घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकाका- पुतण्यांचा वाद; सत्तासंघर्षाला साद

काका- पुतण्यांचा वाद; सत्तासंघर्षाला साद

Subscribe

काका मला वाचवा.. नारायणराव पेशव्यांनी राघोबादादाला दिलेली ही हाक आजही राजकारणात वेळोवेळी ऐकू येते. माधवराव पेशवे आणि रघुनाथराव पेशवे यांच्यापासून वाचण्यासाठी नारायणरावांनी काकांना त्यावेळी हाक दिली होती. आज मात्र राजकारणातील काकांना ‘पुतण्यांनो आम्हाला वाचवा’ म्हणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील इतिहास काका-पुतण्यांच्या वादाची साक्ष देतो. सत्ता संघर्षातील पुढची पायरी गाठत अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांना अंधारात ठेऊन भाजपशी केलेली हातमिळवणी धक्का देणारीच आहे, पण या काका-पुतण्यामधला संघर्ष तसा जुनाच आहे.

दहा वर्षे मागे वळून बघितले तर पवारांचे वारसदार म्हणून मुख्यमंत्रिपदाचे आपण दावेदार आहोत, असा समज करून घेतलेल्या अजित पवारांना पहिला दणका बसला तो काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यावर. २००९ मध्ये विधानसभेत सर्वाधिक आमदार निवडून आणणारा पक्ष हा राष्ट्रवादी होता, पण तरी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद हे काँग्रेसला देऊ केले आणि उपमुख्यमंत्रिपद हे स्वत:कडे ठेवले, पण हे पद अजित पवारांकडे न जाता ते छगन भुजबळांकडे आले. ही घोषणा झाल्यानंतर अचानक अजित पवार गायब झाले. ते कोठे आहेत हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगता येत नव्हते. ते राष्ट्रवादीवर, शरद पवारांच्या निर्णयावर नाराज आहेत की ते छगन भुजबळांवर याचे उत्तर कुणीही देऊ शकले नाही. त्यानंतर आर.आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांना संधी दिली गेली आणि त्यानंतर अजित पवारांची वर्णी लागली. तिथूनच पवार कुटुंबात कलहाला सुरुवात झाल्याचे दिसते. नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पवार कुटुंबातील सदस्यांपैकी स्वत: शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे आले. अजित पवार यांनी आपले पुत्र पार्थ यांनाही पुढे केले, पण पार्थची डाळ शिजली नाही. त्यानंतर पवारांनीही निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली. या संपूर्ण निवडणुकीत जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे या तरुण नेत्यांना प्रचारात प्राधान्य दिले गेले. त्यात अजित पवार मागे पडलेले दिसले. त्यानंतर ईडीच्या प्रकरणाचे निमित्त काढून अजित पवारांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यावेळीही या वादाचे मुख्य कारण कौटुंबिक कलह हेच होते, असे बोलले जाते.

यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात वादग्रस्त ठरलेल्या काका-पुतण्यांमधील सत्तासंघर्ष बघणे रोचक ठरते. या संघर्षात कधी कोणी काकाला धृतराष्ट्राची उपमा दिली, तर कोणी राघोबादादाची दिली, पण कोणताच पुतण्या हा युधिष्ठीरासारखा धर्मभास्कर नव्हता की माधवराव पेशव्यांसारखा कर्तबगार नव्हता. त्यामुळे ही घराण्यातील भाऊबंदकी सतत चर्चेत राहिली आणि परस्परविरोधी पक्षांनी त्यांचा सोयीनुसार वापर करून घेतला. अर्थात काकांशी वैर घेतल्यानंतरही त्यांना देवत्व बहाल करणारे पुतणेही तितकेच चर्चेत राहिले आहे. त्यात राज ठाकरेंचे नाव प्राधान्याने घेता येईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरे यांची निवड केली जाईल अशी चर्चा सर्वदूर होती. प्रत्यक्षात महाबळेश्वरच्या अधिवेशनात बाळासाहेबांनी ही जबाबदारी आपले पूत्र उद्धव यांच्याकडे सोपवली आणि तेथून काका-पुतण्यात अंतर पडले. तसे राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना कधीच दोष दिला नाही, पण क्षमता असूनही आपल्याला डावलले गेल्याची सल त्यांच्या मनात कायम राहिली. २००६ मध्ये शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

- Advertisement -

माझा वाद हा विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजुबाजूच्या बडव्यांशी आहे, असे सांगून राज शिवसेनेबाहेर पडले. राज यांच्याप्रमाणेच काका गोपीनाथ मुंडेे यांचे बोट धरून राजकारणात आलेले धनंजय मुंडे यांच्यातील वादाचीही काही काळ जोरदार चर्चा होती. गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणाच्या शिखरावर पोहोचत असतानाच स्थानिक पातळीवरील राजकारण धनंजय नियंत्रित करीत होते. अनेक लोक त्यांच्याचकडे गोपीनाथ मुंडेंचा उत्तराधिकारी म्हणून बघत होते. २००९ साली गोपीनाथ मुंडे जेव्हा लोकसभेवर निवडून आले तेव्हा विधानसभेची त्यांची जागा धनंजय मुंडेे लढवतील, असेच अनेकांना वाटले होते, परंतु प्रत्यक्षात उमेदवारी मिळाली ती पंकजा मुंडेे यांना. येथूनच एका सुप्त संघर्षाला सुरुवात झाली. परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत वादाची पहिली ठिणगी पडली. भाजपने ३२ पैकी १७ जागांवर नगरसेवक निवडून आणले होते. धनंजय मुंडे यांनी भाजपचे ११ नगरसेवक फोडून स्वतंत्र गटाची स्थापना करत राष्ट्रवादीची सत्ता आणली. पुढे गोपीनाथ मुंडे आणि धनंजय यांच्यातील वाद वाढत गेला.

अर्थात बीड जिल्ह्याचे राजकारण ‘काका-पुतण्यां’च्या वादाशिवाय जणू पूर्णच होऊ शकत नाही. १९९९ पासून बीडमध्ये बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित या काका पुतण्यांमधील वाद चर्चेत राहिला आहे. १९९९ च्या विधानभा निवडणुकीत पुतण्या अमरसिंह यांचा काका बदामराव पंडित यांनी पराभव केला होता. त्यानंतर या वादाच्या ठिणग्या सातत्याने उडत राहिल्या. पुढे २००४ च्या निवडणुकीतही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत बदामराव यांचा अमरसिंह यांनी पराभव केला. २००९ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमरसिंह यांनी राष्ट्रवादीत असलेेल्या बदामरावांनी पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत काका पुतणे दोघे एकत्र आले. याचप्रमाणे गेल्या दोन ते तीन वर्षांत बीडमधील एक मोठे प्रस्थ असलेल्या क्षीरसागर घराण्यात राजकीय संघर्ष पहायला मिळतोय. जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यात हा वाद आहे. अनेक वर्षे राजकारणात असूनदेखील आपले वडील रवींद्र क्षीरसागर यांना सत्तेत पुरेसा वाटा न मिळाल्याने संदीप यांनी काका जयदत्त यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण उगारले.

- Advertisement -

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संदीप यांनी शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी केलेल्या जयदत्त यांचा पराभव केला. गंमतीची बाब म्हणजे हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात ठाकले असले तरी ते एकाच छताखाली म्हणजे एकाच बंगल्यात राहतात. सातारचे उदयनराजे भोसले आणि त्यांचे काका अभयसिंहराजे भोसले यांच्यातील संघर्षही सर्वश्रूत आहे. या दोघांमधील वाद बराच जुना आहे. प्रथम १९९१ साली आपल्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांना शिवसेनेतून विरोधात लढवून नंतर स्वत: उदयनराजे काकांच्या विरोधात उतरले. कधी रयत पॅनेलच्या नावाने अपक्ष उमेदवार म्हणून तर कधी भारतीय जनता पक्षातून ते अभयसिंहांच्या विरोधात राहिले, परंतु जोपर्यंत अभयसिंहराजे भोसले हयात होते तोपर्यंत उदयनराजे यांना कधीच विजय मिळवता आला नाही. १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभयसिंहराजे भोसले हे लोकसभेवर गेले आणि त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली, तेव्हा मात्र अभयसिंहराजेंच्या मुलाला अर्थात शिवेंद्रराजेंना पराभवाची धूळ चारत उदयनराजे विजयी झाले, पण १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अभयसिंहराजे यांनी उदयनराजे यांचा पराभव केला. २००४ ला विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा पराभव केला.

आज उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भाजपवासीय झाले आहेत. त्यामुळे काही काळ तरी या कुटुंबात सत्तासंघर्ष टळेल, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि त्यांचा पुतण्या अवधुत तटकरे यांच्यातदेखील काका-पुतण्या वाद रंगताना दिसतोय. अवधुत यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय, पण एकेकाळी त्यांनी राष्ट्रवादीत असताना आपले काका सुनील तटकरे यांच्याविरुद्ध प्रचार केल्याचीही चर्चा आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात आघाडीच्या काळात मंत्री राहिलेल्या अनिल देशमुखांना पुतण्या आशिषने २०१४ साली धूळ चारली होती. भाजपच्या तिकिटावर ते आमदार झाले, पण स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा पुढे करीत आशिष देशमुखांनी भाजपशी फारकत घेत काँग्रेसचा हात धरला. त्यामुळे आता पुन्हा एकदा अनिल देशमुखांनी या मतदारसंघात विधानसभेत बाजी मारली.

काका- पुतण्यांचा वाद; सत्तासंघर्षाला साद
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -