घरफिचर्सबहुजन चळवळीचा नवा पोश्टर बॉय: चंद्रशेखर आझाद

बहुजन चळवळीचा नवा पोश्टर बॉय: चंद्रशेखर आझाद

Subscribe

भीम आर्मी नावाची एक संघटना सध्या चांगलीच चर्चेत (फॉर्मात) आहे. चर्चेत राहण्याचे कारण भीमा आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर आझाद नावाचा एक तरूण-तडफदार नेता. चंद्रशेखर सध्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने भीम आर्मीच्या मुंबई आणि पुणे येथील सभा रद्द करुन चंद्रशेखरला नजरकैदेत ठेवल्यामुळे तो आणखीच चर्चेत आला. त्यानंतर 1 जानेवारी रोजी त्याने मोठ्या रुबाबात कोरेगाव भीमा येथे एंट्री घेतली. कोरेगाव भीमा येथे असलेल्या विजयस्तंभाला मानवंदना देऊन आझादने महाराष्ट्राच्या समाजकारणातही (पर्यायाने राजकारणात) अधिकृत एंट्री केली असे म्हणायला हरकत नाही. मात्र महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीची शेकडो शकले पडलेली आहेत. उत्तरेत आंबेडकरी चळवळीला सत्तेत बसवण्यात यशस्वी झालेले बसपाचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांचा ज्याप्रमाणे महाराष्ट्राने हिरमोड केला. त्याप्रमाणे चंद्रशेखर आझादचाही होईल का? भीम आर्मी जरी आज फक्त सामाजिक संघटन असले तरी निवडणुकीच्या राजकारणाबाबत त्यांनी आपले पत्ते उघडलेले नाहीत. भीम आर्मी राजकारणात उतरेल का? महाराष्ट्र चंद्रशेखरला स्वीकारू शकेल का? या सर्व प्रश्नांचा सांगोपांग घेतलेला हा आढावा.


भीम आर्मीचा हा झंझावात २०१४ सालापासून सुरु झाला. सहारनपुर येथील विचारवंत सतीश कुमार यांनी अनुसूचित जातीच्या हक्क-अधिकारांचे रक्षण करण्यासाठी एक संघटन असल्याचा विचार मांडला. सहारनपुर जिल्ह्यात २२ टक्के अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. त्यामुळे हे सर्व एकत्र आल्यास एक मजबूत संघटन बनू शकते. यातूनच निर्माण झाली भीमा आर्मी संघटनेची कल्पना आणि संघटनेच्या नेतृत्वासाठी त्यांना भेटला चंद्रशेखर आझाद…

- Advertisement -

भीम आर्मीचा उदय

उत्तर प्रदेशच्या सहारनपुर जिल्ह्यात २०१५ साली धडकूली गावात दोन समुहात झालेल्या एका विवादातून भीम आर्मीची घोडदौड सुरु झाली. घडकौली गावातील चर्मकार समाजाच्या लोकांनी ‘द ग्रेट चमार’ असा बोर्ड गावाबाहेर लावला. त्यानंतर स्थानिक ठाकूर समाजाच्या लोकांना हे काही रुचले नाही. त्यांनी त्या बोर्डाला काळे फासले. त्यानंतर सुरु झाली दोन्ही गटात हाणामारी. काही ठिकाणी संत गुरु रविदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना काळे फासण्याच्या घटना घडल्या, अनुसूचित जातीच्या काही विद्यार्थ्यांना ठाकूरांकडून मारहाण झाली. या प्रत्येक घटनेच्या ठिकाणी भीम आर्मीने धाव घेतली. अन्यायाला कारण ठरलेल्या घटकांनाही ‘जशास तसे’ उत्तर दिले. त्यामुले सहारनपुर जिल्ह्यात भीम आर्मीचा चांगलाच बोलबोला झाली. भीम आर्मीच्या या वाढत्या प्रभावाचे पर्यावसन २०१७ साली सहारनपुरच्या शब्बीरपूर येथे झालेल्या दंगलीत झाले.

 

- Advertisement -

भीम आर्मीचे कार्य

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या त्रिसूत्रीवर सध्या भीमा आर्मी (उत्तर प्रदेशमध्ये) काम करताना दिसतेय. अनुसूचित जाती, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्या मुलांना सरकारी शाळेत नीट शिक्षण दिले जात नाही. खासगी शाळेत टाकण्याची ऐपत नाही. त्यामुळे बहुजन समाजातील अनेक जातींच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. ही अडचण चंद्रशेखरने हेरली. त्यावर काम करण्यासाठी भीम आर्मीने जवळपास ३०० हून अधिक क्लासेस चालू केले आहेत. या क्लासमध्ये शिक्षणासोबतच महापुरुषांचे विचार शिकवले जातात. बहुजनांच्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, तरुणांना त्यांच्या प्रश्नांसाठी संघटित करणे आणि एकूणच समाजाच्या विकासासाठी संघर्ष करणे, अशा स्वरुपात सध्या भीम आर्मी उत्तर प्रदेशात काम करतेय. भीम आर्मीचे नवा सध्या २४ राज्यांमध्ये पोहोचले असल्याचा दावा चंद्रशेखर आझाद करत आहे.

अनुसूचित जातींच्या लोकांवर झालेल्या अत्याचाराचा जाब विचारत राहण्याच्या भीम आर्मीच्या कार्यामुळे सहारनपुर येथे २०१७ साली दंगल उसळली होती. सहारनपुर येथील शब्बीरपुरच्या दंगलीनंतर चंद्रशेखरवर रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करुन चंद्रशेखरची रवानगी तुरुंगात करण्यात आली. मात्र शिक्षा पुर्ण होण्याच्या आतच १४ सप्टेंबर २०१८ ला त्याला तुरुंगातून सोडण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव रात्री अडीच-तीनच्या सुमारास कोणतीही पुर्वसूचना न देता चंद्रशेखरला सोडले. मात्र तरिही हजारो युवकांचा मॉब तुरुंगाबाहेर जमा झाला होता. यावरुन उत्तर प्रदेशमध्ये चंद्रशेखर किती प्रसिद्ध आहे हे कळते. ‘मी सुरुवातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक चळवळीत उतरलो होतो. मात्र भाजपने आता मला उद्देश दिलाय’, असे चंद्रशेखर बाहेर आल्यावर म्हणाला. उद्देश काय तर भाजपला सत्तेतून हाकलून देणे. डॉ. बाबासाहेबांनी सांगितले की, शासनकर्ती जमात व्हा. हा विचार आता अमलात आणण्याची वेळ आली असल्याचे चंद्रशेखर सांगतो.

भीम आर्मी महाराष्ट्रात परिणामकारक ठरेल?

आजपर्यंत महराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे. संत नामदेव असो किंवा शाहू महाराज, ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात सुरु केलेले काम नंतर देशभर गेले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ असेल किंवा काँग्रेस यांची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली. मात्र महाराष्ट्राबाहेर सुरु झालेली चळवळ इथे कधीही रुजू शकलेली नाही. कांशीराम यांनी आंबेडकरी विचारांची प्रेरणा पुणे येथे नोकरीनिमित्त कार्यरत असताना मिळाली. मात्र त्यांनी उभी केलेली बहुजन समाज पक्षाची चळवळ महाराष्ट्रात निर्णायक स्थितीपर्यंत पोहोचली नाही. उलट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्यांनी कोर्‍या पाटीवर आंबेडकरी विचार कोरला आणि त्यांना यश मिळाले. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यावर त्यांनी चार वेळा बसपाची सत्ता स्थापन केली.

त्यामुळे भीम आर्मीला महाराष्ट्रात कितपत यश मिळेल, हे आज सांगता येणे कठिण आहे. चंद्रशेखरचा आक्रमकपणा तरुणांना भावणारा आहे. त्यामुळे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात भीम आर्मीचे संघटन उभे राहिल, हे नक्की. पण ते परिणामकारक असू शकेल का? मतदानावर प्रभाव टाकण्याइतपत त्यांचा प्रभाव असेल का? हे ही प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.

सध्या भीम आर्मी ज्यापद्धतीने काम करतेय, ते काम महाराष्ट्रात तीन दशकांपूर्वी झालेले आहे. दलित पँथर नावाच्या संघटनेने ‘अरे ला का रे’ असे उत्तर देणारी तरुणांची फळी निर्माण केली होती. आज भीम आर्मी अन्याय – अत्याचार झालेल्या ठिकाणी धावून जाते. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडते. त्याप्रमाणेच दलित पँथर संघटना काम करत होती. त्यामुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी समुदायाला तरी याप्रकारचे काम नवीन नाही. मग भीम आर्मी नवीन काय करणार? हा देखील एक प्रश्न आहेच.

कोरेगाव भीमा येथे किंवा चंद्रशेखर महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, अमरावती, नागरपूर आणि इतर ज्या ज्या ठिकाणी गेला तिथे तिथे त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. १८ ते ३० वयोगटातील तरुण त्याच्याकडे आकर्षित झालेले पाहायला मिळाले. मात्र त्यात केडरची कमतरता आहे. बसपा, भारिप, बामसेफ, आरपीआय हे पक्ष केडरबेस असल्यामुळे अनेक पडझड आणि सत्तेपासून लांब असूनही ते टीकून आहेत. मात्र पँथर सारखी संघटना आज तेवढी प्रभावी राहिलेली नाही. कारण दलित पँथर ही रिअ‍ॅक्शन बेस संघटना होती. अनुसूचित जातीवर अन्याय झाल्यानंतर अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन म्हणून दलित पँथर धावून जायची. त्याप्रमाणेच भीम आर्मी सध्या काम करत आहे. (शिक्षणाच्या बाबतीत केलेल्या कामाचा अपवाद सोडून)

नामांतर, स्मारकाच्या आंदोलनांनी आंबेडकरी चळवळ निष्प्रभ

मराठवाडा विद्यापीठ नामांतराचे आंदोलन महाराष्ट्रात खुप काळ चालले. जवळपास एका पिढीने या आंदोलनात आपली पुर्ण शक्ती ओतली. वस्तुतः ज्या गोष्टीने समाजाला कोणताही फायदा होणार नाही, अशा अस्मितेच्या राजकारणात महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ व्यस्त असल्याची पाहायला मिळते. सत्तेचे राजकारण महाराष्ट्रातल्या आंबेडकरी नेत्यांना अद्याप जमलेले नाही. एखादी खासदारकी, मंत्रीपद पदरात पाडून घेण्यातच इथले नेते धन्यता मानतात. इतर पक्षातून अनुसूचित जातीचे जे काही मंत्री झाले त्यांनी त्यांनी त्यांच्या पक्षाचा अजेंडा चालवला. आंबेडकरी चळवळीला त्याचा विशेष काही लाभ झाला नाही.

कांशीराम यांनी चालू केलेली चळवळ मात्र याला अपवाद होती. ‘पॉलिटीकल पॉवर इज द मास्टर की’ हे विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. हाच विचार उराशी बाळगून कांशीराम यांच्या बसपाने चार वेळा उत्तर प्रदेशची सत्ता मिळवली. मायावती यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असताना भव्य आंबेडकर पार्क बनवले. त्यासाठी हजारो कोटींचा निधी खर्च केला. काही जिल्ह्यांची नावे बदलून त्याला महापुरुषांची नावे दिली. या सर्व गोष्टीसाठी बसपाने कोणतेही आंदोलन केले नव्हते. आपली सर्व ताकद सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यात खर्ची केली आणि सत्तेतून आपले प्रश्न सोडवले.

भीम आर्मी महाराष्ट्रात पहिल्यांदा चर्चेत आली ती २०१८ च्या महापरिनिर्वाणदिनी. ६ डिसेंबरचे औचित्यसाधून भीम आर्मीने दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरासाठी आंदोलन छेडले. तटस्थपणे पाहिल्यास हा काही चळवळीचा मुद्दा होऊ शकत नाही. मुळातच ही न्यायिक मागणी नाही. पण महाराष्ट्राच्या आंबेडकरी जनतेमध्ये एक नामांतराचा व्हायरस घुसलेला आहे. तो भीमा आर्मीच्या आंदोलनाने दिसला. चंद्रशेखर आझाद याच्यासोबत महाराष्ट्रात कोणत्या प्रश्नांवर आंदोलन घ्यायचे याची चर्चा सध्या तरी होत नाही. म्हणूनच भीम आर्मीच्या महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांनी घेतलेले चुकीचे निर्णय भीम आर्मीवर मर्यादा आणू शकतात, अशी शक्यता आहे.

केडरबेसची कमतरता

भीम आर्मी सध्यातरी केडरबेस नसलेली संघटना आहे. यासाठी मनसेचे उदाहरण चपखल बसते. नेता कितीही प्रसिद्ध, फर्डा वक्ता असला तरी त्याच्या संघटनेला काहीच उपयोग होत नाही, जोपर्यंत ते संघटन केबर बेस होत नाही. शिवसेना केडर बेस पक्ष असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नसण्याचा संघटनेला फार काही मोठा फरक पडलेला नाही. त्यामुळे भीम आर्मीला भावनिक मुद्द्यावर जास्त काळ तग धरता येणार नाही.

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ बौद्धेतर नेतृत्व स्वीकारत नाही

चंद्रशेखर आझाद कांशीराम यांना आपला आयडॉल मानतो. मात्र कांशीराम यांना सुद्धा महाराष्ट्राने स्वीकारले नाही. कारण स्वतःला आंबेडकरी अनुयायी म्हणवणारे देखील इथे जात आडवी आणतात. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर चळवळ पुर्णपणे बौद्ध नेतृत्वाच्या आधीन गेली. अनुसूचित जातीतील इतर नेतृत्वाला त्यात नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही. आजही महाराष्ट्रात असलेल्या मुख्य राजकीय पक्ष आणि संघटनाच्या महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांमध्ये अनुसूचित जातीतील बौद्ध वगळता इतर जातींच्या कार्यकर्त्यांना फारसे स्थान नाही. कांशीराम यांच्याप्रमाणेच चंद्रशेखर चर्मकार समाजातून येतो. त्यामुळे आज त्याला तरुणांचा पाठिंबा मिळत असला तरी इतर लोकही त्याचप्रकारे त्याच्या पाठिशी उभे राहतील यात प्रश्नचिन्ह आहेच.

कांशीराम यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याची घोषणा केली होती, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. चंद्रशेखरही आपल्या भाषणात “मी माझ्या समाजासहित बौद्ध धर्म स्वीकारेन”, असे सांगतो. ‘पॉलिटिकल करेक्टनेस’ नावाचा प्रकार जो उत्तरेतील राजकारण्यांच्या अंगी असतो. तोच चंद्रशेखरमध्ये असल्याचे दिसून येते. कारण ज्या ज्या गोष्टींवर विरोध होऊ शकतो, त्यावर तो आधीच आपली भूमिका व्यक्त करुन मोकळा होता.

जसे की, रावण या नावाचा त्याग

भीम आर्मीची सुरुवात केल्यानंतर चंद्रशेखरने रावण हे नाव धारण केले होते. रावणाने आपली बहिण सुर्पनखासाठी रामाशी पंगा घेतला. एखाद्या महिलेची विटंबना कशी झोंबू शकते, हे दाखवण्यासाठी त्याने सीतेचे अपहरण केले. मात्र अपहरणानंतर तिला सन्मानाने वागवले. स्पर्शही केला नाही. रावण हा खर्‍या अर्थाने आपल्या बहिणीचे रक्षण करणारा भाऊ होता. माझ्या बहिणींचे रक्षण करण्यासाठी मी रावण व्हायला तयार आहे. अशी भूमिका चंद्रशेखरने आधी सांगितली होती. मात्र जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामभक्त असलेल्यांना आम्हाला मतदान करावे, रावणभक्त असलेल्या लोकांनी त्या लोकांना मतदान करावे, असे वक्तव्य केले. तेव्हापासून चंद्रशेखरने रावण नाव सोडण्याचा निर्णय घेतला. आपली आधीची भूमिका बदलताना तो कोणतीही भीडभाड ठेवत नाही. हाच त्याचा पॉलिटिकल करेक्टनेस आहे. कारण एखाद्या भूमिकेमुळे मतदानावर प्रतिकूल परिणाम होणार असेल, तर ती भूमिका सोडलेली बरी. हा त्यामागचा विचार.

राजकारणात योग्य वेळ आल्यावर उतरणार

अर्थात मतदानाचा विचार करताना चंद्रशेखरने राजकारणात उतरणार की नाही. याबाबत सध्यातरी ठामपणे काही सांगितलेले नाही. मात्र चंद्रशेखर राजकारणात उतरणार हे नक्की. कारण माझ्या समाजाला शासक बनवायचे आहे, हे प्रत्येक भाषणात तो आवर्जुन सांगतो. शासनकर्ती जमात होण्यासाठी राजकारणात यावे लागेल. मात्र ही योग्य वेळ नसल्याचे चंद्रशेखर सांगतो. कारण आताचे राजकारण मुल्यांवर आधारीत नाही. राजकारणाचे बाजारीकरण झालेले आहे. एखादा श्रीमंत उमदेवार येतो, पैसे वाटतो आणि जिंकतो देखील. त्यानंतर पुन्हा पाच वर्ष पैसे कमवण्यासाठी तो मोकळा होता. उद्देश विरहीत राजकारणात मला उतरायचे नाही. ज्या कारणासाठी लोक निवडूण देतात, त्यावर काम झाले पाहीजे. जाहीरनाम्यावर काम करणारा पक्ष असला पाहीजे असे चंद्रशेखरचे मत आहे.

बहुजनांचे सरकार स्थापन झाले तरी सामाजिक क्रांती थांबता कामा नये, हा विचार देखील कांशीराम यांच्याप्रमाणेच चंद्रशेखरनेही अवलंबलेला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आज आंबेडकरांच्या नावावर चाललेले जे प्रमुख पक्ष आहेत, ते सर्व फक्त राजकारणाशी संबंधित आहेत. सामाजिक क्रांतीशी आता त्यांचा फारसा संबंध राहिलेला नाही.

मायवतींना चंद्रशेखरची भीती

चंद्रशेखर त्याच्या होम ग्राऊंडवर ज्यापद्धतीने राजकारण करेल, त्यावरच भीम आर्मीचा देशभरातील किंबहुना महाराष्ट्रातील त्यांची वाटचाल ठरणार आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि सपा हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मोदी लाटेवर योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे सरकार स्थापन केले असले तरी उत्तर प्रदेशमध्ये जातीय राजकारण कधी डोकं वर काढेल हे सांगता येत नाही. मायावती यांना अनुसूचित जाती आणि जमातींचा पाठिंबा आहे, त्यात त्यांनी ओबीसी आणि ब्राह्मणांना सोबत घेऊन २००७ साली बहुमताने सरकार स्थापन केले होते. २०१२ साली उत्तर प्रदेशने तरुण नेता अखिलेश यादव यांना साथ दिली तर २०१७ साली भाजपच्या विकासाला निवडले.

बसपा अनुसूचित जातीसाठी काम करत नसल्यामुळे भीम आर्मीची स्थापना करावी लागत असल्याचे चंद्रशेखर सांगत असला तरी मायावती किंवा बसपावर तो टीका करत नाही. खासकरून मायावती यांनी चंद्रशेखरवर वैयक्तिक टीक करुनही चंद्रशेखरने त्याला उत्तर दिलेले नाही. बसपा ही आमची, कांशीराम साहेबांची पार्टी असल्याचे आझाद सांगतो. मात्र काही ब्राह्मण समाजातील लोकांनी आता ती ताब्यात घेतली असल्याची टीकाही भीम आर्मीची पदाधिकारी करतात.

चंद्रशेखरने भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातली अनुसूचित जातीमधील मतदार त्याच्याकडे आकर्षित झाल्यामुळे मायावतींना त्याची भीती वाटत आहे. अनुसूचित जातींनी कोणत्याही भंपक आर्मीच्या नादाला लागू नये, असे त्या जाहीरपणे सांगत आहेत. मात्र तरिही चंद्रशेखरचा प्रभाव कमी होताना दिसत नाही. शब्बीरपूरच्या दंगलीनंतर अनेक अनुसूचित जातीच्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते. त्याचा विरोध करण्यासाठी भीम आर्मीने दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन केले होते. या आंदोलनाला जमलेल्या गर्दीने आझादच्या ताकदीचा सर्वांनाच अंदाज आला.

२०१९ च्या निवडणुकीत चंद्रशेखर स्वतः उभा राहणार नसला तरी सपा-बसपा-काँग्रेसची महाआघाडी होणार असेल तर मी त्यांच्यासाठी मतदारांना आवाहन करेल, अशी भूमिका त्याने घेतलेली आहे.

भाजपनेच जन्म दिला युवा नेत्यांना

शब्बीरपूर दंगलीनंतर उत्तर प्रदेश सरकारने चंद्रशेखरवर रासुका लावून त्याला तुरुंगात टाकले. मात्र भाजप अनुसूचित जातीच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण होत असल्यामुळे त्याला शिक्षा पुर्ण होण्याआधीच सोडावे लागत आहे. चंद्रशेखर बाहेर येऊन मायावतींना आव्हान देऊ शकतो, जेणेकरुन अनुसूचित जातीचे मत विभाजन होईल, अशीही भाजपची यामागे अटकळ असू शकते.

चंद्रशेखर आझादप्रमाणेच कन्हैया कुमार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर अशा युवा नेत्यांचा उदय भाजपच्या कार्यकाळात झाला आहे. चंद्रशेखरप्रमाणेच कन्हैया आणि हार्दिकला तुरुंगात टाकल्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखीनच वाढली. गुजरातच्या उना येथे गोरक्षकांनी अनुसूचित जातीच्या लोकांवर अत्याचार केल्यानंतर त्याविरोधात आवाज उचलणारा जिग्नेश प्रकाशझोतात आला. चंद्रशेखरला तुरुंगात टाकल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी झालेल्या आंदोलनात जिग्नेश देखील सहभागी झाला होता. या युवानेत्यांची विचारधारा जरी वेगवेगळी असली तरी संविधानाचे रक्षण आणि त्यासाठी भाजपला विरोध… हे समान सूत्र त्यांच्यामध्ये आहे. तसेच भाजपला विरोध करण्यासाठी मुद्दे उपस्थित करण्याची प्रगल्भता, परिपक्वता देखील दिसत आहे.

हार्दिक पटेल आणि कन्हैया यांनी महाराष्ट्राला अनेकदा भेट दिली होती. जिग्नेशने ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर एल्गार परिषद घेतली होती. दलित, भाजपविरोधी, एक तरुण आमदार म्हणून जिग्नेशचा महाराष्ट्रातील संघटना किंवा भाजपविरोधी पक्ष स्वीकार करतायत. पण चंद्रशेखरचे तसे नाही. चंद्रशेखर स्वतःची संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे इतर पक्ष आणि संघटना मायावतीप्रमाणेच चंद्रशेखर आणि त्याच्या भीम आर्मीचा अनुल्लेख किंवा तिरस्कार करताना दिसतील. चंद्रशेखर आझादच्या राजकीय-सामाजिक-वैचारीक भूमिकांचा सहारनपूर आणि कोरेगाव भीमा येथे फक्त ट्रेलर दिसलेला आहे. त्याच्या पुर्ण चित्रपटासाठी आपल्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागले.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -