शाळांचे भवितव्य शिक्षकांच्या हाती

मनुष्याच्या आयुष्यातील नकारात्मक भावना दूर करुन तेजोमय दीपोत्सवाने सकारात्मकता निर्माण करणार्‍या दीपावली सणाला आजपासून सुरुवात झाली. दिवाळीच्या दिव्यांना यंदा कोरोनाची काजळी चढल्याने पणत्यांमधील वातींचा प्रकाश भवताली दाटलेला अंधार कितपत दूर करेल, याविषयी नाही म्हटलं तरी शंकाच आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि सर्व गोष्टी होत्या त्याच ठिकाणी थांबल्या. इतिहासात नोंद होतील अशी रेल्वे, विमानसेवा, कारखाने, शाळा, महाविद्यालयेही ‘लॉकडाऊन’ झाली. कोरोनाचा कर्दनकाळ अजूनही संपलेला नाही. परंतु, या संकटकाळातून स्वत:ला सावरत मानवाने आता त्याच्याशी जुळवून घेतले आहे. स्वत:मध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करुन या आजाराचा जिद्दीने सामना करत कोणतेही औषध नसताना त्यावर मात करायला सुरुवात केली. जनतेची ही सकारात्मकता बघून सरकारनेही अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे.

परिणामी, थांबलेले अर्थचक्र हळूहळू का होईना, पण रुळावर येण्यास सुरुवात झाली. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डळमळीत करणार्‍या कोरोनाने भारतातही थैमान घातले. देशातील प्रगतीशील राज्यांमध्ये अग्रभागी असलेल्या महाराष्ट्राचा कोरोना रुग्णसंख्येत प्रथम क्रमांक लागला. अर्थात याची सर्वस्वी जबाबदारी महाविकास आघाडी सरकारच्या खांद्यावर आली. अगोदरच सलाईनवर असलेल्या आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन शक्य तेवढ्या प्रमाणात गेल्या आठ महिन्यांमध्ये कोरोनाशी सर्वांनी सामना केला. आता अनलॉकच्या या प्रक्रियेत प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन त्याला संधी दिली जात आहे. या सर्व प्रक्रियेत शाळा, महाविद्यालयांचा सर्वात शेवटी विचार केला जातोय. त्याचे स्वागतही व्हायला हवे. कारण विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य असते. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पालकांसह सरकारची असल्यामुळे त्याचा गांभीर्याने विचार होणे स्वाभाविक आहे.

दीपावलीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा विचार होवू शकतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच सांगितले. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची वर्ग हे प्रत्येक दिवशी फक्त चार तास भरवण्याचे नियोजन आहे. त्यातही विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे इंग्रजी, गणित, विज्ञान यांसारखे विषय शिकवले जातील. याच विषयांच्या शिक्षकांना शाळा, महाविद्यालयात नियमित यावे लागेल का? उर्वरित शिक्षक ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ऑनलाईन शिकवतील. त्यामुळे शिक्षकांमध्येच भेदभावाची भावना निर्माण होऊ शकते. कारण शासन निर्णयाचा ‘गैर’समज करुन घेण्यात शिक्षक नेहमी आग्रही असतात. चांगल्या गोष्टी करण्यासाठी आग्रह धरल्याची उदाहरणे तशी दुर्मीळच! गेल्या काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने 50 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेतला होता. त्यालाही शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला.

शिक्षकांना सध्या घरी बसूनच पूर्ण वेतन मिळत आहे. त्यांचा तो हक्कदेखील आहे. पण, आपण घेत असलेल्या वेतनापोटी आत्मियता ठेवून दायित्व निभावण्याचेे धारिष्ठ्य या शिक्षकांनी आता दाखवले पाहिजे. साधारणत: आठ महिने सुट्ट्या मिळालेल्या असतानाही दिवाळी सुट्टीचा मोह त्यांना आवरता आला नाही. ऑनलाईन शिक्षणाला अवघे पाच दिवस सुट्टी दिली म्हणून शिक्षक संघटनांनी तात्काळ विरोध केला. शिक्षण मंत्र्यांनीही त्याला प्रतिसाद देत पाच दिवसांची सुटी 21 दिवस केली. शिक्षकांना हा आपला विजय वाटत असला तरी आपल्याच पायावर कुर्‍हाड मारण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सवयच राहिली नाही, तर पालकही त्यांना शाळांमध्ये पाठवण्याचा आग्रह धरणार नाहीत. भविष्यात फक्त ऑनलाईन शिक्षणाचा ‘ट्रेड’ सुरू झाला तर तंत्रस्नेही नसलेल्या शिक्षकांना नोकरीवर पाणी सोडावे लागेल.

 सद्य:स्थितीला शिक्षण संस्था चालवणे डोईजड झाले आहे. इंग्रजी माध्यम शाळा मनाप्रमाणे शुल्क आकारणी करुन विद्यार्थ्यांना शिकवतात. या तुलनेत विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांना हा आर्थिक डोलारा आता पेलवत नसल्याचे उघडपणे दिसून येते. जिल्हा परिषद, महापालिका शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत. त्यामुळे एकीकडे आर्थिक कुवत नसलेल्या पालकांच्या पाल्याला शिकवण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांच्या खांद्यावर आहे, त्यांनीच आपले मूल्य जोपासले नाही तर कालापव्यय होईल. श्रीमंत घरातील मुले चांगले शिक्षण घेतील. वाटेल त्या शाळेत शिकतील. पण गरिबांच्या मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना थोड्या टाचा उंच कराव्याच लागतील. ‘टाचा उंच केल्याशिवाय चांदण्या खुडण्याचं भाग्य लाभत नाही,’ याचे भान ठेवूनच शिक्षकांना आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. सर्वच शिक्षक एकसारखे असतात, असेही नाही. लॉकडाऊनच्या काळात आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अनेक शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी आपल्या पातळीवर योग्य ती काळजी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य महत्प्रयासाने साध्य केले. त्यांच्या या जिद्दीला सलामच आहे. केवळ सुट्टी आहे म्हणून वेळ वाया घालवायची आणि शासनाने घेतलेल्या निर्णयांना विरोधच करत बसायचा, या नकारात्मकतेने विचार करणार्‍या शिक्षकांच्या नाकर्तेपणामुळे कार्यतत्पर शिक्षकांवर बोट उचलण्याची वेळ येते.

दिवाळीनंतर शाळा सुरू झाली तर काय फरक पडेल. शाळांपेक्षा कमी सुविधा असलेले खासगी कोचिंग क्लासेस अनेक महिन्यांपासून परवानगी मिळण्याची वाट बघत आहेत. त्यांना योग्य वेळी परवानगी मिळेलही. पण सरकारने शाळांना प्राधान्य दिले असून टप्प्याटप्प्याने त्या सुरू झाल्या तर शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, या भावनेतूनच हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य की अयोग्य याचे मापदंड पूर्णत: शिक्षकांच्याच हाती असणार आहेत. एखाद्या शाळेतील विद्यार्थी दुर्दैवाने कोरोनाबाधित झालाच तर त्याविषयी योग्य ती काळजी घेण्याची तयारी आता शाळांनी ठेवली पाहिजे. एकिकडे मुलांना कोरोना होत नसल्याचेही काही लोक छातीठोकपणे सांगतात. तर दुसर्‍या बाजूला विद्यार्थ्यांची काळजी वाहणारेही आहेत. त्यामुळे या दोघांच्या समन्वयातून योग्य तोडगा काढून शिक्षण अविरतपणे सुरू ठेवण्याची हीच ती वेळ म्हणावी लागेल. वर्ष वाया गेले तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे.

अनेक विद्यार्थी शाळेबाहेर राहण्याचीही शक्यता मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. रोजंदारीवर, घरकाम करणारे, भाजीपाला व्यावसाय किंवा हॉटेलमध्ये काम करणार्‍या लोकांना लॉकडाऊनच्या काळात खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यातून सावरण्याचे प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत. घरातील प्रत्येक व्यक्तीला काहीतर कामधंदा करणे अपरिहार्य ठरले. जगण्याची भ्रांत असणार्‍या व्यक्तींना शिक्षणाचे अप्रुप राहील का? हादेखील प्रश्न आहे. दुरस्त शिक्षण पध्दतीचा प्रसार करणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रवेशही यंदा एक ते दीड लाखांनी कमी झाले आहेत. ही फक्त एका विद्यापीठाची व्यथा नाही. तर त्यापेक्षाही वाईट अवस्था ही अभियांत्रिकी महाविद्यालयांची आहे. नोकरीची शाश्वती वाटत नसल्याने पदविका आणि पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याने ही महाविद्यालये आता शेवटच्या घटका मोजत आहेत. या तुलनेत सर्वोत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून

हुशार विद्यार्थ्यांमध्ये आजही रेस लागली आहे. आयआयटी, आयआयएम यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेशाचे दिवास्वप्न आजही अनेक विद्यार्थ्यांना भुरळ घालते. या संस्था म्हणजे फक्त श्रीमंत विद्यार्थ्यांची मक्तेदारी नव्हे, ही ओळख निर्माण करण्याचे खरे सामर्थ्य हे फक्त चांगल्या शिक्षकांमध्येच आहे. त्यासाठी चार भिंतींच्या शाळेत ज्ञानाचे धडे देण्यापेक्षा परिघाच्या पलिकडे शिकवण्याचे धारिष्ठ्य या शिक्षकांना दाखवावे लागेल. कोरोना महामारीच्या पर्वकाळानंतर शाळा, महाविद्यालये सुरू करताना खरी आव्हाने ही शिक्षकांसमोरच असतील. वेळेचे योग्य नियोजन, मर्यादित विद्यार्थी संख्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवल्यास शाळाही व्यवस्थितरित्या चालू शकतील. त्यासाठी शिक्षकांची मानसिक तयारी फक्त असायला हवी.