घरफिचर्सहा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला

हा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला

Subscribe

१९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना करतेवेळी नेतृत्वाची नवी फळी निर्माण केली ती आता उलटून पडलीय. त्यामुळे शरद पवार खचले, ते व्यथित झाले, ते हतबल झाले, त्यांच्यातील ताकद संपली, आता राष्ट्रवादी पक्ष संपणार, तो काँग्रेसमध्ये विलीन होणार या आणि अशा असंख्य गावगप्पांना उधाण आले. प्रत्यक्षात अनुभव मात्र उलट येतोय. संपतील ते शरद पवार कसले? आलेल्या परिस्थितीचे भांडवल न करता त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी सुरू केलेली लढाई त्यांच्यातील परिपक्व राजकारण्याला अधोरेखित करते. खरे तर, पक्षांतराच्या लाटेमुळे राष्ट्रवादीवर आलेले संकट हे गहिरेच आहे. याला पवारही नाकारणार नाही. पण म्हणून अन्य नेत्यांप्रमाणे ते खचले नाहीत की त्यांनी काम करणेही बंद केले नाही.

अनेक वर्षे दूरचित्रवाणीवर च्यवनप्राशची एक जाहिरात दाखवली जात असे. यात ‘साठ साल के बुढे, या साठ साल के जवान..’ असे म्हणत तरुणांना लाजवेल अशा वेगात एक वृद्ध जिने चढतो आणि उतरतो. शरद पवारांकडे बघून या जाहिरातीची आवर्जून आठवण येते. अर्थात यात बुढा साठ वर्षांचा नाही तर तब्बल ८० वर्षांचा आहे. तरीही तरुणांना लाजवेल इतका हुरूप त्यांच्यात आहे. पक्षातील माजीमंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड, विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचा पुत्र रणजितसिंह, पद्मसिंह पाटील, त्यांचा मुलगा राणा जगजित, माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, धनंजय महाडिक, खासदार उदयनराजे भोसले, माजीमंत्री गणेश नाईक, खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांच्यासह अन्य शिलेदारांनी पवारांना त्यांच्या उतारवयात पाठ दाखवली. आभाळ फाटल्याप्रमाणे राष्ट्रवादीला गळती लागली आहे. भगदाड, खिंडार हे शब्दही या गळतीपुढे तोकडे पडावे. मोठ्या नेत्यांमधील निम्मे नेते एव्हाना विरोधकांच्या कंपूत जाऊन मिळाले आहेत. पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना करतेवेळी नेतृत्वाची नवी फळी निर्माण केली ती आता उलटून पडलीय. त्यामुळे शरद पवार खचले, ते व्यथित झाले, ते हतबल झाले, त्यांच्यातील ताकद संपली, आता राष्ट्रवादी पक्ष संपणार, तो काँग्रेसमध्ये विलीन होणार या आणि अशा असंख्य गावगप्पांना उधाण आले.

प्रत्यक्षात अनुभव मात्र उलट येतोय. संपतील ते शरद पवार कसले? आलेल्या परिस्थितीचे भांडवल न करता त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी सुरू केलेली लढाई त्यांच्यातील परिपक्व राजकारण्याला अधोरेखित करते. खरे तर, पक्षांतराच्या लाटेमुळे राष्ट्रवादीवर आलेले संकट हे गहिरेच आहे. याला पवारही नाकारणार नाही. पण म्हणून अन्य नेत्यांप्रमाणे ते खचले नाहीत की त्यांनी काम करणेही बंद केले नाही. अर्थात पवारांवर अन्याय वगैरे झाल्याची भावना कुणाच्या मनात असेल तर ती प्रथम काढून टाकावी. पेरले तसे उगवते. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना पवारांनी काँग्रेसचे १२ आमदार फोडून विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती. त्यामुळे वसंतदादांचे सरकार पडले होते. पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असे त्यावेळी बोलले गेले. असे असले तरी प्रत्यक्षात तो राजकीय धूर्तपणा होता. पुढे १९९१ मध्ये पवारांनी छगन भुजबळ यांच्यासह अनेक आमदारांना शिवसेनेतून फोडून काँग्रेसमध्ये आणले. सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा मुद्दा बनवून राष्ट्रवादीची चूल पेटवली. पण जमले नाही तेव्हा पलटी मारून सोनिया यांच्या आश्रयाला गेले. त्यामुळे आताही जे काही फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे त्याचे बाळकडू संबंधित नेत्यांनी शरद पवारांकडूनच घेतले असावे, असे म्हटल्यास गैर ठरणार नाही. मात्र, त्यातून शरद पवार संपतील असे म्हणने चुकीचे ठरेल.

- Advertisement -

गेली ५० वर्षे राजकारणात केंद्रस्थानी असलेले, १४ निवडणुका लढवून एकही न हरलेले पवार हे एकमेव नेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पवार केंद्रस्थानी असणे स्वाभाविक आहे. सत्तेच्या राजकारणात सवतासुभा उभा करण्याचे प्रसंग वारंवार येत असतात. अशा गोष्टींची पवारांना सवयही आहे. त्यांना राजकारणातील भरती आणि ओहटीचा पुरता अंदाज आहे. तसा पूर्वानुभवही त्यांच्या गाठीशी आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामतीच्या जागेचा समावेश होता. मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च १९८५ ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले. आताही काहीशी तशीच परिस्थिती आहे. राज्यात पक्षासाठी प्रतिकुल परिस्थिती आहे, शिवाय पक्षात नेतृत्वाचा अभाव ठळकपणे जाणवतोय. अशा वेळी त्यांना हतबल होऊन कसे चालेल? म्हणूनच त्यांनी पुन्हा नव्या जोमाने राज्यात दौरे सुरु केले आहेत. त्याला पहिल्याप्रमाणे प्रतिसाद मिळणार नाही हे काळ्या दगडावरच्या रेषेसारखे आहे. पण म्हणून प्रतिसादाच्या भीतीने त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्नच करायचे नाही का? नाशिकमध्ये सोमवारी झालेल्या दौर्‍यापूर्वी पक्षात उदासिनता होती. त्यात हेविवेट नेते छगन भुजबळ शिवबंधन बांधणार या चर्चेने येथील पदाधिकार्‍यांना गलीतगात्र केले होते. अशा मरगळलेल्या वातावरणात शरद पवार यांच्या दौर्‍याने पक्षात किमानपक्षी हालचाली तर सुरु झाल्यात. दुसरीकडे राज ठाकरे यांनी अशा परिस्थितीत गाशा गुंडाळलेला दिसतो. निवडणूक लढवायची की नाही, अशा विचारात ते आहेत. असा विचार जर विरोधी पक्षातील नेत्यांनीच केला तर सत्ताधार्‍यांच्या ते पथ्थ्यावरच पडेल. म्हणूनच पवारांनी रणांगण सोडलेले नाही.

काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने पवारांना ‘नातलग सोडून जात आहेत’, अशा स्वरुपाचा प्रश्न विचारला. या प्रश्नावर पवारांचा तोल ढळला. खरे तर पवारांचा तोल असा सहजासहजी सुटत नाही. येथे पत्रकाराने विचारलेला प्रश्न चुकीचा नव्हता. पण त्यावेळी पवारांची मानसिकता ही बिघडलेली असणे स्वाभाविक होते. त्यांनी वाढवलेले शिलेदार विरोधकांच्या कंपूत जाऊन बसल्याची ही प्रतिक्रिया होती. खरे तर, पवारांवर आजवर अनेक वेळा खालच्या पातळीला जाऊन लोकांनी टीका केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले. भरपूर जणांनी फितुरी केली पण पवारांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. राजकारणात काही गोष्टी या दुर्लक्ष करण्यासाठीच असतात याचा वस्तुपाठ पवारांनी घालून दिला आहे. त्यामुळे त्यांनी आता आपल्यावरील टीकेकडे दुर्लक्ष करीत पुन्हा एकदा राज्य पिंजून काढायचे ठरवलेले दिसते आहे. पक्षाला आलेली मरगळ यातून दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांची हीच वृत्ती त्यांच्यातील नेतृत्वाला बळकटी देऊन जाते. वयाच्या ७९ व्या वर्षीही त्यांची काम करण्याची शैली एखाद्या तरुण राजकारण्याला लाजवेल अशीच आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करत आजही ते पूर्वीच्याच जोमाने बैठका घेताना दिसतात. वयावर मात करीत ते सलग १८ तास काम करतात. आजही त्यांना हजारो कार्यकर्त्यांची नावे तोंडपाठ आहेत. त्यामुळे विरोधातील राजकारणीही त्यांचा आदर करतात. त्यामुळे ‘अस्सी साल का बुढा या जवान’ अशी जाहिरात जर शरद पवारांच्या बाबतीत कुणी केली तर नवल वाटू नये !

हा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -