घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआपण निर्बुद्ध होत चाललो आहोत...!

आपण निर्बुद्ध होत चाललो आहोत…!

Subscribe

मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवरचा असो, फेसबुकवरचा असो, ट्वीटरवरचा असो, अजून कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा असो किंवा मग कुणी ऐकोऐकी सांगितलेला असो. अशा मेसेजेसची सत्यासत्यता पडताळण्यासाठीचा संयमच आपण गमावून बसलो आहोत. पुरेसा विचार न करता लगेच मत व्यक्त करण्याची, भूमिका ठरवण्याची आणि समोरच्याला खोटं पाडण्याची घाई आपल्या नुकसानाला कारणीभूत ठरत आहे. मग ते नुकसान समाज म्हणून आपली शकलं पडण्यातलं असो, लोकशाही म्हणून आपल्या अपयशातलं असो किंवा अर्थव्यवस्थेतले आर्थिक भागीदार म्हणून आलेल्या तोट्यातलं असो. पाकिस्तानी जनतादेखील तिथलं सरकार, लष्कर आणि दहशतवादी संघटनांच्या जाचाखाली भरडली जात असताना पाकिस्तानींविरोधात मेसेज आले की अनाकलनीय राष्ट्रवादाने आपल्या धमन्या टरारून फुगायला वेळ लागत नाही. आपला संयम सुटत चालला आहे!

शाळेत असताना नववीच्या मराठी भाषेच्या पुस्तकामध्ये पहिलाच धडा आणि त्या धड्यातलं पहिलंच वाक्य होतं ‘सांप्रत भारतीय लोक भिकारी होत चालले आहेत’! खरंतर तेव्हा भिकारी हा शब्द परीक्षेत उत्तरामध्ये लिहिताना देखील विचित्र वाटायचं. स्वत:लाच कसं भिकारी म्हणायचं? असा प्रश्न पडायचा, पण आता तेच वाक्य सध्याच्या बदललेल्या आणि अजून बदलत जाणार्‍या परिस्थितीमध्ये थोडं बदलून पुन्हा लागू होऊ लागलंय. सांप्रत भारतीय लोक निर्बुद्ध होऊ लागले आहेत! सारासार विचार किंवा विवेक कशाशी खातात? हेच आपल्याला माहिती नाही की काय, अशाप्रकारचं वर्तन आपल्याकडून होत आहे आणि गंभीर बाब म्हणजे आपल्याला ते कळत नसताना तीच खरी हुशारी आणि ‘अपडेट’ राहणं आहे, असा आपला गैरसमज झाला आहे. त्यातून व्हर्च्यूअल म्हणता येईल अशी वास्तवाची नवी पोकळी निर्माण झाली आहे आणि इहलोकातून या पोकळीमध्ये आपण अगदी अलगद जाऊन पोहोचलो आहोत. जिथे कोणत्याही गोष्टीची कारणमीमांसा न करता त्यावर प्रतिक्रिया देण्याची आणि त्याहीपुढे जाऊन क्रिया करण्याची म्हणजेच ‘अ‍ॅक्शन’ घेण्याची घाई म्हणा किंवा उत्सुकता म्हणा शिगेला जाऊन पोहोचली आहे. आपण निर्बुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे!

‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’ ही संज्ञा गेल्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून बरीच चर्चेत आली आहे आणि या युनिव्हर्सिटीचं ज्ञान इतकं प्रखर आणि प्रभावी असतं, की त्याच्यापुढे आपलं इतक्या वर्षांचं शिक्षण, विचार करण्याची क्षमता, सारासार विवेकबुद्धी, घटनांमागचा कार्यकारणभाव ओळखण्याची वृत्ती असं सारंच नुसतं फिकंच पडत नाही तर पार गायब होऊन जातं. इथल्या प्रत्येक गोष्टीवर दिलं जाणारं ज्ञान अगदी सहज आत्मसात केलं जातं. त्याच दिशेने विचार सुरू होतो. पुढे प्रसार सुरू होतो आणि सर्वात शेवटी त्यावरच आधारित कृती आकार घेऊ लागते. अगदी हल्लीचंच उदाहरण घ्यायचं तर गेल्या दोन दिवसांमध्ये पी. चिदम्बरम यांच्याबद्दल एक मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहे. त्यामध्ये १०० रुपयांच्या दोन नोटा दाखवून त्यावर चिदम्बरम अर्थमंत्री असतानाच्या दोन वेगवेगळ्या गव्हर्नर यांची सही आहे. म्हणून याच नोटबंदीच्या गोंधळामुळे चिदम्बरम यांना अटक झाली, असा अजब शोध लावला आहे आणि हा मेसेज वाचल्यानंतर ग्रुपमधले किंवा आसपासचे लोकं सहज बोलून जातात, ‘अच्छा, म्हणून चिदम्बरमला अटक झाली’! सत्य परिस्थितीच्या अगदी उलटा तर्क!

- Advertisement -

वास्तविक पाहता आपल्या आसपास घडणार्‍या घडामोडींबद्दल अनास्था दाखवणे, त्या घडामोडी दाखवणार्‍या (अर्थात, माध्यमे आपली भूमिका चोख बजावत नसले, तरी त्यातून काय घडतंय, हे तरी समजू शकतं!) प्रसारमाध्यमांबद्दल डोक्यात राग असणे (थँक्स टू स्वत:च्या समजुतीपेक्षा व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीची शिकवण!), सारासार विचार करण्यात वेळ आणि शक्ती खर्च करण्याची इच्छा नसणे आणि अगदी सहज व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणारी माहिती खरी मानून त्यावर लगेच मत तयार करून प्रतिक्रिया देण्याची आळशी वृत्ती असणे अशी काही याची कारणं असू शकतात, पण त्याचा विचार करायलाही सामान्यांना वेळ मिळू नये, याची पुरेपूर काळजी एकीकडे सत्ताधारी आणि राजकारणी घेत असताना जनसामान्य मात्र या ‘फेक’ विश्वात मुक्तविहार करण्यात हुशारी मानू लागले आहेत.

या व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीची दहशत इतकी की पाकिस्तानमध्ये एका न्यायाधीशाने व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली बदलीची अफवा खरी मानून सुरू असलेला खटला जागेवर थांबवला! आता यावर सहज प्रतिक्रिया असेल ‘हे पाकिस्तानमध्येच होऊ शकतं’ (पाकिस्तानी नागरिकांबद्दल इतका पराकोटीचा असंतोष, कारण पुन्हा थँक्स टू व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी!) तर हे प्रकार भारतातही फारच विलक्षण पद्धतीने सुरू असतात. याच महिन्यात केरळच्या मुन्नारमध्ये अशाच एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमुळे स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये दिवसभर खातेदारांची रीघ लागली होती. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक पोस्ट खातेदाराच्या खात्यामध्ये पात्रतेनुसार ३ ते ५ लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं होतं. ‘बंगळुरूमध्ये दहशतवादी हल्ला होणार’, अशा व्हायरल मेसेजमुळे मागच्या आठवड्यात बंगळुरूच्या काही भागामध्ये रस्त्यांवर स्मशानशांतता पसरली होती. अशाच व्हायरल बातमीमुळे गाझियाबादमध्ये दोन माणसं एकमेकांसमोर उभी होती, पण अशाच दोघांनी शहरात लहान मुलांचं अपहरण केल्याच्या व्हायरल बातम्यामुळे पेटलेल्या लोकांनी या दोघांना गलितगात्र होईपर्यंत मारहाण केली. आपल्याच नातीसोबत जाणार्‍या एका ५८ वर्षांच्या महिलेला जमावाने बेदम मारहाण केली. कारण काय, तर जमावाला वाटलं की नातीचा रंग गोरा आहे आणि आजीचा रंग काळा आहे. त्यामुळे ती त्या आजीची नात नसून तिने अपहरण केलेली मुलगी आहे!

- Advertisement -

आत्ताही हा लेख लिहिताना आणि तुम्ही हा लेख वाचताना असे अगणित मेसेज व्हायरल होत असतील आणि त्यावर भडकलेला किंवा मूर्ख बनलेला जमाव त्याच मूर्खपणावर आधारीत मतं पसरवत असेल, त्यावर कारवाई करत असेल. मुळात अशा मेसेजेसची सत्यासत्यता पडताळण्याचा प्रचंड कंटाळा आणि आपल्या कथित पुरुषार्थाला किंवा भावनिकतेला हात घालणार्‍या मेसेजेसची सहज उपलब्धता यामुळे आलेल्या मेसेजेसवर विचार करण्याच्या भानगडीत कुणी फारसं पडत नाही. जिथे शहरी कथित शहाण्याची ही अवस्था, तिथे खेडुत अशिक्षित जनतेची काय व्यथा? त्यांना तर इतर कोणत्याही गोष्टीची, संदर्भांची आणि वैचारिक माहितीची उपलब्धता नसताना हातात आलेला स्वस्तातला मोबाईल आणि त्यामध्ये टाकलेल्या स्वस्तातल्या नेटच्या जिवावर जे काही त्यांच्यापर्यंत पोहोचतं, तेच खरं असं मानून चालणार्‍यांची संख्या प्रचंड मोठी आहे. अमित शाह यांनी यासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांसमोर नुकताच केलेला दावा खूप काही सांगून जाणारा आहे. ‘देशातल्या एकूण ५२ लाख लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप भाजपकडे आहेत. त्या जिवावर आपण हवी ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, खरी वा खोटी! याचा आधार घेत काही महिन्यांपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांच्याच वडिलांच्या कानशिलात लगावल्याचं खोटं वृत्तदेखील त्याचंच एक उदाहरण आहे’. देशाच्या गृहमंत्र्यांच्या या वक्तव्याला अजून कुठल्या पुराव्याची गरज नसावी!

मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवरचा असो, फेसबुकवरचा असो, ट्वीटरवरचा असो, अजून कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा असो किंवा मग कुणी ऐकोऐकी सांगितलेला असो. अशा मेसेजेसची सत्यासत्यता पडताळण्यासाठीचा संयमच आपण गमावून बसलो आहोत. पुरेसा विचार न करता लगेच मत व्यक्त करण्याची, भूमिका ठरवण्याची आणि समोरच्याला खोटं पाडण्याची घाई आपल्या नुकसानाला कारणीभूत ठरत आहे. मग ते नुकसान समाज म्हणून आपली शकलं पडण्यातलं असो, लोकशाही म्हणून आपल्या अपयशातलं असो किंवा अर्थव्यवस्थेतले आर्थिक भागीदार म्हणून आलेल्या तोट्यातलं असो. सरकारकडून कोणतीही घोषणा न होता देखील पेट्रोल महागणार असा मेसेज व्हायरल झाल्याबरोबर पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी काही आपल्याला नवी नाही. सगळेच मुस्लीम दहशतवादी आणि भारतद्वेष्टे असतात यासारख्या लाखो मेसेजेसला भुलून भारतातल्या प्रत्येक मुसलमानाला न्यायालयाच्याही परस्पर दहशतवादी ठरवून संशयित नजरेने पाहणारे आपल्याकडे कमी नाहीत. पाकिस्तानी जनतादेखील तिथलं सरकार, लष्कर आणि दहशतवादी संघटनांच्या जाचाखाली भरडली जात असताना पाकिस्तानींविरोधात मेसेज आले की अनाकलनीय राष्ट्रवादाने आपल्या धमन्या टरारून फुगायला वेळ लागत नाही. आपला संयम सुटत चालला आहे!

कोट्यवधी भारतीयांच्या हातात मोबाईल फोन आहेत. फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅप आहे. अगणित मेसेज या सर्व माध्यमांमध्ये आधीच पोहोचले आहेत. मागची पिढी विटी-दांडूपर्यंत पोहोचली त्या वयात नवीन पिढी कधीच व्हर्च्युअल झाली आहे. पुढची पिढी याच व्हर्च्युअल जगात जन्माला येणार आहे. वास्तव जगाबद्दल ऑनलाईन माध्यमांनी निर्माण केलेल्या नकारात्मक प्रतिमेमुळे व्हर्च्युअल जगात वावरणारी आणि पुन्हा त्याच व्हर्च्युअल जगातून वास्तव जगाकडे त्रासिक नजरेनं पाहणारी आजची पिढी उद्याचा भारत असणार आहे. अशा परिस्थितीत जितकं ऑनलाईन समाजमाध्यमांवर पसरेल, तितका उद्याचा भारत वास्तवापासून दूर जात राहील आणि वास्तवाचा तिरस्कार करत राहील आणि मग अशा परिस्थितीत एकट्या भाजपकडेच ५२ लाख भारतीय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आहेत आणि फक्त तेच त्यांना हवा तो, खरा किंवा खोटा, मेसेज लोकांपर्यंत पोहोचवू शकतात, असं मानणं मूर्खपणाचं आणि निर्बुद्धपणाचं ठरेल. कदाचित ते तसं मानण्याची हिंमत आपल्यामध्ये असेलही. कारण सांप्रत भारतीय लोक निर्बुद्ध होत चालले आहेत!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -