टाटांच्या तनिष्कची जाहिरात आणि हिंदू- मुस्लीम संबंधांचे विविध पैलू

टाटांच्या तनिष्क ब्रँडच्या जाहिरातीवरून जो काही गहजब सोशल मिडियासह सर्वत्र उडाला आहे ती टाटा समूहाची कट्टर हिंदुत्ववाद्यांना पोषक ठरणारी एक चाल आहे, असेच म्हणावे लागेल. टाटा हे उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत.‌ सरकारकडून फायदे मिळवण्यासाठी ही मंडळी सरकारला पोषक ठरणारी कामे करत असतात. मात्र इतर उदयोजकांपेक्षा टाटा समूह सामाजिक कार्यात सर्वात पुढे असतात हे ही आवर्जून नमूद करावे असे आहे. तनिष्कची अशी हिंदू मुस्लिम संबंधाची जाहिरात करण्यामागे कुठलेही सामाजिक ऐक्य घडवण्याचा त्यांचा हेतू नाही. नाही तर त्यांनी सामाजिक ऐक्य घडवण्याचे प्रत्यक्ष कार्य केले असते. याच टाटा समूहाने आपल्या नॅनो गाड्या पाकिस्तानला एक्स्पोर्ट न करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान हा सीमेवर कुरापती काढून भारतीय सैन्यावर हल्ले करतो, म्हणून आपण असा निर्णय घेतला असे ते त्यावेळी म्हणाले होते. त्यावेळी त्यांचे देशप्रेम जागे झाले होते. तसे होते तर मग टाटांनी फक्त नॅनो गाड्या कशाला, आपली कुठलीच उत्पादने पाकिस्तानला विकू नयेत, पण टाटा हे धंदेवाईक आणि उद्योजक असल्यामुळे तसे ते करणार नाहीत. टाटांच्या नॅनो या काय दर्जाच्या गाड्या आहेत ते सगळ्यांना माहीत आहे. पाकिस्तानात त्या गेल्या असत्या तर पाकिस्तानी लोकांनी जाणून बुजून टाटांच्या कीर्तीची लक्तरे वेशीवर टांगली असती. हे टाटांना माहीत होते. त्यामुळेच त्यांनी हा समजूतदार पणाचा निर्णय घेतला.

तनिष्काची सध्या सुरू असलेली जाहिरात पाहून भारतात तथाकथित लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळेल हे म्हणणे अपरिपक्वपणाचे आहे. आता शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे मुले मुली विचार करून आणि आपल्या पसंतीचा जोडीदार निवडत असतात. जात आणि धर्म बघून कुणी प्रेम करत नाही, प्रेम हे माणसावर होत असते. जात आणि धर्म हे नंतर येतात. लव्ह जिहाद ही कल्पनाच भोंगळ आहे. कारणं कुणीही प्रेमात फसावण्याइतक्या हिंदू मुली भोळसट आणि भाबड्या नाहीत. त्या चांगल्या वाईटाचा विचार करू शकतात. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कोण योग्य कोण अयोग्य हे त्यांना कळते.

दुसरी गोष्ट म्हणजे अशा जाहिरातीवरुन समाजात वाद उफळणार हे जाहिरात करणाऱ्यांना माहीत असते. कारण ते अनेक वर्षे व्यवसायाच्या जाहिराती करतात, त्यामुळे कशाचे काय पडसाद उमटू शकतात हे त्यांना माहीत आहे. बरेच वेळा टाटांसारखे उद्योजक सरकारची मर्जी सांभाळण्यासाठी असे प्रकार करतात. अशा प्रकारच्या वादग्रस्त जाहिरातीतून सामाजिक ऐक्य घडत नाहीच, उलट सामाजिक दुही निर्माण होऊन हिंदूंना भावनिक चिथावणी मिळते. त्यामुळे हिंदूंची मते मोठ्या प्रमाणात एकत्र होतात, त्याचा फायदा हिंदुत्ववादी राजकीय पक्ष उचलत असतात. या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, पण ते वेगवेगळ्या विचारसरणींचे आहेत. त्यांना एकत्र करायचे असेल तर मुस्लिमांविषयीचा रोष अशा प्रकारे निर्माण केला जातो. यावरून जेव्हा संघर्ष होतो तेव्हा मुस्लीम समाज हा अल्पसंख्यक असल्यामुळे त्याचे जास्त नुकसान होते.

प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी बंधूंचे पक्ष ही भाजपची टीम बी आहे, असे राजकीय विश्लेषक कायम म्हणतात. कारण या नेत्यांची आक्रमकता हे बेगडी, दिखाऊ आणि विकाऊ असल्याचे मानले जाते. कारण त्यांना आक्रमक विधाने करायला लावून हिंदूंना मोठ्या प्रमाणात एकत्र केले जाते. त्याचा सत्तेत येण्यासाठी वापर केला जातो. जे सुज्ञ आणि सुशिक्षित हिंदू मुस्लिम आहेत, त्यांचे रोटी बेटी संबंध हे अनेक वर्षांपासून होत आलेले आहेत. फक्त ते त्याचा गाजावाजा करत नाहीत.

जाहिरात, चित्रपट, नाटकात हिंदू मुलगी मुस्लीम मुलाशी लग्न करते असे दाखवले जाते, पण मुस्लीम मुलगी हिंदू मुलाशी लग्न करते असे दाखवले जाते नाही. कारण मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातात आणि त्यांचा उद्रेक होतो. मग संयम आणि सहिष्णुतेचा ठेका काय हिंदूंनीच घेतला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. भारतात हिंदू बहुसंख्य आहेत. मुस्लीम अल्पसंख्य आहेत. त्यामुळे मुस्लिमांच्या मनात असुरक्षिततेची भावना असते, आपला प्रभाव कमी होईल, असे त्यांना वाटते, याच भावनेतून महमदअली जिनांनी पाकिस्तानची निर्मिती केली होती. आजही त्याच भावनेतून मुस्लीम मुलीने हिंदू मुलाशी लग्न केले तर इथले मुस्लीम आक्रमक होतात. त्यात पुन्हा हिंदू कुटुंबांमध्ये मुस्लीम मुलींना स्वीकारण्याची मानसिकता फारशी दिसत नाही. अशा विवाहांना मुस्लिमांकडून कडवा विरोध होतो हे बरोबर असले तरी किती हिंदू किंवा बिगर मुस्लीम तरुण मुस्लीम मुलींशी विवाह करण्यास तयार आहेत, याचाही विचार व्हायला हवा. या मागे अनेक शतकांपासून चालत आलेली काही सामाजिक कारणे आहेत का? कारण भारतीय उपखंडातील बहुतांश मुस्लीम हे धर्मांतरित आहेत, पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत. त्यातील बहुतांश हे मागासवर्गातील होते. कुठल्याही समाजात जातीय आणि आर्थिक मागासांची वरच्या वर्गातील लोकांकडून जास्त छळवणूक आणि पिळवणूक होते. म्हणून ते अन्य धर्माचा आश्रय घेत असतात. त्या काळच्या हिंदू धर्मातील मागासांनी मुस्लिम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्या मागील ही छळवणूक आणि पिळवणूक हे एक मुख्य कारण आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वेच्छेने हिंदू धर्माचा त्याग केला नव्हता. त्यांचा नाईलाज झाला म्हणून त्यांनी त्यावेळी निर्णय घेतला. कारण सवर्ण हिंदू मागासवर्गीयांची सावलीसुद्धा निषिद्ध मानत होते. तर मग प्रत्यक्ष माणसाचे जगणे किती कठीण असेल याची कल्पना केली तरी मन भयकंपित होईल आणि हिंदू म्हणविल्या जाणाऱ्या आपल्याच बांधवांना आपण किती हिन वागणूक दिली याची आपल्याला लाज वाटेल.

(लेखक आपलं महानगर चे वरिष्ठ उपसंपादक आहेत.)