गो मानू…!

Subscribe

‘गुंतता हृदय हे…’ या नाटकातील कल्याणी अजूनही काळजाच्या कोपऱ्यात घट्ट रुतून आहे. तिची आपल्या मुलीला महानंदला मारलेली हाक कानात अजून गुंजत आहे. आशालता वाबगावकर यांनी ही भूमिका रंगवताना ‘गो मानू, मामा इले, चटय टाक’, हा तिच्या बोलण्यातील लडिवाळपणा आणि मुख्य म्हणजे भाविण (देवदासी) रंगवताना त्या पात्राला अनुसरून केलेला जातीवंत अभिनय नाटकाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणारा होता. देवाची सेवा करणारी ती स्त्री असली तरी तिच्या चालण्या बोलण्यातील अदब, तिचं दिसणं, तिचं नटणं आणि बोलणं यात एक मोठी उंची असायची. देऊळ आणि देवळांची परंपरा सांगणाऱ्या गोवा आणि तळ कोकणात ती काल परवापर्यंत टिकून होती आणि आजही काही प्रमाणात आहे. त्या परंपरेशी नातं सांगणारी आशालता यांनी रंगवलेली ‘कल्याणी’ आजही रसिकांना विसरता येत नाही. आपल्या मुलीने महानंदाने आपली परंपरा पुढे न्यावी म्हणून तिच्या लग्नाच्या विरोधात उभी राहिलेली कल्याणी नंतर आपणच आपल्या मुलीचं भविष्य उद्ध्वस्त केलं म्हणून तिला झालेला मनस्ताप आणि त्यातून मनावर झालेला परिणाम त्यांनी इतका परिणामकारक केला होता की नाट्यप्रेमी थक्क होऊन जायचे. आणि शेवटी ‘गो मानू सोड मग गो माका. गो मानू sss’, अशी फोडलेली किंचाळी अंगावर काटा आणणारी होती.

 

- Advertisement -

अभिनयाची कुठलीही शाळा, संस्था नाही, प्रशिक्षण वर्ग नाहीत. अंगभूत कलागुणांचा आविष्कार घेऊन जन्माला आलेल्या कलावंतांपैकी आशालता एक होत्या. त्याचं दिसणं, बोलणं, अभिनय करणं सारं काही विलक्षण होतं. ते अस्सल होतं. कुठंही कृत्रिमपणाचा लवलेश नाही. ‘छिन्न’ नाटकात सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील, दिलीप कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांबरोबर काम करताना आशालता यांनी त्यात साकारलेली आई अविस्मरणीय होती. वामन तावडे यांच्या लेखणीतून उतरलेल्या या नाटकाचे ऐंशीच्या दशकात एकच खळबळ उडवली होती. तीच गोष्ट ‘अंकुश’ची. एन. चंद्रकांत म्हणजे चंद्रकांत नार्वेकर यांच्या या सिनेमातील आईची भूमिका त्यांनी इतक्या प्रभावीपणे केली होती की प्रत्येकाला ती आपल्या आणि सोबतच्या मुलांवर प्रेम करणारी प्रेमळ आईच वाटावी. ‘माई’ हे पात्र रंगवताना त्यांनी आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचारांनंतर जो शोक व्यक्त केला होता तो काळीज हलवणारा होता. याच शोकामुळे नाना पाटेकर आणि त्याचे मित्र बदला घेण्यासाठी पुढे सरसावतात. पण आपलं दुःख म्हणजे बदला नव्हे हे सांगताना त्यांचा सूर क्षमा याचनेला जोडणारा होता. म्हणूनच त्या आपल्या मुलीच्या सोबत ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना. हम चले नेक रस्ते पर हम, भूल कर भी कोई भूल हो ना…’, ही प्रार्थना म्हणतात तेव्हा आपण त्या प्रार्थनेचा एक भाग होतो.

 

- Advertisement -

अभिनयाबरोबर गाणंही आशालता यांचा एक मोठा गुणविशेष होता. ‘मत्सगंधा’ नाटकात तो बहरून आला. संगीत नाटकांच्या परंपरेचे साक्षी असणारं हे नाटक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत प्रतिभेने नटले होते. त्या नाटकात मिळालेल्या भूमिकेचे त्यांनी सोनं केलं. आताही हे नाटक, त्यातली गाणी, अभिनय अविस्मरणीय आहे. आपल्या अनुभवांवर आधारित ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही आशालता यांनी लिहिलय. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवताना, आशालताबाईंना गळ्यातून उतरवण्यापूर्वी प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्यामागील भाव टिपण्याची सवय लागली होती. घरी नाटक, संगीत कला असे कोणतेही वातावरण नव्हते. तरीही त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेत असताना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली. राज्य नाट्यस्पर्धेत ‘संशयकल्लोळ’ नाटकातील नायिका रेवतीची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने गायिकेला गोपीनाथ सावकार यांच्यासारख्या सिद्धहस्त दिग्दर्शकाने अभिनयासाठी निरीक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

 

आशालता यांच्या अभिनय कारकिर्दीतील त्यांचे ‘मत्स्यगंधा’ हे नाटक मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली ‘मत्स्यगंधा’ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाट्यपदे गाजली. वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते. नाटकातील संगीताने पं. अभिषेकी यांनी नाट्यसंगीताचा बाज बदलला, त्याला नवे रूप दिले. नाटकातील ‘सत्यवती’ (मत्स्यगंधा)च्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्य पूर्णपणे हरलेली राजमाता अशा १८ ते ७० वर्षे वयोगटातील विविध छटा यातून सादर करायच्या होत्या. ते एक आव्हानच होते. १ मे १९६४ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहात नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले नाटक दुपारी अडीचच्या सुमारास संपले. या नाटकाने त्यांना खूप नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवून दिली.

 

‘मत्स्यगंधा’च्या यशानंतर  नाटक पूर्णवेळ करायचे असे ठरवून त्यांनी मंत्रालयातील नोकरी सोडली. ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘चंद्रलेखा’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाट्यसंस्थांमधून त्यांनी आजवर पन्नासहून अधिक नाटके केली आहेत. या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मदनाची मंजिरी’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘स्वामी’, ‘गरुडझेप’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘भावबंधन’, ‘गुंतता हृदय हे’, ‘छिन्न’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्येही त्या होत्या. ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘एकापेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’ आणि अन्य शंभरहून अधिक मराठी चित्रपटही त्यांच्या नावावर आहेत. मराठी नाटक आणि चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटाचा पडदाही गाजविला. दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी चरित्र अभिनेत्री  म्हणून काम केले.

 

नाटक, चित्रपट आणि मालिका असा चोफेर प्रवास करताना आशालता कधी थकल्यात असं वाटत नव्हतं. आपण सतत काम केलं पाहिजे. रसिकांना चांगल्या कामानं प्रभावित केलं पाहिजे, यावर त्याचा भर असे. यामुळे त्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी ही कार्यरत होत्या. मात्र कोरोनाच्या क्रूर काळाने त्यांचा हा मोठा प्रवास अचानक थांबवला…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -