घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकोरोनाच्या दुसर्‍या लाटेपासून सावधान

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेपासून सावधान

Subscribe

नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. युरोपीय देशांमध्ये आधीच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धडक दिली आहे. भारतातही दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असल्यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला. मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येत मुंबई टॉपला आहे. दुसरी लाट टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षिततेचे उपाय अवलंबून सावधानता बाळगावी लागेल.

17 नोव्हेंबर रोजी कोरोना नावाच्या विषाणूचा जन्म होऊन एक वर्ष झाले. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर जगाला या नव्या विषाणूची माहिती मिळाली. आधी चीनची निर्भत्सना करुन झाल्यानंतर हळूहळू यावर्षीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत जगभरातील अनेक मोठ्या देशांमध्ये कोरोनाने हात-पाय पसरले होते. भारतात 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. 14 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा कहर संपले अशी भाबडी समजूत आपण करुन बसलो आणि पुढचे जवळपास 8 महिने कित्येक भारतीय घरीच बसून आहेत. पण तो कोरोना काय कमी झाला नाही. ऑक्टोबरपासून नव्या रुग्णांच्या निदानात घट झाली असली तरी आता नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. युरोपीय देशांमध्ये आधीच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धडक दिली आहे. भारतातही दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असल्यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला. मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येत मुंबई टॉपला आहे. त्यातच आता दुसर्‍या लाटेच्या बातमीने ‘भय इथले संपत नाही’ या कवी ग्रेस यांच्या कवितेची आठवण होऊन अंगावर काटा उभा राहतो.

या विषयाचा उहापोह करण्याआधी कोरोनाची दुसरी लाट म्हणजे नेमकं काय? हे आधी समजून घ्यायला हवं. पहिल्या लाटेत विषाणू लोकसंख्येतील एका गटाला आपली शिकार बनवतो. एखाद्या विशिष्ट भागातील लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग पसरतो. दुसर्‍या लाटेत विषाणू लोकसंख्येच्या दुसर्‍या गटावर आक्रमण करतो. दुसरी लाट ही शक्यतो लॉकडाऊन खुला झाल्यानंतर आल्याचे जगभरातील उदाहरणांवरुन दिसून येत आहे. आधी लॉकडाऊनमध्ये घरी थांबलेले आणि सर्व नियमांचे काटेकोर पालन करणारे लोक जेव्हा लॉकडाऊन उघडल्यानंतर बाहेर पडतात, तेव्हा त्यांना विषाणूचा संसर्ग होतो. तरीही अद्याप दुसर्‍या लाटेची दाहकता किती असू शकते, याबाबत निश्चित असा अंदाज लागलेला नाही.

- Advertisement -

भारताचे राष्ट्रीय कोविड 19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के पॉल यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसंबंधी भाष्य करताना सांगितले की, भारतात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. मात्र मागच्या काही महिन्यांमध्ये आरोग्य व्यवस्थेवर आपण चांगले काम केले असल्यामुळे दुसर्‍या लाटेत मृत्यूदर कमी राहू शकतो. युरोप आणि अमेरिकामध्ये दुसर्‍या लाटेचे परिणाम पाहायला मिळाले आहेत. कोरोना विषाणूची प्रवृत्ती ही थंड वातावरणात अधिक काळ जिवंत राहण्याची आहे. त्यामुळे भारतात थंडीचा कहर वाढल्यानंतर कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. उलट पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट मोठी असू शकते, असे पॉल यांचे म्हणणे आहे. थंडीच्या दिवसांत लोकांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात कोरोनाचा प्रसार जेवढा अंदाज व्यक्त झाला होता, तेवढा वाढला नाही. मात्र दिवाळीच्या दरम्यान कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढला. यापुढे सार्वजनिक समारंभ कमी व्हायला हवेत, असे पॉल यांचे म्हणणे आहे.

पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या सेंटर फॉर कंट्रोल ऑफ क्रॉनिक कंडीशन्सचे संचालक डॉ. प्रभाकरण दुरैराज यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेबाबत बोलताना सांगितले की, थंडीच्या दिवसांत सर्वच संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होते. त्यात सार्स-कोविड हा विषाणू उन्हाळ्यातदेखील पसरला होता. त्यात आता जगातील इतर देशांमध्ये थंडीच्या दिवसांतच कोरोनाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे थंडीत भारतातही दुसरी लाट येऊ शकते. डॉ. प्रभाकरण यांनी दावा केल्याप्रमाणे दिल्लीत प्रदूषण आणि थंडीचा कहर वाढल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये देखील प्रचंड वाढ दिसून येत आहे.

- Advertisement -

दुसरी लाट नेमकी का येते? याबाबत एम्सचे डॉक्टर रंदिप गुलेरिया यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. पहिल्या लाटेत जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत जाते. तेव्हा लोक आपोआपच कोरोनासंबंधीचे नियम पायदळी तुडवायला सुरुवात करतात. लोकांमध्ये एकप्रकारचा निष्काळजीपणा येतो आणि त्याचवेळी विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढतो. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी गुलेरिया यांनी 1918 साली पसरलेल्या स्पॅनिश प्लू महामारीचे उदाहरण दिले आहे. तेव्हा देखील लोकांनी पहिल्या लाटेनंतर सुरक्षेचे उपाय सोडून दिल्यानंतर पुन्हा एकदा साथ पसरली होती. त्यामुळे यावेळीदेखील मास्क, सोशल डिस्टसिंग आणि इतर खबरदारीचे उपाय सोडून दिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे गुलेरिया यांचे मत आहे.

जगभरात आतापर्यंत 5 कोटी 67 लाख लोकांना कोरोना संसर्ग झालेला आहे. तर साडे तेरा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताबाबत बोलायचे झाल्यास 89 लाख लोकांना कोरोनाची लागण झालेली असून त्यापैकी 1 लाख 31 हजारजणांचे मृत्यू झालेले आहेत. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 17 लाख 57 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 46 हजार मृत्यू झाले आहेत. सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यामुळे दुसर्‍या लाटेचा अधिक धोका महाराष्ट्राला बसू शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात अनलॉक अंतर्गत आता हॉटेल्स, मॉल्स, थिएटर, जिम, सर्व कार्यालये आणि प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आलेली आहेत. लोकल वगळता सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खुली करण्यात आलेली आहे. कोरोना संक्रमणाचे सुरुवातीचे काही महिने ज्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात होते, ते आता पाळणे अशक्य वाटू लागले आहे. लोकांमध्ये सुरुवातीच्या काळात जी कोरोनाबाबत भीती होती, ती आता उरलेली नाही. हे दिसून येत आहे.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने भारताच्या अर्थव्यवस्थेचे अक्षरशः कंबरडे मोडले. केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज देऊन या परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापार्‍यांना बसलेला आर्थिक फटका, बुडालेले रोजगार, मध्यम वर्गीयांच्या बचतीला लागलेली गळती, वाढलेली महागाई या समस्या पुढील काळात देखील ज्वलंतच राहणार आहेत. त्यात दुसरी लाट आल्यानंतर जर पुन्हा लॉकडाऊन करावे लागले, तर ते कुणालाही परवडण्यासारखे नाही. आज अशी परिस्थिती आहे की, लोकांना दुसर्‍या लाटेची भीती वाटत नाही, मात्र दुसरे लॉकडाऊन झाल्यास अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्र दुसर्‍या लाटेसाठी सज्ज आहे. आरोग्य व्यवस्थेपासून औषधे यांचा पुरवठा पुरेसा केलेला आहे. कोरोना चाचणी देखील अतिशय रास्त दरात होत आहे. त्यामुळे दुसरी लाट जरी आली तरी त्याला तोंड देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतात कोरोनाची दुसरी लाट नक्की येणार का? कडाक्याच्या थंडीत विषाणू काय रंग दाखविणार? याबाबत आरोग्य क्षेत्रातदेखील मतमतांतरे आहेत. सरकार आपल्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न करेलच. पण लोकांनीही आता स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्ये हल्ली मास्क वापरणे बंद झाले आहे. फेरीवाले, दुकानदारदेखील विना मास्क दिवसभर व्यवसाय करतात. त्यामुळे जर दुसर्‍या लाटेचा संसर्ग झाला तर कोरोनाचा स्फोट होऊ शकतो. पहिल्या लाटेनंतर कोरोना कितपत आरोग्याला त्रास देतो, हे एव्हाना सर्वांना कळलं आहेच. कोरोनाचा मृत्यूदर हा 2-3 टक्क्यांच्या आसपास असला तरी त्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतात, हे विसरुन चालणार नाही. जर पुन्हा लॉकडाऊन झाला तर आधीच पगारात कपात त्यात कोरोनाची दुसरी लाट हे सामान्यांचे जगणे मुश्किल करु शकते.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -