घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआता निसर्गाची हाक ऐकायला हवी...!

आता निसर्गाची हाक ऐकायला हवी…!

Subscribe

मुळात मी आधी डाॅक्टर का झाले? आणि नंतर माझे आवडीचे क्षेत्र सोडून शेतीकडे का वळले? ही एक स्टोरीच आहे. मला असे वाटते की, आपल्या आयुष्यात जे काही घडते त्यामागे काहीतरी कारण असते, तो संकेत आपण ओळखला पाहिजे.

मी लहानपणापासून ॲस्थमॅटीक आहे आणि या आजारानेच मला डाॅक्टर होण्याची प्रेरणा दिली. मी पहिलीत असतानाच ठरवले होते डाॅक्टर होण्याचे आणि त्याप्रमाणे मी चेस्ट फिजिशियन झाले. १८ वर्षे माझे स्वत:चे आय.सी.यू. असलेले हाॅस्पिटल चालवले आणि मग एक क्षण असा आला आयुष्याला कलाटणी देणारा परत एकदा माझे आजारपणच कारणीभूत ठरले.

- Advertisement -

१ मे २०१०. तो दिवस मला लख्ख आठवतोय. बागेत काम करून मी आत आले आणि अचानक मला अस्वस्थ वाटू लागले आणि पुढचे २४ दिवस मी बेड रिडन होते. त्यातच २४ मे ला आमचे अमेरिकेला जाण्याचे बुकिंग झाले होते. ट्रिप जवळ जवळ कॅन्सलच केली होती. पण, सगळे नाराज होऊ नये, म्हणून मी जाण्याचा निर्णय घेतला. २४ मे ला अक्षरश: मी व्हिलचेअर वरून प्रवास केला आणि अमेरिकेत गेल्यावर जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे माझा दम गायब झाला. सगळी औषधे, आप्तेष्टांच्या शुभेच्छा माझी इच्छाशक्ती सर्व काही भारतातही होतेच. पण, मग असे काय होते. ज्यामुळे माझा दम गेला. कदाचित स्वच्छ हवा आणि रेसिड्यु फ्री फूड! आणि मग मी टाॅक्झिन फ्री लाईफ स्टाईलचा ध्यासच घेतला. सुरवात स्वत: पासून करायची आणि इतरांना पण त्याचा लाभ द्यायचा असे ठरवले. १९९६ साली पुण्याजवळ आम्ही जमीन घेतली होती तिथे ॲार्गॅनिक फार्मिंग करायचे ठरवले. पहिली १-२ वर्षे विकत शेणखत घेतले. पण, ते पुरत नव्हते आणि केमिकल खते घालाविच लागत होती. म्हणून गाई घ्यायचे ठरवले.

कुठल्या गाई घ्यायच्या याचा अभ्यास करताना असे लक्षात आले की “श्वेत क्रांती” च्या नादात सरकारने जर्सी आणि एच एफ गाई आणून शेतकऱ्यांच्या मनावर देशी गाई पालन हे कसे तोट्याचे आहे हे इतके बिंबवले कि आपल्या देशी गाईंचा निर्वंश होत चालला आहे. मग ठरवले की देशी गाईच घ्यायच्या. कितीही नुकसान होवो. पण, आपला गोवंश वाचवायचा आणि आमच्या गोपालनाची सुरवात झाली. २०१३ साली २ खिलार आणि ६ गीर गाई घेतल्या आणि बघता बघता ६-७ गाईंच्या ५०-६० गाई कधी झाल्या हेच कळले नाही.

- Advertisement -

आमच्या प्रत्येक गाईला आम्ही नावाने हाक मारतो आणि त्याही मी गेल्यावर हंबरून लाड करून घ्यायला अगदी उत्सुक असतात. आम्ही आमच्या गाईंना अगदी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो. दुधासाठी कधीच त्यांच्यापुढे अकाली मात्रृत्व लादत नाही किंवा दूध वाढीसाठी ईंजेक्शन्स देत नाही. आमच्याकडे महाराष्ट्राची शान खिलार, गुजरातची गीर आणि नामशेष होत चाललेली कोकण कपिला आहे. जी केवळ २.५-३ फूट उंच असते. अशा तीन प्रकारच्या गाई आहेत. गाई घेतल्यावर खताचा प्रश्न सुटला आणि आम्ही एक नंबर पिके काढली. शेवगा, टाॅमॅटो कलिंगड आणि एक्झोटिक भाज्यांसुद्धा केल्या. मार्केटयार्डमधले व्यापारी वाट बघायचे आमच्या मालाची. कारण ते होतेच तसे रसाळ आणि विषमुक्त!

तो माल मार्केटयार्डला पोचवण्यासाठी मी छोटी गाडी विकून टाटा झेनाॅन घेतली. आयुष्याचा ज्या टप्प्यावर लोकांना मर्सिडीझ घेण्याचे वेध लागतात त्या वेळेस मी चांगली चालत असलेली प्रॅक्टीस सोडून वेगळी वाट चोखाळत होते. त्यात मला कमीपणा वाटत नव्हता आणि मुख्य म्हणजे माझ्या नवऱ्याने पण पूर्ण सपोर्ट केला, कारण त्याचा स्वत: च्या कर्तृत्वावर आणि माझ्यावर पण विश्वास होता. तर असे झेनाॅन भरभरून माल. विकत होतो. पण, एवढे ३-४ महिने वेळ, पैसा कष्ट शेतात घातल्यावर शेतकऱ्याच्या हातात काय पडते ते कळले. १८० -२०० रुपयाने ग्राहकांना मिळणाऱ्या मालाचे शेतकऱ्याला फक्त ३०-४० रुपये मिळतात.

इथे परत एक छोटासा टर्न घेतला. फूड प्रोसेसिंगचा निर्णय घेतला. शेतात उगवणारी प्रत्येक गोष्ट प्रोसेस करायला सुरवात केली. साॅस, कैरी पन्हे, चिंच चटणी, चवनप्राश, जॅम्स, गुलकंद इत्यादी बघता बघता लिस्ट वाढतच गेली आणि अजूनही वाढतच आहे. एकतर व्हॅल्यू ॲडिशन होत गेली. शेल्फ लाईफ वाढले आणि मुख्य म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या , डाल्डा मैदा, प्रिझर्वेटिव्ज, इमल्सिफायर्स असे आरोग्याला अपायकारक गोष्टी ज्या कशापासून बनवलेल्या जातात
हे जर कळले तर धक्का बसेल, अशा गोष्टी वापरून केलेल्या वस्तूंना आम्ही हेल्दी पर्याय देतो. आपली जीवनशैली बरीचशी वेस्टनाईज होत चालली आहे. ती पूर्णपणे आपल्याला १८० डिग्रीचा टर्न घेता येणार नाही हे लक्षात घेऊन आम्ही प्राॅडक्ट्स डिझाईन करतो. नूडल्स खायचेत, पास्ता खायचाय ना मग होल व्हीट खा. आम्ही १००% होल व्हीट देतोय. तसेच आमच्या कुठल्याही पदार्थात सिंथेटिक कलर्स, फ्लेल्हर्स नसतात. प्रिझर्वेटिव्जही नसतात.” हेल्दी खाना फ्राॅम डाॅक्टर्स किचन“ ही आमची टॅग लाईन आहे.

हे सर्व करत असताना आणखी एक आव्हान समोर उभे राहिले. गाई घेतल्यामुळे शेणखत भरपूर मिळायला लागले पण घरचे भागून दूधही उरायला लागले. दूध विकणार तरी कुठे आणि कसे? ए २ दूधाचे महत्व लोकांना कसे पटवायचे? आणि मी एक कंपनी फाॅर्म केली “ हेरा काॅटेज इंडस्ट्री “ त्याच्या ३ ब्रांचेस आहेत.

हेरा ॲार्गेनिक्स : रेसिड्यू फ्री प्रोसेस्ड फूड तयार करते
जस्ट काऊज : ए २ दुधाचे पदार्थ
ॲना बाॅडी केअर प्राॅडक्टस ; टाॅक्सिन फ्री काॅस्मेटिक्स

हेराचा अर्थ आहे गाॅडेस ॲाफ फर्टिलीटी आणि ते आमच्या लाडक्या लॅब्रॅडाॅरचे नाव होते. जिने आम्हाला प्राण्याच्यावर प्रेम करायला शिकवले.

मग दुधाचे पदार्थ बनवायला सुरू केले

मार्केट मध्ये एवढे मातब्बर एस्टॅब्लिश्ड ब्रॅंड्स असताना श्रीखंड, लस्सी करण्याचे तरी का ठरवले? आमच्या श्रीखंडात काय असे वेगळे आहे? एकतर आमचे दूध वेगळे आहे. आमचे श्रीखंड शुद्ध देशी गाईच्या दुधापासून केल्यामुळे चव तर उत्तम आहेच तसेच त्यात साखर पण कमी असते आणि कुठलेही प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम फ्लेव्हर्स घातलेले नसतात त्यामुळे एकदा आमचे श्रीखंड खाल्लेला माणूस सहसा दुसरे श्रीखंड खात नाही.

देशी गाईंच्या दुध ए२ प्रकारचे असते तर जर्सी गाईंचे ए १ प्रकारचे असते. देशी गाय म्हणजे पाठीवर वशिंड असलेली गाय ए २ दूधामध्ये बिटा २ केसिन हे अमायनो ॲसिड असते आणि ए१ दुधात बिटा १ असते. हे बिटा १ मुळे जुव्हेनाईल डायबेटिस, लॅक्टोज इनटाॅलरन्स, डायरिया, हार्ट डिसीजेस आणि कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे न्युझिलंड आणि ॲास्ट्रेलियातला अभ्यास आहे. नेटवर याबद्दल सविस्तर माहिती आहे. ए२ दूध घेणाऱ्या लोकांमधे या आजारांचे प्रमाण कमी आहे, शिवाय ए२ दूध पचायला हलके असते. पण ए२ दूध इतके महाग का असते तर गाईंची संख्या खूपच कमी झालेली आहे आणि देशी गाय दूधही कमी देते .

खिलार गाय ३-४ लिटर देते आणि गीर गाय ६-७ लिटर देते. जर्सी गाय १४-१५ लिटर दूध देते. शेतकऱ्याच्या मनावर हेच अर्धसत्य बिंबवले गेले आहे. पण, जर्सी गाय ४-५ डिलीव्हरीज मधे निकामी होते. शिवाय तिला सतत व्हॅक्सिन्स द्यावी लागतात आजारपणाचे प्रमाणही जास्त आहे आणि तिला दिलेली औषधे दुधावाटे आपल्या पोटात जातात. दूध वाढीसाठी त्यांना हार्मोन्स दिले जातात. त्याचेही दुष्परिणाम आपल्यावर दिसत आहेत. मुलांचे वयात येण्याचे वय हे १३-१४ वरून ९-१० वर आलंय. त्याचे हे एक मोठे कारण आहे. तर देशी गाय ही ह्या मातीतली असल्यामुळे ती चिवट आहे तिला सहसा कुठलेही रोग होत नाहीत. १०-१२ वासरे होतात. जर्सी गाईचा आहार पण फार जास्त असतो, जर्सी बैलही उपयोगाचे नसतात. देशी गाईंना खाद्य पण कमी लागते तसेच तिचे शेण आणि गेमुत्र पण औषधी आहे.

श्रीखंड, आम्रखंड , ड्रायफ्रूट श्रीखंड , लस्सी बरोबरच आम्ही पनीर , क्रीमचीज, फ्लेव्हर्ड फेटाचीज, माॅझरेल्ल्ला हे ही करतो. आता पुढचे लक्ष्य आहे हार्ड चीज बनवण्याचे. त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. मोठा टर्नओव्हर असलेली ॲग्रो इंडस्ट्री उभी करणे. हे माझे स्वप्न नसून बाहेरील देशात ज्याप्रमाणे फार्मस्टेडिंग करतात ती संकल्पना मला आपल्या इथे राबवायची आहे. सगळ्यांनी उठून शहरात गर्दी करण्यापेक्षा आपण आपली खेडी इतकी सुंदर आणि स्वयंपूर्ण बनवली पाहिजेत की लोकांनी तिकडे रहाणे पसंत केले पाहिजे. आपल्याकडे केरळ मध्ये हा पॅटर्न बघायला मिळतो. केरळ इतके सुंदर असण्याचे ते एक मुख्य कारण आहे असे मला वाटते.

त्यादृष्टीने आम्ही वेगवेगळी माॅडेल्स शेतावर उभी करतोय. त्यामधे साॅईललेस व्हरटिकल फार्मिंग असेल, फूड प्रोसेसिंग असेल, व्हेजिटेबल डिहाईड्रेशन असेल, असे अनेक पर्याय आहेत. कुठलेही एक माॅडेल निवडले तरी एक स्वतंत्र व्यवसाय उभा करता येईल याचा विश्वास बघणाऱ्याला वाटेल. पुढील वर्षापासून ही सर्व शेती आणि गो-संगोपनाची माॅडेल्स सर्वांना बघण्यासाठी आम्ही ओपन करणार आहोत. ज्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर होईल आणि शहरी लोकही खेड्याकडे आकृष्ट होतील. काही व्यवसाय करायचा नसेल तरी शेतात रहाणे किती कम्फर्टेबल आणि सस्टेनेबल आहे हे सगळ्यांना पटले पाहिजे.

निसर्गाशी आपण किती खेळतोय याचे आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे, त्याच्यापुढे आपण नाही हे कोरोनाच्या माध्यमातून त्याने आपल्याला दाखवून दिलेच आहे. तर मला असे वाटते आहे की आपण सगळ्यांनी निसर्गाची ही हाक ऐकावी आणि परत एकदा आपली खरी भारतीय जीवनशैली स्विकारावी.


डॉ . मेधा अंबिके

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -