घरफिचर्सकोकणी बाणा, ताठ कणा !

कोकणी बाणा, ताठ कणा !

Subscribe

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणी माणसाच्या कणखरपणाची, चिवटपणाची अनुभूती पुन्हा पहायला मिळाली. या आधी 1961 च्या चक्रीवादळालादेखील इथल्या माणसाने धैर्याने तोंड दिल्याच्या गोष्टी आमच्या पिढीने आधीच्या पिढीकडून ऐकल्या आहेत. 1972 चा दुष्काळ असो. या दुष्काळाच्या दिवसात रेशनवर मिळणार्‍या डुकरीवर (तांबडी ज्वारी) इथल्या माणसाने दिवस ढकलले. अगदीच नाही तर फणसाची नाहीतर वालीची भाजी आणि तांदळाची पेजेवर त्याने दिवस काढले. पण कोण पुढारी येईल आणि माझ्या ताटात वाढेल म्हणून वाट बघत बसला नाही. स्वतःच्या पोटापाण्याची सोय त्याने स्वतःची तैलबुद्धी वापरून केली. या नैसर्गिक संकटाची चाहूल लागली तरी इथला माणूस गांगरून, बावरून गेला नाही.

सातशे वीस किलोमीटर्सची समुद्रकिनारपट्टी लाभलेला हा कोकण प्रदेश. अनेक परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, रिती रीवाज आणि बोलींनी युक्त असणारा. माणसांचे अनेक नमुने, त्यात इरसालपणा, बेरकीपणा, हे गुण आलेच. पुलंनी म्हटल्याप्रमाणे इथल्या माणसाशी नारळापेक्षा करवंटीशी सलगी जास्त…..त्यांनी रंगवलेला अंतू बर्वा किंवा श्रीनांनी शब्दात उतरवलेला बापू हे इथले सार्वत्रिक नमुने. इथल्या नदीसमुद्राची लय आणि गाज नित्यनियमित कानात साठवणारा इथला माणूस म्हणजे वेल्हाळ !

या माणसाने निसर्गाचे, राजकारणाचे, समाजकारणाचे अनेक प्रसंग बघितले. सगळ्या प्रसंगात हा माणूस किती खंबीर राहिला याची अनेक उदाहरणे देता येतील… इथल्या माणसाची श्रद्धा-अंधश्रद्धा या प्रखर आहेत. कोकण्या म्हणजे देवदेवस्कीवाला हा त्याच्याबद्दल पसरलेला सार्वत्रिक गैरसमज… त्याच्या श्रद्धा या त्याच्या जीवनाचा एक भाग आहे. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा त्याने आज एकविसाव्या शतकातदेखील तेवढ्याच राखून ठेवल्या.

- Advertisement -

नव्वदीच्या दशकात जागतिकीकरणाच्या, अर्थकारण्याच्या, समाजकारणाच्या आणि औद्योगिकीकरणाच्या व्याख्या बदलल्या आणि कोकणी माणूस बदलला, म्हणजे त्याने जगाच्या दृष्टीने त्याने तो बदल आत्मसात केला. इतकी वर्षे कोकणातले अर्थकारण जे मनीऑर्डर संस्कृतीवर अवलंबून होते ते आरपार बदलून गेले. त्याच्या राजकारणाच्या संकल्पना बदलल्या. म्हणजे स्वतंत्रकाळापासून कोकणी माणूस नेहमीच विरोधी पक्षात बसलेला, त्याने लोकसभेला आपलं मत नेहमीच समाजवादी पक्षाच्या पारड्यात टाकलं, इथल्या माणसाला बॅरिस्टर नाथ पै, किंवा प्रा. मधु दंडवते यांचं राजकारण जास्त भावलं, त्याने या दोघांनाच निवडून दिले. पण नंतरच्या काळात नव्याने येणार्‍या पक्षांनी कोकणाचा ताबा घेतला. हे बदल सगळ्या क्षेत्रात झाले. पण एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे यात कोकणी माणसाच्या भौतिक आयुष्यात बदल झाले. पण कोकणी माणसाचा मूळ कणखरपणा मात्र तसाच राहिला.

इथल्या माणसाचा हा कणखरपणा, चिवटपणा, खंबीरपणा कुठल्याना कुठल्या प्रसंगी बघायला मिळतो. तिरमिरीतपणा आणि रसिकपणा या तर वेगळ्याच गोष्टी. इथल्या वाडीत, घरात असेच बोलणे होत असते. म्हणजे कोणी विचारले की, अहो तुमच्या वाडीत दिगंबर कुठे रहातात तर उत्तर ऐकायला मिळते. या वाडीत दिगंबर …. मी काय त्याच्या बारश्याक गेलो नाय…पण अशे सरळ गेलास की याक घर हा ….तिथे बाबल्या राहतो …त्याचाच नाव बहुतेक दिगंबर …हा त्याचा स्वभाव नेहमीच निदर्शनास येतो. किंवा अहो अमक्या माणसाचं घर तुमच्या घरापासून किती लांब आहे हो….तर त्याचे घर लांब कुठले …त्याच्या घराला आग लागली तर माझ्या खिडकीतून दिसेल …ही चमत्कारिक भाषा नव्हे तर कुठली तरी वाडीतली आडभाषा.

- Advertisement -

काल कोणीतरी समाजमाध्यमावर एक कोकणी शेतकरी दुसर्‍या कोणाच्या जमिनीची मेरा (जमिनीची हद्द दाखवणारा उंचवटा) खापवून ती जमीन आपल्या हद्दीत घेत आहे, असा एक प्रातिनिधिक फोटो टाकला. अर्थात हा प्रातिनिधिक फोटो कोकणातल्या माणसाची टिंगल करणारा होता. कोकणी माणूस जमिनीसाठी, आपल्या घरासाठी जीवाचे रान करतो असा एक प्रवाद सर्वदूर आहे… जमिनीसाठी आणि घरासाठी कोण सजग नसतो? …..सगळेच असतात. कोकणी माणूस दरवर्षी तलाठ्याला भेटून आपल्या नावावर असलेल्या जमिनीचा सातबारा तो नेहमीच डोळ्याखालून घालतो. त्यात आपल्या सगळ्या हिश्शेदारांची नावे असावीत याबाबत तो नेहमीच जागरूक असतो हे खरं आहे, पण याच कोकणी माणसाने कोकण रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात येत आहे याची जाणीव लागताच आपल्या सुपीक जमिनी कोकण रेल्वेच्या प्रकल्पाला दिल्या. त्यावेळी त्याचा मोबदला किती मिळेल याचाही विचार केला नाही …तिच परिस्थिती मुंबई -गोवा चौपदरीकरणाच्या वेळी … मुंबई -गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होणार हे नक्की झाल्यावर त्याने आपल्या जमिनी लिहून दिल्या. कोकणातला जमीनदार हा काही मोठा एकरी जमीनदार नाही….त्याची मजल गुंठ्यावर ….हा विचारदेखील केला पाहिजे.

जेव्हा जेव्हा विकासाचा मुद्दा आला आहे तेव्हा तेव्हा कोकणी माणूस उभा राहिला आहे, तेव्हा त्याने आपले राजकीय भांडण असो किंवा मतभेद असो…ते नेहमीच बाजूला ठेवले आहेत. त्याचा फटकळपणा किंवा तिरमिरीतपणा नेहमीच अधोरेखित केला गेला आहे. आपल्या तत्वावर मत मांडताना त्याची ठाम वृत्ती नेहमीच समाजाभिमुख आहे हे मात्र विसरता कामा नये.
गावातले वंशपरंपरागत येणारे विधी हे शेतीशी आणि समाजजीवनाशी निगडित आहेत, अर्थात त्याच्यावर दबाव असावा म्हणून त्या रुढींचा संबंध देवदेवस्कीशी जोडण्यात आला. याचा अर्थ तो देवदेवस्कीत रमला असा नाही होत. हा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. अमेरिकन सरकारच्या नोकरीत असणारे सुप्रसिध्द साहित्यिक जयवंत दळवी तर म्हणायचे की, विमानातून प्रवास करताना माझी ग्रामदेवता विमानाच्या पंखावर बसून माझे रक्षण करते. गावच्या ग्रामदेवतेवर असणारा हा त्याचा विश्वास आहे. डॉक्टरी उपचार कितीही केले तरी रुग्ण माणसाला ग्रामदेवतेचा अंगारा लावायला तो विसरत नाही.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणी माणसाच्या कणखरपणाची, चिवटपणाची अनुभूती पुन्हा पहायला मिळाली. या आधी 1961 च्या चक्रीवादळालादेखील इथल्या माणसाने धैर्याने तोंड दिल्याच्या गोष्टी आमच्या पिढीने आधीच्या पिढीकडून ऐकल्या आहेत. 1972 चा दुष्काळ असो. या दुष्काळाच्या दिवसात रेशनवर मिळणार्‍या डुकरीवर (तांबडी ज्वारी) इथल्या माणसाने दिवस ढकलले. अगदीच नाही तर फणसाची नाहीतर वालीची भाजी आणि तांदळाची पेजेवर त्याने दिवस काढले. पण कोण पुढारी येईल आणि माझ्या ताटात वाढेल म्हणून वाट बघत बसला नाही. स्वतःच्या पोटापाण्याची सोय त्याने स्वतःची तैलबुद्धी वापरून केली. या नैसर्गिक संकटाची चाहूल लागली तरी इथला माणूस गांगरून, बावरून गेला नाही.

वादळ आलं…किनारपट्टीवर धडकलं ….कोणाची घरं गेली, घरावरची कौलारू छपरं उडाली…शेतीवाडी पाण्याखाली आली…. दापोली, लांजा, अलीबाग इथली परिस्थिती तर भयानक झाली… वादळाने इथल्या माणसाचे हाल केले, त्याचं आर्थिक कंबरडे मोडले … वादळ शमलं, तसा कोकणी माणूस पुन्हा उभा राहिला … आता मला नुकसानभरपाई मिळेल म्हणून वाट न बघता, त्याने कंबर कसली. स्वतःच्या घराची कौलं त्याने मिळवली…त्याने ती घरावर चढवली…आणि मृगाच्या साक्षीने आलेल्या पावसाचे त्याने त्याच उत्साहाने स्वागत केले…पुन्हा आपल्या शेतात जाऊन चिखल करून भातपेरणी करण्यासाठी तयार झाला. हा चिवटपणा या मातीतल्या माणसात पूर्वापार जडून बसला आहे.

इथल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातल्या लोकांनी निसर्ग म्हटला की, या गोष्टी व्हायच्याच. इथल्या माणसाने मनाशी एक खुणगाठ बांधली ती म्हणजे कोण आपला वाली येईल आणि मूठभर पदरात टाकेल याची शाश्वती नाही….उद्या मदत जाहीर झाली तरी आपल्यापर्यंत पोचणार नाही हे त्याला जणू माहीतच आहे. पूर, दुष्काळ. पाऊस, वादळ हे इथल्या माणसाच्या पाचवीलाच पुजलेले …म्हणजे त्याच्या रोजच्या जीवनाचा भागच तो. म्हणूनच की, काय इथल्या नैसर्गिक आपत्तीचे रिपोर्टिंग होत नसावं. ठराविक वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या किंवा रिपोर्टर याची दखल घेतात.

या निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध ललितलेखिका रश्मी कशेळकर यांनी सांगितलेला किस्सा आठवतो त्यावरून कोकणी माणूस या वादळाला कसा सामोरा जाणार याची कल्पना येईल. रश्मीताई सध्या रत्नागिरीत रहातात. साहजिकच त्यांना देवगडला असणार्‍या आपल्या माहेरच्या लोकांची काळजी वाटू लागली. त्यांनी न राहून आपल्या देवगडच्या भावाला फोन केला आणि वादळाचा काय रे ? त्यावर त्यांच्या भावाने दिलेले उत्तर- हा, वादळाचा … चालू हा. काय विचारू नको. माडांची टाकळी सरकलेली हत … त्येका सांगतय पडवेचे पत्रे न्हेलस त लय लाम्ब न्हेव नुको…जवळच टाक …. माका हाडूक बरे ….

असा हा इथला माणूस … या वादळाला टक्कर द्यायची हिंमत त्याला इथल्या मातीने दिली… हा कणखरपणा, राठपणा, चिवटपणा हा इथल्या मातीचा गुण …तो गुण इथल्या माणसात देखील अस्सलपणे उतरला आहे. तो दूरवर गेला तरी त्याची पाळमूळ या मातीत घट्ट बसली आहेत…आम्ही वीस वर्षापूर्वी विक्रोळी सोडून ऐरोलीत रहायला आलो, इथल्या वास्तूंच्या गृहप्रवेशासाठी गावाहून माझ्या चुलत्यांनी-तात्यांनी दोन नारळ पाठवून दिले… पूजेनंतर ते नारळ देवापुढे कलशात ठेवले, थोड्या दिवसानंतर त्यांना कोंब आला म्हणून बाबांनी ते नारळ इमारतीच्या भोवती असणार्‍या मोकळ्या जागेत लावले…वीस वर्षात त्या झाडांची भलतीच वाढ होऊन ते माड आता चौथ्यामजल्याला समांतर गेले आहेत. निसर्ग वादळाची चाहूल लागली. ही माडाची झाडं गोलगोल फिरू लागली… वादळाचा फटका या झाडांना बसणार की काय…बाजूच्या सोसायटीत असणारे जांभळीचे झाड कडाकड मोडून पडलं …आता या माडांची पाळी… पण नाही…वादळ गेलं पण माड ताठ उभे राहिले…मग लक्षात आलं. इथल्या माणसाचा हा गुण झाडांनादेखील लागला की काय …वार्‍यावादळात ताठ उभं रहाण्याचा …की इथल्या निसर्गाने ही शिकवण दिली….असे अनेक प्रश्न पडतात आणि तिरमिरीत पण ताठ बाण्याचा कोकण्या डोळ्यासमोर उभा राहतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -