घरफिचर्समायमहानगर ब्लॉगबाळासाहेब परत या...

बाळासाहेब परत या…

Subscribe

शिवसेना जरी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी हट्टाहास करत असेल, त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रयत्न करत असेल, तरी शिवसेनेला त्या मुख्यमंत्रीपदाचा वापर करून हिंदुत्वाचे धोरण कदापि राबवता येणार नाही. कारण प्रत्येक वेळी शिवसेनेला कायम धर्मनिरपेक्ष विचारांचे अवडंबर माजवणार्‍या दोन्ही काँग्रेसला शिकस्त द्यावी लागणार आहे आणि प्रत्येक वेळी आपला सत्तेचा डोलारा कोसळेल की काय, या भीतीपोटी शिवसेनेला दोन्ही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष, अल्पसंख्याकांचे हित जोपासणे या अजेंडाभोवती पिंगा घालावा लागणार आहे. यात भाजपने आता सत्तेचा हट्टाहास खुशाल सोडून द्यावा आणि शिवसेनेला तिच्या अवस्थेवर सोडून द्यावे. तटस्थ होऊन एका हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाला धर्मनिरपेक्ष पक्ष कसे गिळंकृत करतात, हे पाहून त्यातून बोध घ्यावा. शेवटी केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत आहे. अजून साडेचार वर्षे बाकी आहेत. भाजपचे तसे काहीच नुकसान होणार नाही, भाजपकडे अजून बराच वेळ आहे. शिवसेनेची मात्र होत असलेली वैचारिक वाताहात पाहून हिंदू म्हणून ‘परत या...परत या...बाळासाहेब परत या...’असे म्हणावेसे वाटते.

17 नोव्हेंबर 2012 हा दिवस अवघ्या मराठी माणसासाठीच नव्हे, तर हिंदूंसाठी दु:खाचा दिवस होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. एक सामान्य व्यक्तिमत्त्व मात्र मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्वत:च्या भौतिक सुखाचा त्याग करून समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची केले. शिवसेना नावाची संघटना बांधली, ती वाढवली, गुंडगिरी, दादागिरी करण्यात तारुण्य वाया घालवणार्‍या लाखो तरुणांना विधायक कार्याच्या दिशेने संघटित केले. आपल्या संपूर्ण आयुष्यात व्यंगचित्रकार, पत्रकार, संपादक, शिवसेना पक्षाचे संस्थापक, नेता आणि अखेर हिंदुहृदयसम्राट म्हणून अखिल हिंदूू धर्मीयांसाठी वंदनीय व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेब अवघ्या जगाला ज्ञात झाले. शिवसेना हे त्यांचे व्रत होते, जे त्यांनी आयुष्यभर अंगिकारले. राजकारणात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आणि विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत अनेकदा मातोश्रीमध्ये एकत्र बसून जेवण केले, मात्र राजकारणात राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा विचारही बाळासाहेबांच्या मनाला शिवला नाही किंबहुना त्यांनी तसे कधीच न करण्याचा निश्चय केला होता.

प्रखर हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद याला बाळासाहेबांनी त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक जीवन हे घट्ट बांधून ठेवले होते. त्यामुळेच कोणताही सामाजिक प्रश्न असो, विविध राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या विचारसरणीनुसार त्यांची भूमिका मांडत, मात्र त्या प्रश्नावर हिंदुत्वाचा विचार काय असावा, हे केवळ बाळासाहेब सांगत असत. ती भूमिका मांडल्यानंतर मात्र अवघ्या देशात खळबळ माजत असत. कारण स्वातंत्र्यकाळापासून या देशात कोणताही सामाजिक प्रश्न निर्माण झाला की, त्यावर उपाय शोधताना धर्मनिरपेक्षता, एक गठ्ठा मते, अल्पसंख्याकांचे हित जोपासणे हेच निकष लावले जात. काँग्रेसने पेरलेले हे बीज इतके देशभर पसरले की, देशभरात जेवढे म्हणून प्रादेशिक पक्ष निर्माण झाले ते सर्व काँग्रेसच्या या विचारांच्या समांतर शाखा बनल्या. त्यामुळे देशात या व्यतिरिक्त दुसर्‍या वाटेने रोखठोक विचार करणारे बाळासाहेब यांनी एकप्रकारे देशात वैचारिक क्रांतीच घडवून आणली किंबहुना तेव्हापासूनच काँग्रेसच्या विचारधारेला हळूहळू सुरूंग लागत गेेला. ज्यामुळे आज भाजपला जेवढा हिंदूंचा जनाधार मिळाला आहे, त्यात बाळासाहेबांच्या या वैचारिक क्रांतीचा बराच वाटा आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हणूनच बाळासाहेबांच्या निधनानंतर पुढे काय, असा प्रश्न केवळ शिवसैनिकांनाच पडला नव्हता, तर तमाम हिंदू धर्मीयांना पडला होता.

- Advertisement -

देशात हिंदूंना मिळणार्‍या सापत्न वागणुकीच्या विरोधात बाळासाहेब ‘आवाज’ बनले होते. त्यामुळे आजही मुंबईत शिवसेनाच हवी, असा आग्रह कायम धरला जातो. काल, रविवारी बाळासाहेबांची सातवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हजारो शिवसैनिकांनी शिवतीर्थावर येऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले, मात्र यंदा त्यांच्या मनात संभ्रम जाणवला. कारणही तसेच होते. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसची विचारधारा म्हणजे अल्पसंख्याकांचे हित जोपासणे, हिंदूंना सापत्न वागणूक, जातीचे राजकारण, धर्मभेद, पंथभेदाचे माहेरघर म्हणून कायम तिरस्कार केला, त्या काँग्रेसला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे दर्शन घेताना तमाम शिवसैनिकांच्या मनात विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?, असा प्रश्न पडला असणार. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय तमाम शिवसैनिकांना पटला असेलच याची अजिबात खात्री देता येणार नाही आणि तसाच तो तमाम हिंदु बंधू-भगिनींनाही पटला असेल, याचीही शाश्वती देता येणार नाही. सत्ता, सत्तेतील महत्त्वाची पदे यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारधारेला बगल दिली, असा विचार कितीही नाकारला तरी शिवसैनिक आणि हिंदू धर्मीयांच्या मनात येत असणार. किमान समान कार्यक्रमात देशभरात समान नागरी कायदा लागू करावा, हिंदूहित जोपासावे, मठ, मंदिर, धर्मग्रंथ यांचे रक्षण करणे, राम मंदिर उभारणे इत्यादी अनेक मुद्यांवर शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना नक्कीच आग्रही राहू शकणार नाही.

पावलोपावली शिवसेनेच्या हिंदुत्व या वटवृक्षाची एक एक फांदी गळून पडणार आहे. कारणही तसेच आहे. सत्तेत सहभागी व्हा, आम्हाला पाठिंबा द्या, म्हणून शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या मागे लागली आहे. त्यामुळे शिवसेनेला कायम उपकृत राहावे लागणार आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा हिंदुत्वाचा मुद्दा समोर येईल, तेव्हा दोन्ही काँग्रेस कदापि शिवसेनेला हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहू देणार नाही, तसे न केल्यास दोन्ही काँग्रेसने हिंदुत्वाचा विचार स्वीकारला असे होईल. ज्यामुळे दोन्ही काँग्रेसची देशभरात बदनामी होईल. धर्मनिरपेक्षता, अल्पसंख्याकांचे लांगूलचालन हे दोन्ही काँग्रेसच्या विचारधारेचे मूळ, त्याच्याशी शिवसेनेेसाठी त्या फारकत घेणार नाही. त्यामुळे सरतेशेवटी शिवसेनेलाच माघारी घ्यावी लागणार आहे. ज्याच्यामुळे दुर्दैवाने शिवसेनेची विश्वासार्हता कमी होत जाणार आहे. केंद्रात आणि देशातील बहुतांश राज्यात भाजप सत्तेवर आहे, त्यामुळे नाही म्हटले तरी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यातच होते, मात्र महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेसला जीवनदान दिले आहे, हे कुणीही आता विसरू शकणार नाही. दोन्ही काँग्रेसला सत्तेत बसवल्यावर त्या शिवसेनेचा घास घेऊन संपूर्ण सत्तेवर अंकुश ठेवणार आहेत. सत्तेचे राजकारण कसे करायचे हे दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांना चांगलेच ठावूक आहे. एकदा सत्तेत आल्यावर त्याला कसे चिटकून राहायचे हे त्यांना शिकवण्याची गरज नाही. त्यांच्या राजकारणात शिवसेना संपणार नाही, यासाठी उद्धव ठाकरे यांची दमछाक होणार आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेला स्थिरस्थावर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना जेवढे प्रयत्न करावे लागले नव्हते, तेवढे दोन्ही काँग्रेससोबत मांडीला मांडी लावत सत्ता चालवताना शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी करावे लागणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे शिवसेना जरी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी हट्टाहास करत असेल, त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रयत्न करत असेल, तरी शिवसेनेला त्या मुख्यमंत्रीपदाचा वापर करून हिंदुत्वाचे धोरण कदापि राबवता येणार नाही. कारण प्रत्येक वेळी शिवसेनेला कायम धर्मनिरपेक्ष विचारांचे अवडंबर माजवणार्‍या दोन्ही काँग्रेसला शिकस्त द्यावी लागणार आहे आणि प्रत्येक वेळी आपला सत्तेचा डोलारा कोसळेल की काय, या भीतीपोटी शिवसेनेला दोन्ही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष, अल्पसंख्याकांचे हित जोपासणे या अजेंडाभोवती पिंगा घालावा लागणार आहे. यात भाजपने आता सत्तेचा हट्टाहास खुशाल सोडून द्यावा आणि शिवसेनेला तिच्या अवस्थेवर सोडून द्यावे. तटस्थ होऊन एका हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाला धर्मनिरपेक्ष पक्ष कसे गिळंकृत करतात, हे पाहून त्यातून बोध घ्यावा, शेवटी केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत आहे. अजून साडेचार वर्षे बाकी आहेत. भाजपचे तसे काहीच नुकसान होणार नाही, भाजपकडे अजून बराच वेळ आहे. शिवसेनेची मात्र होत असलेली वैचारिक वाताहात पाहून हिंदू म्हणून ‘परत या…परत या…बाळासाहेब परत या…’असे म्हणावेसे वाटते.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -