करपलं रान देवा, जळलं शिवार!

अनलॉकनंतर घराबाहेर पडताना थोडीशी जोखीम घेऊनच लोकांना त्यासाठीच घराबाहेर पडावं लागतं आहे. अशा वेळी रोजीरोटीसाठी बाहेर पडणारी ही माणसं, हातावर पोट असणारी माणसं तळहातावर शिर घेऊन निघालेल्या बहाद्दरांसारखीच वाटू लागली आहेत. ही माणसं घराबाहेर पडताहेत...हो, त्यांना घटनेनं दिलेलं संचारस्वातंत्र्यही काठाकाठाने उपभोगताहेत, पण तरीही ती निर्धास्त दिसत नाहीत. मोकळीढाकळी वाटत नाहीत. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी कपाळावरची चिंतेची काजळी स्पष्ट दिसते आहे.

कोरोनाने जगाचा पिच्छा अजून काही सोडलेला नाही. अजूनही जग कोरोना सांडलेल्या अवस्थेत आहे. अर्थशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ वगैरे मंडळी कोरोनानंतर येणार्‍या भीषण आर्थिक स्थितीबद्दल सर्वांना सावध करताहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनानंतरचा म्हणजे करोना संपल्यानंतरचा काळ कठीण असेल. तो काळ किती कठीण असेल ते आजच सांगता येत नाही, पण आजच्या कोरोनादरम्यानच्या काळातच हळुहळू हे चटके जाणवू लागले आहेत. कोट्यवधी संसारांना त्याची झळ बसू लागली आहे.

अनलॉकनंतर घराबाहेर पडताना थोडीशी जोखीम घेऊनच लोकांना त्यासाठीच घराबाहेर पडावं लागतं आहे. अशा वेळी रोजीरोटीसाठी बाहेर पडणारी ही माणसं, हातावर पोट असणारी माणसं तळहातावर शिर घेऊन निघालेल्या बहाद्दरांसारखीच वाटू लागली आहेत. ही माणसं घराबाहेर पडताहेत…हो, त्यांना घटनेनं दिलेलं संचारस्वातंत्र्यही काठाकाठाने उपभोगताहेत, पण तरीही ती निर्धास्त दिसत नाहीत. मोकळीढाकळी वाटत नाहीत. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी कपाळावरची चिंतेची काजळी स्पष्ट दिसते आहे.

परवा असाच मी काही कामासाठी घराबाहेर पडलो. आजुबाजूला पाहिलं तर मला दिसणारं दृश्य नेहमीचं नव्हतं. नेहमीचे भाजीवाले, फेरीवाले होतेच, पण त्यांच्यासोबत काही वेगळ्या भाजीवाल्या, फेरीवाल्यांची भर पडली होती. कालपरवापर्यंत ज्यांच्या संसाराचं रहाटगाडगं बरं चाललं होतं ती माणसं आज रस्त्यावर उतरलेली दिसत होती. कुणी भाजी विकत होतं, काही तरणीबांड मुलं मासळी विकत होती, काही पोरसवदा मुलं-मुली मास्क विकत होत्या. त्यांचा हा पोटापाण्याचा, जगण्याचा, अस्तित्वाचा लढा पहात पहात मी चाललो होतो. सुर्‍याला धार लावून देणारा कुणी कळकट-मळकट कपड्यातला तर ‘धारवाला, धारवाला’ असं जिवाच्या आकांताने ओरडत होता. असं ‘धारवाला, धारवाला’ ओरडताना त्यांच्या मानेची ती ताणली जाणारी शिर स्पष्ट दिसत होती.

ह्या अशाच करूण कोरोनामय वातावरणात मी एका रिक्षाला हात केला. रिक्षात बसलो. त्या रिक्षाच्या ड्रायव्हरला मी माझं जाण्याचं ठिकाण सांगितलं.
‘सुटे पैसे आहेत ना!’ असं फार खोल स्वरात विचारत त्याने माझ्याकडे पहात मीटर टाकला. त्याच्या नजरेतला भकासपणा त्याने लपवण्याचा प्रयत्न केला असता तरी तो दिसलाच असता इतकी त्याच्या आजच्या जीवनातली अगतिकता ठळकपणे दिसत होती.
मी होकारार्थी मान हलवली.
‘सुटे पैसे का विचारताय!…तुमच्याकडे नाहीत का?’, मला त्याला बोलतं करायचं होतं. त्याची नेमकी अडचण जाणून घ्यायची होती.
‘तसं नाय सायब,’ तो म्हणाला, ‘आत्ताच मी दोन भाडी भारली, दोघांच्याकडं पण शंभर-दोनशे-पाचशेच्या नोटा होत्या, त्यांना केळीवाल्या-कांदेवाल्याकडे भिका मागून कसंबसं सुटं पैसं करून दिलं, त्येच्यामुळं आता माझ्याजवळ सुटं पैसं राह्यल्यालं न्हायत. म्हणून तुम्हाला आपलं विचारलं. पहिलंच सांगितलेलं बरं, नाय का!’
‘हो, सुटे पैसे ही तुमच्या धंद्यातली आता तर मोठी अडचण असेल, नाही का!’ मी त्याला जाणीवपूर्वक विचारलं.
‘सायब, सुट्या पैशाची अडचण हायच हो, पण ते नसतील तर ह्येच्यात्येच्याकडनं भीक मागून आणताना आणि ते आमच्याकडनं घेताना लोकांची जी तगमग होती ती बघून आपल्याला लई तकलिफ होते हो…त्यांना नोटा तर पायजेल असतात, पण त्या नोटांना खूप लांबनं शिवायचं असतं. एक मॅडम म्हणाली, नोट इथं ठेवा, मग मी घेते…काय करायचं, त्यांचंसुध्दा चुकत नसतं आणि आमचं पण,’ त्याने आपली कैफियत माझ्याकडे मांडली.
मला त्याचा तो धंदा आणि तो त्या एका क्षणी फारच उपेक्षित वाटला.
‘धंदा तरी पूर्वीच्यासारखा होतो का हो?‘ मी काळजीने विचारलं.
‘कसला धंदा राहिलाय…बरेच लोक तर पायी पायी जातात, पण रिक्षात बसायला मागत नायत…एकतर लॉकडाउनमध्ये जे कर्ज झालं ते पण अजून फिटलं नाय,’ तो मागे बसलेल्या मला पुढे बघून सांगत होता.
हे सगळं सांगून एकाएकी थोडा वेळ तो शांत झाला. अगदी नि:शब्द. आमची रिक्षाही सिग्नलला थांबली. त्याने हळू आवाजात रिक्षात गाणं लावलं, ‘नटरंग’मधलं ’खेळ मांडला…देवा, खेळ मांडला.’
तो आणि मी आता काहीच बोलत नव्हतो. तो गपगुमान रिक्षा चालवत होता. पण ते गाणं माझ्या मनावर एव्हाना एकेक ओरखडा ओढत होतं.
‘भेगाळल्या भुईपरी जिणं, अंगार जीवाला जाळी’ ही ओळ ऐकता ऐकता तर पार जिव्हारी लागली.
मी मला जायच्या ठिकाणी पोहोचलो. मी त्याचा मीटर दाखवत होता तितके नेमके पैसे दिले. अगदी सुटे पैसे दिले. कोरोनाआधीच्या काळात जसे आपण देत होतो तसे दिले. कसल्या स्पर्शाची भीती न बाळगता…पण घरी येताच घरच्यांनी मात्र ते सॅनिटाइज केलेच!…मला त्या गाण्यातली ती ओळ पुन्हा आठवली – करपलं रान देवा, जळलं शिवार!