घरफिचर्समायमहानगर ब्लॉगBlog: अनेक कुटुंबांना जोडणारा धागा म्हणजे 'अंकुश परब सर'

Blog: अनेक कुटुंबांना जोडणारा धागा म्हणजे ‘अंकुश परब सर’

Subscribe

‘धागा हारातील फुलांना अगदी नाजुकपणे गुंफतो, त्यांना एकत्र गुंफून माळ तयार करतो’. आपल्या या कुटुंबामध्येही अशाच एका ‘धाग्याची’ गरज असते. जो कुटुंबातील सर्व सदस्यांना अगदी जिव्हाळयाच्या नात्याने अलगदपणे एकत्र गुंफतो. अगदी तसेच ‘श्री. अंकुश शंकर परब’ हे आमच्या घराचे ‘कुटुंबप्रमुख’. जन्म मुंबईचा. प्राथमिक शिक्षण गावी पाचल, तळवडे येथे झाले. सातवीला पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले. अंधेरीच्या टाटा कंपाऊड म्युनिसिपल शाळेत शिक्षण घेऊनही दहावीला फर्स्ट क्लासने पास झाले. हा फर्स्ट क्लास कधीच सोडला नाही, अगदी पदवी परीक्षेतही. इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये बी. कॉम ला ‘सर्वप्रथम’ येण्याचा मान मिळवला. यात उल्लेखनीय म्हणजे हे सर्व यश कोणताही ‘क्लास न लावता’.

‘कष्ट करण्याची सवय’ गावच्या राहणीमानाने लावली. तोच ‘काटकपणा’ उर्वरित आयुष्यातही कामी आला. कॉलेजमध्ये एक ‘स्कॉलर’ विद्यार्थी म्हणून नाव कमविल्यामुळे इंतर विद्यार्थीही सरांकडे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी येऊ लागले. या सर्वांतून जन्म झाला ‘परब क्लासेस’ चा. प्रादेशिक भाषेतील मुलांना ‘सोप्या भाषेत’ अगदी ‘खेळकर वृत्तीने’ शिकविणारा क्लास. या व्यवसायात अगदी निस्वार्थ बुध्दी. तळागाळातील मुलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रामुख्याने मदत झाली ती त्यांचे जुळे बंधू ‘श्री. लहू परब’ आणि बहिण ‘रश्मी पवार’ यांची. अगदी माफक फी घेऊन चालवलेला हा ‘परब क्लास’ लवकरच मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक मायेचा आधार झाला.

- Advertisement -

जोगेश्वरी पूर्व येथील हा क्लास समाजात सुशिक्षत आणि जाणकार पदवीधर घडवत होता. या क्लासने समाजामध्ये आपले स्थान अढळपणे लवकरच निर्माण केले. क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी अगदी जवळचे आपुलकीचे नाते सरांनी निर्माण केले होते. म्हणूनच आसपासच्या भागातील पालक आपल्या पाल्याला परब सरांच्या सुपूर्द करून अगदी बिनधास्त असायचे. सरांनी तसे सिद्ध केलेही. दहावीला ४०-५० टक्के मिळवणारा विद्यार्थी बारावीला फर्स्ट क्लास मिळवायचाच.

सामाजिक जाणिवेची भान असलेली अशी व्यक्ती स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही तितक्याच ताकदीने पेलत होती. सरांना दोन बहिणी, तीन भाऊ. दोन्ही बहिणी जेष्ठ आणि नंतर ३-४ वर्षांच्या अंतरावर हे भाऊ, लहू आणि अंकुश हे जुळे शेंडेफळ. आमच्या कुटुंबातील एकही सदस्य नाही ज्याने ‘दहावी, बारावीला’ अंकुश सरांचे मार्गदर्शन घेतले नाही. सर्व पुतणे, पुतण्या, भाचे अगदी घरी राहायलाच असायचे. शैक्षणित क्षेत्रातील मार्गदर्शन हे कुटुंबातील सर्वच सदस्यांना. असा सर्व परब कुटुंबियांना जोडणारा एक कणखर धागाच. नात्यांचे हे जाळे अगदी कोळयाच्या जाळयाप्रमाणे नाजूक परंतु लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत ठेवण्याचे काम अंकुश सरांनी केले. सर्वांनाच शैक्षणिक व आर्थिक मदत केली. आर्इ-वडिलांच्या वृध्दापकाळी आजारी असताना ‘आर्थिक बळ’ देऊन त्यांची योग्यप्रकारे सेवा केली. मातृ-पितृ ऋणातून खऱ्या अर्थाने मुक्त झाले. पहायला गेले तर कुटुंबात सर शेंडेफळ परंतु आपल्या अफाट बुद्धीमत्तेने व त्यासोबत मिळालेल्या व्यावसायिक यशाने सर्व कुटुंबाची जबाबदारी योग्यरीत्या पेलली. आम्हाला दोन मुली ‘स्मृती’ आणि ‘स्वरदा’. स्मृती सध्या परदेशात नोकरी करत आहे. स्वरदाचे शिक्षण चालू आहे. स्वरदाचे टेनिसमधील कर्तृत्व हे फक्त तिच्या वडिलांचेच अथक परिश्रम.

- Advertisement -

अंकुश सरांची नाळ ही त्यांच्या गावाशी जोडलेली होती. कारण त्यांचे बालपण अगदी त्या कोकणाच्या मातीत गेले होतं. शेतीची सर्व कामे नांगरणी, पेरणी, लावणी, कापणी अवगत होती. अशाच कारणामुळे ‘परब मराठा समाज मंडळाशी’ संबंध आला व लवकरच या नात्याने अगदी उच्चांक गाठला. या मंडळाचे ते एक सक्रिय सभासद झाले. तेथेही मुलांना शैक्षणिक व करियर मार्गदर्शन चालूच. त्याचबरोबर मंडळाच्या विविध उपक्रमात जसे महिलादिन, बालदिन यामध्येही अध्यक्षपद भूषविले. आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांना आपलेसे केलं, अगदी अल्पकाळात.

सामाजिक, कौटुंबिक जाणिव असलेला एक दुवा. गोरगरीबांचा पालनकर्ता. आपल्या अनेक विद्यार्थ्यांना फक्त पदवीधरच न करता त्यांचे संसारही मार्गी लावले. म्हणूनच आज तेच सर्व विद्यार्थी सरांची आठवण काढतात. आज १५ जुलै सरांचा वाढदिवस या लेखाद्वारे सरांना आमच्या सर्वांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ankush parab book release

अंकुश परब यांच्याबद्दल त्यांच्या पत्नी डॉ. संगीता अंकुश परब यांनी “माणुसकीचा दीपस्तंभ” हे पुस्तक लिहिले आहे. अंकुश परब यांच्या जन्मदिनी म्हणजेच १५ जुलै रोजी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.



या लेखाच्या लेखिका डॉ. संगीता अंकुश परब या मुंबईतील जय हिंद कॉलेजच्या रसायनशास्त्रातील सहयोगी प्राध्यापक असून त्या अंकुश परब यांच्या पत्नी आहेत.

Sangeeta Parab
डॉ. संगीता अंकुश परब
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -