घरफिचर्समातृत्वाचं पॉलिटिक्स

मातृत्वाचं पॉलिटिक्स

Subscribe

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. पंतप्रधानासारख्या महत्त्वाच्या पदावर असताना ते न लपवता सहजपणे मातृत्व स्वीकारणं हा धाडसी निर्णय होता. पंतप्रधानपदी बाळाला जन्म देणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. याआधी १९८८ साली बेनझीर भुत्तो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना मुलाला जन्म दिला होता.

जेसिंडा आर्डन या न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात कमी म्हणजे ३७ वर्षे वयाच्या पंतप्रधान आहेत. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्या निवडणूक जिंकून पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. शपथविधीच्या अवघ्या सहा दिवस आधी त्यांना प्रेग्नन्सीची बातमी समजली होती. बाळांतपणानंतरही त्यांनी काही आठवड्यांची रजा घेतली आहे. जेसींडा आर्डन यांनी आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं तेव्हा त्यांना जगभरातून ट्रोल करण्यात आले होते. जगभराच्या पुरूषी मानसिकतेनुसार आईपणाची जबाबदारी स्त्रियांना कमकुवत करते अशीच आहे. तिच्या कर्तृत्त्वाची मोजमाप करताना तिच्या मातृत्वाचे परिमाण वापरले जाते. एक तर ती ‘आई’ होऊ शकते किंवा ती ‘कर्तृत्त्व’ करू शकते. दोन्ही गोष्टी तिला एकावेळी साधता येत नाही. येणारच नाहीत अशी एक धारणा खोलवर रूजली आहे. त्यामुळेच बाईच्या जगण्याचेच पॉलिटिक्स तिच्या मातृत्त्वातून घडवण्याची वृत्ती टिकून आहे. यातून जेसींडादेखील वाचल्या नाहीत. तिथं सर्वसामान्य महिलांचं दुखणं किती भयंकर असेल याची कल्पना न केलेलीच बरी.

- Advertisement -

मातृत्वाचं कोलीत वापरून कौटुंबिक आणि तिच्या व्यावसायिक आयुष्याचा खेळखंडोबा करण्याची आयती संधी पितृसत्ताक समाजाला मिळते. अशी कैक उदाहरणं सापडतील जिथं करिअरमध्ये पुढे जाणाऱ्या पत्नीला ‘लगाम’ घालण्यासाठी तिच्यावर आईपण लादलं गेलं. एकदा का ती आई झाली की तिने मुल आणि घरकामात स्वत:ला गाडून घ्यावं अशीच कुटुंबियांची आणि समाजाची अपेक्षा असते. करिअर करणारी आई मुलांकडे दुर्लक्षच करणार असा समज असतो. त्यामुळे तिच्यापुढे एकतर करिअर कर नाहीतर, मुलाकडे लक्ष दे म्हणून तिला कात्रीत पकडले जाते.
मातृत्वाचा स्वीकार केल्यानंतर पुन्हा एकदा करिअरसाठी धडपडणाऱ्या एका मैत्रिणीचं मोडून पडणं तर प्रत्यक्ष पाहिलं. तिने मुलं वर्षाचं होईपर्यंत पूर्णवेळ मुलाच्या संगोपनात घालवलं. त्यानंतर तिला तिचं माध्यमातलं क्षेत्र खुणावू लागलं.

बऱ्याच हालचाली केल्यानंतर तिला एका कंपनीत नोकरीही मिळाली. मात्र ती नोकरी तिला केवळ महिन्याभरात सोडावी लागली. ती घराबाहेर राहू लागल्याने मुलाने धसका घेतला व आजारी पडला. त्याच्या मनावर फार मोठा परिणाम होण्याची तिला भीती दाखवली गेली आणि तिची नोकरी सुटली. विशेष म्हणजे तिचं एकत्रित कुटुंब आहे. इथं खरंतर किती स्वाभाविक होतं की ज्या बाळाला दिवसरात्र आई दिसायची ती अचानक सात आठ दिवस दिसत नाही म्हटल्यावर तो जरा घाबरणारच. पण जर कुटुंबियांनी थोडासा आधार दिला असता आणि मुलालाही आई नसण्याच्या सवयीसाठी थोडा वेळ दिला असता तर प्रश्न अलगद सुटला असता. मात्र इथं मुलाच्या भल्याची वा त्याला काही झालंच तर त्याची दोन्हींची जबाबदारी आईकडे ढकलून बाकी सर्वांनी हात वर केले.

- Advertisement -

एका खाजगी शाळेत शिक्षिकेच्या जागेसाठी एका तरूणीला बोलावलं. ती बारामतीहून पुण्यात मुलाखतीसाठी आली. त्यात तिला तिचं फॅमिली प्लॅनिंग काय आहे विचारलं आणि तिने उत्तर देण्याआधी त्यांनीच सांगितलं की नोकरी स्वीकारल्यावर किमान २ वर्षे तरी पाळणा लांबवावा लागेल. तिच्या लग्नाला आधीच तीन वर्षे झाली होती. त्यामुळे घरून मुलबाळासाठी प्रेशर होते आणि इथं या विचित्र अटीमुळे तिच्यापुढे पेच निर्माण झाला. मात्र कुटुंबाची आर्थिक गरज, तिच्यासाठी मिळणारी चांगली संधी हा विचार करत तिने नोकरी स्वीकारली. आज तिच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत, मात्र आता वाढत्या वयामुळे गर्भधारणेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलेला नोकरीवर न घेण्याचा अलिखित नियम असतो. बाई विवाहित असेल तर ती सतत तिचं घर, सणवार, पैपाहुणे, मुलंबाळं अशा सबबी देऊन कामाची टाळाटाळ करते असा जावईशोध या कंपन्यांना लागला आहे. शिवाय गर्भवती महिलेला सहा महिन्यांची पगारी सुट्टी देण्याचा धसकाही यांनी घेतलेला असतो. अनेकदा ऑफीसमध्ये जर एखादी गरोदर स्त्री असेल तर तिला मिळणाऱ्या प्रसुती रजा, प्रसुती रजांचा मिळणारा पगार अशा गोष्टींवरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या तिला सुनावले जाते. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सुषमाने तिचा अनुभव सांगितला. तिला केवळ तीन महिन्यांच्या सुट्ट्या मिळाल्या. त्याही प्रसुतीच्या अंदाजे तारखेच्या अलिकडे दीड महिना व पलिकडे दीड महिना घेण्याची जबरदस्ती असते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रसुतीनंतर केवळ दीड महिना रजा. प्रसुतीची वेळ आणि कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होण्याचा एकच कालखंड होता. तिची प्रसुती झाल्याने कंपनीने परस्परच तिचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला नव्हता. ओली बाळंतीण होऊन कंपनीच्या मॅनेजमेंटशी हुज्जत घालण्यात प्रचंड उर्जा आणि वेळ घालवावी लागली. कसाबसा तिचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झाला. यानंतर तिने पुन्हा दोन महिन्यांची बिनपगारी सुट्टी घेतली. पण तिच्या प्रसुतीच्या सुट्ट्यांवरून तिला आजही कंपनीने तिच्यावर किती उपकार केले हे ऐकून घ्यावं लागत आहे. वैद्यकियदृष्ट्या खरंतर बाळाला किमान दोन वर्षे स्तनपान देणे आवश्यक असते. पहिल्या वर्षभरानंतर आईच्या स्तनपानातून मुलांना न्यूट्रीशन मिळत असते. मात्र बहुतांश आया त्यांच्या मुलांचा हे न्यूट्रीशन हिरावून कंपन्यांना वेळ देत असतात. त्याचं मोल का बरं मग या कंपन्या करत नाहीत?

आईचा जीव मुलांसाठी कासावीस होत राहतो आणि म्हणून मग त्या प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत अशीही एक ओरड केली जाते. मात्र जन्माला आलेलं मूल जितकं आईचं असतं तितकंच बाबांचं आणि कुटुंबियातील सर्वांच असतं. ते मूल भविष्यातील आपल्या देशाचं नागरिक असतं त्याअर्थी बालसंगोपन ही समाजाचीही जबाबदारी बनते. पण याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते आणि मग एखाद्या बाईचा ‘आई’ असण्याचा संबंध जोडून तिला घरातच बांधून ठेवलं जातं. आजही आपल्याकडे आई मुक्तपणे, निर्धास्तपणे कामावर जाऊ शकेल अशी व्यवस्थाच नाही. सपोर्ट सिस्टिमच नाही तर त्या आईचा जीव थोडाथोडा घरात मुलांमध्ये गुंतणार हे स्वाभाविकच आहे. यावरून तात्काळ तिच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्याची गरजच नाही.

कंपन्यांची भांडवलशाही वृत्ती माणसांच्या नसानसांत उतरली आहे. म्हणून मग गर्भवती स्त्रीकडे इतक्या असंवेदनशीलपणे पाहण्याचे धाडस त्यांच्यात येते. या पार्श्वभूमीवर जेसींडा आर्डन यांनी इतक्या खुलेपणाने मातृत्वाचा स्वीकार करणे ही संकुचित वृत्तीला चांगलीच चपराक आहे. याबाबत महिलांनीही सजग होण्याची नितांत जरूर आहे. कामाच्या वाटणीपासून ते बालसंगोपनाच्या जबाबदारी वाटपाबाबत त्यांनी आपल्या जोडीदारासोबत संवादी राहण्याची गरज आहे. वैयक्तिक पातळीवर ही समज वाढीस लागल्यास तीच समज कंपन्यांच्या पॉलिसीतही उतरेल. इथं ‘प्रेग्नेंट वूमन इन ऑफिस’ ही अगदी साडेतीन मिनिटांची एक व्हिडीओ स्टोरी आठवते. एक गरोदर महिला रोजच्याप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये येते. पायऱ्या चढून ती तिच्या डेस्कपर्यंत जाते तर तो रिकामा असतो. तिचं सर्व सामान हलवलेलं असतं. तिचा एक सहकारी तिला एचआरला भेटायला सांगतो आणि तिच्या मनात धस्स होतं.

आपल्याला कामावरून काढल्याची शंका तिच्या मनात येते. ती व्यवस्थापकाकडे जायला निघते तर तळमजल्यावर तिच्या नावाची पाटी असलेलं एक छोटं केबीनच तिला दिलेलं असतं. ऑफिसमधील प्रत्येक सहकाऱ्याने तिला ‘कंफर्टेबल’ वाटेल याची काळजी घेऊन तिच्या केबीनची रचना केलेली असते. तिचा वरिष्ठ अधिकारी स्वत: तिला भेटायला येतो आणि विचारतो की कसं वाटतंय? ‘बिकमींग मदर इज नॉट इजी वुई जस्ट ट्राय टू मेक इट लेस डिफिकल्ट’ वरिष्ठांची ही संवेदना आणि गर्भवती स्त्रीच्या कामावरचा विश्वास घर असो वा कंपन्या यांत रूजेल तेव्हा बाईच्या मातृत्वाचं पॉलिटिक्स आपोआपच बाजूला पडेल.

प्रेगन्सी अ‍ॅण्ड पॉलिटिक्स

जेसींडा आर्डन यांच्या मातृत्वाबाबत बोलताना बेनझीर भुत्तो यांच्याबाबत काय घडलं होतं तेही समजून घ्यायला हवं. १९८७ मध्ये बेनझीर भुत्तोंचा देशातील सैन्य शासन उलथवून टाकण्याचा लढा सुरू होता. १९८८ मध्ये त्या गर्भवती राहिल्या. पाकिस्तानचे सैन्यशासक जनरल जिया उल-हक यांनी लोकशाही पद्धतीनं निवडणुका घेण्याचं जाहीर केलं. भुत्तो गरोदर असल्यानं निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही अशी हक यांची धारणा होती. निवडणूक नाट्यानंतर काळजीवाहू सरकार स्थापन करू, असा जिया उल-हक यांचा डाव होता. पण बेनझीर कणखर होत्या. त्यांना वडील झुल्फीखार अली भुत्तोंना हरू द्यायचं नव्हतं. बेनझीर यांनी निवडणुकीत सहभाग घेतला आणि पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या. पण विरोधकांनी मॅटर्निटी लीव्हवरून बेनझीर यांचा छळ सुरू ठेवला. या त्रासात बेनझीर यांनी एका प्री-मॅच्युअर बाळाला जन्म दिला. ‘प्रेग्नन्सी अ‍ॅण्ड पॉलिटिक्स’ या बीबीसीने केलेल्या रिपोर्टनुसार बेनझीर यांनी विरोधकांचे मनसुभे हाणून पाडत मातृत्व स्वीकारलं होतं.

अपत्यहीन आणि अविवाहित म्हणून अनेक राजकारणी महिलांना जगभर छळण्यात आलं आहे. २००५ मध्ये जर्मनीच्या चान्सेलर अंजेला मर्कल यांच्यावर मूल जन्माला न घातल्यामुळे चिखलफेक झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या एका बड्या राजकीय नेत्यानं २०१० मध्ये देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या जुलिया गिलार्ड यांना वांझोटी म्हणून हिणवलं होतं. वांझ महिला शासन करण्यास अनफिट असतात अशा गलिच्छ भाषेत त्यांच्यावर टीका झाली होती. भारतातही एकट्या राजकीय महिलांना छळण्याचा काळाकुट्ट इतिहास आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, जयललिता, मायावती, शीला दीक्षित, उमा भारती आणि वसुंधरा राजे यांच्यावर अनेकदा चिखलफेक झाली आहे.


हिनाकौसर खान-पिंजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -