घरफिचर्सनवीन बँक-पेमेंट बँक !

नवीन बँक-पेमेंट बँक !

Subscribe

महत्त्व आणि परिचय

गरजेतून नवीन शोध लागतात. पेमेंट बँकेबाबत नेमके असेच झाले. देशाच्या मध्यवर्ती बँकेने याबाबत पुढाकार घेतला. देशातील छोटे-छोटे उद्योग व अल्प-उत्पन्न असलेले घटक यांच्यासाठी काही करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने २०१३ साली संचालक नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमली. या घटकांना बँकिंगमार्फत मदत करून त्यांची उन्नती घडवून आणण्यासाठी पेमेंट बँकेची स्थापन करण्यात आली.

आपल्या देशात ‘बँक’ आणि ‘पोस्ट’ या पूर्वापार चालत आलेल्या आर्थिक संस्था आहेत, हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. आज बँकांच्या शाखा दुर्गम जागी अगदी खेडोपाडी पसरलेल्या आहेत. (तरीही अजून असंख्य लोक बँकिंग सेवेपासून वंचित आहेत, हेही कटू सत्य आहे!) बँकेत पैसे ठेवायचे-काढायचे आणि कर्ज मिळण्याची सोय आहे -अशी आणि इतकी जुजबी माहिती साधारणपणे सर्वांनाच माहिती असते. तसेच बँकांचे ढोबळ प्रकार -सरकारी, प्रायव्हेट, परदेशी, ग्रामीण आणि सहकारी बँक असे असतात हेही परिचित असते. गेली अनेक दशके आपल्या बँकिंगचा हाच ढाचा बनलेला आहे. या कप्प्यात तसा काही मूलभूत बदल झालेला नाही. अलीकडे मात्र ‘पेमेंट बँक’ निघाल्याने आपल्या बँकिंगमध्ये एका नवीन दालनाची भर पडली असे म्हणायला हरकत नाही. अशा बँक्स निघालेल्या आहेत, त्यांची आपल्याला बेसिक माहिती असावी म्हणून हा लेख. आपण राहतो तिथे नवीन शेजारी आला तर, आपण उत्सुकतेने परिचय करून घेतो. इव्हन आपल्या ऑफिसात एखादा नवीन स्टाफ जॉईन झाला की, आपल्याला त्याला भेटावेसे वाटते. हे जसे साहजिक आहे, तसेच बँक-विश्वात नवीन घडामोडी होत आहेत, हे आपण आर्थिक साक्षरता म्हणून जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

पार्श्वभूमी -आपण पेमेंट बँकेचे जनक – आपल्या देशात बँकिंग रुजवण्याचे काम ब्रिटिशांनी केले. त्यांच्या बँकिंगची मुळे इथे रुजवली. आज आपल्या बँकांच्या कार्यपद्धतीवर अमेरिकन आणि युरोपियन बँकिंगचा प्रभाव आहे. मात्र आपल्या देशाला जे हवे आहे तशा बँका उभ्या करण्याचे स्वप्न काही नामांकित अर्थ-धुरीणांनी पाहिले, पैकी सी.डी.उर्फ चिंतामणराव देशमुख, तसेच देशात सहकार चळवळ रुजवणारे-धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील, शंकरराव धुमाळ व वैकुंठभाई मेहता अशा मंडळींनी आपल्या देशातील बँकिंग-सहकार चळवळ ‘देशी’केली. तरीदेखील विकसनशील देशातील बँकिंग हे प्रगत असल्याने अनेक नवनवीन गोष्टी तिथे आधी सुरू होतात आणि नंतर अनेक देशात त्यांचा वापर करणे सुरू होते. (उदाहरणार्थ -क्रेडीट कार्ड, इंटरनेट-मोबाईल बँकिंग इत्यादी)

पेमेंट बँकेचा जन्म – गरजेतून नवीन शोध लागतात. पेमेंट बँकेबाबत नेमके असेच झाले. देशाच्या मध्यवर्ती बँकेने याबाबत पुढाकार घेतला. देशातील छोटे-छोटे उद्योग व अल्प-उत्पन्न असलेले घटक यांच्यासाठी काही करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने २०१३ साली संचालक नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास-समिती नेमली. हेतू हा होता की, देशात असलेल्या या घटकाला बँकिंगमार्फत कशी मदत करता येईल आणि त्यांची उन्नती होऊ शकेल. संपूर्ण पाहणीतून काही निष्कर्ष निघाले आणि त्यातून निर्णय झाला पेमेंट बँक स्थापन करण्याचा. आपल्या देशातील लोकसंख्या, त्यांच्या आर्थिक गरजा यांचा सर्वांगीण विचार करून हे सोल्युशन निघाले. त्यातून आपल्या सोयीची-अल्प-उत्पन्न गटासाठी व लघु-उद्योग करणार्‍या मंडळींना सोयीची अशी पेमेंट बँक असावी, असे ठरले. सन २०१४ मध्ये मार्गदर्शक सूत्र ठरवली गेली आणि २०१५ मध्ये ज्यांना पेमेंट बँक काढण्यात स्वारस्य आहे त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले. प्रस्थापित उद्योग-समूह व काही कॉर्पोरेट्स यांनी म्हणजे एकूण ४१ अर्ज रिझर्व्ह बँकेकडे दाखल झाले. त्यातून अकरा अर्जदारांना पेमेंट बँक काढण्यासाठी तत्त्वतः मान्यता देण्यात आली. अशारीतीने देशात प्रथमच आपली गरज भागवणारी देशी पेमेंट बँक -आपले आपल्या सोयीचे मॉडेल जन्माला आले.

- Advertisement -

पेमेंट बँक स्थापनेमागचे हेतू-
१) सरकारचे ‘आर्थिक समावेशन’ करून परीघाबाहेरील लोकसंख्येला बँकिंग तसेच आर्थिक कार्यक्रमात सहभागी करून घेणे या धोरणाशी सुसंगत असल्याने त्याकरिता अशा पेमेंट बँक्स असणे आवश्यक.
२) अशिक्षित, निम-कुशल कामगार, मजदूर, रोजंदारीवर उत्पन्न कमावणारे आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना बचत करण्यासाठी ‘बचत खाते’ उपलब्ध करून देणे, बँकिंगची सवय लावणे.
३) अनुदान किंवा तत्सम सबसिडीचे पैसे थेट बँक खात्यात जमा करून लाभाथींना थेट फायदा करून देणे, असे करताना भ्रष्टाचार रोखणे वा कमी करण्याचा प्रयत्न करणे.
४) कमी -अल्प-उत्पन्न मिळवणारे कुटुंब, स्थलांतरित बांधकाम मजूर, छोटे व्यवसाय-काम-धंदा करणारे तसेच संघटित नसलेले यांना सामावून घेणे.
५) अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान वापरून ग्रामीण भागात सर्वदूर पातळीवर बँकिंग-वित्त सेवा पोहोचवणे
पेमेंट बँकेची वैशिष्ठ्ये -आपल्याकडे आजवर कार्यरत असलेल्या अनेक प्रकारच्या बँकेपेक्षा ही वेगळी बँक नेमके काय वेगळे करणार? का ही केवळ काही ठराविक गटांना कमाई करण्यासाठी निर्माण केलेली संधी आहे. असा अविचार करण्याची गरज नाही. कारण हे वेगळे कार्य करण्यासाठी व आपल्या देशातील असंख्य छोट्या प्रमाणात कमाई करणार्‍या आणि पायावर उभे राहू इच्छिणार्‍यांसाठी टाकलेले एक ठोस पाऊल म्हणता येईल. आपल्या रिझर्व्ह बँकेने हे काम आरंभले म्हणून अभिमान बाळगला पाहिजे. कारण देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी अनेक-स्तरीय घटकांच्या हातभाराची, उत्पन्न -रोजगार वाढून अर्थ-चक्र गतिमान ठेवण्याची आत्यंतिक गरज असते.

अशा बँकेची एकूण रचना आणि आकृतिबंध-
१) अशा बँकेचे भाग-भांडवल रु १०० कोटी असावे
२) संपूर्ण बँकेकडे अगदी प्रारंभापासून अगदी अद्ययावत तंत्रज्ञान असलेच पाहिजे
३) किमान २५ टक्के शाखा या जिथे आजवर एकही बँक-शाखा नसेल अशा भौगोलिक प्रदेशात उघडल्या गेल्या पाहिजेत ही महत्त्वाची अट ठेवलेली आहे. कारण मुख्य हेतू हाच तर आहे की, बिन-बँकेच्या गावात-खेडोपाड्यातील जनतेला बँक-सेवेचा लाभ घेता यावा.
४) मान्यता मिळालेल्या अशा बँकेच्या नावात -‘पेमेंट बँक’ हे शब्द असलेच पाहिजेत कारण तसे केल्यासच ही बँक खास उद्देशाकरिता निर्माण झालेली आहे, हे संबंधितांना व सर्वांना सहजपणे कळू शके आणि इतर व्यापारी बँकांपेक्षा वेगळी आहे हे स्पष्ट होईल.
पेमेंट बँकेचे कार्य आणि एकूण कार्य-पद्धती- ही बँक तशी इतर बँकाप्रमाणे सेवा-सुविधा पुरवणारी असते,काही ठळक भेद असतो,तो पुढीलप्रमाणे :-
साधे बचत खाते किंवा चालू खाते उघडता येते.
अशा खातेदाराला ‘कर्ज’ मात्र मिळू शकत नाही.
खात्यातील सर्वाधिक रकमेची मर्यादा सध्यातरी -रु १००,०००/ इतकी आहे (पुढेमागे वाढू शकेल)
अन्य सुविधा – एटीएम, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग
छोट्या रकमेची असंख्य बचत खाती मात्र खाते-संख्या भरपूर असल्याने उलाढाल मोठ्या प्रमाणावर
पेमेंटस, रेमिटन्स हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून जलदपणे आणि नेमकेपणाने करता येते

खालील बाबी -सोयी मात्र मिळू शकत नाहीत –
१) कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळू शकत नाही.
२) अशा खातेदाराला कधीच क्रेडीट कार्ड मिळू शकत नाही. (कारण मुळात क्रेडीट-कार्ड म्हणजे तुम्ही तुम्हाला उद्या येणारे उत्पन्न आज खर्च करणे,त्याचा उपयोग खरेदी करण्यासाठी करणे. ज्यांचे उत्पन्नच अल्प आहे किंवा दैनंदिन कमाईवर अवलंबून आहे, त्यांच्या भविष्यातील उत्पन्नाची काही हमी किंवा शाश्वतीच नसल्याने त्यांना क्रेडीट-कार्ड सुविधा देणे योग्य नाही, हेच यामागचे कारण आहे) आणि आपण शहरी-महानगरी भागात राहणारे अर्बन-लोक कसे बेधडक आणि बिनधास्तपणे क्रेडीट-कार्ड वापरतो आणि मॉलमध्ये शॉपिंग करतो हे थोडेच गरजेचे असते, चैन आणि छानछोक हाच तर जास्त हेतू असतो ना?

पेमेंट बँक आणि नित्य-नियमित असलेल्या अन्य व्यापारी बँक -तुलना-
१) कर्ज देणे –
पेमेंट बँक -देऊ शकत नाही.
अन्य बँका- हो. बाकी निकषांची पूर्तता होत असेल तर नक्कीच देऊ शकतात.
२) ठेवी स्वीकारणे-
पेमेंट बँक -हो. मात्र, मर्यादा ठेवलेली आहे, एका खात्यात फक्त रु १,००,०००/- इतकीच ठेवता येते.
अन्य बँका- ठेवी घेता येतात,तशी मर्यादा नाही.
३) बँकेची गुंतवणूक
पेमेंट बँक – या बँकेला अन्य ठिकाणी वा साधनांत पैसे गुंतवण्याची मुभा नाही, फक्त सरकारी बॉन्ड किंवा व्यापारी बँकेमध्ये ठेवता येतात.
अन्य बँका- या बँका आपले उत्पन्न वाढावे म्हणून खुल्या बाजारपेठेत, मनी-मार्केट, शेअर्स, बॉन्डस इत्यादी ठिकाणी आपल्याकडील निधी गुंतवू शकतात.
४) खात्यात ‘किमान रक्कम’ असण्याची अट –
पेमेंट बँक – प्रत्येक खात्यात किमान अमुक रुपये असावेत अशी मुळीच अट नाही, म्हणून झिरो रक्कम असलेली खाती उघडली जातात.
अन्य बँका-हो. प्रत्येक व्यापारी बँकेची आपापली अशी ‘किमान रक्कम’ ठेवण्याची अट असते, तिचे पालन न केल्यास दंड भरावा लागतो आणि खात्यात तितकी रक्कम लागलीच जमा करावी लागते.
५) क्रेडीट कार्ड-
पेमेंट बँक – आपल्या खातेदाराला क्रेडीट कार्ड देऊ शकत नाही.
अन्य बँका- हो. सहजपणे देऊ शकतात.
६) ग्रामीण शाखा –
पेमेंट बँक- हो. त्यांना ग्रामीण -दुर्गम भागात शाखा काढण्याची अट घातलेली असल्याने आणि तोच मुख्य हेतू असल्याने काढाव्याच लागतात.
अन्य बँका – ग्रामीण भागात मोजक्याच शाखा असतात.

सध्या अस्तित्वात असलेल्या पेमेंट बँक्सची नावे व माहिती खालीलप्रमाणे-
१) आदित्य बिर्ला पेमेंट बँक
२) एअरटेल पेमेंट बँक
३) इंडिया पोस्ट पेमेंट बँक
४) फिनो पेमेंट बँक
५) जिओ पेमेंट बँक
६) पेटीएम पेमेंट बँक
७) एनएसडीएल पेमेंट बँक
मे महिन्याची सुट्टी -उन्हाळा म्हणून गावी कोकणात किंवा खेड्यात जातो, तिथे गेल्यावर आपण एक अर्थसाक्षर आणि जागरुक नागरिक म्हणून आपल्या नातलगांना, गावातील आजुबाजूच्या मंडळींना जवळपास कुठे ‘पेमेंट बँक’ आहे का? याचा शोध घ्यायला लावा आणि त्यांना त्यांचे ‘पहिले बँक खाते’ उघडण्यास मदत करा. अहो, यालाच तर सोशल-वर्क म्हणतात, कठीण नाही ना? मग लक्षात ठेवा आणि यंदाच्या सुट्टीत हे अनोखे पुण्य कमवा !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -