाने

कोरोनाशी लढण्यासाठी एकतर इम्यून सिस्टीमला प्रशिक्षित केले पाहिजे. हे प्रशिक्षण केवळ लसीकरण अथवा इन्फेक्शन याच दोनच गोष्टींनी शक्य आहे. नुसती इम्युनिटी वाढवणे म्हणजे काय? कोरोना उपचारामध्येमध्ये त्याचे स्थान काय? याबद्दल काही बेसिक माहिती तरी या इम्यूनिटीच्या दुकानदारांना आहे काय?

Mumbai
Ramdev Babas patanjali corona medicine
प्रातिनिधिक छायाचित्र

बाबा रामदेव यांचे कोरोनावरील औषध इम्युनिटी बूस्टर आहे म्हणून सांगितले जाते. इम्युनिटी बूस्टर म्हणजे रोग-प्रतिकार क्षमता वाढवणारी औषधे. व्हिटामिन विकणाऱ्या परदेशी फार्मा कंपन्या, होमिओपाथी, जडी बुटी, आयुर्वेद या साऱ्यांनी सध्या इम्युनिटी बूस्टरची दुकाने उघडली आहेत. जणू काही हेच कोरोनावरचे औषध असा प्रचार सुरु आहे. हा प्रचार चुकीचा आहे. कोरोनाच्या भीतीचा गैरफायदा घेऊन केलेला लबाडीचा धंदा आहे, हे लक्षात आणून देण्यासाठी हा लेख लिहीत आहे.

कोरोना मुळे घडणारे मृत्यू हे मुख्यतः प्रतिकारशक्तीचा अतिरेक झाल्यामुळे घडत आहेत. व्हायरसने झालेले आजार आपली रोगप्रतिकारशक्ती बरी करत असते. ती रोगप्रतिकार शक्ती जरा जास्त खवळली तर अपाय होऊ शकतो. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे रोगप्रतिकार शक्ती खवळते आहे आणि त्या खवळलेल्या इम्युनिटीमुळे कोरोना पेशंट मरत आहेत. इथे पेशन्टच्या मृत्यूचे मुख्य कारण अती वाढलेली प्रतिकारशक्ती आहे. सबब रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, हा कोरोना वरील सरळधोपट उपचार नव्हे, हे आधी नीट समजून घ्या.

माणसाला दोन प्रकारच्या इम्युनिटी – प्रतिकार शक्ती असतात. एक अनुभवाने शरीर शिकते ती (Acquired) आणि दुसरी (Innate) जन्म सिद्ध रोगप्रतिकारक शक्ती. कोरोना आणि त्यावरील लसीबद्दल बद्दल विचार करताना (Acquired) अनुभवजन्य रोगप्रतिकार शक्ती अधिक महत्वाची आहे. ही अतिशय चलाख सिस्टीम आहे. जुन्या अनुभवातून ती अधिक शिकत शहाणी होत जात असते.

उदाहरणार्थ गालगुंड, कांजिण्या यासारखे आजार लहानपणी एकदाच होतात. पुन्हा होत नाहीत कारण त्याच्याशी लढायला इम्युनिटी प्रशिक्षित झालेली असते.

पोलियोची लस म्हणजे काय असते? पोलियोचे मेलेले किंवा बिनविषारी केलेले व्हायरस म्हणजे पोलियोची लस. हे पोलियोचे मरतुकडे व्हायरस आपण आपल्या पोरांना लसीकरण म्हणून खाऊ घालत असतो. बाळाची अल्पशिक्षित इम्युनिटी अशा मरतुकड्या व्हायरसचा फन्ना क्षणात उडवते. पण त्याहून महत्वाचे म्हणजे या व्हारसला कसे हाणायचे? ते जन्मभर लक्षात ठेवत असते. लसीकरण हे एक प्रकारचे इम्युनिटीला दिलेले प्रशिक्षण आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी एकतर इम्यून सिस्टीमला प्रशिक्षित केले पाहिजे. हे प्रशिक्षण केवळ लसीकरण अथवा इन्फेक्शन याच दोनच गोष्टींनी शक्य आहे. नुसती इम्युनिटी वाढवणे म्हणजे काय? कोरोना उपचारामध्येमध्ये त्याचे स्थान काय? याबद्दल काही बेसिक माहिती तरी या इम्यूनिटीच्या दुकानदारांना आहे काय?

रोग प्रतिकार शक्तीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तिचा आप – पर भाव. स्वत:चे कोण? आणि परके कोण? हे इम्युनिटी ओळखू शकते. लक्षात ठेऊ शकते. रेल्वेत जसा तिकीट तपासणारा टीसी असतो तसा टीसी प्रतिकारशक्तीकडे पण असतो. शरीरातील कोणती गोष्ट स्वकीय आहे? कोणती परकीय आहे? याची सतत तपासणी चालू असते. जे परकीय वाटेल त्याच्यावर हल्ला केला जातो. हा हल्ला केमिकल किंवा प्रत्यक्ष असतो. प्रत्यक्ष हल्ल्यात पोलीस पेशी जाऊन परकीय ब्याक्टेरिया खाऊन टाकतात आणि पचवतात. मग ढेकर देतात.

टिसी आणि पोलीस हे रोगप्रतिकार शक्तीचे महत्वाचे भाग आहेत. काही पोलीस स्वतः जाऊन परकीयांना अक्षरश: खाऊन टाकतात. काही पोलीस गोळी मारतात. त्याला अँटीबॉडी असे म्हणतात. हा एक केमिकल रेणू आहे. कोणत्या प्रकारचा शत्रू कोणत्या गोळीने मरतो? हे इम्युनिटी लक्षात ठेवत असते. हे लक्षात ठेवण्याचे काम एका कारकून पेशीकडे दिलेले असते. रोगावरचा उपाय लक्षात ठेवणारे कारकून, आपला कोण? आणि घुसखोर कोण? ते ठरवणारे टीसी आणि प्रत्यक्ष हल्लाबोल करणारे पोलीस असे मानवी रोग प्रतिकार शक्तीचे महत्वाचे तीन भाग आहेत.

इम्युनिटी खवळणे हा अतिशय गंभीर प्रकार आहे. ते पोलिसांचे बंड आहे. हि खवळलेली इम्युनिटी विविध प्रकारची शस्त्रे घेऊन स्वतःच्या शरीरावरच हल्ला करते. त्यात मृत्यू येऊ शकतो. कोरोना व्हायरस काही पेशन्टची इम्युनिटी (वाढवतो ) खवळवतो आहे. या वाढीव इम्युनिटी मुळे पेशन्ट मरत आहेत.

इम्युनिटीने जर योग्य प्रमाणात हल्ला केला तर इन्फेक्शन जाते आणि माणूस बरा होतो. कोरोनाचे ८० टक्के पेशन्ट माईल्ड लक्षणे दाखवणारे आहेत. याचा अर्थ त्यांची इम्युनिटी बरोबर काम करते आहे. जर त्यांची इम्युनिटी खवळली तर त्याच पेशण्टचा मृत्यू होऊ शकतो. या इम्युनिटी खवळलेल्या पेशन्टसाठी स्टिरॉइड औषधे परिणामकारक ठरत आहेत. ही स्टिरॉइड औषधे इम्युनिटी कमी करणारी औषधे म्हणून ओळखली जातात. आता अशा खवळलेल्या इम्यूनिटीत – इम्युनिटी बूस्टर देणे म्हणजे काय? हे बूस्टर कोणत्या प्रकारच्या पेशींवर काम करतात – याची कोणतीही माहिती या इम्यूनिटीच्या दुकानदारांना नाही. ही बूस्टर औषधे शास्त्रशुद्ध क्लिनिकल ट्रायल मध्ये तपासलेली नाहीत. त्याबद्दल काही माहिती नसताना कोरोना विजयाचे दावे करणे हा गुन्हा आहे. लुबाडणूक आहे.

सबब इम्युनिटी बूस्टर हा रामबाण उपाय नाही. क्लिनिकल ट्रायल केल्याशिवाय इम्युनिटी बूस्टरचे साईड इफेक्ट्स कळणार नाहीत. या औषधाने जर इम्युनिटी खवळत असेल तर पेशण्टचा जीव जाण्याचा धोका आहे.

दुसरा मुद्दा क्लिनिकल ट्रायलचा. रामदेव बाबानी ४० लोकांवर क्लिनिकल ट्रायल केल्याचा दावा केला आहे. हा आकडा अतिशय अपुरा आहे. संख्याशास्त्र विज्ञान वापरून किती पेशन्ट वर क्लिनिकल ट्रायल घ्यायची ते ठरवले जाते. औषधाच्या मानवी चाचणीतील शेवटच्या टप्प्यात हजारो पेशन्ट घ्यावे लागतात. रामदेव बाबाने ४० घेतले. म्हणजे ही ट्रायल स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स दाखवणार नाही. संख्याशास्त्रीय दृष्ट्या या ट्रायलचे निष्कर्ष खरे मानता येणार नाहीत.

त्याहून मोठी लबाडी म्हणजे बाबाने माईल्ड कोरोना पेशन्टवर ट्रायल घेतली आहे. हे पेशन्ट कोणत्याही मेजर उपचाराशिवाय आपोआप बरे होतात. त्यांना बूस्टर देऊन दाखवणे ही धूळफेक आहे. बाबाच्या क्लिनिकल ट्रायलचे डिजाईन फसवे आहे. हजारो निरोगी लोकांमध्ये हे बूस्टर देऊन त्यातले किती पेशन्ट कोरोनामुळे बाधित होत नाहीत? हे पाहिले पाहिजे. कोरोना लसीच्या चाचण्या याच प्रकारे होत आहेत. बाबाने हे केलेले नाही. बाबाच्या ट्रायल शास्त्रीय दृष्ट्या सदोष आहेत. त्यावरून कोरोनावर उपचार सापडल्याचा दावा करणे ही शुद्ध लबाडी आहे.

तात्पर्य :

१) स्वतःच्या इम्यूनिटीची काळजी घ्यायची असेल तर सकस आहार, भरपूर पाणी, Multivitamin जीवनसत्वाची एखादी गोळी आणि ३० मिनिटे व्यायाम हे आवश्यक आहे. लबाडीचे दावे करण्यापेक्षा रामदेव बाबानी अजून चार योगासने करायला सांगितली असती – तर त्याचा खूप फायदा कोरोना साथ आटोक्यात आणायला झाला असता. पतंजली ट्रस्टचे उत्पन्न फुगायला नव्हे.

२) मोठ्या फार्मा कम्पन्या लबाड्या करतात का? तर होय. अनेक करतात. त्यावर उपाय म्हणजे या कंपन्यावर अधिक निर्बंध आणणे. नवीन कायदे काळजीपूर्वक बनवणे. बाबाच्या लबाडीला मोकळे रान देणे नाही. एक चूक दोन लोकांनी करणे म्हणजे न्याय नाही.

३) इम्युनिटी बूस्टर ची उपयुक्तता सिद्ध झालेली नाही. या गटातली अनेक औषधे कोरोनात घातक ठरू शकतात. बाबा रामदेव यांनी त्यांची औषधे शास्त्रीय दृष्ट्या तपासलेली नाहीत. क्लिनिकल ट्रायल सदोष आहेत. कोरोनाच्या भीतीचा गैरफायदा घेऊन, अशा औषधांचा बाजार मांडणे हा सामाजिक गुन्हा आहे. फसवणूक आहे. ठाकरेंचे महाराष्ट्र सरकार आणि मोदींचे केंद्र सरकार या दोघांनीही बाबाच्या दाव्यांना चाप लावला ते बरे झाले.


लेखक – डॉ. अभिराम दिक्षीत, एम.डी

लेखकाची माहिती – प्रस्तुत लेखक गेली दहा वर्षे क्लिनिकल ट्रायल, त्याचे डिझाईन, नवीन औषधनिर्माण शास्त्रात कार्यरत आहे. युरोप अमेरिका भारत चीन मल्टीनेशनल फार्मा कंपन्यांचा मेडिकल एडव्हायझर म्हणून काम केले आहे. लेखकाच्या कामाचा मुख्य मुद्दा क्लिनिकल ट्रायल किंवा औषध निर्माण शास्त्रात फार्मा कंपन्यानी केलेल्या चुका शोधून दाखवणे हा आहे.