Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग पाकिस्तानची जागतिक धूळफेक

पाकिस्तानची जागतिक धूळफेक

Related Story

- Advertisement -

पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने नुकतेच लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख झकीर रहमान लखवी याला दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याबद्दल १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी कसाब टोळीने जो हल्ला केला, त्याचा सूत्रधार लखवी होता. भारताने त्याच्यावर तसा आरोप केला होता. मुंबईवर कसाब टोळीने केलेल्या हल्ल्यात मुंबईतील १६० जणांचा बळी गेला होता. हॉटेल ताजवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारताची राजधानी असलेल्या मुंबईवर आणि त्यातही पुन्हा ताजसारख्या जागतिक ख्याती असलेल्या हॉटेलवर पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी हल्ला केलेला होता. हा हल्ला इतका भीषण होता की, कसाब टोळीने मुंबईत आपल्याकडील एके ४७ या स्वयंचलित बंदुकांमधून गोळ्या झाडून अनेकांची अक्षरश: कत्तल उडवली होती. त्यात ज्येष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचाही समावेश होता. हल्ला नक्की कुठून झाला आणि तो कुणी केला आहे, हे सुरुवातीला मुंबईतील पोलीस दलाला आणि सुरक्षा यंत्रणांना लक्षात येत नव्हते, पण त्या हल्ल्याचे स्वरुप आणि हल्लोखोरांचा पवित्रा पाहिल्यावर हा हल्ला विदेशातील लोकांनी केलेला आहे, हे लक्षात आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आपल्याकडे जी शस्त्रसामुग्री होती, त्याचा उपयोग करून कसाब टोळीचा फडशा पाडला. त्यात त्यांना एनएसजी कमांडोंची मदत झाली.

यावेळी अजमल कसाब या अतिरेक्याला मुंबई पोलिसांनी प्राणाची बाजी लावून जिवंत पकडला. कसाब पाकिस्तानातून आला. त्याचे आईवडील पाकिस्तानात आहेत, हे सगळे समजत असताना कसाब टोळी ही पाकिस्तानातून गेलेलीच नव्हती, असे पाकिस्तानने सांगितले. मुंबईवर हल्ला करणारे कसाब आणि त्याचे साथीदार पाकिस्तानचे नागरिक आहेत, हे पाकिस्तान मान्य करायलाच तयार नव्हते. त्यांच्याकडील जी काही ओळखपत्रे आणि शस्त्रे होती, त्यावरून ते पाकिस्तानी आहेत, हे सिद्ध होत होते, तरीही पोलिसांशी झालेल्या धुमश्चक्रीत ठार झालेल्या अतिरेक्यांचे मृतदेहही पाकिस्तानने स्वीकारले नाहीत. कारण मृतदेह घेतले तर ते अतिरेकी आपल्याच भूमीवरून गेले होते, असे सिद्ध होईल. एका बाजूला आम्ही आमची जमीन अतिरेक्यांना वापरू देणार नाही, असे पाकिस्तानचे राज्यकर्ते जागतिक पातळीवर मोठ्या मानभावीपणे सांगत होते. त्यामुळे हा ठपका आपल्यावर येऊ नये, म्हणून पाकिस्तानने कसाब टोळीचे पितृत्व नाकारले. २६ नोव्हेंबर २००८ जो हल्ला झाला, त्यामागील बरेच सूत्रधार पाकिस्तानमधील आहेत. त्यापैकी लखवी हा एक आहे. हाफिज सईद हासुद्धा या हल्ल्यामागील सूत्रधार आहे. पाकिस्तानमध्ये बसलेल्या या सूत्रधारांचे मुख्य लक्ष्य हे भारत आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचे राज्यकर्ते आम्ही आमच्या भूमीचा अतिरेकी कारवायांसाठी वापर करू देणार नाही, असे जगभर सांगत असतात, पण भारतावर हल्ले करणार्‍या सगळ्या अतिरेक्यांच्या मूळस्त्रोताचा शोध घेतला तर तो पाकिस्तानात सापडतो. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अतिरेक्यांनी इंडियन एअर लाईनचे एक विमान प्रवाशांसह अपहरण करून कंदाहरमध्ये नेले होते. त्या अपहरणकर्त्यांनी आमचे सहकारी जे भारताच्या ताब्यात आहेत ते सोडा, तरच आम्ही विमान भारताच्या ताब्यात देऊ अन्यथा प्रवाशांची हत्या करू अशी धमकी दिली. त्यावेळी चर्चेचे सगळे उपाय थकल्यावर भारत सरकारने चार अतिरेक्यांना सोडले. त्यांना अफगाणिस्तानात नेऊन सोडण्यात आले. ते अतिरेकी तिथून पाकिस्तानात पोहोचले. त्यापैकी एक अझहर मसूद याने पुढे भारतीय संसदेवर जो अतिरेक्यांनी हल्ला केला, तो घडवून आणला. आम्ही अतिरेक्यांना आश्रय देत नाही, असे पाकिस्तान कितीही ओरडून सांगत असला तरी त्यांच्या त्या बोलण्यात काही तथ्य नसते. पुलवामा हल्ला हा पाकिस्तानने घडवून आणला असे पाकिस्तानच्या एका मंत्र्याने त्यांच्या संसदेत सांगून पाकिस्तानची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली.

पण नंगे को खुदा भी डरता हैं, अशी पाकिस्तानची अवस्था आहे. त्यांना लाजलज्जा हा काही प्रकार नाही. त्यामुळे ते काहीही बोलण्यास आणि काहीही करण्यास तयार असतात. मुंबई हल्ल्यात हात असल्याच्या कारणावरून हाफिज सईद यालाही काही महिन्यांपूर्वी अटक करून कैदेत ठेवण्यात आले होते. पण तो केवळ दिखावा होता. आता ज्या लखवीला १५ वर्षांची सजा ठोठावण्यात आली आहे. त्याला मुंबईवर २००८ साली हल्ला झाला होता, तेव्हा जागतिक दबावामुळे अटक करण्यात आली होती. पण पुढे त्याला जामीन देऊन बाहेर काढण्यात आले. आता त्याला पुन्हा अटक करून शिक्षा देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील न्यायव्यवस्थेवर आणि विशेषत: दहशतवाद विरोधी न्यायालयांच्या कामकाजावर कसा विश्वास ठेवायचा हाच एक मोठा प्रश्नच असतो. कारण चोर त्यांचेच, पोलीस त्यांचेच, वकील त्यांचेच, न्यायाधीश त्यांचेच आणि देशही त्यांचाच, त्यामुळे सगळाच सोयीचा मामला आणि जगाच्या डोळ्यात धूळफेक, अशी परिस्थिती आहे.

- Advertisement -

भारताचे केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी असताना त्यांनी भारतामध्ये अतिरेकी कारवायांची सूत्रे हाताळणार्‍या २० अतिरेक्यांची यादी पाकिस्तान सरकारला पाठवून त्यांना भारताच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली होती, पण पकिस्तानने त्यापैकी एकाही अतिरेक्याला भारताच्या ताब्यात दिलेले नाही. उलट, भारत पाकिस्तानवर निराधार आरोप करत आहे, असा टोहो फोडला. १९९३ साली ज्याने मुंबईत आपल्या हस्तकांकरवी मुंबईत ठिकठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून अनेकांचे जीव घेतले होते, अब्जावधीची मालमत्ता नष्ट केली होती, तो दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे अनेक पुरावे दिसत असूनही तो आमच्याकडे नाहीच, असा पवित्रा पाकिस्तान नेहमीच घेत असतो. अनेक वेळा दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे पुढे येतात आणि पाकिस्तानचे हसे होते, पण ज्यांना कसली लाजच नाही, त्यांना त्यामुळे काहीही फरक पडत नाही.

अल कायदाचा म्होरक्या ओसामा बीन लादेन याने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्विन टॉवर पाडून अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांचे नाक कापले होते. अमेरिकेची त्यामुळे जागतिक मानहानी झाली होती. ते ओसामाचा कसून शोध घेत होते, पण तो त्यांना कुठेच सापडत नव्हता. पण शेवटी हा ओसामा पाकिस्तानातच लपलेला आहे. तिथे त्याला पाकिस्ताननेच आश्रय दिला असून त्याच्यावरील उपचाराचीही सोय केलेली आहे, असे अमेरिकेला कळले. त्यानंतर अमेरिकेच्या सील कमांडोनी रात्रीच्या वेळी अचानक हल्ला करून ओसामाला ठार करून उचलून नेले आणि त्याचा मृतदेह नष्ट करून टाकला. जी अमेरिका पाकिस्तानच्या निर्मितीपासून त्यांना सर्व प्रकारची आर्थिक आणि लष्करी मदत करते, तिच्याशी पाकिस्तानने गद्दारी केली होती.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात ओसामाचा खातमा करण्यात आला होता. ओबामा यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या समारोपाच्या भाषणात असे म्हटले होते की, पाकिस्तान हा अतिरेक्यांचा अड्डा बनलेला आहे. त्यांच्या या विधानात तथ्य आहे, कारण त्यांनी तो अनुभव घेतला होता. जागतिक पातळीवरून पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्यात आल्यानंतर त्यांच्या देशातील अतिरेक्यांच्या म्होरक्यांवर काही तरी कारवाई केल्याचे नाटक करून जगाच्या डोळ्यात धूळफेक केली जाते. त्यामुळे विशेषत: भारताने पाकिस्तानविषयी सावध आणि सतर्क राहणे अधिक आवश्यक आहे.

- Advertisement -