घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराष्ट्रद्रोह : हेरगिरीचा मनी अन् हनी ट्रॅप

राष्ट्रद्रोह : हेरगिरीचा मनी अन् हनी ट्रॅप

Subscribe

चीनने भारताशी पंगा घ्यायला सुरुवात केल्यापासून पाकिस्तानची खुमखुमी वाढलेली दिसते. त्याच अनुषंगाने पाकने आता भारतात हेरगिरी सुरु केल्याची गंभीर बाब समोर येत आहे. नाशिकमध्ये पाकच्या हेरगिरीच्या दोन घटना एकाच आठवड्यात उघडकीस आल्यात. यात ‘मनी’ आणि ‘हनी’ ट्रॅपचा वापर करण्यात आलाय. दुर्दैवाची बाब म्हणजे राष्ट्रद्रोह करणारे हे गद्दार भारतीयच आहेत.

तोफ प्रशिक्षण केंद्र असलेल्या आर्टिलरी सेंटरच्या सैनिकी हॉस्पिटलचे फोटो काढून एका रोजंदारीवरील कर्मचार्‍याने पाकिस्तानला पाठवले. या प्रकरणात संबंधिताला अटक करण्यात आली आहे. लष्करी हद्दीत मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तरीही मोबाईलचा वापर होत होता. दुसर्‍या प्रकरणात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल कंपनीतील एका कर्मचार्‍यानेच गोपनीय माहिती आणि फोटो पाकिस्तानमधील एका तरुणीला पाठवल्याची बाबही पुढे आली. ४१ वर्षीय दीपक शिरसाट हा कंपनीत असिस्टंट सुपरवायजर म्हणून मागील बारा वर्षांपासून काम करत आहे. त्याला ‘हॅनीटॅ्रप’मध्ये पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सी आयएसआयने अडकवल्याचेही बोलले जाते. आरोपी शिरसाटने भारतीय लढाऊ विमानांविषयी गुप्त माहिती तसेच इतर संवेदनशील माहिती आयएसआयला दिल्याचा आरोप आहे. मिग-२१ एफएल, मिग-२१ एम, मिग-२१ बीआयएस, मिग-२७, सुखोई-३० फायटर जेट, के-१३ मिसाइल यांसारख्या महत्त्वपूर्ण जेट आणि मिसाइलबद्दल पाकिस्तानी एजन्सीला या तरुणाने माहिती दिल्याचे पुढे आले. दीपकला या जाळ्यात अडकवण्यासाठी हसिना नावाच्या सुंदर मुलीचा वापर केला गेला.

हसीनाने जानेवारी २०१९ मध्ये सोशल मीडियावर दीपकशी मैत्री केली. काही महिन्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या मुलीने दीपकचा विश्वास जिंकला आणि हळूहळू त्याच्याबद्दल सगळी माहिती घेतली. या मुलीने दीपकच्या मदतीने एचएएलच्या आत काय चालतं याची माहिती घेतली, पण तिला आतले फोटो, व्हिडियो आणि इतर माहिती हवी होती. त्यामुळे तिने दीपकसोबत ऑनलाइन अश्लील गोष्टी करायला सुरुवात केली. त्या मुलीने दीपकचे फोटो, व्हिडीयो काढले आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. दीपकने भीतीपोटी सहा महिन्यांपर्यंत हसीनाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. नंतरही माहिती पुरवणार होता, पण त्याआधी एटीएसला माहिती मिळाली आणि त्याला अटक करण्यात आली. एचएएल ही कंपनी भारतातील लढाऊ विमान बनवणारी कंपनी असल्याने तिच्यात अतिशय गोपनीय पद्धतीने हे काम केले जाते.

- Advertisement -

जेणेकरून इतर देशांना या लढाऊ विमानांची खाजगी माहिती मिळू नये. असे असतानाही सहा महिन्यांपासून कंपनीचा एखादा कर्मचारी गोपनीय माहिती पाकच्या लोकांना पुरवतो ही बाब आपल्या सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. योगायोग असा की, शत्रूची रडार यंत्रणा उद्ध्वस्त करणार्‍या रुद्रम-१ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ज्या दिवशी झाली, त्याच दिवशी हे हेरगिरी प्रकरण उघडकीस आले. यातून आपली संरक्षण सिद्धता व सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणाचे यथोचित दर्शन होते. यापूर्वीदेखील नाशिकमध्ये हेरगिरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. २००९ मध्ये पोलीस प्रबोधिनीसह रेल्वेस्थानक, आर्टिलरी सेंटरसह गर्दीच्या ठिकाणी घातपाताचा कट रचण्यात आले होते. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी बिलाल शेख ऊर्फ लालबाबा याला नाशिकमधूनच अटक केली होती.

एकूणच, भारतातील सुरक्षिततेशी संबंधित ठिकाणांवर पाकिस्तान लक्ष ठेऊन असल्याचे पुढे येतेय. भारताशी थेट युद्ध करण्याची धमक पाकमध्ये नाही. तितके युद्ध साहित्यही त्यांच्याकडे नाही. अशा वेळी हेरगिरीच्या माध्यमातून भारतातील गोपनीय माहिती मिळवणे आणि पुढील षङ्यंत्र रचून भारताला अशक्त करण्याचा कट रचला जात आहे हे या घटनांवरुन स्पष्ट होते. हे केवळ नाशिकमध्येच घडतेय असेही नाही. जून महिन्यात उघडकीस आलेल्या तीन घटनांनी भारतात हेरगिरी किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे हे दाखवले. पहिल्या घटनेत जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पाडले. दुसर्‍या घटनेत पाकिस्तानी आयएसआयसाठी काम करणार्‍या दोन एजंटला राजस्थानमधील बिकानेर पोलिसांनी अटक केली. हे दोघे गुप्तहेर ऑगस्ट २०१९ पासून भारतीय सैन्यात हेरगिरी करत होते आणि सैन्याची गुप्त माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला देत होते. तिसर्‍या घटनेत दिल्लीतील राजनैतिक दूतावासाशी संबंधित तीन कर्मचार्‍यांना भारताविरोधात हेरगिरी करत असताना गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. हे तिघेही इंटर-सर्व्हिसेस इंटेजिलन्सच्या (आयएसआय) संपर्कात होते. त्यांचे गुप्तहेर पाकिस्तानच्या हाय कमिशनमध्ये काम करत माहिती मिळवत होते. काही महत्त्वाच्या कागदपत्रांची देवघेव करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या अटकेमुळे पाकिस्तानच्या ‘स्पाय ट्रॅप’ची पोलखोल झाली. आयएसआयचे हे अधिकारी लष्करातील अधिकार्‍यांना भेटत.

- Advertisement -

डिफेन्स अधिकार्‍यांना सातत्याने लालूच दाखवत. न्यूजसाठी माहिती घेत आहोत असे सांगत. माहिती मिळताच आयएसआयपर्यंत पोहचवत होते. काश्मीरमधील लष्कराची गुप्त माहिती मिळविण्याचा पाकिस्तानचा डाव होता. अर्थात, पाकची अशा हेरगिरीची खोड नवी आहे असेही नाही. २०१६ साली दिल्लीमधल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील १६ पाकिस्तानी कर्मचार्‍यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. या सर्वच हेरगिरीच्या प्रकरणांत आयएसआयचा हात असल्याचे स्पष्ट होते. आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे. भारतीयांना पैसा पुरवणे आणि ‘हनी ट्रॅप’द्वारे त्यांना जाळ्यात अडकवणे ही या संघटनेची मोडस ऑपरेंडी. एचएएलच्या प्रकरणात हनी ट्रॅप अस्त्राचा वापर केला गेला. त्यापूर्वी नौदलाच्या ११ जवानांच्या बाबतीतही या अस्त्राचा वापर करण्यात आला होता. या सर्वांना पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी सोशल मीडियावर ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवले होते. या सर्वांना पोलिसांनी मुंबई, कारवार आणि विशाखापट्टणमसह देशातील अन्य काही नौदल तळांवरुन अटक केली होती. या सर्वांवर फेसबुकसह त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलद्वारे भारतीय नौदलाची संवेदनशील माहिती विशेषत: बोटी आणि पाणबुड्यांची माहिती फोडली. या हेरगिरी करणार्‍यांना पैसे पुरवणार्‍यासही राष्ट्रीय तपास पथकाने मुंबईतून अटक केली. त्याच्या घरी हेरगिरीसाठी लागणारे अद्ययावत उपकरणे व कागदपत्रे मिळून आलीत. त्यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी भारतीय लष्करातील सोमवीर नामक जवान पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले होते.

आयएसआयच्या एजंटने सोमवीरसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. मेसेजवरुन सुरु झालेली ही मैत्री व्हिडीओ कॉलिंगपर्यंत पोहोचली. दोघांमध्ये अश्लील बोलणेही सुरु झाले. यानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली भारतीय सैन्यासंबंधित टँक, शस्त्र, लष्कर कंपनी आदी माहिती हा जवान अश्लील फोटो आणि पाच हजार रुपयांसाठी या एजंटला पुरवून मोकळा झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सर्व प्रकार सुरु होता. अर्थात ‘हनी ट्रॅप’साठी केवळ तरुणींचाच वापर केला जातो आणि सावज तरुण असतात असेही नाही. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या घटनेने ‘हनी ट्रॅप’ची दुसरी बाजू समोर आणली. या प्रकरणात हिर खान नावाच्या एका तरुणीस पाकिस्तानमधील दोन युवकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्री केली होती. अर्थात या दोघांनी तिच्या हृदयावर नाही तर तिच्या मेंदूवर ताबा घेतला. धार्मिक कट्टरतेची अस्मिता अधिक टोकदार करत हिंदू देव-देवतांविरोधात सोशल मीडियावर तिच्याकडून बोलून घेतले जात. तिला फूस लावणारे हे युवक हैदराबाद, कानपूर आणि दिल्लीतील काही तरुण विद्यार्थ्यांच्याही संपर्कात होते हे तपासात समोर आले आहे.

हेरगिरी केवळ माणसांच्या माध्यमातूनच होते हा समज पाकने गेल्या मे महिन्यात खोडून टाकला. हेरगिरीचे प्रशिक्षण दिलेले एक कबुतर जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पकडण्यात आले. हे कबुतर सांकेतिक भाषेतील संदेश आणि क्रमांक घेऊन पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत आले होते. एकूणच पाकिस्तानने हेरगिरीसाठी सर्वच साधनांचा वापर सुरु केल्याचे दिसते. हा देश ज्याच्या जोरावर उड्या मारतो तो चीनही हेरगिरीत मागे नाही. काही महिन्यांपूर्वी पुढे आलेल्या माहितीनुसार चीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पाच मंत्री, माजी आणि आजी ४० मुख्यमंत्री, ३५० खासदार, कायदेतज्ञ, आमदार, महापौर, सरपंच आणि लष्करातील काही अधिकारी अशा जवळपास १३५० लोकांची हेरगिरी सुरु आहे. त्यामुळे भारताला आता अधिक सतर्क रहावे लागेल हे निश्चित. ही जबाबदारी केवळ आपल्या सुरक्षा यंत्रणांची आहे असेही नाही. प्रश्न आपल्या देशाच्या सुरक्षिततेचा आहे. देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशी कोणतीही हालचाल दिसल्यास पोलिसांना किंवा दहशतवाद विरोधी पथकाला त्याची माहिती तात्काळ देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते कर्तव्य सर्वांनीच निभावल्यास पाकिस्तानला नांग्या वर काढण्याची हिंमत होणार नाही, हे निश्चित.

राष्ट्रद्रोह : हेरगिरीचा मनी अन् हनी ट्रॅप
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -