नाथाभाऊ खरंच राष्ट्रवादीत चालले?

eknath khadse
एकनाथ खडसे

भारतीय जनता पार्टीचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या मागील काही दिवस येत आहेत. त्यातच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचेही काहीजण ठामपणे सांगत आहेत. इतकं की त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासाठी घटस्थापनेचा मुहुर्त ठरला असल्याच्या पैजाही काहीजणांनी लावल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांनी एका पत्रकार परिषदेत नाथाभाऊ लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही केला आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले की त्यांना राज्याचे कृषिमंत्रिपद मिळणार हे नाथाभाऊंच्या जवळील कार्यकर्ते अगदी छातीठोकपणे सांगत आहेत. एकंदरीत नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चांगलीच वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.

नाथाभाऊ जर राष्ट्रवादीत गेले तर त्यांच्यासाठी शनिवारचा मुहुर्त ठरलेला आहे. इथपर्यंत सर्व सुरळीत होत आलेले आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादीत जातील की भाजपतच राहतील हे मात्र ते स्वत:च सांगू शकतात आणि आतापर्यंत त्यांनी तसा कोणताही गौप्यस्फोट केलेला नाही. मग अशी वातावरण निर्मिती कशाला होत आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या वातावरणाचा नेमका फायदा कोणाला होणार याचाही विचार करणे अगत्याचे आहे. नाथाभाऊंची भाजपत घुसमट होते, यात कोणतेही दुमत नाही. खुद्द नाथाभाऊंनी ती वारंवार बोलून दाखवली आहे. पक्षाच्या राज्यातील नेतृत्त्वावर त्यावरून त्यांनी वारंवार तोफही डागलेली आहे. मात्र आज त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची वेळ अटीतटीवर आली असताना नाथाभाऊंनी त्याबाबत स्वत:हून आपले मौन सोडणे आवश्यक होऊ लागले आहे. नाथाभाऊ आज त्या मन:स्थितीत दिसत नाहीत.

राजकारणात काहीही होऊ शकते. त्यातही नाथाभाऊंसारख्या प्रभावी नेत्याला रोखणे कठीण आहे, हे आता राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाला कळून चुकले आहे. मात्र त्याचवेळी नाथाभाऊंना हेही माहीत आहे की स्वपक्ष सोडून अन्य पक्षात गेल्यास आतापर्यंत जी पतप्रतिष्ठा मिळवली ती एका क्षणात धुळीस मिळू शकते. जो मानसन्मान स्वपक्षात मिळतो तो अन्य पक्षात मिळेलच असे नाही. पुन्हा विचार आणि तत्वांशी तडजोड करावी लागणार हे निश्चित. २०१४ साली विधानसभा निवडणुकीपूूर्वी भाजपने, शिवसेनेसोबतची युती तोडली होती. त्यावेळी स्वत: नाथाभाऊंनी आपण ही युती तोडली म्हणून सांगितले होते. त्यातून त्यांनी शिवसेनेचा रोष ओढवून घेतला होता. आता नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आणि मंत्री झाले तर त्यांना शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखालीच काम करावे लागणार आहे. दुसरे म्हणजे भाजप सोडून गेलेले यशवंत सिन्हा आणि जसवंत सिंंह यांची काय अवस्था झाली हे नाथाभाऊंनाही माहीत आहे. आज जसवंत सिंह जिवंत नाहीत. मात्र यशवंत सिन्हा भाजप सोडल्याचा अनुभव घेत आहेत. मुरब्बी राजकारणी म्हणून नावलौकिक असलेले नाथाभाऊ यांना हे माहीत नसेल का? त्यामुळे तर नाथाभाऊ पक्ष सोडण्याबाबत अद्याप ठाम भूमिका घेत नसतील का?

नाथाभाऊंचा खान्देशातील लोकसंग्रह, लोकप्रियता, कामाचा झपाटा प्रचंड आहे. कार्यकर्त्यांवरील त्यांचे प्रेम आणि दरारा याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे. सुरेशदादा जैन यांच्यासारख्या नेत्याला खान्देशच्या राजकारणात निष्प्रभ करण्याचे मोठे काम नाथाभाऊंनी करून दाखवले आहे. शतप्रतिशत भाजप ही संकल्पना महाराष्ट्रात नाथाभाऊंनी सर्वप्रथम खान्देशात रुजली. त्याच ध्येयाने पछाडत त्यांनी राज्यातही शतप्रतिशत भाजपसाठी प्रयत्न केले. आज त्याच नाथाभाऊंवर आपला पक्ष सोडण्याची वेळ आली आहे. त्याचे कारणे काय असतील, याचा भाजप नेत्यांनी विचार करायला हवा आहे. युती तोडली म्हणून त्यावेळी नाथाभाऊंवर आगपाखड झाली असली तरी केवळ आपल्याच पक्षाची एकहाती सत्ता यावी, सत्ता स्थापन करण्यासाठी आपल्याला अन्य कोणाच्या कुबड्यांची आवश्यकता भासू नये, अशी इच्छा प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची असते. नाथाभाऊ त्याबाबत काही वेगळे नव्हते.

उलट त्यांनी तसा प्रयत्न केला म्हणून तर राज्यात भाजपचं वर्चस्व असलेल्या युतीची सत्ता आली होती. नाथाभाऊ नाराज का आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, यात भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाने हस्तक्षेप केला असता करत कदाचित आज नाथाभाऊंवर वेगळा विचार करण्याची वेळ आली नसती. इतकेच नव्हेतर राज्य भाजपच्या नेतृत्त्वात जो बेबनाव निर्माण झाला आहे त्याचेही निराकरण होऊ शकले असते. पण भाजपमधील बहुतेक सर्वच नेत्यांनी नाथाभाऊंकडे दुर्लक्ष केले असे आता तरी दिसत आहे. मात्र आजही वेळ गेलेली नाही. ज्येष्ठ नेत्यांचा पक्षात सन्मान राहील याची दक्षता पक्ष नेतृत्त्वाने घेतली तर नाथाभाऊ कदाचित वेगळा विचारही करू शकतील. कारण ज्याप्रकारे स्वत: एकनाथ खडसे आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मौन धारण करून आहेत, ते पाहिले तर असे दिसते की नाथाभाऊंचे मन अजूनही भाजप सोडण्यास राजी झालेले नाही.

भाजपच्या राज्यातील नेतृत्वाने एकदा नव्हे अनेकदा नाथाभाऊंच्या नेतृत्वाबद्दल आस्थाच व्यक्त केली आहे. त्यांच्याशी अनेकदा बोलणेही झाले आहे. पण घटना अशा घडत गेल्या की, त्यावर विश्वास ठेवणे नाथाभाऊंसाठी अशक्य होते. एक तर त्यांना तिकिट नाकारणे, ते मिळविण्यासाठी त्यांना हट्ट करण्यास भाग पाडणे, शेवटी त्यांच्या मुलीला तिकिट देणे आणि तरीही तिचा पराभव होणे हे कुणाला भलेही वाटेल, पण नाथाभाऊंना ते आस्थेचे वाटणे अशक्य आहे. त्यांच्या जागी कुणीही असते तरी त्याची अशीच प्रतिक्रिया झाली असती. नेतृत्वाच्या जशा काही चुका झाल्या असतील तशाच नाथाभाऊंच्याही झाल्या असतील. पण डोळ्यात भरण्यासारखी त्यांची चूक म्हणजे विभागातील बहुतेक सत्तासूत्रांचे कुटुंबात केंद्रीकरण करणे ही होय. भाजपसारख्या कार्यकर्ताधिष्ठित पक्षात ती पचणे शक्यच नव्हते.

पण तरीही त्या कथित चुकीची किती शिक्षा द्यायची याचेही काही प्रमाण असायला हवे. बहुधा त्याचे भान राहिले नसावे. गैरसमज ही अशी वस्तू आहे की, ती एकदा निर्माण झाली की, लगेच प्रभावी पावले उचलली नाहीत तर वाढतच जाते. संशयाने संशय वाढतो, विश्वासाने विश्वास वाढतो. हे समीकरण नीट राबविता आले नाही म्हणजे समस्या निर्माण होतात. आजची परिस्थिती त्याच प्रकारची आहे. एकनाथ खडसे मनाने आजही भाजपतच आहेत. हीच नेमकी वेळ आहे त्यांना कायमचे भाजपत ठेवण्याची. त्यांना रोखण्याची गरज भाजपला आहे. एका नेत्याच्या जाण्याने पक्ष संपत नाही, असे म्हटले जाते. मात्र पक्ष जरी संपला नाही तरीही काही काळासाठी पक्षाचे नुकसान होतेच. ते नुकसान टाळायचे असेल तर नाथाभाऊंना वेळीच रोखणे गरजेचे आहे. अर्थात तो प्रयत्न भाजपने करायचा आहे. त्यांच्या नेत्यांच्या मनात काय आहे हे तेच जाणतात. कदाचित खडसे जाणार याची राजकीयदृष्ठ्या तयारी भाजपने केलेली असू शकते. त्यामुळे नेमके काय होणार हे पाहणे उत्स्तुकतेचे ठरणार आहे.