घरफिचर्सअर्थपूर्ण वृक्षारोपण

अर्थपूर्ण वृक्षारोपण

Subscribe

बाभूळ आणि निलगिरी या झाडांमुळे जमिनीवर बारीक कुरण, गवत, इतर तन उगवत नाहीये. यामुळे त्यावर जगणार्‍या प्राण्यांची संख्या कमी झाली आहे.

विचार न करता केलेल्या वृक्षारोपणाचे दुष्परिणाम आज सर्वत्र दिसू लागले आहेत. ऑस्ट्रेलियन बाभूळ आणि निलगिरी या झाडांमुळे जमिनीवर बारीक कुरण, गवत, इतर तन उगवत नाहीये. यामुळे त्यावर जगणार्‍या प्राण्यांची संख्या कमी झालीय. हे चक्र पुढे सुरूच राहते. परिणामी ससा, हरण, सांबर, भेकर, काळवीट आदींची संख्या कमी झाल्याने यावर अवलंबून असणारे (जगणारे) वाघ, बिबट, सिंह हे सर्व आपली जागा सोडून मानवी वस्तीत येत आहेत किंवा त्यांची संख्या कमी होतेय.

जून-जुलै महिना आला की झाड लावायला सुरुवात होते. आपल्या महाराष्ट्रात दख्खनचे विस्तृत पठार, सह्याद्री, सातपुडा डोंगररांगा आणि कोकण किनारपट्टी अशी विविध जैव भौगोलिक परिस्थिती आहे. या परिस्थितीमुळे इथे सदाहरित, निम सदाहरित, कोरड्या पानगळीच्या जंगलात आणि गवताळ माळरानात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. याबरोबरच पाऊस आणि माती प्रकारानुसार शेती-हवामानात विविधता असणारे नऊ विभाग राज्यात आहेत आणि त्यानुसार भरपूर पाण्यावर येणार्‍या तसेच कोरडवाहू जमिनीत येणार्‍या झाडांची विविधता आढळते. निव्वळ देशी वृक्ष म्हणून भारतातील किंवा महाराष्ट्रातील अतिशय भिन्न वातावरणात येणारी झाडे इतर ठिकाणी लावणे हेही चुकीचे होईल. जसे फणस, हिरडा मराठवाड्यात लावून फारसा वाढणार नाही तसे शमी, कडुलिंब पश्चिम घाटाच्या खूप पावसाच्या प्रदेशात वाढणार नाही. निव्वळ देशी वृक्ष म्हणून कोणतीही झाडे लावणे उपयोगाचे होणार नाही.

- Advertisement -

या सर्व गोष्टींचा विचार न करता केलेल्या वृक्षारोपणांचे दुष्परिणाम आज सर्वत्र दिसू लागले आहेत. ऑस्ट्रेलियन बाभूळ आणि निलगिरी या झाडांमुळे जमिनीवर बारीक कुरण, गवत, इतर तन उगवत नाहीये. यामुळे त्यावर जगणार्‍या प्राण्यांची संख्या कमी झालेय. हे चक्र पुढे सुरूच राहते. परिणामी ससा, हरण, सांबर, भेकर, काळवीट आदींची संख्या कमी झाल्याने यावर अवलंबून असणारे (जगणारे) वाघ, बिबट, सिंह हे सर्व आपली जागा सोडून मानवी वस्तीत येत आहेत किंवा त्यांची संख्या कमी होतेय. दोन वर्षांपूर्वी केरळमधील निलगिरी पर्वत रांगेतील जंगलातून अशा प्रकारची झाडे तोडण्याचा निर्णय तेथील वनविभागाने घेतला होता. दहा-बारा फूट उंच झाडे तोडून त्या जागी स्थानिक मातीला अनुकूल झाडांची लागवड करण्यात आली. मात्र झालेलं नुकसान भरून काढता येणार नाही. म्हणून वृक्षारोपण करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा नीट विचार होणं गरजेचं आहे.

जैविक विविधतेचे महत्त्व लक्षात घेऊन, झाडांचे विविधांगी उपयोग ध्यानात ठेवून वृक्षारोपण केलं पाहिजे. झाडांमुळे हवेतील कार्बनचे प्रमाण कमी होऊन आपल्याला ऑक्सिजन उपलब्ध होते. शहरांमधील वाहने आणि कारखान्यातून बाहेर पडणार्‍या कार्बन आणि सल्फरजन्य धोकादायक वायूंना शोषून घेण्याची क्षमता झाडांमध्ये असते. झाडं त्यांच्या मुळाच्या माध्यमातून माती धरून ठेवण्यास आणि पाणी जमिनीत मुरवण्यास मदत करतात. मोसमी वार्‍यांना अडवून पाऊस पाडण्यात देखील झाडांची मोठी भूमिका असते. मात्र त्या त्या प्रकारच्या झाडांची निवड केली तरच. शक्यतो स्थानिक पर्यावरणाशी मिळती जुळती झाडांची लागवड करावी. त्यात सुद्धा विविधता असावी. स्थानिक वृक्षांमध्ये सुद्धा लवकर वाढणारी, अधिक उंच वाढणारी, जळावू लाकूड फाटा देणारी, शेती-औजाराला उपयोगी लाकूड देणारी, बांधकाम उपयोगी अशी झाडे असावीत. स्थानिक लोकांना याचे ज्ञान आणि जाण असते. यासाठी स्थानिक गरजा, झाडाबद्दलचे लोकज्ञान याचा मेळ घातला तर वृक्षारोपण सार्थकी ठरेल.

- Advertisement -

पर्यावरणाला घातक विदेशी झाडे : निलगिरी, वेडी बाबुळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ, उंदीरमारी, या प्रकारचे झाडे लावली गेली तर या झाडांचे परागकण हवेत पसरून अनेक लोकांना श्वसनाचे त्रास होऊ शकतात. तसेच या झाडांची सावली व पानांचे दाट अच्छादन जमिनीवर पडते. तेथे लहान झुडुपे, गवत यांची वाढ कमी प्रमाणात होते. परिणामी तेथे माती धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. मोठ्या पावसात तेथील माती वाहून जाऊन त्याची धूप होते. जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता कमी होते. पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी खूप खाली जाते. निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ या वनस्पतीची भूगर्भातील पाणी खेचण्याची क्षमता खूप असते. परिणामी त्या ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न फार तीव्र होतो. याचे परिणाम हळूहळू जाणवतात. तेथील नैसर्गिक चक्राला खीळ बसते.

उपयुक्त व पर्यावरण पूरक म्हणजे कोणती? सावली देणारी, फळं, फुलं देणारी, पक्षी, फुलपाखरू आकर्षित करणारी, जनावरांना चारा देणारी, औषधी संयुगे असणारी, जळावू लाकूड देणारी, माती धरून ठेवणारी तसेच कठीण जमीन भुसभुशीत करणारी. ज्या झाडांचे मूळ स्थान भारत किंवा भारतीय उपखंड आहे असे स्थानिक समजली जातात. सामान्यपणे स्थानिक झाडं ही पर्यावरण पूरक असतात. काही वेळा झाडं स्थानिक असली तरी त्यांची एकसुरी लागवड हे पर्यावरणीयदृष्ट्या घातक ठरू शकते. म्हणून एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकाच प्रजातीची झाडं न लावता विविधता ठेवावी.

जेव्हा आपण उपयुक्त शब्द वापरतो तेव्हा ते कुणासाठी उपयुक्त असा प्रश्न असतो? येथे निव्वळ मनुष्यकेंद्री विचार करून चालणार नाही. काहींचे उपयोग अजून आपल्याला माहिती झाले नसतील; पण भविष्यात त्या-त्या झाडांच्या अभ्यासातून त्यांची उपयुक्तता पुढे येईलच. कोल्हापूर भागात आढळणार्‍या नरक्या या उग्र वासाच्या झाडावर संशोधन झाले. त्यामध्ये कॅन्सरसारख्या रोगावरील औषध बनवण्यासाठी आवश्यक रासायनिक संयुगे असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तिटकारा म्हणून दिलेलं नाव बदलवून त्याला लोकं आता अमृता म्हणतात. त्यामुळे नवीन झाडे लावीत असताना वरील प्राधान्यक्रम ध्यानात घेतला तरी परिसरातील इतर झाडे, झुडपे, वेली, गवत यांचे संरक्षण करणे ही आपली जबादारी समजली पाहिजे.

काही देशी/स्थानिक झाडांची यादी:
१ आंबा, २ तामण, ३ फणस, ४ जांभुळ, ५ साग, ६ हिरवा चाफा, ७ मोहा, ८ शेवगा, ९ पांगारा, १० पळस, ११ करंज, १२ आवळा, १३ बहावा, १४ आपटा, १५ कडुनिंब, १६ भेर्ली माड, १७ बिब्बा, १८ काटेसावर, १९ भोकर, २० सोन चाफा, २१ चिंच, २२ बेहडा, २३ हिरडा, २४ अर्जुन, २५ बेल, २६ शिरीष, २७ काजू, २८ बांबु, २९ कचनार, ३० चारोळी, ३१ शिसू, ३२ शिवण, ३३ धामण, ३४ पांढरा कुडा, ३५ आईन, ३६ नाना, ३७ बकुळ, ३८ नरक्या, ३९ बोर, ४० सीतेचा अशोक, ४१ करू, ४२ चांदाडा, ४३ कदंब, ४४ शमी, ४५ गुळ भेंडी, ४६ किनई, ४७ वारस, ४८ वावळ, ४९ शिंदी, ५० धावडा


बसवंत विठाबाई बाबाराव

(लेखक पर्यावरण समन्वयक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -