घरफिचर्स‘नोटा’च्या कपाळी गोटा

‘नोटा’च्या कपाळी गोटा

Subscribe

आजवर आपल्या अपयश वा पराभवावर काँग्रेस जशी पांघरूण घालत राहिली, तसाच काहीसा प्रकार मंगळवारच्या निकालानंतर भाजपच्याही समर्थकांकडून होत आहे. तुम्ही तीन राज्यातील सत्ता गमावली हे व्यवहारी सत्य आहे आणि नोटा वा तत्सम काही कारणे दाखवून विजय हुकल्याचे दावे निरर्थक आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर काँग्रेसचे समर्थक हेच करत बसले आणि एकामागून एक राज्ये काँग्रेसला गमावण्याची पाळी आली. कधी ईव्हीएम वा कधी धनशक्तीचे आरोप करून काँग्रेसने आपल्या पराभवावर पांघरूण घातलेले होते. त्यातून युक्तीवाद जरूर साधला गेला. पण येणारे पराभव टाळता आले नाहीत.

“You can avoid reality, but you cannot avoid the consequences of avoiding reality.” – Ayn Rand सत्य नाकारले किंवा त्याकडे पाठ फिरवली म्हणून ते संपत नाही, की त्याचे परिणाम भोगण्यातून सुटका नसते. हेच सतत काँग्रेस करत आली आणि त्यावर पडदा घालण्यासाठी माध्यमांसहीत बुद्धीमंतांचा उपयोग काँग्रेसने केला, म्हणून त्या पक्षाची दुर्दशा झालेली आहे. ताज्या निवडणुकीतून तो पक्ष सावरत असताना भाजपने तीन राज्ये गमावली आहेत. पण त्याकडे डोळेझाक करून काँग्रेसचे समर्थक आपल्याला तीन राज्यांत निर्णायक सत्ता मिळाल्याचा आनंदोत्सव करण्यात गर्क आहेत. निदान आरंभीच्या दोनतीन दिवस त्यांना त्यातून सवलत द्यावी लागेल. कारण विजयाचा आनंद घेताना त्यांनी दु:खाचा सोहळा साजरा करावा, अशी अपेक्षा कोणी करू शकत नाही. पण त्यांच्याकडून भाजपचे अनेकजण काही धडा शिकलेले दिसत नाहीत. कारण आजवर आपल्या अपयश वा पराभवावर काँग्रेस जशी पांघरूण घालत राहिली, तसाच काहीसा प्रकार मंगळवारच्या निकालानंतर भाजपच्याही समर्थकांकडून होत आहे.

तुम्ही तीन राज्यातील सत्ता गमावली हे व्यवहारी सत्य आहे आणि नोटा वा तत्सम काही कारणे दाखवून विजय हुकल्याचे दावे निरर्थक आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर काँग्रेसचे समर्थक हेच करत बसले आणि एकामागून एक राज्ये काँग्रेसला गमावण्याची पाळी आली. कधी ईव्हीएम वा कधी धनशक्तीचे आरोप करून काँग्रेसने आपल्या पराभवावर पांघरूण घातलेले होते. त्यातून युक्तीवाद जरूर साधला गेला. पण येणारे पराभव टाळता आले नाहीत. आता असले युक्तीवाद बाजूला ठेवून तीन राज्यांतील भाजपच्या विरोधातील किरकोळ असंतोष संघटित केला, म्हणून त्यांच्या हाती निसटती सत्ता लागलेली आहे आणि तोच अशा बाबतीतला धडा असतो. पण समाजमाध्यमे वा अन्यत्र भाजपचे समर्थक तो धडा शिकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. अन्यथा ‘नोटा’मुळे मध्यप्रदेश व राजस्थानात सत्ता कशी गेली, त्याचे युक्तीवाद ऐकायला मिळाले नसते.

- Advertisement -

काँग्रेसच्या समर्थकांनी ईव्हीएमवर शंका घेऊन मागली दीडदोन वर्षे काहुर माजवले होते. म्हणून मतदान यंत्रे बदलली गेली नाहीत, किंवा कर्नाटक वा गुजरातमध्ये काँग्रेसला यश संपादन करता आलेले नव्हते. असे आरोप वा युक्तीवाद लोकांचे मनोरंजन करायला लाभदायक नक्की असतात. पण त्यामुळे सामान्य मतदाराचे मन जिंकता येत नाही. त्यानेच तर मतदान केलेले व बदल घडवलेले असतात. म्हणूनच त्या आरोपाचा वा काहूर माजवण्याचा राजकीय लाभ काँग्रेसला मिळू शकला नव्हता. त्याचप्रमाणे त्यांची टवाळी करण्यात कालापव्यय करणार्‍या भाजप समर्थकांना आपल्या पक्षाला चार मते मिळवून देणेही शक्य झालेले नाही. तसे असते तर तीन राज्यांत भाजपला सत्ता गमावण्याची पाळी आलीच नसती. ती आली कारण यंत्रातील ‘नोटा’ असे बटन नसून पक्षात आलेली मरगळ किंवा खोटा आत्मविश्वास त्याला जबाबदार आहे. कोणीतरी मध्यप्रदेशच्या अकरा मतदारसंघातील आकडे दिलेले आहेत आणि तिथे नोटा बटन दाबलेल्यांनीच भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला, असा दावा केलेला आहे.

नोटा म्हणजे जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी कुणालाही पसंती नसल्याचा कौल असतो. म्हणजे मतदार मत द्यायला येतो आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना नाकारून जातो. सहाजिकच त्याचे मत गणतीमध्ये येत नाही. त्याने आपली एकूण उमेदवार किंवा सर्वच राजकीय पक्षांविषयी नाराजी नोंदवलेली असते. तो आपले मत वाया घालवतो, असा त्यातला दावा आहे. ते बटन जर सर्वांना नाकारणारे असेल, तर ते भाजपच्या बाजूचे होते आणि गणतीत नसल्याने आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे गृहीत, आपलीच फसगत करणारे आहे. कारण मतदाराला आपली नापसंतीच व्यक्त करायची होती आणि त्याने ते काम केले आहे. जर त्याने तेच मत भाजपविषयी नाराजी म्हणून काँग्रेस वा अन्य कुणाला दिले असते, तर निकालात फरक पडणार होता काय? एकूण मतदानाची टक्केवारी बघितली व त्यातील पक्षनिहाय टक्केवारी बघितली, तरी भाजपची मते पुर्वीच्या तुलनेत काहीशी घटलेली आहेत. म्हणजेच पुर्वी भाजपलाच आपले मत देणार्‍या अनेकांनी काँग्रेस वा भाजप सोडून अन्य कोणाला तरी मत दिलेले आहे. भाजपवरची नाराजी अन्य पक्षाला मत देण्यातून व्यक्त होते किंवा कुठल्याही पक्षाला मत न देण्यातूनही व्यक्त होते. ती फक्त नोटातूनच व्यक्त होत नाही. शिवाय आपले मत परिस्थिती व अनुभवानुसार बदलणे हा मतदाराचा अधिकार आहे. तो नोटातून व्यक्त होऊ शकतो, त्यापेक्षा अधिक घातक परिणाम दुसर्‍या पक्षाला मत देण्यातून होतो.

- Advertisement -

सहाजिकच नोटा बटन दाबणार्‍यांनीच भाजपला पाडले, असला दावा मतदाराचा आणि लोकशाहीचाही अपमान करणारा आहे. काँग्रेसची मते वाढली वा भाजपची कमी झाली, म्हणजेच काही हजार मतदारांनी यावेळी भाजपकडे पाठ फिरवली आहे. ती फिरवताना त्यांनी अन्य पक्षांना कौल दिला असेल, तर त्याला गुन्हेगार समजणे लोकशाहीला घातक असते. किंबहुना आपलीच फसवणूक करून घेणे असते. मोदींच्या थापा किंवा मार्केटींग व प्रचाराला मतदार भुलला, असे २०१४ पासून काँग्रेसवाले म्हणत आलेले आहेत. कारण त्यांची मते कमालीची घटली आणि पैकी काही मते भाजपच्या पारड्यात येऊन पडलेली होती. पण ते सत्य काँग्रेस समर्थकांना लपवायचे होते. पण ते लपवल्यामुळे काँग्रेसचेच लोक गाफिल राहिले आणि त्यांनी जनतेमध्ये जाऊन मतदाराला चुचकारण्यात आळस केला. म्हणून मते आणखी कमी होत गेली आणि एकामागून एक राज्ये हातून निसटली. त्यातून आता काँग्रेसला जाग आलेली दिसते. म्हणूनच त्यांनी जनतेत जाऊन मतदाराला प्रभावित करण्याचा मार्ग चोखाळला. त्याचा लाभ त्यांना थोडासा मिळाला आहे. अजून भाजपविषयी जनमत तितके विरुद्ध गेलेले नाही. पण असल्या नोटा विरोधातील भूमिकेने समर्थकच भाजपचे अधिक नुकसान करतील.

भाऊ तोरसेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -