शरद पवार अन् व्देषाचे राजकारण!

Mumbai
sharad-pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

महाराष्ट्रावरील सध्याचे सर्वात मोठे संकट कोणते असेल तर ते म्हणजे शरद पवार, असा ग्रह होईल असे वातावरण भारतीय जनता पक्षातर्फे तयार केले जात आहे. नरेंद्र मोदींपासून पंकजा मुंडेंपर्यंत, नव्हे स्थानिक पातळीवरील नेत्यांपर्यंत प्रत्येक जण शरद पवारांनाच टार्गेट करत आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ही बाब अधिक ठळकपणे पुढे आली. या सभेत झालेल्या भाषणांमध्ये प्रत्येकाने पवारांवर तोंडसुख घेतले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होणे यात नवल नाही. परंतु कुणी कोणावर आरोप करावे, कुणावर टीका करावी याची एक संहिता ठरलेली असते. तिच खंडीत करण्याचे काम सध्या ‘भाजपेयी’ करत आहेत. खरे तर पंतप्रधान वा मुख्यमंत्र्यांनी कितीही उर बडवून महाराष्ट्राच्या पाच वर्षातील विकासाच्या गप्पा मारल्या तरीही मूलभूत प्रश्नांची सोडवणूक या मंडळींना करताच आलेली नाही, हे उघड सत्य आहे. त्यामुळेच कदाचित मूळ प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये म्हणून शरद पवारांचे नाव हत्यारासारखे वापरले जात आहे. नाशिकमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना लक्ष करत पवार हे पाकिस्तानधार्जिणे आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पवारांना पाकिस्तानचा पाहुणचार चांगला वाटतो, तेथील लोकप्रतिनिधी चांगले वाटतात. त्याचाच फायदा शत्रू राष्ट्र घेतात असा मोदींचा बोलण्याचा रोख होता. मोदींना एव्हाना पुरते कळून चुकले आहे की, निवडणूका कोणत्याही असो, त्यात राष्ट्रभक्ती, सैनिक, लढाई, हल्ले, पाकिस्तान व्देष आणि राममंदिर यांसारखे ठेवणीतील भावनिक मुद्दे बाहेर काढले की, मतदार त्याला बळी पडतात आणि ते आपल्या हक्काचेे मत मोदींना अर्थात भाजपच्या उमेदवाराला देऊन मोकळे होतात. म्हणून नाशिकमध्ये झालेल्या भाषणातही काश्मीर आणि कलम ३७० रद्द करण्याचे गुणगाण गायले गेले. याचे गुणगाण गाण्यासही हरकत नाही. पण तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका छोट्या शहरात सभा घेत आहेत. ज्या शहराजवळ शेतीच्या प्रश्नांनी उग्र रुप धारण केलेले आहे, शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत, हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत; तेथील लोकभावना लक्षात घेऊन मोदींनी भाषण करणे क्रमप्राप्त होते. परंतु या मुद्यांना साधा स्पर्शही न करता मोदींनी पुन्हा एकदा आपला राष्ट्रवाद लोकांमध्ये ठासण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे करताना त्यांनी आपणच केवळ राष्ट्रवादी आहोत, विरोधी पक्षातील मंडळी राष्ट्रद्रोही आहेत हे सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला. ‘काँग्रेस का कन्फ्युजन मैं समझ सकता हूँ, लेकीन शरद पवार भी?’ असा सवाल करत मोदींनी खरे तर पवारांना थेट १४६ वर्षाच्या काँग्रेस पक्षाच्या बरोबरीने आणून ठेवले. किंबहुना त्यांना काँग्रेसपेक्षाही अधिक श्रेष्ठत्व दिले. आपला राष्ट्रवाद सिद्ध करताना पवारांना राष्ट्रद्रोही ठरवण्यात मोदींची जीभ कचरली नाही हे विशेष. राष्ट्रद्रोह हा भारतातील सर्वाधिक गंभीर गुन्हा ठरतो. त्यामुळे अशी वक्तव्य करताना मोदींनी दहा वेळा विचार करायला हवा. सर्वोच्च पदावरील व्यक्तीने या पातळीवर उतरून टीका करणे उचित नाही. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये देशाच्या आजी-माजी पंतप्रधानांच्या सभा झाल्या. अगदी इंदिरा गांधींपासून ते अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा अनेकांची भाषणे झाली आहेत. पण त्यांनी पदाची प्रतिष्ठा सांभाळली. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत काय काम केले, पुढील पाच वर्षात काय काम करणार याचा लेखाजोखा देशासमोर मांडला. मोदींकडून हीच अपेक्षा होती. प्रत्यक्षात ही मंडळी पवारांवरच टीकास्त्र सोडण्यात धन्यता मानते आहे. त्यातल्या त्यात सुखावह बाब म्हणजे मोदींच्या भाषणाची ढब ही सभ्यतेची होती इतकेच. किमानपक्षी त्यांनी पवारांच्या अनुभवाचा तर आदर राखला. पण या पक्षातील अन्य नेत्यांना मात्र ते जमले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह खासदार सुभाष भामरेंनीही आपल्या भाषणांत पवारांना एकतर्फी टार्गेट केले. मुख्यमंत्र्यांनी जुने भांडण उकरुन काढत आमच्याकडे खतावण्या करायला फडणवीसांसारखे लोक असल्याच्या पवारांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. तुम्ही जनतेचे राजे आहात अशी मानसिकता असल्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसवले असा टोलाही त्यांनी लगावला. पवारांनी असे वक्तव्य करुन त्यावेळी चुकच केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी तरी कुठे शहाणपण दाखवले. त्यांनीही पवारांचीच री ओढली. त्यावर कडी पंकजा मुंडेंनी केली. आपल्या मतदार संघात शरद पवार स्वतः उभे राहिले तरी तेथे कमळाशिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य मुंडे यांनी सभेत केले. पुन्हा विजयी होण्याचा आत्मविश्वास बाळगण्यात गैर नाही. पण फाजील आत्मविश्वास असू नये. मुळात मुंडे आणि पवार यांची कोणत्याही पातळीवर बरोबरी होऊ शकत नाही. अनुभव, कामाची शैली आणि एकूणच राजकीय समज पाहाता शरद पवारांवर असे कुणीही भाष्य करणे संयुक्तिक ठरत नाही. सुधीर मुनगंटीवार यांनीही या सभेत पवारांची खोडी काढली. पवारांना गेल्या ४७ वर्षात छत्रपतींचा परिवार कधी दिसला नाही. केवळ स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिल्यामुळे बारामती म्हणजे महाराष्ट्र असे समीकरण पवारांनी केल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात सभ्यतेचा वस्तुपाठ घालून देणार्‍या मुनगंटीवार यांनीही पवारांच्या वयाचा, पदाचा आणि अनुभवाचा विचार न करता तोंडपट्टा चालवला. या मंडळींनी अजित पवार वा त्यासमकक्ष फळीवर टीका केली तर ते समजण्यासारखे आहे. पण थेट पवारांना लक्ष्य करणे हे राजकीय नैतिकतेला शोभेसे नाही. अशा राजकारणाला सुडाचे आणि व्देषाचे राजकारणच संबोधण्यात येईल.
सत्तेच्या मस्तीत धुंद असलेल्या मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीला कमी लेखत भविष्यातील सक्षम विरोधी पक्ष हा वंचित बहुजन आघाडी असेल असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांना वंचित आघाडीची इतकी धास्ती आतापासूनच असेल तर प्रकाश आंबेडकरांवर ते तोंडसुख का घेत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. वंचित आघाडीच्या बाबतीत भाजपची भूमिका सुरुवातीपासूनच सोयीची राहिलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला एरवी मिळणारी दलित आणि मुस्लिम समाजाची बर्‍यापैकी मते आता वंचित आघाडीकडे जात असल्याने त्याचा थेट फायदा हा भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षालाच होतो. त्यामुळे हा फायदा लुटण्याची राजकीय संधी साधत वंचित आघाडीला भाजपकडून सॉफ्ट कॉर्नर दिला जातो. सत्ताधार्‍यांसाठी खरा विरोधी पक्ष हा राष्ट्रवादीच आहे हे आता पवारांवर केल्या जाणार्‍या टीकेवरुन स्पष्ट होते. त्यामुळे चोहोबाजूने पवारांवर वार करण्याची रणनीती भाजपने आखलेली दिसते. शरद पवार यांच्या उंचीचा नेता सध्या तरी राष्ट्रवादी वा काँग्रेसकडे नाही. पवार यांच्यावर हल्ला करुन महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक नेते आजपर्यंत मोठे झाले. त्यामुळे पवार यांच्यावर टीका केली की एक वर्ग सुखावतो, असे लक्षात आल्याने त्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी पवारांना टार्गेट केले जात असावे. १९९५ मध्ये अशा प्रकारे पवारांना टार्गेट करुन राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली होती. पण एकच युक्ती वारंवार फलदायी ठरत नाही, हेदेखील लक्षात ठेवावे. भाजपच्या टीकेमुळे पवारांची प्रतिष्ठा धुळीस मिळणार नाहीच, पण ते ऐन निवडणुकीत लक्षवेधी मात्र ठरू शकतात हे लक्षात घेतले तरी पुरे!