घरफिचर्सनाणारच्या मलईवर सत्ताधाऱ्यांच्या डोळा!

नाणारच्या मलईवर सत्ताधाऱ्यांच्या डोळा!

Subscribe

ग्रीन रिफायनरी आणि 1 लाखरोजगार वगैरे सगळे काही खोटे

‘मी यासंदर्भात लवकरच तुम्हाला भेटेन’, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्गारातील अर्थ हा थेट नाणारलाच रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा सरकारचा डाव आहे, हे उघड सत्य आहे. लवकरच निवडणुका लागणार असून पुन्हा एकदा आपणच सत्तेवर येणार असल्याने साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून प्रकल्प रेटण्याचा भाजपचा डाव स्पष्ट दिसत आहे. ते मग डबल ढोलकी शिवसेनेच्या क्षुल्लक विरोधाला भीक घालणार नाहीत आणि प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न करतील. भाजप आणि त्यांचे नेते किती खोटारडे आहेत, हे या घुमजावावरून दिसून येते. प्रमोद जठार, प्रसाद लाड आणि गेला बाजार संजय यादवराव हे सध्या नाणारचा पोपट जिवंत राहावा म्हणून मांत्रिकाची भूमिका बजावत आहेत.

नाणार रिफायनरीचा मेलेला (तसा दाखवण्यात आलेला) पोपट सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने पुन्हा जिवंत केला आहे. कारण त्यात लाखो कोटींचे अर्थकारण दडलेले आहे. ग्रीन रिफायनरी आणि 1 लाख रोजगार वगैरे सर्व काही खोटे असून नाणारच्या मलाईदार लोण्यावर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा डोळा आहे. कधी एकदा हा मलाईदार गोळा खातोय आणि आपल्या सात पिढ्यांचे कल्याण करतोय, असे सत्ताधार्‍यांना झाले आहे. अन्यथा नाणार प्रकल्प राजापूरमधून रद्द करण्यात आल्याची विधानसभेत घोषणा करूनही लोकांना हवा असेल तर त्याचा फेरविचार करायला काहीच हरकत नाही, असा खोटारडेपणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला नसता आणि शिवसेनाही त्याला आड येणार नाही, असा बोगसपणा करण्याची हिंमत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दाखवली नसती.

- Advertisement -

भाजप हा सुरुवातीपासून नाणारचा कट्टर समर्थक आहे. थेट दिल्लीपासून त्याचे लागेबांधे आहेत. पण, शिवसेनेचे काय? भूमीपुत्रांच्या नावाने गळे काढून आपली पोळी भाजणार्‍या या पक्षाला कसलाच धरबंध नाही. लोकांना नको असेल तर हा प्रकल्प होणार नाही आणि लोकांना हवा असेल तर शिवसेना आड येणार नाही, हा भंपकपणा शिवसेनेला जमतो. एन्रॉन प्रकल्पाबाबतही शिवसेनेने असेच धरसोड धोरण दाखवले होते. आरेतील मेट्रो कारशेडबाबत हीच उटपटांग भूमिका आणि आता नाणारसंदर्भात हाच खुळेपणा. एक तर भाजपप्रमाणे प्रकल्पाला हो तरी म्हणा किंवा या प्रकल्पाला विरोध करणार्‍या नाणार आणि परिसरातील 100 टक्के भूमिपुत्रांच्या मागे तरी उभे राहा. पण नाही… स्वतःची अशी काही भूमिका नसली की कशी नालस्ती होते, हे या निमित्ताने शिवसेनेचे बेगडी रूप लोकांना बघायला मिळत आहे.

नाणार जिवंत राहिले पाहिजे, असे सत्ताधार्‍यांबरोबर कोणाला वाटते. तर राजापूरच्या धंदेवाल्या लोकांना. म्हणजे हॉटेलवाल्यांना, दुकानदारांना, लॉजवाल्यांना, जमीन दलालांना, भूमाफियांना, स्थानिक पुढार्‍यांना, कंत्राटदारांना, दिल्ली, गुजरात, राजस्थानवरून आलेले पण शेतकरी नसलेले तरीही करोडो रुपयांच्या जमिनी बोगस नावाने घेणार्‍या परप्रतियांना, आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांना, या कंपन्यांनाच्या दलालांना, या दलालांची भाटगिरी करणार्‍या छुप्या रिफायनरी समर्थक संपादकांना. आता एका प्रकल्पासाठी एवढी मोठी मानवी साखळी गुंतल्यावर नाणारचा पोपट जिवंत होणारच… तो कधीच मेला नव्हता. तसे दाखवण्यात आले होते. अन्यथा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर मंत्रालयात येऊन तो पुन्हा जिवंत करा, असे सांगण्याची हिंमत कोणाला झाली नसती.

- Advertisement -

प्रकल्प हवा म्हणून सांगणारे यात मूळ जमीन मालकच नाहीत. मी वर म्हटल्याप्रमाणे वरची ही मतलबी दलाल मंडळी आहेत. आणि त्यांनीच मध्यंतरी राजापूरला मोर्चा काढून रिफायनरीचे समर्थन केले होते. याच लोकांनी समर्थकांच्या नावाने एक ऑफिस कम दुकान उघडले आहे आणि आता मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत येऊन याच पाच पंचवीस लोकांनी सांगितले की, आम्हाला प्रकल्प हवा आहे. मग फडणवीस यांनीही ठरवून या लोकांना सामोरे जात ‘नाणारच्या फेरविचाराला काहीच हरकत नाही’, असा बेमालूम अभिनय केला. ‘नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, असे मी सुरुवातीपासून ओरडून सांगत होतो. हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असून ज्या प्रकारे या प्रकल्पाला विरोध झाला ते पाहून मी तो निर्णय रद्द केला. पण, तुमचा उत्साह पाहिल्यावर या प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा करावी, असे मला वाटते.

या प्रकल्पामुळे कोकणातील 1 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आज मी या प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय जाहीर करत नाही, पण मी लवकरच या संदर्भात तुम्हाला भेटेन’, हे फडणवीस यांचे भाषण ठरवून झाले. यात्रेत समर्थकांना बोलवायचे, त्यांनी मागणी करायची आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन द्यायचे, हे न समजायला कोकणातील जनता इतकी खुळी नाही. ‘मी यासंदर्भात लवकरच तुम्हाला भेटेन’, या फडणवीस यांच्या उद्गारातील अर्थ हा थेट नाणारलाच प्रकल्प उभारण्याचा सरकारचा डाव आहे, हे उघड सत्य आहे. लवकरच निवडणुका लागणार असून पुन्हा एकदा आपणच सत्तेवर येणार असल्याने साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून प्रकल्प रेटण्याचा भाजपचा डाव स्पष्ट दिसत आहे. ते मग डबल ढोलकी शिवसेनेच्या क्षुल्लक विरोधाला भीक घालणार नाहीत आणि प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न करतील…

भाजप आणि त्यांचे नेते किती खोटारडे आहेत, हे या घुमजावावरून दिसून येते. प्रमोद जठार, प्रसाद लाड आणि गेला बाजार संजय यादवराव हे सध्या नाणारचा पोपट जिवंत राहावा म्हणून मांत्रिकाची भूमिका बजावत आहेत. यापैकी यादवराव हा तर महाभंपक माणूस असून एकीकडे शाश्वत कोकण विकासाच्या गप्पा मारणार आणि वर रासायनिक प्रकल्पांना छुपा पाठिंबा देणार. मध्यंतरी एका कोकण पाणी परिषदेत त्याला आम्ही ज्येष्ठ पाणी अभ्यासक राजेंद्र सिंह यांच्यासमोर जैतापूरसह कोकणात उभ्या राहणार्‍या रासायनिक प्रकल्पांविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यावेळी आमचा अशा प्रकल्पांना विरोध असेल असे कार्यक्रमात फजिती होईल म्हणून वेळमारु उत्तर त्यांनी दिले होते आणि आता छुप्या पद्धत्तीने नाणारचे समर्थन करायला हे मोकळे. सरकार कोणाचेही असो दरवर्षी ग्लोबल कोकण महोत्सव घेऊन कोकण विकासाचे चित्र दाखवणार्‍या यादवरावने नक्की कोकणाचा विकास किती झाला? हे लोकांना जाहीरपणे सांगावे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्याचे डिपॉझिट जप्त करून कोकण विकासाचा बाजारबुणगेपणा उघडकीस आणला होता. आता पुन्हा हिंमत असेल तर त्यांनी राजापूरमधून पुन्हा निवडणूक लढवावी. लोक त्यांच्या उमेदवारीची वाट बघत आहेत. तीच गोष्ट प्रमोद जठार यांची. रिफायनरी तात्पुरती रद्द झाल्यापासून त्यांना अन्न गोड लागत नाही. या प्रकल्पाला लोकांचे कसे समर्थन आहे हे सांगण्यासाठी त्यांनी स्वतः पत्रकार परिषद न घेता एका बाजारबुणग्यामार्फत (अजय सिंग सेंगर. या भगवे कपडे घालून फिरणार्‍या माणसाचे एकच काम सिनेमा, प्रकल्प यांना विरोध करायचा किंवा समर्थन) पत्रकारांना नाणारचे कौतुक सांगण्याचा प्रयत्न केला. नाणार प्रकल्प विरोधक आणि आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेच्या लोकांनी ही पत्रकार परिषद उधळून लावली. आता हे झाल्यानंतर खरेतर जठार यांनी ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद होती तेथे येण्याचे काहीच कारण नव्हते. पण ते आले आणि काय काय झाले याची विचारपूस करून गेले. मी या घटनेचा साक्षीदार आहे. मी बर्‍याचदा त्यांना ग्रीन रिफायनरी म्हणजे काय? असे विचारले आहे.

जगात अशी कुठे रिफायनरीची संकल्पना नाही. कच्च्या तेलावर प्रक्रिया करून उरलेले पदार्थ कुठे आकाशात नेले जाणार नाहीत. एक तर ते जाळून टाकले जातील किंवा समुद्रात सोडले जातील. म्हणून तर प्रकल्पासाठी नाणारचा समुद्र हवा आहे. यावर जठारांनी उत्तर दिलेले नाही. प्रसाद लाड यांचे काय सांगावे. मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ते ताईत आहेत. विनोद तावडे आणि आशिष शेलार या आपल्या पक्षातील निष्ठावंत नेत्यांपेक्षा लाड आणि प्रवीण दरेकर अशी मंडळी फडणवीस यांना जवळची वाटत आहेत. कोकणातील महाजनादेश यात्रेची सारी जबाबदारी लाड यांनी आपल्या समर्थ खांद्यावर पेलली. नाणार समर्थकांना ऊर्जा देण्याचे कामही त्यांनी चोख बजावले. आता यापुढे जठार यांच्याऐवजी लाड हेच नाणार समर्थनाला हवा भरण्याचे ‘महान’ कार्य हाती घेतील…

कोकणात भाजपला जनाधार नाही. गेली पाच वर्षे जंगजंग पछाडून त्यांना काहीच हाती लागलेले नाही. देवगड, गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी हे विधानसभा मतदार हाताशी येतील असे चित्र निर्माण केले जात आहे, पण ते त्यांना कदापि शक्य होणार नाही. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जनाधार नाही आणि ठाणे, पालघरमध्ये शिवसेना भक्कम असल्याने भाजपचा जीव तडफडत आहे. या चार जिल्ह्यांमध्ये पक्षाची ताकद कमी असल्याचे खुद्द भाजप कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मान्य केले आहे. या न्यूनगंडातून बाहेर पडण्यासाठी म्हणून आता गणेश नाईक आणि नारायण राणे या बाहेरच्या लोकांना कमळ हाती दिले जात आहे.

पण, सर्वच गोष्टी आयात नेते आणि सत्ता, पैशाच्या जोरावर विकत घेता येत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी नाणारच्या फेरविचाराची घोषणा करताच हजारो भूमीपुत्रांनी रस्त्यावर उतरून आपला विरोध पुन्हा एकदा दर्शवला. लोकांचा विरोध नाही, असे फडणवीस आणि आदित्य यांना वाटत असेल तर त्यांनी नाणारच्या पंचक्रोशीला भेट द्यावी म्हणजे लोकांचा कडवा विरोध समजेल. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रेटण्यासाठी आणि लोकांचा विरोध नसल्याचे दाखवून देण्यासाठी त्यावेळी काँग्रेसमध्ये असणारे माजी मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जैतापूर परिसरात नेऊन जोरदार शो करण्याचा प्रयत्न केला होता. पण लोकांचा विरोध काय असतो ते ग्रामस्थांनी दाखवून दिले. खरेतर फडणवीस यांनी हे आव्हान स्वीकारले पाहिजे.

‘आपलं महानगर’च्या 20 जुलै 2018 च्या अंकात मी ‘मुख्यमंत्रीसाहेब, ही घ्या नावे’ या मथळ्याखाली नाणारमध्ये जमीन खरेदी करणार्‍यांची नावे दिली होती. या परप्रांतीय लोकांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याच्या दोन वर्षे आधीच 2016 साली 2500 एकर जमिनी खरेदी केल्या होत्या. गुजरात, राजस्थान, दिल्लीतील लोकांना हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे हे आधीच कसे समजले? एकरी 2 लाख रुपयांनी ही जमीन खरेदी केली आणि हेच शहा, मोदी, त्रिपाठी, मेहता रिफानरीसाठी संमती पत्र देत एकरी 35 लाखांची मागणी करत आहेत. फडणवीस सरकार काल आणि आज जे म्हणत आहे की स्थानिक जमीन मालकांचा प्रकल्पाला विरोध नाही, हे याच परप्रांतीय जमीन खरेदीधारकांच्या जोरावर.

नाणारसाठी 2500 एकरची संमती पत्र देणार्‍या 190 जणांच्या यादीतील ही नावे पाहा :
रिझवान मन्सूर काझी, कनक रतनलाल दुग्गार, अमित परमानंद शुक्ला, सुशीलकुमार अच्चा, सुभाष केडिया, चंद्रकांत भन्साली, चंपकलाल मांगेलाल शहा, शांतीलाल मांगीलाल शहा, शशिकांत मांगीलाल शहा, निशांत नरेंद्र भगत, आदित्य अनिल गग्गर, धीरजकुमार खंडेलवाल, बिना इंद्रकुमार (सर्व जमीन खरेदीदार चौके गाव)

सुनंदा दिनेश शहा, आशिष रामचंद्र मेहता, रमेशचंद्र चिमणलाल मेहता, चंद्रकांत भन्साली, किरिट मनीलाल मेहता, सुजिता सुरेश शहा, महिंद्र मांगीलाल शहा, शांतीलाल मांगीलाल शहा (सर्व खरेदीदार कारशिंगे गाव)

दिनेश ओमप्रकाश पारिख, राजेंद्र शिवालाल डागा, प्राची त्रिपाठी, सुनील जसराज चोरडिया, मोहनलाल चंदनलाल राठोड, सतिश किसन केडिया, सुभाष किसन केडिया, महेशकुमार मुंदिराज, परमानंद शुक्ला, दीपक कांतिलाल शहा, प्रफुल्ल बाबुलाल शहा, दिनेश वाडिलाल चौधरी, हरिलाल वाडिलाल चौधरी, विवेक अनराज शहा, सिद्धी रूषभ शहा, कनुभाई हिरालाल शहा, अजय मनिलाल शहा, नितिन मनुभाई शहा (सर्व जमीन खरेदीदार उपके गाव)

राजेंद्र डागा, संजय बिहाणी, राधेश्याम फालोड, प्रकाश मदलेचा, गणेश भुतडा, सौरभ सुरेंद्रकुमार जैन (सर्व जमीन खरेदीदार काळादेवी गाव).

रवी दत्ता बोंढारे- हिंगोली, संजय माळी- मानगाव, राजेंद्र शिवलाल डागा, संजीव गोम्स (सर्व जमीन खरेदीदार साखर गाव)
प्राची त्रिपाठी, सुकेश सुरेश मुंदडा, रूचा प्रमोटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, प्रशांत छाचड, महेंद्र कांचनलाल शहा, शेरिल नलिन मोरखिया

(सर्व जमीन खरेदीदार विन्ये गाव)
मुदलीयार येल्लुस्वामी (जमीन खरेदीदार सांगवे), संंजीवनी उगले-नगर (जमीन खरेदीदार कारिवणे ), सुनील जसराज चोरडिया, सपना सुभाष केडिया (सर्व जमीन खरेदीदार पडवे गाव)

महेश कांतिलाल शहा, पिनेश अतराज शहा, शांताबेन अतराज शहा, कनुबाई हिरालाल शहा, राकेश ललितकुमार शहा, कमलेश चंदुलाल मेहता, नितिन मनुभाई शहा, केयुर दिलीप गांधी, चंद्रकांत भन्साली, कमलेश जेठलाल शहा, मांगिलाल हस्तिलाल जैन, महेंद्र मांगिलाल शहा, दर्शना राहुल गोलेचा, मनीष रामनिरंजन झुनझुनवाला (सर्व खरेदीदार गोठिवरे-उपळे गाव)

कनक रतनलाल डुग्गर, अनिताबेन जितेंद्र शहा, सिद्धी रूषभ शहा, शिवकुमार शहा, गोरखनाथ मढवी, निलेश नवीनचंद्र शहा, शैलेश रतिलाल झवेरी, इंदु विमल सोलंकी, विपिनकुमार जिपनलाल बापना, संगिता राकेश संघवी, निलेश नवीनचंद्र शहा, दिनेश धरमशीश शहा, रमेश धनराज जैन, समीर रेवती झा, पुखराज बोथमाल सिंंघवी, दीपक जयप्रकाश झवेरी, राहुल जगन्नाथ हेगडे, राहुल भिवड, विनोद विठ्ठलराव भातलवंडे-बीड, गौरव विनयकुमार जैन- जोधपूर, शैलेंद्र रमेशचंद्र राठी-पुणे, पद्मजा मंत्री-पुणे, महेशकुमार मुंदीराज, शरद धीरालाल शहा, पुनित दौलत अदनानी, भरतकुमार बाबूलाल पारेख, प्रकाश राठी, शकुंतला नरेंद्र लखोटिया, चंद्रकांत, भन्साली, राजेन किर्तीलाल शहा, अविष्कार मुरलीमनोहर अग्रवाल, प्रणव विनोद जोशी, अर्पिता पथिक शहा, विशाल यवनमल शहा, कुणाल यवनमल शहा (सर्व जमीन खरेदीदार तारळ गाव).

याशिवाय पहिल्या नाणार परिसरात जमीन खरेदी करणार्‍यांच्या पहिल्या 38 जणांच्या यादीतही अशाच परप्रांतियांचा समावेश होता आणि आपण कोकणी भूमिपुत्र आहोत, असे सांगत प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देण्याची तयारी दाखवली होती आणि यात समावेश होता… गौरव विनयकुमार जैन, दीपेन भरत मोदी, पुनीत सतीश वाधवा, सौरभ सुरेंद्रकुमार जैन, प्राची त्रिपाठी, पुखराज बोथमल सिंघवी, हिमांशू प्रशांत नीलावार, दिनेश धर्मशी शहा, किशोर रातीलाल शहा, मित्तव वर्दीभाई दोषी, कनक रतनलाल दुग्गर, राजेश सुंदतलाल शहा, संतोष रतनलाल कटारिया, अनिताबेन जितेंद्र शहा, सिद्धी रिषभ शहा, सतीश किशन केडिया, सपना सुभाष केडिया, गौतम जेथमल जैन, सुभाष किसन केडिया, महेश कांतीलाल शहा, विलास रतनलाल कटारिया, गानेढं भिवराज भुतडा, नंदकिशोर कन्हैयालाल चांडक, अमित घनश्याम ठावरी, उमाकांत मनोहरलाल राठी, अस्मिता दिनेश मांगूकिया, मनीष रामरंजन झुनझुनवाला, संजय भिकुलाल दुधावत, प्राची अमित शहा, महेंद्र मांगीलाल शहा यांचा.

नाणारसाठी अडीच लाख कोटींची गुंतवणूक आणि 15 हजार एकर जमीन संपादित करावी लागणार असून तब्बल 3 हजार 200 कुटुंब विस्थापित होणार आहेत.

संपादित जमिनीवर आंबे आणि काजूची मोठ्या प्रमाणावर झाडे असून त्याचेही मोठे नुकसान होणार आहे. याशिवाय प्रदूषणामुळे मासेमारी कमी होऊन मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यातील गंभीर बाब म्हणजे पर्यटन आणि फलोत्पादन जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे मूळ सौंदर्य प्रदूषणामुळे नष्ट होईल. मात्र सत्ताधार्‍यांना कोकणच्या भविष्याची चिंता नाही. नाणार परिसर धगधगत असून जगाने नाकारलेले प्रकल्प आणून कोकण उद्ध्वस्त करू पाहणार्‍या सत्ताधार्‍यांना जनतेच्या मोठ्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -