घरफिचर्सआता परीक्षा शिक्षण विभागाची

आता परीक्षा शिक्षण विभागाची

Subscribe
कोरोना वैश्विक महामारीचा दैनंदिन जीवनमान आणि सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला आहे. या महामारीचा ज्या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला, त्यात शिक्षण अग्रभागी आहे. मुलांच्या बाबतीत पालकांची संवेदनशीलता लक्षात घेऊन सर्व प्रकारचे शिक्षण सध्या बंद आहे. त्याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होत असून त्यातून मार्ग काढण्याचा स्थानिक पातळीवर ज्याच्या त्याच्या परिने प्रयत्न सुरू असताना आज राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षी जून महिन्याच्या दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यात जाहीर होणारे दहावीचे निकाल यंदा जुलै अखेरीस जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये दरवर्षीप्रमाणे मुलींनी बाजी मारली असून राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे.
कोकण मंडळाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल कोल्हापूर विभागाचा निकाल आहे. सर्वच मंडळांचा निकाल तसा खूप चांगला आहे. यामुळे शाळा, विद्यार्थी आणि पालक खूश असणार यात शंकाच नाही. मात्र, या वाढलेल्या निकालामागे शाळांतर्गत गुणांची कमाल आहे, हेही या आनंदाच्या क्षणी विसरून चालणार नाही. यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांनाही ८० टक्क्यांच्यावरती गूण सहज मिळतात. या अंतर्गत गुणांचा परिणाम म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे ९० टक्क्यांवर गूण नसलेले पालक वगळता इतरत्र हे चांगले गूण दुर्लक्षित राहणार आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेतील परीक्षा आणि त्या परीक्षेतील गूण हे विद्यार्थ्यांचे खरे मूल्यमापन करत नाही. यामुळे परीक्षेतील गूण म्हणजे सर्वकाही नाही, असे मत जवळपास सर्वच शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत असतात. मात्र, प्रत्यक्षात करिअरच्या सर्व वळणांवर परीक्षा आणि तिच्यात मिळालेले गूण हाच एकमेव आधार असतो, हे सत्य नाकारून चालणार नाही. यामुळे गूण दहावीचे असले तरी ते विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे ठरतात. गूण ही महत्वाची गोष्ट झाल्याने सीबीएसई, आयसीएसई या परीक्षा मंडळांशी स्पर्धा करताना गुणांची मुक्तहस्ते उधळण करण्याचे धोरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतले आहे. यामुळेच मागील वर्षी अंतर्गत गुणांशिवाय परीक्षा घेतल्याने राज्यातील सर्वच विभागांचे निकाल खालावले होते. त्यामुळे इतर परीक्षा मंडळांच्या तुलनेत राज्य परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पालक व शाळांमधून ओरड झाली. यामुळे शिक्षण विभागाने पुन्हा एकदा अंतर्गत गूण देण्यास सुरुवात केली. त्यामुळे यंदाचे निकाल अगदी गगनाला भिडले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या चांगल्या गुणांमुळे आधीच कोरोना महामारी आणि त्यातून आलेले लॉकडाउन यामुळे तणावात असलेल्या पालक व विद्यार्थ्यांसाठी हे गूण निश्चितच दिलासादायक आहे.
लॉकडाउनमुळे गेले चार महिन्यांपासून पालक आणि मुले घरात कोंडून असून शहरी भागात ऑनलाईन वर्गांची धूम सुरू आहे, तर ग्रामीण भागात शिक्षणाच्या नावाने सगळा आनंदी आनंद आहे. यामुळे आपल्या मुलांच्या भवितव्याचे काय हा एक प्रश्न सर्वांच्या चेहर्‍यावर असतो. अशात दहावीचे निकाल हे सर्वांना दिलासा देणारे आहेत. मार्च महिन्यात कोरोना महामारीचा उद्रेक झाला असतानाच राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू होत्या. केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केले, तेव्हा राज्य शालांत परीक्षा मंडळाचा भूगोलाचा पेपर शिल्लक होता. मात्र, लॉकडाउनला एका पाठोपाठ मुदतवाढ मिळत गेल्याने सरकारने अखेर भूगोलाची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरासरी गूण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता निकाल जाहीर झाला असून यंदा पंधरा वर्षांमधील सर्वाधिक निकाल लागला आहे. नेहमीप्रमाणे यात मुलींनी बाजी मारली यात कुठलेही नवल उरलेले नाही. विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षाही फारशी नव्हतीच, कारण अकरावीच्या वर्गात जाण्याचे आकर्षण यंदा नाही. कारण कोठेही प्रवेश घेतला तरी शिक्षण व अभ्यास घरातूनच करायचा आहे. लॉकडाउन आणि कोरोना महामारीमुळे ना निकालाचा जल्लोश साजरा करायचा आहे, ना मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जाऊन आनंद व्यक्त करायचा आहे. यामुळे कोरोनामुळे बदललेल्या जगात दहावीच्या निकालाचा संदर्भही बदलून टाकला आहे.
आता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. एक तर सर्व महाविद्यालये सध्या बंद असून काहींनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आता अकरावीचे प्रवेश झाल्यानंतर तेथेही ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू होतील. अकरावीला विज्ञान शाखा घेणार्‍या विद्यार्थ्यांचे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने कधीच सुरू झाले असून त्यांच्यासाठी अकरावी वर्ग प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. दहावीच्या निकालाचे अप्रुत आता पूर्वीसारखे उरले नसून केवळ अकरावी प्रवेश आणि तंत्रनिकेतनचे प्रवेश एवढ्यापुरतेच त्याचे महत्व आहे. यामुळे दहावीच्या या प्रचंड यशानंतर अकरावीच्या प्रवेशाची मोठी समस्या उद्भवणार असल्याचे दिसत आहे. अकरावीचे वर्ग प्रत्यक्ष भरणार नसले तरी अकरावी प्रवेशाची नोंदणी करून कोरोना महामारी असेपर्यंत विद्यार्थ्यांना घरूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे दहावीच्या निकालानंतर प्रवेशासाठी उडणारी झुंबड यंदा दिसणार नाही. महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल, अशी नियमावली करावी लागणार आहे. दरवर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया दहावी निकालाच्या महिनाभर आधी सुरू असते. यंदा लॉकडाउनमुळे असणार्‍या अनेक निर्बंधामुळे अकरावीच्या निकालाची प्रक्रिया यापुढे सुरू होणार आहे. त्यामुळे आणखी दीड-दोन महिन्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपून खर्‍या अर्थाने शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याचे दिसत आहे. इतर वर्गांप्रमाणेच अकरावीचे शिक्षणही घरातच बसून होणार असल्यामुळे आपल्या पाल्यांना या शिक्षणातून किती आकलन होते, परीक्षा कशा घेणार, बारावीच्या परीक्षांचे काय, असे अनेक प्रश्न पालकांसमोर आहे. यामुळे दहावीचे निकाल लागल्याचे पालकांच्या चेहर्‍यावर समाधान असले तरी डोक्यावर भविष्याच्या काळजीचे ढग अधिक गडद आहे.
कोरोनामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडलेली असल्याने जवळपास प्रत्येक पालकाच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम झालेला असल्याने अकरावीचे प्रवेश, ऑनलाईन शिक्षणाचा खर्च आणि खासगी क्लासेसची भरमसाठ फी यामुळे पालक मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे दहावीच्या गुणांचा आनंद हा अकरावी प्रवेशाच्या कसरतीमध्ये पूर्णपणे विरून जात असतो. आणि पुढच्या करिअरचे वेध पालकांना लागलेले असतात. यावर्षी अगदी उशिरा जाहीर झालेल्या या निकालांमुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता प्रचंड ताणलेली असताना आता प्रवेश घेऊन करायचे काय, असा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. कोरोना महामारीचे संकट किती दिवस राहणार याबाबत वेगवेगळ्या तज्ज्ञ व संस्थांचे म्हणणे वेगवेगळे आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून शिक्षणाचे काय होणार याची मोठी चिंता आहे. आता प्रत्येक घरात सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण तात्पुरती व्यवस्था म्हणून सर्वजण त्याला सहजतेने घेत आहेत. शहरी भागात ऑनलाईन सुविधा असली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संपर्क क्षेत्राच्या अभावामुळे अद्याप शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे पुढील वर्षी परीक्षा होतील का? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणच दिले जात नसेल तर त्यांची आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धा कशी होणार, असे अनेक प्रश्न येत्या काळात उद्भवणार आहे. यामुळे हा निकाल जाहीर करून आपली जबाबदारी संपली असा समज करून शिक्षण विभागाला निर्धास्त होता येणार नाही.
शिक्षण विभागाची खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना त्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षण कसे देणार व सर्वांना शिकण्याची संधी कशी उपलब्ध करून देणार, याचेही उत्तर द्यावे लागणार आहे. याबरोबरच सर्वच शालेय शिक्षण अगदी तळागाळाच्या विद्यार्थ्यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी केवळ दूरदर्शनवरून शिक्षण अशा घोषणा करून थांबता येणार नाही, तर दिले जाणारे शिक्षण विद्यार्थी ग्रहण करतात का आणि त्यांनी किती ग्रहण केले, याची तपासणी कशी करणार, या प्रश्नाचेही उत्तर त्यांना शोधावे लागणार आहे. तसेच सहामाही, वार्षिक आणि परीक्षा मंडळाच्या परीक्षा कशा घेणार याचेही नियोजन आताच जाहीर करण्याची गरज आहे. यंदा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रवेश परीक्षा अजून खोळंबल्या असून जवळपास दोन-अडीच वर्षांपासून त्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची प्रचंड हेळसांड झाली आहे. याबाबत अद्याप कुठलाही ठोस मार्ग निघालेला नसताना पुढील वर्षी काय व्यवस्था करणार याबाबतही कोठेही स्पष्टता नाही, यामुळे दहावीचे निकाल लागल्याने विद्यार्थी व पालक तणावमुक्त झाले असले तरी खरी परीक्षा आता शिक्षण विभागाची सुरू झाली आहे. या परीक्षेला ते कसे सामोरे जातात, यावर लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार आहे, यामुळे त्यांना सर्वांना सोईचा होईल, असा तोडगा काढण्यात यश मिळो, हीच सदिच्छा !
Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -