घरफिचर्समायमहानगर ब्लॉगढोंगाच्या बाजारातील व्यापारी

ढोंगाच्या बाजारातील व्यापारी

Subscribe

कुठलाही समाज हा आपला इतिहास जाज्वल्य, अभिमानास्पद असावा याच्या शोधात असतो. तसा नसेल तर तो स्वत:च्या दृष्टीकोनातून तयार करून घेतो. आपल्या महापुरुषांचे दैवतीकरण करतो. इतिहासातील महापुरुषांचे सर्व हक्क विकत घेतल्याप्रमाणे अस्मिता टोकदार केल्या जातात. अशा समाजामध्ये कुठल्याही महापुरुषांबद्दल बोलण्याची एक अलिखित आचारसंहिता असते आणि ती आचारसंहिता भंग करणार्‍याची गय केली जात नाही. बर्‍याचदा त्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे लोक आयुष्यातून उठण्याचा धोका असतो. भारतात अलीकडच्या काळात जातीच्या, धर्माच्या व प्रांताच्या अस्मिता अशाच टोकदार करण्यात आल्या आहेत. त्या टोकदार अस्मितांचा सामना अनेकांना करण्यास भाग पडले आहे. या अस्मिता कुणा एका पक्षाने व गटानेच जोपासल्या आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. प्रत्येकानेच सोयीप्रमाणे या अस्मितांचा वापर करून आपल्या वैचारिक, पक्षीय विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. आताही दिल्लीतील भाजप कार्यालयात प्रकाशित झालेल्या मोदींवरील पुस्तकाच्या शीर्षकात मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केेल्याने उठलेला वाद त्याच नाटकाचा पुढचा अंक आहे एवढेच..

इतिहास हा भूतकाळातून धडा घेत वर्तमान घडवण्यासाठी वाचायचा असतो, पण आपण इतिहासाचे ते महत्त्वाचे तत्व विसरून गेलो असून आपल्याला इतिहास म्हणजे वर्तमानकाळातील आपल्या सूडभावना अधिक चेतवण्यासाठीचे जणू एक हत्यार मिळाले आहे. यामुळे आपल्या राज्यात व देशातही इतिहासातील मुडदे उकरून समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग सातत्याने सुरू असतात. त्यासाठी कुठलेही निमित्त पुरेसे ठरते. बरे यासाठी कुठलाही एक नियम किंवा आचारसंहिता नाही. फक्त समोरचा व्यक्ती कोण आहे, यावरून आपण कुठल्या बाजूने उभे राहायचे हे ठरले आहे. म्हणजे आपल्या सोयीनुसार या अस्मिता जाग्या होत असतात. त्यामुळे एक झुंड उठून दुसर्‍या गटातील व्यक्ती वा समूहाविरोधात तुटून पडतात, ही बाब आपल्याकडे नित्याची झाली आहे. त्यामुळे त्यातील गांभीर्य नष्ट झाले असून केवळ एकमेकांवर चिखलफेक करण्याचा तो खेळ बनला आहे. या महापुरुषांच्या अस्मितेच्या आडून स्वत:चे राजकारण साधण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडूनच होत असतो. आताही तसाच काहीसा प्रकार झाला आहे. मात्र, तो आपल्यासाठी नवीन नाही. याची अनेक उदाहरणे दाखवता येतील. आंतरराष्ट्रीय कीर्तिचे चित्रकार एम.एफ. हुसेन यांनी चित्र काढताना विद्येची देवता सरस्वतीचे विडंबन केले. तेव्हाही देशभर वातावरण ढवळून निघाले होते. तेव्हाही समाजात दोन गट तयार होऊन एकाकडून तो कलेच्या अविष्कार स्वातंत्र्याचा मुद्दा असल्याचे आवर्जून सांगितले जात होते, तर दुसरीकडे हा हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा मुद्दा होता. त्यात कलाकार मुस्लीम असल्याने तर स्वत:ला हिंदू म्हणवून घेणार्‍यांच्या भावना अधिक दुखावणे साहजिक होते. मात्र, ही बाब अविष्कार स्वातंत्र्याशी जोडून अनेक विचारवंत त्या कलाकाराच्या पाठीशी उभे राहिले होते.

खरे तर भारतीय समाज म्हणून तो विभूती पूजक आहे. महापुरुषांचे दैवतीकरण करून त्यांची पूजा करण्याची आपली हजारो वर्षांची परंपरा आहे. त्यातून आपल्याकडे अवतार या संकल्पनेचा जन्म झाला आहे. ही अवतार संकल्पना पुरेशी नसावी म्हणून भगवद्गीतेत तर भगवंताच्या विभूती कोणकोणत्या आहेत हे सांगण्यासाठी स्वतंत्र अध्याय आहे. यामुळे जेथे कुठे आपल्याला आवडणार्‍या व्यक्तिंचे कर्तृत्व मांडायची वेळ येते, तेथे देवदेवतांशी त्याचा संबंध जोडण्याची आपली परंपरा आहे. यामुळेच पूर्णपणे अवैदिक असणार्‍या सिद्धार्थ गौतम बुद्धाला दशावतारात स्थान देण्यात आले आहे. वर्तमानकाळातील कुठलाही प्रवाह हा आपल्याच महान परंपरेशी संबंधित आहे, हे दाखवण्यासाठी भगवद्गीतेतील विभूती योग हा मोठा आधार आहे. त्याचे प्रत्यंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या बुधभूषण या ग्रंथामध्येही दिसून येते. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना विष्णूचा अवतार म्हणून जाहीर केले आहे, तर महाराज हे शिवाचे अवतार असल्याचेही अनेक कीर्तनांमधून मांडले जाते. तशीच परिस्थिती आपल्याकडील संतांची आहे. अनेक कीर्तनकार कथांमधून कुणालाही संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, रामदास स्वामी हे कोणकोणत्या देवांचे अवतार आहेत, हे सहजपणे ऐकायला मिळेल. एवढेच काय मराठीत ‘आजा मेला नातू झाला’ अशी म्हण प्रसिद्ध आहे. याचा साधासरळ अर्थ आजोबा मेला म्हणजे नातवाच्या रूपाने पुन्हा त्याच वंशवेलीमध्ये जन्म घेतो. पुनर्जन्मावर विश्वास असलेल्या समाजात भूतकाळातील महापुरुष पुन्हा आपल्यात वेगळ्या रूपामध्ये वावरत असल्याची संकल्पना आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडली आहे. स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हटले गेले आहे. महाराष्ट्रातील वैचारिक चर्चेमध्येही महात्मा गांधी व लोकमान्य टीळक यांची तुलना संत तुकाराम यांच्याशी करताना त्यांच्याप्रमाणे कठोर नेमके कोण होते, यावरूनही विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, जेथे वर्तमानातील व्यक्तिंचे कर्तृत्व मोजताना भूतकाळातील महापुरुषांचे परिमाण वापरण्याचा प्रयत्न केला जातो. तो किती योग्य, अयोग्य आहे, याबाबत चर्चा, मंथन व्हायला हरकत नाही, पण चर्चांपेक्षा आपल्या सोयीचे मुद्दे घेऊन भूमिका घेण्याचा प्रकार म्हणजे जणू ढोंगाचा बाजार सगळ्याच बाजूंनी मांडला जात आहे, हे दुर्दैवी आहे.

- Advertisement -

महापुरुषांच्या अवमानाचा एक अलीकडील मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्याबाबतचा. त्यासाठी दोन उदाहरणे घेऊ म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूंमधील ढोंगीपणा बघता येईल. गोविंदराव पानसरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिलेली एक प्रचंड खपाची पुुस्तिका आहे. तिचे नाव ‘शिवाजी कोण होता?’ असे आहे. या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल कुणाही कथित पुरोगामी लोकांनी कधीही विरोध केला नाही, पण स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे लोक उठता बसता त्याला विरोध करतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपतींचा उल्लेख त्यांच्या लेखनातून अनेकदा एकेरी केला आहे. त्याचा वारंवार उल्लेख करून पुरोगामी विचारवंत सावरकरांचा अवमान करीत असतात. ज्येष्ठ विचारवंत नरहरी कुरुंदकर यांनी श्रीमान योगी या शिवचरित्राला दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. या संपूर्ण प्रस्तावनेत शिवाजी महाराजांचा उल्लेख कुठेही आदरार्थी केलेला नाही. मात्र, कुरुंदकर दोन्ही टोळक्यांना आपले वाटत असल्यामुळे त्याबद्दल कुणीही चकार शब्द बोलत नाही. याच्यातून एकच अर्थ निघतो तो म्हणजे येथे शिवाजी महाराजांविषयी आपली अस्मिता तेव्हाच टोकाची होते, जेव्हा ती तसे घेणे आपल्या राजकीय वा वैचारिक भूमिकेला साजेशी असते. आपल्याला महाराजांविषयी आदर कमी आणि समोरच्या व्यक्तिविषयी अनादर अधिक असतो. तो व्यक्त करण्यासाठीचे शिवाजी महाराज केवळ एक माध्यम बनले आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने पडत आहे.

आता या सगळ्या गदारोळात भाजपचे महाराष्ट्रातील नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा बघा. ते म्हणतात की ब्रम्हांड आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. त्यांचे हे विधान स्वागतार्हच आहे, पण ज्या पुस्तकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडल्याबाबत दुर्लक्ष करून राज्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांशी तुलना केली जात नाही का, असा उलट प्रश्न विचारला आहे. म्हणजे तुम्हीही अवमान करीत आहात, मग आम्ही अवमान केला तर कुठे काय बिघडले असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ निघत नाही का? राष्ट्रवादीचे लोक पंतप्रधान मोदींविषयीच्या या पुस्तकाविषयी एवढे आक्रमक झाले आहेत, पण त्यांनी कधी ‘जाणता राजा’ शब्दामुळे महाराजांचा अवमान झाल्याचे म्हटल्याचे कुणाच्या ऐकीवात आहे का? म्हणजे हा सगळा सोयीचा बाजार आहे. त्यात कुणालाही महापुरुषांचे कर्तृत्व, त्यांनी जपलेली मूल्ये, त्यांनी घालून दिलेले आदर्श याच्याशी काहीही देणे घेणे नाही. यामागे महापुरुषांच्या नावाचा वापर करून आपल्या पदरात काय पडणार आहे, एवढाच एक व्यापारी दृष्टीकोन आहे.

- Advertisement -

ज्यांना मोदींची तुलना महाराजांशी झाल्यामुळे वाईट वाटत नाही ते व ज्यांना या तुलनेचे खूप वाईट वाटत आहे ते दोघेही एकाच मनोवृत्तीचे लोक आहेत, त्यांनी केवळ आपली अस्मिता कोणत्यावेळी टोकदार करायची हे ठरवून टाकले आहे आणि गंमत म्हणजे तेच लोक एकमेकांच्या समोर येऊन प्रश्न उपस्थित करून निरुत्तर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात महाराजांविषयीच्या आदराची भावना गौण असून त्यानिमित्ताने आपली पोळी भाजून घेण्याचाच मुद्दा प्रथमस्थानी आहे. मात्र, असे सोयीचे वाद सातत्याने निर्माण करून आपण त्या महापुरुषांचे चरित्र अभ्यासून त्याप्रमाणे नवसमाज निर्मितीचे त्यांचे विचार, संस्कार व ध्येय याकडे दुर्लक्षित करण्याचा सामूहिक अपराध तर करीत नाही ना, याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे, पण त्याचे भान कुणालाही उरले नाही, ही दुदैवी गोष्ट आहे.

ढोंगाच्या बाजारातील व्यापारी
Milind Sajgurehttps://www.mymahanagar.com/author/milind-sajgure/
Resident Edior, Nashik Edition, Aaple Mahanagar
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -