टॅटूच्या दुनियेत ‘नमो, नमो शंकरा’

राष्ट्रीय टॅटू दिनानिमित्त या अनोख्या विश्वातील ट्रेण्डचा घेतलेला हा धांडोळा

Nashik
page1_international tatto day
International tattoo day

तरुण पिढी ही देवधर्मापासून दूर जात आहे, असे सहज म्हटले जाते. परंतु, टॅटूच्या दुनियेत डोकावून बघितले तर चित्र उलट दिसते. आज महाराष्ट्रात सर्वाधिक टॅटू काढला जातो तो शंकाराच्या नावाने. कोणी महादेवाचे नाव काढते, तर कुणी डमरू.. कुणाला तिसरा डोळा मोहिनी घालतो तर कुणाला त्रिशूळ तिसरा डोळा, डमरू, त्रिशूळ, गळ्यातील नाग, असा एकत्रित टॅटू काढण्याचीही सध्या कमालीची फॅशन आहे. राष्ट्रीय टॅटू दिनानिमित्त या अनोख्या विश्वातील ट्रेण्डचा घेतलेला हा धांडोळा.

दिवारमधील अमिताभ बच्चनच्या हातावरील ‘मेरा बाप चोर है’, या गोंदलेल्या अक्षरांपासून प्रियांका चोपडाच्या हातावरील ‘डॅडिज लिटील गर्ल’पर्यंत टॅटूचा प्रवास येऊन पोहोचला आहे. युवा पिढीमध्ये टॅटूची क्रेझ कमालीची वाढत आहे.
ज्यांची चित्रकला उत्तम आहे आणि टॅटू रंगवण्याचे अथवा गोंदवण्याचे कौशल्य ज्यांच्यापाशी आहे, अशा कलाकारांना गेल्या काही वर्षांत टॅटूचे एक नवे क्षेत्र करिअर म्हणून खूले झाले आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद शहरांमध्ये हजारोंनी टॅटू कलावंत चांगली धनराशी कमवत आहेत. मुंबई, पुणे आणि नाशिकमधील ट्रेंड लक्षात घेता सर्वाधिक चलती आहे ती शंकराच्या नक्षीतील टॅटूची. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची नावे तसेच चित्रांनाही मराठी तरुणांकडून पसंती दिली जाते.

या टॅटूंचा चालू आहे ट्रेण्ड

 • नावे– छत्रपती, क्षत्रीय कुलवंत, गणपती, ओम नम:शिवाय, हरे कृष्ण, महादेव, जय भोले, बम भोले, प्रिय व्यक्तीचे नाव. देवनागरी तसेच रोमन अक्षरे
 • चित्रे– शिवाजी महाराज, गणपती, साईबाबा, माणसाचा डोळा, मोराचे पिस, उडणारे पक्षी, कृष्ण, बासरी, आई-वडिलांचे चित्र,सिंह, हत्ती, बैल, कवटी, मांजर, चांदणी, योध्दा,.
 • नक्षी– हार्टबिट,पाने, फुले, दागिणे, मेहंदीतील नक्षी.

टॅटू काढण्यासाठी सर्जरीशिवाय पर्याय नाही-

जुना टॅटू नको असल्यास एक तर प्लास्टिक सर्जरीचा पयार्य शिल्लक असतो किंवा जुन्या टॅटूला लपवण्यासाठीही नवीन टॅटू काढावा लागतो. लेसर किरणांनी टॅटू काढता येतो. त्वचेच्या रंगानीही टॅटू झाकता येतो.

हवाई दलात नाकारली नोकरी

हाताच्या दर्शनी भागावर टॅटू असलेल्या एका उमेदवाराने हवाई दलात वैमानिकपदासाठी अर्ज केला होता. परंतु, टॅटूमुळे हवाई दलाने त्याला नोकरी नाकारली. या उमेदवाराने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले; न्यायालयानेही नकार दिला. आदिवासी उमेदवारांना अशा प्रकारचे टॅटू काढण्याची परवानगी आहे. कारण त्यांनी आपल्या समाजाच्या चालीरिती आणि परंपरेनुसार ते शरीरावर गोंदवले आहेत, असं हवाई दलाच्या वकिलांनी स्पष्ट केले होते.

dhanraj randive
धनराज रणदिवे, टॅटू आर्टिस्ट

युवक व्यक्तिमत्वात भर पडेल अशा टॅटूला देतात प्राधान्य

अनेकदा प्रेरणादायी टॅटू काढला जातो. काही तरुण-तरुणी केवळ अनुकरण करण्यासाठी टॅटू अंगावर काढतात. काही युवक-युवती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर पडेल, असे टॅटू काढतात. काही आयुष्याशी निगडित घटनांशी टॅटू काढतात. पण सर्वाधिक चलती आहे ती शंकराच्या नावांची आणि त्याच्याशी संबंधित अस्त्रांची. – धनराज रणदिवे, टॅटू आर्टिस्ट

ही घ्यावी काळजी-

 • टॅटू काढल्यावर १५ दिवस त्या भागाला पाणी, साबण लावू नये.
 • टॅटू काढल्यावर लगेचच व्यायाम करु नये.
 • टॅटू काढल्यावर किमान आठ दिवस दारु पिऊ नये.
 • टॅटू काढल्यावर आठ दिवस मांसाहार खाऊ नये.
 • आंबट पदार्थ खाणे टाळावे.
 • टॅटू काढून झाल्यावर धर्नुवाताचे इंजेक्शन घ्यावे.
 • रक्तदाबाच्या रुग्णांना टॅटू काढलेला चालत नाही.
 • टॅटू काढल्यावर किमान सहा महिन्यांसाठी रक्तदान करता येत नाही.