किंगमेकर कोण… उद्धव, पवार की सोनिया

राजकारणात जर का तुम्हाला कुणाच्या भरवशावर वा निर्णयावर अवलंबून राहावे लागते त्याचवेळी तुमची राजकीय पटलावरची कारकीर्द ही छोटी होत जाते. शिवसेना सध्या त्याच पॅचमधून जात असून किंगमेकर असूनही शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी काय निर्णय घेतात यावर सत्तेचे गणित जुळवावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागल्यापासून किंगमेकरच्या भूमिकेत सोनिया गांधी गेल्या आणि निवडणुकीपासून ते आतापर्यंत सर्वांनाच आपल्या कलेने खेळवणारे राजकारणातील भीष्माचार्य शरद पवार यांचाही राजकीय बुद्धीबळाच्या पटावर 64 घरांमधील वावर हळूहळू कमी होताना दिसत आहे.

Mumbai

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन महिना होत आलाय तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागून एक आठवडा झालाय. मात्र, राजकीय स्थिती जैसे थे… मागच्या पानावरून पुढेही सरकलेली नसल्याने अखेर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हिंदुत्वाच्या आणाभाका घेऊन तीन दशके युतीत असणारे दोन पक्ष आमने-सामने उभे ठाकले. भाजप आणि शिवसेनेने मागील महिन्याभरात परस्परांवर आरोप केले. मात्र, कुणाकडूनही युती तुटल्याची घोषणा झालेली नाही हे विशेष. त्यामुळेच 30 वर्षांचा मित्र हा मित्र राहिला नाही तरी चालेल; पण कपट, कटकारस्थाने करून शत्रूपक्षाशी हातमिळवणी करीत असेल तर नक्कीच यातना होणार. तीच गत सध्या शिवसेना आणि भाजपची झाली आहे. शिवसेनेचे केंद्रात एकमेव मंत्री असलेले अरविंद सावंत यांनी आठवड्यापूर्वी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा राजीनामा देत एनडीएतून बाहेर पडत असल्याचे संकेत दिले, तर भाजपनेही आठवड्याभरानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या माध्यमातून ‘शिवसेनेच्या मंत्र्याने राजीमाना दिल्याने आणि महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक करत असल्याने आम्ही त्यांच्या दोन्ही सभागृहातील जागा बदलून विरोधी पक्षाच्या दिशेला केली आहे’, असे सांगितले. त्यामुळेच शिवसेनेला आता केंद्रात आपला कुणी मित्र राहिला नाही याची जाणीव पहिल्यांदा झाली आणि त्यातूनच भाजपबद्दलचा राग सध्या शिवसेनेच्या मोजक्या नेत्यांमध्ये दिसून येतो. मात्र, असे असले तरी शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे-पुढे करण्यापेक्षा भाजपशी बिघडलेले संबंध कसे सुधारतील याकडे शिवसेनेच्या गोटात दबक्या आवाजात सध्या कुजबूज सुरू आहे. त्यामुळेच राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो… आम्ही अजून युती तोडलेली नाही… परतीचे दोर आम्ही कापलेले नाहीत… अशी वक्तव्ये शिवसेनेकडून केली जात आहेत, हे विशेष.

निवडणुकीच्या निकालापासून एक क्रमांकाचा पक्ष असलेला भाजप बॅकफूटवर गेल्याचे दिसले. मात्र, दोन क्रमांकाचा पक्ष असलेला शिवसेना हा सुरुवातीपासून किंगमेकरच्या भूमिकेत होता. शिवसेनेशिवाय भाजप किंवा महाशिवआघाडीचे सरकार येणार नाही याची कल्पना आल्यानेच निकालाच्या दिवशीच शिवसेनेने आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याची भाषा करत भाजपला वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत बसायला भाग पाडले. मात्र, त्याचवेळी राष्ट्रपती राजवट लागल्यापासून शिवसेनेची किंगमेकरची भूमिका गळून पडली आणि त्यांना तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांवर विसंबून राहावे लागले. राजकारणात जर का तुम्हाला कुणाच्या भरवशावर वा निर्णयावर अवलंबून राहावे लागते त्याचवेळी तुमची राजकीय पटलावरची कारकीर्द ही छोटी होत जाते. शिवसेना सध्या त्याच पॅचमधून जात असून किंगमेकर असूनही शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी काय निर्णय घेतात यावर सत्तेचे गणित जुळवावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीपासून किंगमेकरच्या भूमिकेत सोनिया गांधी गेल्या आणि निवडणुकीपासून ते आतापर्यंत सर्वांनाच आपल्या कलेने खेळवणारे राजकारणातील भीष्माचार्य पवार यांचाही राजकीय पटावरील 64 घरांमधील वावर हळूहळू कमी होताना दिसत आहे.

शरद पवार जे बोलतात ते कधीच करीत नाहीत आणि करतात ते कधीच बोलत नाहीत असा एक समज आहे. मात्र, मागील आठवड्याभरातील त्यांची वक्तव्ये नीट बघितली आणि ऐकली तर ते त्यांच्या स्वभावाला तंतोतत जुळताना दिसतात. महाराष्ट्रात तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा एक समान बिंदू राजकारणात निर्णय घेत होता तो बिंदू म्हणजे पवार. त्यामुळे 1980 असो, 2014 असो वा 2019 या तिन्ही वेळी राष्ट्रपती राजवट आणि समीकरणे बघितली तर पवारांच्या ‘पॉवर प्ले’ ची चुणूक दिसते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीकडे असणारा राज्यातील सत्तेचा रिमोट कंट्रोल हळूवारपणे पवारांनी आपल्याकडे कधी घेतला हे उद्धव यांनाही कळला नसणार, तर त्यावर कढी म्हणजे विदेशीपणाचा आरोप झालेल्या; पण भारतीय राजकारणाची नस ओळखणार्‍या सोनिया गांधींनी पवारांकडील रिमोटची बॅटरी काढत ती 10 जनपथवर आणून ठेवली आहे. त्यामुळे रिमोट कंट्रोल जरी पवारांच्या सिल्व्हर ओकवर दिसत असला तरी 10 जनपथवर रिमोटमधील बॅटरी आणण्यासाठी पवारांच्या फेर्‍या वाढणार हे मात्र निश्चित. ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने’ या म्हणी प्रमाणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी अजुनही कागदावरच आहे.

गेला आठवडाभर सत्तेेचे गुर्‍हाळ दळण्यात शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि काँग्रेसकडून अहमद पटेल वेगवेगळे फॉर्म्युले बनवत असले तरी आता लवकरात लवकर महाशिवआघाडीचे सरकार स्थापन व्हायला हवे. नाहीतर गप्प बसलेली भाजप ‘मी पुन्हा येईन’च्या जोशात सत्तेचे समीकरण बिघडवू शकते, अशी भीती निवडून आलेल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना वाटते आहे. महाशिवआघाडी हे एका पक्षाचे सरकार नसेल. त्यामुळे हे सरकार स्थापन होण्यासाठी वेळ तर लागणारच. कारण वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा विचारासाठी वेळ घ्यावाच लागतो, असे कारण देत महाशिवआघाडीचे निमंत्रक संजय राऊत यांनी पवार जे काल बोलले ते योग्यच आहे, असे सर्टिफिकेटही पवारांना देत सारे काही आलबेल असल्याचे चित्र रंगवले आहे. एनडीएतून शिवसेनेला बाहेर काढण्याच्या प्रकाराने शिवसेनेचे नेते दु:खी आहेत. २०१४ मध्ये युती तुटली होती. त्यानंतर आम्हाला युतीत जायची इच्छा नव्हती. भाजपनेे त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपच्या अंताची सुरुवात ही महाराष्ट्रातूनच होणार आहे. येत्या काळात भाजपला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी आता जुळवून घ्यायचे नाही. महाराष्ट्रातील सत्तापेचाची किंमत त्यांना चुकवावी लागल्याचे संकेत गेल्या काही दिवसांत दिसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून गेल्या काही दिवसांपासून मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या मोठा वाद पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सामनातून भाजपवर कडक शब्दांत प्रहार सुरू केला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचा महाराष्ट्र अशा मंबाजींना साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. आता महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात एकच गर्जना घुमेल, शिवसेना झिंदाबाद! हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत’, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनीही सामनामधून भाजपला थेट आव्हान दिले आहे. महाराष्ट्राशी घेतलेला पंगा तुमचा तंबू उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र एकतर उठत नाही आणि उठला की बसत नाही असे म्हणत आता शिवसेना आणि भाजपची आरपारची लढाई सुरू झाली आहे.

निवडणुकीनंतर महिन्याभरानंतरही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आहे तशीच आहे. त्यात कोणताही बदला झालेला नाही. त्यामुळे 56 आमदार निवडून आणणारी शिवसेना शरद पवार यांच्या जाळ्यात अलगद कधी अडकली आणि सत्तेची सूत्रे हळूवारपणे मातोश्रीवरून निसटत ती सिल्व्हर ओकपर्यंत गेली. पवारांच्या एकहाती प्रचार सभा आणि भाजपला एकहाती अंगावर घेतल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला झाला आणि प्रचारात कुठेही न दिसणार्‍या काँग्रेसने अल्पसंख्याक आणि दलित समाजाच्या वोट बँकवर मजल मारत 44 आमदारांना विधानसभेत पाठवले. त्यामुळे तुलनेने राष्ट्रवादीचे 10 आमदार जास्तीचे निवडून येऊनही काँग्रेसच सध्या किंगमेकरच्या भूमिकेत दिसते. शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडत आपले दरवाजे बंद केल्याने आता शिवसेनेला शरद पवार यांच्या मागे फरफटत जाण्यापेक्षा दुसरा मार्ग सध्या तरी दिसत नाही. उद्धव ठाकरे यांच्या वारंवार यू टर्न मारण्याबाबत प्रसारमाध्यमांत बरीच टीका होत असते. मात्र, यावेळी जर त्यांनी यू टर्न घेतला तर तो त्यांच्या ठाकरे आडनावाला शोभणारा नसेल हे मात्र नक्की. त्यामुळे आता शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेतून वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत गेलेली दिसते. म्हणूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार की भाजपचाच पुन्हा मुख्यमंत्री होणार यासाठी अजून काही दिवस मतदारांना वाट बघावी लागणार. अन्यथा राष्ट्रपती राजवटीचे महिने उलटून गेल्यास शिवसेना आणि भाजपच्या हाती भोपळा आलेला दिसेल आणि त्यासाठी पुन्हा शरद पवार यांचा पॉवर प्ले कारणीभूत ठरण्याची दाट शक्यता आहे.