नक्षलवाद्यांना गावबंदी आदिवासीचा एल्गार

नक्षलवादी आदिवासींच्या भल्यासाठी नाहीत. ही बाब जेव्हा स्थानिक आदिवासींना पटायला लागली. तेव्हापासून नक्षलवाद्यांना स्थानिक आदिवासींकडून मिळणारा प्रतिसादही कमी झाला. त्याचाच परिणाम आज गडचिरोलीत एक हजाराच्यावर गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे. नक्षलवादाला यापुढे थारा देणार नसल्याचा निर्धार आदिवासींनी केला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.s

Mumbai
आदिवासीचा एल्गार

जहाल नक्षलवादी तथा माओवादी संघटनेचा प्रमुख गणपती उर्फ मुपल्ला लक्ष्मण उर्फ रामन्ना याने वयोवृद्धत्व आणि प्रकृती अवस्वस्थेमुळे महासचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे जागेवर कुख्यात नंबाला केशव राव उर्फ बसवाराजू याची महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली. हा नक्षलवादी संघटनेतील या वर्षातील सर्वात मोठा फेरबदल. याच वर्षी गडचिरोलीतील कसनाचूर-बोरीयाच्या जंगलात ४० नक्षलवाद्यांसह देशभरात जवळपास ६५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलीस दलाला मिळालेले यश या दोन मोठ्या घटना या वर्षाअखेरीपर्यंत घडल्या. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळ काहीशी थंडावल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. जाळपोळीच्या किरकोळ घटना सोडल्यात तर यावर्षी गडचिरोलीत नक्षलवाद्यांना पोलिसांनी सळो की पळो करून सोडले आहे. त्याचा परिणाम नक्षलवाद्यांना एकही मोठी घटना घडविता आली नाही.

२०१८ या वर्षाच्या अगदी सुरुवातीला नक्षलवाद्यांनी अगदी आक्रमक भूमिका घेत सूरजागड लोह खाणीला विरोध करित पोलीस खबर्‍या ठरवून आादिवासींचे हत्यासत्र सुरू केले. मात्र त्याच दरम्यान एप्रिल महिन्यात महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवर इंद्रावती नदीच्या पात्रात कसनासूर-बोरीयाच्या जंगलात जवळपास 50 नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असल्याची माहिती खबर्‍यांना गडचिरोली पोलिसाना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर सी-60 च्या तीन तुकड्या मध्यरात्रीच जंगलात 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास करून दाखल झाल्या आणि भल्या पहाटे नक्षलवाद्यांचे स्थळ बदलीच्या हालचाली सुरू असतांना एका नक्षलीच्या दृष्टीला पोलीस दिसताच त्याने पोलिसांवर गोळी चालवली.

प्रत्युत्तरात सी-60 पथकाने नक्षलवाद्यांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार सुरू केला. यात 40 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये साईनाथ व नंदू या नक्षल कमांडरसह जहाल नक्षलवाद्यांचा समावेश होता. या कारवाईत सी-60 पथकाला मिळालेल्या मोठ्या यशाने गडचिरोली पोलीस दलाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आणि त्यानंतर गडचिरोलीत पोलिसांनी नक्षलवाद्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. त्याचा परिणाम तेव्हापासून आजवर गडचिरोलीत नक्षलवाद्यांना एकही मोठी घटना घडवून आणण्यात यश आले नाही. अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये केंद्र व राज्य सरकार तथा पोलीस दमन विरोधात पत्रक व पोस्टर बाजी, बॅनर युद्ध करण्यापलिकडे नक्षलवाद्यांना थेट पोलिसांवर हल्ला करत आला नाही. हे नक्षलवाद्यांचे अपयश आणि पोलिसांच्या व्यूहरचनेचे यश आहे. सध्या गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळ जहाल नक्षली कमांडर नर्मदाक्का हिच्या नेतृत्वात काम करीत आहे.

पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे नर्मदाक्का हिला सद्धा कधी छत्तीसगड तर कधी तेलंगना तर कधी महाराष्ट्राच्या जंगलात वास्तव्य करावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण गडचिरोली पोलिसांनी थेट अबुजमाड पहाडावर जाणार्‍या मुख्य रस्त्यांवरील नक्षली तळ उध्वस्त केले आहे. येथे नक्षलवाद्यांचे शिबिर उध्वस्त करून घोडे, त्यांचा औषधसाठा तसेच नक्षल शस्त्र व साहित्य जप्त केले. केव्हापासून नक्षलवादी काही प्रमाणात का होईना शांत झाले आहे. नर्मदाक्काने सूरजागड प्रकल्पाच्या माध्यमातून वातावरण पेटवून स्थानिक आदिवासींमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातही तिला यश मिळाले नाही. या एका वर्षांमध्ये पोलीस दल व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण ६५ जहाल नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच जहाल नक्षलवादी तथा केंद्रीय समिती सदस्य अरविंद याचा बिमारीमुळे मृत्यू झाला तर नक्षल कमांडर उद्धामसिंग हा चकमकीत मारल्या गेला. त्यामुळे नक्षलवादी चळवळीला मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामाना करावा लागत आहे.

पीपल्स लिबरेशन गुरील्ल आर्मीच्या (पीएलजीए) १८ व्या स्थापना दिवसानिमित्त २ ते ८ डिसेंबर या कालावधीत हिंसाचार घडवून आणण्याचे आवाहन करतांनाच केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात अन्यायग्रस्तांनी पेटून उठण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे नक्षलवाद्यांना वाहने जाळण्यापलिकडे काहीच करता आले नाही. त्याला कारण सध्या नक्षलवादी चळवळीला मनुष्यबळाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच नक्षलवाद्यांनी नुकत्याच प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात गडचिरोलीतील आदिवासी युवक युवतींना चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन देखील केले आहे.

पीएलजीए सप्ताहाला सुरूवात होत नाही तोच नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथे रस्ता बांधकामाचे कार्य करणार्‍या एका कंत्राटदाराचे १० जेसीबी मशीनसह १६ वाहने पेटवून दिली. याला कारण नक्षली नेतृत्व बदलानंतर आता नक्षली नेत्यांनी चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी हिंसाचाराच्या घटनांसोबतच केंद्रातीली मोदी सरकारला टार्गेट करून चळवळीत मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबण्यिाचा निर्णय घेतला गेला. मात्र स्थानिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आदिवासींना चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी कोणती व्यूहरचना आखायची हा प्रश्न नक्षलवादी नेत्यांसमोर आहे. तेंदूपत्ता, आदिवासीवरील अन्याय आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ स्थानिक आदिवासींना मिळत नाही असा घोषा देत १९८० च्या दशकात नक्षलवादी चळवळ गडचिरोलीच्या अरण्यप्रदेशात रूजण्यास सुरुवात झाली. ही चळवळ रूजवितांना नक्षलवाद्यांनी अनेक बड्या नेत्यांना, कंत्राटदारा तसेच पोलिसांवर हल्ले करून त्यांचा जीव घेतला.

नक्षली हल्ल्यात आजवर शेकडो लोक मारल्या गेले. मात्र नक्षलवादी आदिवासींचे भल्यासाठी नाही तर खंडणी वसूलीसाठीच ही कामे करतात ही बाब जेव्हा स्थानिक आदिवासींना पटायला लागली. तेव्हापासून नक्षलवाद्यांना स्थानिक आदिवासींकडून मिळणारा प्रतिसादही कमी झाला. त्याचाच परिणाम आज गडचिरोलीत एक हजाराच्यावर गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे. पूर्वी गावकरी नक्षलवाद्यांना जेवण पुरवायचे, परंतु आज नक्षलवाद्यांनी जेवणाचा आग्रह धरला तर गावकरी गाव सोडून इतरत्र निघून जातात. नक्षलवादी व पोलीस या दोन्हीचा त्रास नको यासाठी आता स्थानिक आदिवासी या दोन्ही पासून दूर राहण्याचा प्रयत्न करित आहे.

नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य तथा पोलीत ब्युरो अरविंद (सुजीत, निशांत) याचे दिर्घ आजारानंतर निधन झाले. त्यामुळे नक्षलवादी चळवळीला जबर धक्का बसला आहे. तसेच तेलंगना सीमेवर प्रभाकर ठार झाला. त्याचे सोबतच पाली, कसनासूर चकमकीत श्रीणू, नंदू साईनाथ, लता हे पोलीस चकमकीत ठार झाले. तसेच रोशनी ही सुद्धा चकमकीत ठार मारल्या गेली. तर बस्तर मध्ये कैलाश व मिना चकमकीत ठार झाले. पीएलजीएचच्या १८ व्या स्थापना दिवशी या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे कार्य पूर्ण करण्याची शपथ घ्यावी व चळवळीला समोर न्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे. मात्र स्थानिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चळवळ समोर न्यायची कशी हा मुख्य प्रश्न आता नक्षली नेत्यांना आहे. नुकतीच पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत बॅनर व पोस्ट लावून केंद्र व राज्य सरकार आदिवासींच्या विरोधात असल्याचे तसेच मोदी सरकार ब्राम्हणवादी हिंदू फासीवासी आहे असे सांगितले.

देशात गरीबी, निरक्षरता, बिमारी, भूखमरी, आत्महत्या, विस्थापन, बेरोजगारी, सामाजिक व आर्थिक समस्यांवरून लोकांचे लक्ष्य विचलीत करण्यासाठी मोदी सरकार व नव भारताचे स्वप्न दाखवून बुद्धीजीवी तथा सामान्य लोकांवर समाधान फासीवादी हल्ला करत आहे. ब्राम्हणवादी हिंदू फासीवाद्यांच्या विरोधात क्रांतीकारी संघटना, जनवादी, प्रगतीशील, दलित, आदिवासी, महिला यांनी एकत्र येवून संयुक्त मोर्चा उभारून मजबूत आंदोलन करण्याचे आवाहन केले. चार वर्षांच्या कार्याकाळात अपयश आल्यानंतर मोदी सरकार ब्राम्हणी हिंदू फासीवादाचे जहर पेरत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) व पीएलजीए मध्ये सर्व अन्यायकारी जनता व समुहादायाने संघटीत होऊन आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले. गडचिरोली व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणातत पोस्टरबाजी करून स्थानिक युवक व युवतींना चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. दक्षिण सब जोनल ब्युरो भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) सचिव गणेश उईके याचे स्वाक्षरीने निघालेल्या पत्रकात मोदी सरकार कशा पद्धतीने गरीबांवर अन्याय करित आहे हे दाखवतांनाच सशस्त्र संघर्ष करण्याचे आवाहन केले.

मात्र गडचिरोलीतील आदिवासी नक्षलवाद्यांच्या या आवाहनाला बळी पडत नसल्यामुळेच आता नक्षलवाद्यांना चकमकीत पूर्वीसारखे यश मिळत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पूर्वी नक्षलवाद्यांची गुप्तचर यंत्रणा स्थानिक आदिवासींच्या बळावर होती. आता पोलिसांनी स्थानिक आदिवासींना विश्वासात घेत तसेच पोलीस भरतीत आदिवासींना प्राधान्य देत स्वतःची स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभी केली. याच खबर्‍यांच्या माहितीच्या आधारावर गडचिरोली सी-60 पथकाने 40 नक्षलवाद्यांना ठार करून यश मिळविले. याच यशाच्या बळावर आता गडचिरोलीत नक्षल हालचाली काही प्रमाणात हा होईना मंदावल्या आहेत. हे पोलिसांना मिळालेले मोठे यश आहे. जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून पोलिसांनी आदिवासींमध्ये एकप्रकारे विश्वास निर्माण केला. त्याच विश्वासातून आता गडचिरोलीतील हिंसाचाराचे प्रमाण कमी झाले आहे. उद्या जाळपोळ व खबर्‍यांचे हत्यासत्रही थांबेल असा विश्वास पोलीस दलाला आहे.

तिकडे स्थानिक पातळीवरही नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहिमा आखण्यात आल्या आहेत. याच मोहिमेचा एक भाग देशातील सर्वात मोठी सुरक्षा एजन्सी असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआईए) केंद्रीय गृह विभागाच्या निर्देशावरून देशातील ‘मोस्ट वॉन्टेड’ जहाल नक्षलवाद्यांची यांदी आतंकवाद्यांच्या धर्तीवर प्रकाशित केली आहे. या यादीत पहिलेच नाव नक्षलवादी चळवळीच्या महासचिव पदाचा नुकताच राजीनामा दिलेले माजी प्रमुख मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती उर्फ रामन्ना याचे आहे. तर दुसरे नाव नवनियुक्त महासचिव जहाल नक्षली नंबाला केशव राव उर्फ बसवाराजू याचे आहे. विशेष म्हणजे या यादीत झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, उडीसा व महाराष्ट्रातील टॉपमोस्ट नक्षलवाद्यांचा समावेश आहे. तर गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार किडणी व लिवरच्या आजारावर उपचार करण्यासाठी गणपती दोन महिन्यापूर्वीच नेपाळ मार्गे फिलीपीन्स येथे गेल्याची माहिती आहे.

नक्षलवादी चळवळीत नुकतेच मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. वयोवृद्ध अवस्थेमुळे गणपतीने महासचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर जहाल नक्षलवादी नंबाला केशव राव उर्फ बासवाराजू याची नियुक्ती केल्याने नक्षल्यांनी जाहीर केले आहे. बासवाराजू याची नक्षलवादी चळवळीचा नवा प्रमुख म्हणून घोषणा होत नाही तो केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआईए) ने आतंकवाद्यांच्या धर्तीवर देशातील मोस्ट वॉन्टेड जहाल नक्षलवाद्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिले नाव मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती उर्फ रामन्ना याचे आहे. गणपती याचेवर 3 कोटी रुपयांचे बक्षिस आहे. नुकतीच गणपती यांनी नक्षली चळवळीतून निवृत्ती घेतली आहे. यासाठी वयोवृद्धत्वाचे कारण समोर करण्यात आले असले तरी किडनी व लिवरच्या आजारामुळे गणपती बिमार असल्याची माहिती आहे.

मात्र दोन महिन्यापूर्वीच सुरक्षा एजन्सीला चकवा देत गणपती रस्त्याच्या मार्गाने झारखंड, बिहारमध्ये येऊन नेपाळ येथे गेला. तिथे त्याच्यावर फिलीपींन्सची राजधानी मनीला येथून आलेल्या डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर तो थेट फिलीपींन्स मध्ये गेल्याची माहिती आहे. याच कारणामुळे गणपती स्वतःहून महासचिव पदापासून दूर झाल्याचीही माहिती आहे. या यादीत दुसरे नाव नवनियुक्त महासचिव नंबाला केशव राव उर्फ बासवा राजू याचे आहे. त्याचेवर एक कोटीचे बक्षिस आहे. विशेष म्हणजे नंबाला याचे सुद्धा अबुजमाड येथे वास्तव्य असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबत टॉप मोस्ट यादीत झारखंड मध्ये चळवळीत सक्रीय प्रशांत बोस उर्फ किशनजी याचे नाव आहे.

छत्तीसगड, आंध्रप्रदेश व उडीसा या तीन राज्यांच्या सीमेवर कार्यरत सायन्ना हा नक्षलवादी नेता सक्रीय आहे. त्याचेही नाव या यादीत आहे. सोबतच मल्लोइयुला वेणुगोपाल हा छत्तीसगड व महाराष्ट्र सीमेवर सक्रीय आहे. या भागातील नेतृत्व त्याचेकडे आहे. विशेष म्हणजे एनआईएने छायाचित्रांसह नक्षलवाद्यांची ही यादी जाहीर केली आहे. तसेच त्यांच्या ठिकाणांचाही पत्ता आहे. मोठे नक्षलवादी नेते एकाच ठिकाणी बरेच दिवस वास्तव्य करित नाहीत. त्यांच्या स्थानात सातत्याने बदल होत असतो. त्यामुळे त्यांना पकडणे कठीण आहे. केंद्र व राज्य सरकारकडे गणपती व बासवाराजू यांचे तीन दशकपूर्वीचे छायाचित्र आहे. नविन छायाचित्र कुठल्याही एजन्सीकडे उपलब्ध नाही. दरम्यान गडचिरोलीत आता नक्षल चळवळीतील बदलानंतर काही प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडवून आणण्याचा डाव असल्याचा गुप्तचर विभागाची माहिती आहे. परंतु गडचिरोली पोलिसांनी तयार केलेल्या सी-६० पथकाने नक्षलवाद्यांना जंगलातूनच बाहेर पडू न दिल्याने किंबहूना त्यांना जंगलातच रोखून धरल्याने सध्यातरी गडचिरोलीत शांतता दिसून येत आहे.

  • संजय वैद्य

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here