घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराज्यपालांना हिंदुत्व का आठवले ?

राज्यपालांना हिंदुत्व का आठवले ?

Subscribe

राज्यपाल हे आपल्या देशाच्या राज्यघटनेने निर्माण केलेले पद असून या घटनेचा धर्मनिरपेक्षता हा पाय आहे. हे काय कोणाला माहीत नाही का? नक्कीच माहीत आहे. कारण हे सामान्य नागरिकशास्त्र आहे. पण, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वागणे, बोलणे, चालणे पाहता ते सांगा कोणाचे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या कोश्यारी यांचा आतापर्यंतचा महाराष्ट्रातील कारभार बघितला तर ते राज्यपाल आहेत की, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत हेच कळेनासे होते आणि मग प्रश्न पडतो राज्यपाल सांगा कोणाचे? कंगना रानौत या नटरंगी अभिनेत्रीने मुंबई, महाराष्ट्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अजिबात मान न ठेवता अगदी निर्लज्जपणे टीका केली. तिला भाजपची फूस होती हे उघड दिसत होते. मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर वाटते, असं बरळणार्‍या या वाचाळ बाईला राज्यपाल तिच्यावर आभाळ कोसळल्यासारखे भेट देतात, तिची मायेने चौकशी करतात. त्याच अधिकाराने तुमचे हे बोलणे योग्य नाही, असे तिला ठणकावून सांगत का नाहीत? कसे सांगणार? दिल्लीतून मोदी सरकार या बाईला वाय सुरक्षा व्यवस्था देत असेल तर राज्यपाल तिची आस्थेने चौकशी करणार ना. हे काय उघड सांगायची गोष्ट असते का भाऊ! भाजपच्या नेत्यांना, पदाधिकार्‍यांना ज्या सहजतेने आपले राज्यपाल भेटतात ते पाहता राज्यपाल सांगा कोणाचे? हे नव्याने सांगण्याची गरज नाही आणि मंगळवारच्या प्रकरणाने ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरांवरुन सोमवारी पत्र लिहिले आणि मंदिरे का उघडत नाही असा सवाल केला? हा सवाल ठीक होता. पण, हे पत्र लिहिताना कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचा विसर पडलाय का? असा प्रश्न केला. असा सवाल करण्याची त्यांना काय गरज होती. ते राज्यपाल आहेत का भाजपचे प्रवक्ते. एकदा त्यांनी तसे जाहीर करावे, मग प्रश्न निकाली निघतो. राज्यघटना त्यांना एखाद्या मुख्यमंत्र्याला तुम्हाला हिंदुत्वाचा किंवा तुमच्या धर्माचा विसर पडला आहे का, असे सांगण्याचे अधिकार देते का? मग कोश्यारी यांना तसे वागण्या-बोलण्याचा अधिकार दिला कुणी? अशी हिंमत होते कशी? या सार्‍या प्रश्नांचे उत्तर हे आहे की, वर भाजपचे मोदी सरकार असून आणि त्यांचा अशा लोकांना आशीर्वाद आहे. कंगनाबाईला जसा वरदहस्त आहे तसाच हा प्रकार आहे. कोश्यारी यांना उद्धव ठाकरे यांनीही मग जशाच तसे उत्तर देत ‘माझ्या हिंदुत्वाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही’, असा शालजोडीतला दिला हे बरे केले. शिवाय ‘मुंबईला पीओके म्हणणार्‍यांचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्वात बसत नाही’, असा टोला देखील लगावला, हे आणखी बरे केले. कोरोनाच्या काळात लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत त्यांचे पगार निम्मे झाले. लोकांच्या हाताला काम नाही.

- Advertisement -

नवीन नोकर्‍या नाहीत. महागाई वाढत चालली असून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लढाई अपुरी पडत आहे. यावर कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असते तर समजू शकले असते, पण त्यांना लोकांची नाही तर मंदिरांची आणि हिंदुत्वाची काळजी वाटत असेल तर राज्यपाल सांगा कोणाचे? असा प्रश्न पडून त्याचे उत्तर भाजपचे. असे सरळ उत्तर मिळत असेल तर कोश्यारी आज ज्या पदावर बसले आहेत त्या राज्यपालपदाचा सन्मान न राखण्यासारखे आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी ठणकावले ते बरोबर आहे, असे म्हणावे लागेल. ‘राज्यपाल महोदय, असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे सेक्युलर असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत तिचा महत्वाचा गाभा सेक्युलॅरिझम आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही दैवी उपदेश येतात का? असाही प्रश्न आपणास पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे’, असे सांगत कोश्यारी यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्याचे उत्तम काम ठाकरे यांनी केले. विशेष म्हणजे हे उभ्या महाराष्ट्राने तर पाहिलेच, पण त्याचे पडसाद दिल्लीतही उमटले असतील तर ते बरेच म्हणायला हवे. कोणी तरी अरेला कारे करत आहे.

जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल, असे कोश्यारी यांना ठाकरे यांनी सुनावल्याने ती मोठी चपराक भाजपला होती. कारण एका मुख्यमंत्र्यांचे ते काम करत आहेत, हेच त्यांच्या बोलण्यातून दिसले.

- Advertisement -

कोश्यारी हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख असल्याने त्यांनी हे सरकार घटनेनुसार चालते की नाही, हे पाहायचे असते. बाकी इतर गोष्टींसाठी लोकनियुक्त सरकार आहे, ते निर्णय घेत असतात. खरे तर उद्धव ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, तर शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. शिवाय शिवसेना हिंदुत्ववादी आहे हे सगळ्या देशाला माहीत आहे. मग फक्त मंदिरे उघडण्यासाठी त्यांना हिंदुत्वाची जाणीव करून देण्याची काही गरज नव्हती. त्यांचे पत्र म्हणजे कोश्यारी यांचा बोलविता धनी कोणी दुसरा आहे का अशी शंका निर्माण करणारा आहे. मग राज्यपाल सांगा कोणाचे? असा प्रश्न निर्माण होत असेल तर ती कोणाची चूक म्हणावी लागेल, याचा त्यांनी नक्की विचार करावा. शंका आधीसुद्धा आली होती. भाजपने रात्रीस खेळ करून भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देताना कोश्यारी यांनी इतकी घाई कशाला केली होती? शेवटी हसे होऊन काही तासांच्या अंतराने हे रात्रीचे सरकार कोसळले आणि यात फडणवीस यांच्याप्रमाणे राज्यपाल पदाची शान गेली. तेच आता पत्रावरून झाले. राज्यपाल या घटनात्मक पदाचा मान गेला.

मागच्या सहा महिन्यांपासून मंदिरांच्या बरोबरीने सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनही बंद आहे. या लोकलअभावी मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजले आहेत. विरार, वसई, नालासोपारा, कल्याण, डोंबिवली सोडा, पण शहरात राहणार्‍यांना दादरवरुन चर्चगेट गाठण्यासाठी कसरत करावी लागतेय. लॉकडाउनमध्ये लोकांचं उत्पन्न कमी झालेलं असताना, शहरातच एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे जाण्यासाठी वेळ आणि बरेच पैसे मोजावे लागत आहेत. याचा विचार करता लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी आंदोलन होणे गरजेचे असताना भाजप आणि राज्यपाल कोश्यारी सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या प्रश्नाचा विचार करत नाहीत? कारण देव धर्म, मंदिरे, पूजाअर्चा दाखवून लोकांचे मेंदू बधिर करता येतात. पोटाला भाकर देता येत नाही, हे खरे वास्तव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -