घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआत्मसन्मान विकल्यावर काय होणार?

आत्मसन्मान विकल्यावर काय होणार?

Subscribe

अनेक वर्षांच्या खस्ता खात संसार उभा राहतो. तो उभा करताना कशा अडचणी येतात हे आपल्या व्यक्तिगत जीवनात आपण अनुभवतोच. मग देशाचा आणि राज्यातल्या राजकारणात स्वत:चा संसार उभा करताना किती खस्ता खाव्या लागत असतील, हे दलबदलूंना कोणी सांगावं? ज्या संसारात आपलं महत्त्व निर्माण केलं त्याच संसाराला एका रात्रीत लाथ मारली जात असेल तर अशा दलबदलूंची दशा करण्याची आवश्यकता केवळ बोलून दाखवण्यापुरती नको. जिथे संधी मिळेल तिथे अशा बदलूंना धक्का देण्याची आवश्यकता आहे.

नि:स्वार्थांना आत्मसन्मानाची खूप चाड असते. स्वार्थ जोपासू लागला की आत्मसन्मानाचे बारा वाजलेच म्हणून समजा. आज राज्याच्या राजकारणात आत्मसन्मानाला जागा राहिलेली नाही. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा स्वार्थी माणसं आत्मसन्मान गुंडाळून ठेवतात. आपल्या राज्यात आत्मसन्मान गुंडाळून ठेवणारे सध्या भाजपच्या दावणीला स्वत:ला बांधून घेत आहेत. जे आत्मसन्मान विकतात त्यांना समाजात स्थान राहत नाही, हा इतिहास आहे. तेव्हा आपण कोणाच्या किती आहारी गेलं पाहिजे, हे ज्याने त्याने ठरवून टाकलं पाहिजे. १३व्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जे काही चित्र आहे, ते अजिबात अपेक्षित नाही. पुरोगामी म्हटल्या जाणार्‍या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सुरू असलेली उलथापालथ कमालीची उद्वेगी बनली आहे. सात पिढ्यांना पुरेल इतकी कमाई केलेले नेते आज कोणताही संकोच न बाळगता पक्षांतर करीत आहेत. कोणाच्याही कल्याणासाठी ते पक्षांतराच्या मार्गात नाहीत. त्यांचा स्वार्थच यात यशस्वी ठरतो आहे. आपणच मोठे असल्याचं दाखवण्यासाठी हा सारा खेळ आहे. या प्रवेशात ना राज्यहित ना देशहित निव्वळ राजकीय स्वार्थ आहे.

आयुष्यभर ज्या पक्षाच्या मदतीने दरमजल मारत ज्येष्ठत्व मिळवून दिलं तीच माणसं जेव्हा मूळ पक्षाला सोडून परपक्षात जातात तेव्हा ते नक्की कोणाचेच नसतात. त्यांच्या अस्तित्वाचीच त्यांना जाणीव नसते. त्यांना ती नसते तसं त्यांना जे आपल्यात घेतात त्यांनाही ती राहत नाही. केवळ विरोधकांचा नायनाट व्हावा, इतकाच दुष्ट हेतू त्यांच्यात डोकावत असतो.
निस्वार्थ हा शब्द आज राजकीय कोषातून दूर गेला आहे. ज्यांनी भाजपत प्रवेश घेतला आहे. त्यांच्या मागे चौकशांचं शुक्लकाष्ट लागलं होतं, हे सांगण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही सत्तेत पदं भूषवलेल्या व्यक्तीकडून चुका होणं हे स्वाभाविक लक्षण आहे. सत्तेतले सगळेच काही देवाचे अवतार नाहीत. तेव्हा चुका होणं हे जिवंतपणाचं लक्षण मानलं जातं, पण याच चुंकावर बोटं ठेवत विरोधकांना नामोहरम करायचं, ही पध्दत पुढे आली तेव्हाही स्वार्थच डोकावत गेला. ही पध्दत केवळ उफराटी नाही तर चुकलेल्यांच्या कार्यत्वाला ठोकरणारी होय. अशा चुका भाजप नेत्यांनीही केल्या, पण त्यांना त्याचा फटका बसू दिला नाही. नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला तो काही उगीच नाही. त्यांच्यामागे अशाच चौकशांचा ससेमिरा भाजपने लावला. याचा गैरफायदा घेत त्या पक्षाने त्यांना आपल्याकडे घेतले आणि सरतेशेवटी नामोहरम करावं इतका अवमान त्यांना गिळावा लागला.

- Advertisement -

विजयसिंह मोहिते काय आणि सातारचे उदयनराजे काय, कणकवलीचे नारायण राणे काय आणि शिशिर शिंदे काय, आयारामांची इतकी मानहानी झाली की त्यांना पुढे कोणीही विचारलं नाही. नारायण राणे यांच्या पुत्राला म्हणजे नितेश राणे यांना आजवर ज्यांच्या शिव्या शाप स्वीकारल्या त्याच प्रमोद जठारांकडून ए.बी. फॉर्म स्वीकारावा लागला. गाजावाजा करत प्रवेशाची स्वप्नं पाहणार्‍या राणेंची याहून अवहेलना ती काय? यातले गणेश नाईक हे असेच नेते. नाईकांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपत प्रवेशाचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतला जात असताना त्यांनी नवी मुंबईच्या महानगरपालिकेतील सारी सत्ता भाजपच्या पायावर ठेवली. प्रवेश घेतल्याच्या दुसर्‍याच दिवशी नवी मुंबईत पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा नवी मुंबईत आले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नाईक यांनाच खुर्ची नव्हती. त्यानंतरच्या आठवडाभरात बाजार समितीत आयोजित मेळाव्यातही गणेश नाईकांना कुठेच स्थान नव्हतं. हेच नाईक जेव्हा राष्ट्रवादीत होते तेव्हा राज्यातल्या एकाही नेत्याचा कार्यक्रम नाईकांच्या उपस्थितीशिवाय पार पडला नाही. आता तर निवडणुकीच्या जागांबाबतही नाईकांची चक्क फसवणूक करण्यात आली आहे. बेलापूरची जागा त्यांना देण्याचा शब्द देण्यात आला, पण ऐनवेळी तोही परस्पर मागे घेण्यात आला.

भाजपत व्यक्तिकेंद्रित राजकारणाला थारा नाही. जो आहे तो त्या त्या स्तरावर. राष्ट्रीय पातळीवर अमित शहा आणि नरेंद्र मोदी वगळता एकाही भाजप नेत्याला स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागता येत नाही. त्यात आता नव्याने देवेंद्र फडणवीस यांचा समावेश झाला आहे इतकंच. लोकसभेच्या अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन यांना अखेरच्या घटकेपर्यंत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली नव्हती. अखेर महाजन यांना स्वत:च एका पत्राद्वारे आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर करावं लागलं होतं. लालकृष्ण अडवाणींनाही ते यावेळचे उमेदवार नसतील, हे कोणीच सांगितलं नाही. अखेरच्या दिवशी उमेदवारी जाहीर होत नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी अंदाज बांधला. सुमित्रा महाजन आणि लालकृष्ण अडवाणी यांची ही अवस्था असेल तर इतरांची काय बिशाद. नाईक आणि विजयसिंह मोहिते काय या नेत्यांची पत ही म्हणजे महाजन आणि अडवाणींची पत नाही. तेव्हा उगाच बेडकाचा अवतार आणण्यात अर्थ नाही. या सर्वांनाच भाजप प्रवेशाचा आनंद क्षणिक असेल, हे सांगायची आवश्यकता नाही. अनेक वर्षांच्या खस्ता खात संसार उभा राहतो. तो उभा करताना कशा अडचणी येतात हे आपल्या व्यक्तिगत जीवनात आपण अनुभवतोच. मग देशाचा आणि राज्यातल्या राजकारणात स्वत:चा संसार उभा करताना किती खस्ता खाव्या लागत असतील, हे दलबदलूंना कोणी सांगावं? ज्या संसारात आपलं महत्त्व निर्माण केलं त्याच संसाराला एका रात्रीत लाथ मारली जात असेल तर अशा दलबदलूंची दशा करण्याची आवश्यकता केवळ बोलून दाखवण्यापुरती नको.

- Advertisement -

जिथे संधी मिळेल तिथे अशा बदलूंना धक्का देण्याची आवश्यकता आहे. जी व्यक्ती देशाच्या लोकशाहीला मारक ठरेल, या व्यक्तींविरोधात अशाच भूमिकेची अपेक्षा आहे. देशाप्रती प्रेम आणि सिध्दांतवादी, तत्ववादी विचारधारेची किनार असलेली पक्षीय परंपरा त्याकाळी होती. अगदीच कमरेचे सोडले आणि डोक्याला गुंडाळले इतकी निर्लज्ज राजकीय परंपरा त्या काळी नव्हती. आयुष्यभर पक्षाप्रती निष्ठा ठेवून तत्वांनी जगणारे अनेक नेते या देशात आणि राज्यात होवून गेले. कोणतेही आमिष त्यांना विचलित करू शकले नाही. एखाद्या मोठ्या नेत्याने पक्ष सोडला तर त्यावर प्रसार माध्यमातून वैचारिक मांडणी होवून ती जनतेसमोर यायची. सांगायचे तात्पर्य एवढेच की पक्षांतर करताना त्यात वैचारिक मतभेद स्पष्ट असायचे. आपल्या नेत्याने पक्ष का सोडला याचे विश्लेषण जनतेला कळायचे. प्रसारमाध्यमं त्या नेत्याची भूमिका मांडायचे. एखादा पक्ष सोडताना त्याची कारणमिमांसा जनतेसमोर आली पाहिजे. कारण या देशात सार्वभौम कुणीही नाही. सार्वभौम आहे ती जनता आणि या जनतेला घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार. विरोधी पक्षात बसून आपल्या पक्षाच्या ध्येयानुसार सत्ताधारी पक्षावर अंकूश ठेवण्यासाठी लढले पाहिजे. यालाच लोकशाही म्हणतात. परंतु सत्ता गेली की लगेच जन्म देणार्‍या, पालन-पोषण करून संधी देणार्‍या पक्षाशी विश्वासघात करून सत्ताधारी पक्षात सामील व्हायचे.

अन्याय झाला, अन्याय झाला म्हणून ओरडत सत्तेच्या मंडपात घुसायचे, हा वेश्येच्या गळ्यात मंगळहार, असाच प्रकार होय. दलबदलूंचा प्रघात ही राज्याच्या साठमारीला चालना होय. ही साठमारी राज्याच्या भवितव्याला मातीत घालणारी असते. जे कोणी हे करेल त्यालाच घरी बसवण्याची जबाबदारी राज्यातल्या प्रत्येकाने घेतली पाहिजे. एकदा का असा भ्रष्ट नीतीमत्तेचा पायंडा पडला आणि जनता अशा नितीभ्रष्ट नेत्यांना प्रश्न विचारणार नसेल तर हे मस्तवाल बेलगाम बनतील, हे या राज्याला परवडणारं नाही. हीच माणसं संपत्तीच्या जोरावर जनतेला उल्लू बनवत असतात. म्हणून श्रध्दा आणि विश्वास सुध्दा डोळसपणे ठेवला पाहिजे. नेता चुकीचा वागत असेल, मतदारांना गृहित धरत असेल तर त्याच्या सार्‍या पिढ्यांना लक्षात राहील अशी पराभवाची अद्दल त्यांना घडवली पाहिजे. या देशात सार्वभौम कुणीही नाही, सार्वभौम आहे तो मतदार आणि त्याला असलेला मतदानाचा हक्क. लोकशाही वाचविण्यासाठी आणि भ्रष्ट व्यवस्था संपविण्यासाठी या देशातील नितीभ्रष्ट, संधीसाधू, सत्तालोलुपांना घराणेशाही करून जनतेचा विश्वासघात करणार्‍या नेत्यांना संपविण्याचा विचार करण्याची आज गरज आहे. आत्मसन्मान विकलेल्यांनाच रस्त्यावर आणणयाची हीच वेळ आहे…

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -