Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai

तेजी की फुगवटा?

Related Story

- Advertisement -

जागतिक अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था यांच्यातील नातेसंबंध हे नेहमीच एखादा अपवाद वगळता परस्पर विरोधी राहिलेले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलाचे परिणाम हे निश्चितपणे भारतीय बाजारपेठेवर आणि परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेवर नक्कीच जाणवतात. मात्र त्यानंतरही जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी ही भारतीय अर्थव्यवस्थेवर तेवढ्याच गतीने आघात करताना जाणवत नाही हे देखील एक सत्य आहे. आणि याचे प्रमुख कारण आहे भारताने स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था हे जरी सांगितले जात असले तरी त्याच बरोबर भारतीयांची आर्थिक स्थितीबाबत असलेली अत्यंत सावध भूमिका हेदेखील यामागचे प्रमुख कारण आहे. आणि या कारणांमुळेच गेल्या दहा महिन्यांपासून देशात आणि महाराष्ट्रातही सुरू असलेल्या काही महत्त्वाच्या क्षेत्रातील टाळेबंदी नंतरही राज्याची अर्थव्यवस्था ही पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊन सुरळीत होत असल्याचे आशादायक चित्र तात्पुरते का होईना, परंतु राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत आहे असे म्हणता येईल.

मुंबई महाराष्ट्राप्रमाणेच देशाचीही आर्थिक राजधानी समजली जाते. जगाच्या नकाशावरही आर्थिक क्षेत्रात मुंबईचे स्थान अव्वल आहे. त्यामुळे आर्थिक बदलांना मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतून कसा प्रतिसाद मिळतो यावर महाराष्ट्राची आणि देशाचीही आर्थिक स्थिती अवलंबून असते. त्यामुळे एकीकडे जगातील महासत्ता असलेल्या भांडवलशाही देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या असताना दुसरीकडे विकसनशील म्हणून गणल्या गेलेल्या भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील हा टप्पा महत्त्वपूर्ण मानला पाहिजे. मात्र त्यासाठीच अर्थक्षेत्रातील तज्ञांनी भारतीय बाजारपेठांमधील ही खरोखरची तेजी आहे की, तेजीचा फुगवटा निर्माण केला जात आहे या संशयाचेही निराकरण करण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेत खरोखरच तेजी आली असेल तर ती निश्चितच कौतुकास्पद आहे मात्र जर कृत्रिम फुगवटा निर्माण केला जात असेल तर तो भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक आणि प्रचंड घातक आहे असेच म्हणावे लागेल.

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापर परवानगी नंतर गेल्या आठवडाभरात मुंबईच्या भांडवली बाजारात त्याचबरोबर देशाच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये ग्राहकांचा उत्साह प्रचंड वाढल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. वास्तविक कोरोना काळातही भारतीय अर्थव्यवस्थेत सोन्याचे दर गगनाला भिडले होतेच. एकीकडे लोकांच्या हातात नोकरी नसल्यामुळे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे बाजारातील चलन पुरवठा पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात होते तर दुसरीकडे त्याच वेळी सोन्याच्या दराने 50 हजारी पार ओलांडली होती. मुंबई शेअर बाजारातील तेजीचे चित्र बरेच बोलके आहे आणि विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमांच्या नवीन टप्प्यांवर जाताना दिसत आहेत. अगदी शेअर बाजाराचे आजच्या दिवसाचेे उदाहरण घेतले तर सेन्सेक्स हा 260. 98 अंशांनी झेप घेत 48 हजार 500 च्या नजीक पोचला होता तर निफ्टीचा 66.60 ने झेप घेत 14,199.50 वर स्थिरावला होता.

मंदीच्या काळातही गेल्या आठवडाभरात ही वाढ झाली. गत सप्ताहाच्या तुलनेत ही वाढ अर्ध्या टक्क्याहून अधिक आहे. मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकात तर विक्रमी परंपरा या मंदीतही कायम असल्याचे चित्र असून मुंबई शेअर बाजाराने सलग दहाव्या सत्रात तेजी नोंदवली आहे. अर्थात शेअर बाजारांमध्ये नोंदवली गेली त्यामध्ये भारतीय बँक आणि वित्त क्षेत्रातील समभागांच्या मोठा आधार बाजाराचा मिळाला ही वस्तुस्थिती देखील नाकारून चालणार नाही. त्याचबरोबर दुसरीकडे देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजाराचे बाजार भांडवल ही विक्रमी निर्देशांकामध्ये ऐतिहासिक टप्प्यांवर पोचल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळाले. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल काल 192.87 लाख कोटींवर गेले होते. मात्र हे होत असताना भांडवली बाजारावर कोणाचे वर्चस्व आहे हे जर लक्षात घेतले तर त्यामध्ये सर्वाधिक बाजार भांडवल रिलायन्स इंडस्ट्रीज 12.46 लाख कोटी तर त्या खालोखाल टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे 11.60 लाख कोटी यांचे आहे. त्यामुळे भांडवली बाजारपेठांमधील पैसा हा कुठे जात आहे हे देखील यातून स्पष्ट होते.

- Advertisement -

शेअर बाजार बरोबरच भारतीय म्युच्युअल फंडमधील गंगाजळी देखील 30 लाख कोटींच्या उंबरठ्यावर पोचली आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत ही वाढ 7.6 टक्के इतकी आहे. यामध्ये सहाजिकच नामवंत फंड आहेत. उदाहरणार्थ, एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, आदित्य बिर्ला सन लाइफ या चार मोठ्या फंड कंपन्यांचा या गंगाजळीमध्ये निम्म्याहून अधिक वाटा आहे. भांडवली बाजारातील तज्ज्ञ याबाबत जे कारण सांगतात ते वरकरणी आहे. त्यांच्या मतानुसार भांडवली बाजाराची संबंधित समभाग संलग्न म्युच्युअल फंड योजनांमध्ये वाढ झाल्यामुळे एकूण मालमत्ता वाढत असल्याचे दिसत असल्याचे ते सांगतात. मात्र हे पूर्णसत्य नाही तर ते अर्धसत्य आहे. भारतीय आणि त्याची विशेषत: शहरी आणि आता निमशहरी म्हणजे ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांचा कल आता मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे, म्युच्यउल फंड्सकडे, सोने खरेदीकडे आणि त्याच बरोबर मालमत्तांच्या खरेदीकडे वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यामध्ये प्रस्थापित गुंतवणूकदारांबरोबरच मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय नवगुंतवणूकदार देखील निर्माण झाला आहे, याकडेही लक्ष वेधले पाहिजे.

राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे आणि त्याचबरोबर कोरोना काळात ठप्प पडलेल्या मालमत्तांच्या रजिस्ट्रेशनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद नाशिक-नागपूर यासारख्या महानगरांमधील बांधकाम क्षेत्रातही तेजीचे चित्र आहे. मुंबई तर या महिन्यांमध्ये गेल्या वर्षभरातील मालमत्ता विक्री नोंदणीचा विक्रम नोंदवला गेला आहे. मालमत्तांच्या आणि विशेषत: बांधकाम क्षेत्रातील आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये वाढ झालेली दिसत आहे. त्यामध्येही प्रमुख कारण म्हणजे कोरोनामुळे घसरलेले जमिनीचे दर हे एक प्रमुख कारण आहे. आणि शहरांमधील बांधलेल्या मालमत्तांच्या किमती या गेल्या वर्षभरात कमी झाल्या नसल्या तरी त्या स्थिर राहिल्या आहेत. वाढलेल्या नाहीत हेदेखील मालमत्तांच्या खरेदी-विक्री मागचे एक प्रमुख गमक आहे.

यामध्ये प्रश्न आहे किंवा संभ्रम आहे तो एकच आहे की भारतीय बाजारपेठेमध्ये जर तेजी असेल तर ती आनंदाची बाब आहे. त्यामध्ये कोणाला पोटदुखी असण्याचे कारण नाही, मात्र प्रस्थापित धनाढ्य गुंतवणूकदार तेजीचे वातावरण जाणून बुजून निर्माण करून त्याचा खोटा प्रभाव जर मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय आणि नव्या गुंतवणूकदारांवर भुरळ पाडण्यासाठी करत असतील तर त्याचा फार मोठा धोका हा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणार्‍या नवगुंतवणूकदारांना आहे. याचे भान गुंतवणुकदारांनी राखण्याची गरज आहे. गेल्या दहा महिन्यात कोरोनाचा फटका सगळ्यांनाच बसलेला आहे. त्यात विशेष करून मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय साफ भरडून निघालेले आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये त्यांची परिस्थिती फार बिकट झालेली आहे, त्यातून ते कसेबसे बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हळूहळू अर्थव्यवस्थेची चाके गतीमान होऊ लागली आहेत. त्यातून अर्थव्यवस्थेत भरीवपणा येणे अपेक्षित आहे. कारण तोच टिकावू असणार आहे. केवळ दिखावू फुगवटा हा फार काळ टिकणार नाही. म्हणूनच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सगळ्यांच्या भरीव प्रयत्नाची गरज आहे.

- Advertisement -