घरफिचर्समायमहानगर ब्लॉगFlash Back 2020: मनोरंजन क्षेत्रात वेबसीरिजचे धुमशान

Flash Back 2020: मनोरंजन क्षेत्रात वेबसीरिजचे धुमशान

Subscribe

२०२० हे वर्ष सर्वांसाठी स्मरणीय आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनचा सर्व क्षेत्रावर परिणाम झाला, यातून मनोरंजन क्षेत्रही सुटले नाही. चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद झाले. चित्रपटगृहात जाण्यासही मनाई करण्यात आली. याचाच फायदा ओटीटी प्लॅटफॉर्मने उचलला. अशा परिस्थितीत ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजनासाठी सज्ज झाले. लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम असल्यामुळे घराच्या चार भिंतीत मनसोक्त मनोरंजनाची धुरा ओटीटी प्लॅटफॉर्मने चांगलीच सांभाळली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजने लोकांना भूरळ घातली. लोकांची वाढती पसंती पाहता लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात वेबसीरिज प्रदर्शित करण्यात आल्या. आकर्षक कथा, भूमिका, थीम साँगच्या वेबसीरिजना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

नवीन कलाकारांना मिळाली संधी

लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी बंद पडली. त्यामुळे कलाकारांना कामच मिळत नव्हते. अशामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्ममधून कलाकारांना एक आशेचा किरण दिसला. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार हे वेबसीरिजकडे वळले. मोठ्या पडद्यावर कामाची संधी मिळत नसलेले कलाकारही याकडे वळले. वेबसीरिजच्या माध्यमातून अनेक नवीन आणि जुन्या कलाकारांनी डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. यामुळे नवीन कलाकारांना आपला अभिनय दाखवण्याची संधी मिळाली. तसेच अनेक मराठी कलाकार हिंदी वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.

- Advertisement -

टेलिव्हिजवर दाखवल्या वेबसीरिज

टेलिव्हिजनवर मालिकेचे शूटिंग बंद झाले होते. त्यामुळे जुन्या मालिका आणि सध्या चालू असलेल्या मालिकांचे तेच तेच एपिसोड दाखवले जात होते. नवीन चित्रपटही पाहण्यास मिळत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये छोट्या पडद्यालाही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिज आणि चित्रपटांनी हात दिला. टेलिव्हिजनवर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिज छोट्या पडद्यावर दाखवण्यास सुरुवात झाली. अनेक हिंदीसह मराठी वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात वेबसीरिज दाखवण्यात आल्या.

२०२० चे वर्ष वेबसीरिजने गाजवले

या वर्षातील सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय वेबसीरिजमध्ये पहिले नाव ’स्कॅम १९९२ हर्षद मेहता’ हे येते. ९० च्या दशकात हर्षद मेहताने देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा ७०० कोटींचा शेअर बाजार घोटाळा केला होता. यावर आधारित ही वेबसीरिज आहे. ’दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ अशा प्रकारच्या या वेबसीरिजमधल्या अनेक डायलॉगनी प्रेक्षकांना वेड लावले. या वेबसीरिजचे थीम साँग काही जणांची मोबाईल कॉलरट्यून आणि रिंगटोन झाली. या वेबसीरिजमध्ये हर्षद मेहता आणि सुचेता दलाल यांची भूमिका साकारणारे प्रतीक गांधी आणि श्रेया धन्वंतरी यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. काही दिवसांपूर्वी आयएमडीबीने भारतातील पहिल्या १० वेबसीरिजची यादी जाहीर केली होती. यामध्ये भारतामधील सर्वात आवडत्या वेबसीरिजचा मान ‘स्कॅम १९९२ हर्षद मेहता’ला मिळाला. या वेबसीरिजला १० पैकी ९.५ गुण मिळाले होते.

- Advertisement -

वेबसीरिजमुळे नावारूपाला आले हे कलाकार

गुजराती थिएटरमध्ये नावाजलेला अभिनेता प्रतीक गांधीला ’मित्रों’ आणि ’लवयात्री’ या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली नाही. पण हंसल मेहताची वेबसीरिज ’स्कॅम १९९२ हर्षद मेहता’मुळे प्रतीकचे नशीब बदलले. तो घराघरात पोहोचला. हर्षद मेहताची भूमिका प्रतीक गांधीने पुरेपूर साकारली. पंकज त्रिपाठीने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले पण त्याची खरी ओळख ’मिर्झापूर’ या वेबसीरिजमुळे झाली. याव्यतिरिक्त वेबसीरिजमुळे अनेक बॉलिवूडच्या चित्रपटात छोटी-मोठी भूमिका करणारे कलाकार चांगलेच चर्चेत आले. यामध्ये जयदीप अहलावत (पाताल लोक), जितेंद्र जोशी (पंचायत), बरूण सोबती (असूर), आदिती पोहनकर (आश्रम) असे अनेक कलाकर लोकप्रिय झाले.

बॉलिवूड सेलिब्रिटींचे ओटीटीवर पदार्पण

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने ‘ब्रीद : इन द शॅडो’ या वेबसीरिजमधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. अभिषेकने या वेबसीरिजमध्ये अविनाशची भूमिका केली. अभिनेत्री करिश्मा कपूरने ‘मेंटलहुड’मधून पदार्पण केले. यामध्ये करिश्माने तीन मुलांच्या आई आणि एक ब्लॉगर अशी भूमिका साकारली. करिश्माप्रमाणे अभिनेत्री सुष्मिता सेनने देखील ‘आर्या’ वेबसीरिजमधून डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. 2020 मध्ये ‘स्कॅम १९९२ हर्षद मेहता’, ‘मिर्झापूर २’, ‘पंचायत’, ‘आश्रम’, ‘स्पेशल ऑप्स’, ‘बंदिश बँडिट्स’, ‘पाताल लोक’, ‘अभय २’, ‘आर्या’ अशा अनेक वेबसीरिजनी प्रेक्षकांना भुरळ पाडली.

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -