घरफिचर्सयुद्ध नको... घरातही आणि घराबाहेरही...

युद्ध नको… घरातही आणि घराबाहेरही…

Subscribe

‘दहशतवाद संपलाच पाहिजे, पण त्यासाठी युद्ध नको.’ वाक्य वाचून माझ्यात थोडी जाण आली. आज माझ्या गावच्या निनाद मांडवगणे याच्या पत्नीने ,‘युद्ध नको हो’ असे स्पष्ट सांगितले आणि खूपच हायसे वाटले. इतक्या मोठ्या तिच्या नुकसानी नंतरही ती मानवतेला धरून आहे त्याअर्थी शेवटी मानवताच विजयी होईल. ‘विजेता’ तिचे नाव तिच्या वाक्यात आपण मिसळलो नाही तर हे तिकडे करा असे सांगत असताना कधी आपल्या घरात घुसेल हे आपल्याला कळणारही नाही. म्हणूनच म्हणते आहे ‘युद्ध नकोच… घरातही आणि घराबाहेरही……

त्या तिथं पलीकडं तिकडं, त्या कुंपणाच्या पल्याडग, मला खात्री हाय, माझी मैत्रीण हाय॥
तुम्ही म्हणाल, तिचं नाव काय?, मी खरंच सांगते ठाव नाय,
असलं जहिरा, जिनत, सलमा, रजिया नाय तर असलं जरीना
काय असलं कुणाला, खबर मी म्हणते, नावात एवढं असतंय काय?

- Advertisement -

तुम्ही म्हणाल मला, तिचं गाव काय, मी खरंच सांगते ठाव नाय, असलं पेशावर, रावळपिंडी,
लाहोर नाय तर असल कराची, काय असलं कुणाला खबर, मी म्हणते, गावा बिगर काय अडतंय काय?

तुम्ही म्हणाल मला मग, करते काय? नाही ठाऊक परी अंदेसा हाय, असलं रांधत, दळत-कांडत,
रानाला न्हाय तर तान्ह्याला पाजत, काय असल कुणाला खबर मी म्हणते, बाई दुसरं करणार काय?

- Advertisement -

तुम्ही म्हणाल मला मग ओळख कशी?, आमच्या दोघींचं बाप हायेत बॉर्डरपाशी,असंल तिच्याबी उरात धडकी, माझ्यावानी झोप उडाली, काय हुईल कवा काय, घडंल ही भीती, हाच ओळखीचा धागा हाय।

ही पवन खेबुडकर यांची कविता, आम्ही स्त्री मुक्तीवाल्या बाया अनेक वेळा गातो. बाबासाहेब म्हणायचे की स्त्री मुक्ती ही मानवमुक्तीचीच चळवळ आहे. त्या अर्थानेही मी स्त्रीवादी झाले. ज्या ज्या वेळी ही कविता मी ऐकली मला माझ्या जन्मा आधी घडलेली जागतिक युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध आठवत असे आणि काय परिस्थिती असेल त्यावेळी याचा न झेपणारा अनुभव घेत असे मी. गेले आठवडाभर हा ताण माझ्या सारखे अनेक संवेदनशील नागरिक अनुभवत आहेत. माझ्याकडे जव्हारला टीव्ही नाही याचे अधिक सुख ह्या आठवड्यात मी अनुभवले. बातम्यांमध्ये चाललेला थिल्लरपणा अगदी अल्पसा माझ्या वाट्याला आला व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीत मी ही तुमच्या सारखेच पैसे भरुन प्रवेश घेतलेला असल्यामुळे माझ्यापर्यंतही काही बातम्या पोहोचल्याच. आता मला विचारल्याशिवाय काहीही डाऊनलोड करायचे नाही ही फॅसिलिटी कशी वापरायची याचे तंत्रज्ञान माझ्या तरुण मित्रांनी शिकवल्यापासून मी आता फार स्वतःच्या जीवाला त्रास करुन घेत नाही. त्यामुळे बरेच अ‍ॅनिमेशन केलेले व्हिडिओ पाहण्याचा प्रसंग आला नाही. त्यामुळे मी बरीच वाचले. रवीश म्हणाला काही दिवस टीव्ही पाहू नका हे मी बरेच आधीपासून अमलात आणले आहे. त्यामुळे जरा वाचन वाढले आहे, लिखाणही वाढले आहे.

पण घरात बसून, एक बॉम्ब टाकून मनातल्या मनात पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन उडवून टाकल्याचे स्वप्न पाहणारे मात्र माझ्यासारख्या अडाण्यांना माहिती पोहोचेल याची व्यवस्थित रचना करतात आणि कितीही काळजी घेतली तरी काही तपशील आपल्यापर्यंत पोहोचतातच. हा सर्व त्रागा तुम्हाला सांगते. कारण अशी मनातल्या मनात देश, लोक यांना काढून टाकणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. हे असे लोक त्यांच्या त्यांच्या मनातल्या मनात असे मांडे खात असते तर मला फार वाईट वाटले नसते. पण असे लोक आता सर्व सार्वजनिक ठिकाणी त्यांचे अस्तित्व तयार करत आहेत आणि त्यात सहभागी न होणार्‍यांना ‘देशद्रोही’ जाहीर करून टाकतात आणि एकदा का तुम्ही त्यांच्या अशा गटात आलात की तुमचे जगणे त्यांच्या नियंत्रणात ते घ्यायला लागतात. या सगळ्याचा खूपच त्रास होतो आहे कारण यात तरुण पोरांची संख्या जास्त आहे म्हणून. एवढं असत तरी कदाचित मी हा विषय तुमच्याशी बोललेच नसते; पण आज गंभीरपणाने बोलते आहे कारण तसेच आहे.

आमच्या जव्हारमधली एक छोटीशी शाळा. म्हणजे श्रीमंत अंगणवाडी खरं तर. ज्या आईबापांकडे थोडे पैसे आले आहेत, इंग्रजी बोर्ड लावलेल्या शाळा म्हणजे आपल्या पोरांची प्रगती, शाळेच्या युनिफॉर्ममध्ये टाय असला म्हणजे आपलं पोरग नक्की परदेशात जाईलच …..इ.इ.अनेक गैरसमज असलेल्या पालकांच्या खिशातून/पर्समधून, मार्केटिंगच्या तत्वाने भरपूर पैसे घेऊन चालवलेल्या ह्या बालवाड्या. अशीच एक रंगीत बालवाडी आमच्याकडे आहे. ज्यादिवशी पुलवामाची घटना घडली. त्याच्या दोन-तीन दिवसांनी ह्या शाळेच्या लोकांनी सर्व ज्युनिअर केजी, सीनियर केजी याचे वर्ग एकत्र केले, वर्गात एक संगणक उपलब्ध केला, त्यावर पुलवामाची सहज उपलब्ध झालेली अ‍ॅनिमेटेड फिल्म मुलांना दाखवली, मग सर्व शहिदांचे फोटो असलेले मोठे बॅनर समोर लावले, आणि एका एका मुलाला समोर बोलावून त्यांच्या हातात दिलेली मेणबत्ती त्या फोटोंसमोर लावायला सांगितली. यासर्व नाट्याचा मध्यंतर असा झाला की हळूहळू बाई रडायला लागल्या आणि मग सर्व वर्ग ढसढसा रडला. तोपर्यंत शाळा सुटायची वेळ झाली होती. मुलं तसाच रडलेला चेहरा घेऊन घरी आले. माझ्या एका सहकार्‍याची मुलगी ह्या शाळेत आहे,तिच्या घरी मी ही कामानिमित्त गेलेली होते. त्या लेकराची आणि माझी खूपच दोस्ती आहे. प्रत्येकवेळी मला ती भेटली की खूप बोलते, तिला खूप काही मला सांगायचे असते, खूप सारे प्रश्न मला विचारायचे असतात. पण आज ती तोच मूड घेऊन घरी आली होती. तिने सांगेपर्यंत हा कुठलाही प्रकार आम्हाला माहीत नव्हता. चौकशी केल्यावर वरील सर्व सविस्तर कळाले. प्रसंग अजून संपलेला नाही. प्रसंगाचा शेवट असा की, ते लेकरू मला सांगत होत ‘आई, मी ना मोठी होईल तेव्हा बंदूक घेईन आणि पाकिस्तानला मारेन, त्यांनी आपल्या सोल्ड्जरला मारलं ना?’

मी अजूनही त्याच धक्क्यात आहे की, शाळेने हे असं का केलं? त्यांना असं करायला कोणी सांगितलं? शाळेत संगणक, तो अनिमेशन केलेला व्हिडीओ कोणी पुरविला? शाळेतले शिक्षक एरवी शिकवण्यासाठी एव्हढे कल्पक नसतात मग ही कल्पकता त्यांना कोणी दिली? ज्या शाळेत असे प्लान कार्यक्रम होतात त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य काय? हे विद्यार्थी जागतिक गावाचे नागरिक असणार की नाही? या सर्वांचे एका वाक्यात उत्तर आहे की काहीना असे मानवाच्या मनात सतत आपलं न ऐकणार्‍याचा राग तयार करून हवा आहे आणि ते यासाठी एकही संधी सोडत नाही. ही तात्पुरती निर्माण केलेली युद्धसदृश्य परिस्थिती किती लोकांच्या विशेषतः तरुणाच्या, लहानग्यांच्या मनात काय काय भीती, राग, असंवेदनशीलता निर्माण करीत आहे. त्यामुळेच आज घरा घरात सतत रागावलेले, नाही हा शब्द ऐकून न घेणारे, आत्ताच हवं आहे असं सतत म्हणणारे लहान मुलं दिसत आहेत जे ह्या देशाचे नागरिक होणार आहे. हे नागरिक जरा कोणाचा विरोधी सूर ऐकून घ्यायला तयार नाही, मग ती विरोधी वागणार्‍यांशी कसं वागतील याचा विचार करुन डोक फुटायला आलं आहे. म्हणून मी हे आज तुम्हांला शेअर करते आहे. रागीष्ट मुलांचे कौतुक करण्यात तुम्ही अग्रेसर आहात. त्याला हे अजिबात आवडत नाही, तो ही भाजी खाणारच नाही अशी त्याच्या आधी तुम्ही प्रस्तावना करता तेव्हा तुम्हा सर्वांना याचा त्रास व्हावा. आपण निर्माण केलेल्या या ‘त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, माजलेत ते’ च्या वातावरणामुळे तुम्ही ‘माणूस’ मारण्याचे शास्त्र शिकवता आहात हे तुमच्या लक्षात यावे यासाठी हा चिमटा.

त्या दिवशी २६ ला मी सीएसटीला पोलीस प्रशिक्षणात सहभागी होते, चहाचा ब्रेक झाला आणि मला आयोजकांनी निरोप दिला,‘आपण केला बरं का त्यांच्यावर अ‍ॅटॅक’. माझी तर पायाखालची जमीनच सरकली. त्याआधीच्या ‘२६’ ला ही मी अशीच सीएसटीवर होते. जस्ट मी लोकलमध्ये बसले, विक्रोळीपर्यंत जेमतेम पोहोचले असेन आणि त्यांनी आपल्यावर अ‍ॅटॅक केल्यामुळे झालेली सर्व प्रकारची अगदी इमारतीपासून ते माणसाच्या मनातली पडझड पहिली होती, ते सर्व काही सेकंदांच्या आत डोळ्यांसमोरून गेले. कसे तरी सत्र संपवले आणि तिथून बाहेर पडून आधी आपल्या माणसात जाण्यासाठी झपाझप पावल टाकत स्टेशनकडे धावत चालली होती. कामा हॉस्पिटलकडून जरा वळाले आणि फटाक्यांचा जबरदस्त आवाज झाला. खूपच घाबरले मी. घामाच्या धारा लागल्या. आवाजाच्या दिशेने पळतच गेले, माझ्यासारखे अनेकजण त्याच दिशेकडे पळत जात होते. पोहोचले तेव्हा पाहिलं तर, स्टेशनच्या जवळ असलेल्या मुस्लीम बहुल कॉलेजने सर्व विध्यार्थ्यांना खाली जमा केलेले होते, दोन चार तिरंगे फडकत होते, एका बाजूला चेकाळलेले तरुण फटाक्यांच्या लडी, बॉम्ब फोडत होते, लाऊड स्पीकरवर ए. आर. रहेमान वंदेमातरम् जोराजोरात गात होता, तोंडावरचा बुरखा न उचलता ‘इट का जवाब पत्थरसे देंगे’च्या जोरदार घोषणा सुरू होत्या. मुलमुली एकत्र विजयाचा उन्माद करीत होते. काहीवेळच चालला हा सर्व ड्रामा, जणू काहीतरी सिद्ध करण्यासाठीच करायचा होता तो. हा पुरावा असंख्य मोबाईल कॅमेरे हे टिपून तिथे अनुपस्थित असणार्‍यांना लाईव्ह शेअर करीत जगजाहीर करीत होते.

बुरख्यात सारख्याच दिसणार्‍या बर्‍याच मुली, एकत्रच उभे असलेले त्यांचे वर्गमित्र आणि त्या ह्या जल्लोषात एकत्र सामील झालेल्या होत्या आणि त्यांच्या अशा एकत्र उभ्या राहण्याला त्यांचे कुठलेच गुरू ऑब्जेक्शन घेत नव्हते. कशीतरी स्टेशनला पोहोचले, मोबाईल इतका वेळ सत्रासाठी बंद करुन ठेवला होता त्याला जागे केले. तोपर्यंत बातम्या सविस्तर धडकलेल्या होत्या. मोठा व्यक्ती गंभीर आजारी असला आणि त्याला दवाखान्यात नेले की पेपरवाले सर्व त्याच्या संदर्भात माहिती गोळा करुन अगदी ‘पान’ रेडी ठेवतात आणि शेवटचा निरोप आला की ‘शेवटी त्यांनी इतक्या वाजता प्राण सोडला’ हे टाईप होते आणि पान प्रिंट होते. अगदी आज तसच सर्व पान सविस्तर रेडी होतं. परत तोच प्रश्न कोणी दिली ही सविस्तर माहिती? शहारून तिथेच पुलावर उभे होते आणि हळूहळू मित्रांच्या पोस्ट यायला लागल्यावर समजलं की आम्ही त्यांच्या घरात घुसलो नव्हतो तर दोन शेजारी कचरा टाकायला जी जागा तशीच गलीच्छ ठेवतात त्यावर हल्ला केला होता आपण.

त्याला जोडूनच सर्वांचे वाक्य होतं, ‘दहशतवाद संपलाच पाहिजे, पण त्यासाठी युद्ध नको.’ वाक्य वाचून माझ्यात थोडी जाण आली. आज माझ्या गावच्या निनाद मांडवगणे याच्या पत्नीने ,‘युद्ध नको हो’ असे स्पष्ट सांगितले आणि खूपच हायसे वाटले. इतक्या मोठ्या तिच्या नुकसानी नंतरही ती मानवतेला धरून आहे त्याअर्थी शेवटी मानवताच विजयी होईल. ‘विजेता’ तिचे नाव तिच्या वाक्यात आपण मिसळलो नाही तर हे तिकडे करा असे सांगत असताना कधी आपल्या घरात घुसेल हे आपल्याला कळणारही नाही. म्हणूनच म्हणते आहे ‘युद्ध नकोच… घरातही आणि घराबाहेरही……

-अनिता पगारे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -