घरफिचर्सजैवविविधता : पौष्टिक अन्न, निरोगी समाजाची पूर्वअट

जैवविविधता : पौष्टिक अन्न, निरोगी समाजाची पूर्वअट

Subscribe

आपल्या परिसरातील जीवांची (वनस्पती, प्राणी) विविधता, आपल्या आहारातील पोषणमूल्ये आणि आपले आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध असतो. ज्या शिवारात कारं, बोरं, करवंद, कवठ, अळीव, आंबे, अमोन्या कामोन्या, धामणं तोरणं असा रानमेवा आहे. लहान मुलं, तरुण, महिला यांच्या खाण्यात तो आहे. तेथील लोकांचे आरोग्य तुलनेत सुदृढ असते. या वर्षीच्या २२ मे च्या जैवविविधता दिनी हा वेगळा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा.

शिवारातील टेंभरं, अळीव, चारोळी, कारं, बोरं या रानमेव्याची आणि कैक रानभाज्या संपवायच्या, मग लोहाच्या व फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, कॅल्शिअम पावडर, शासकीय योजनेतून गावागावात पोहचवायचं. वयात येणार्‍या मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी म्हणून आज बहुतेक सर्व राज्यातील शाळांमध्ये आयर्न, फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या दिल्या जातात. काही राज्यात कॅल्शिअमची पावडरही दिलं जाते. या गोळ्या आणि पावडरी मोफत वाटल्या जातात. वरकरणी या मोफत कार्यक्रमांची आर्थिक उलाढाल कोट्यवधी रुपयांची असते. या तात्कालिक व तात्पुरत्या उपाययोजना म्हणून ठीक आहेत. कुपोषण संपवून आपल्या समाजाचे आरोग्य सुदृढ बनवायचं असेल तर शेती आणि शेत शिवारातील जैवविविधता समृद्ध करण्याच्या दिशेने मूलभूत कार्यक्रम आखणे गरजेचे आहे.

अजूनही जैवविविधता संवर्धंनाचे काम म्हणजे सेवाभावी समाजकार्य असेच मत प्रचलित आहे. जैवविविधता संवर्धनात काम करणार्‍या व्यक्ती, संस्था यांना फारसा जनाधार दिसत नाही. या संस्थादेखील लोकांसोबत म्हणावे तसे व तितके काम करीत नाहीत. जैवविविधतेचे काम, पर्यावरणाचे काम म्हणजे झाडं, झुडपं, पशू , पक्षी, किडी यांच्या सोबतचेच कामं असं एकरेषीय समीकरण रूढ आहे. पर्यावरणच नव्हे तर अलीकडे बहुतेक सर्व क्षेत्रात प्रश्नाकडे सुटे सुटे पाहण्याची सवय लागली आहे. सवय लावली गेली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्याच्या व्यवस्थेला, व्यवस्था ज्यांचे हितसंबंध जोपासते आहे, त्या जात-वर्गाला चिकित्सक विचारप्रवाह व चिकित्सक विचार करणारे लोक नको आहेत. पुणे महापालिकेच्या एका वार्डामधील, नगरसेवक कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी घंटागाडी पाठवतो. त्यावर सतत एक घोषणा सुरू असते, प्रश्न अनेक उत्तर एक …..! गाळलेल्या जागी त्या नगरसेवकाचे नाव असते. बहुतेक शासकीय योजना, अनेकांच्या विचारांची दिशा अशी एकच एक जालीम उपाय शोधण्यावर भर असतो. या विचारला साहजिकच विविधता नकोशी असते. मग ती जैवविविधता असेल की लोकांच्या आचार-विचारातील विविधता. त्यांना सर्वांना सारखं करून सोडायचं असतं.

- Advertisement -

सर्वांची घरे सारखी, सर्वांचा पेहराव सारखा, सर्वजण खातात ते अन्न सारखे. खुल्या बाजारव्यवस्थेचा हा खूप मोठा दुष्परिणाम आहे. जीवन जाळे हे विविधतेतून बनलेले असते. जीवांची विविधता आणि त्यांचे परस्पर अवलंबन यातून जीवनाचे जाळे तयार होते. या जीवनजाळ्याला अन्नसाखळी म्हणता येऊ शकते. या अन्नसाखळीतील किंवा जीवन जाळ्यातील प्रत्येकाचे इतरांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो. हे संबंध निव्वळ तांत्रिक नसते तर ते जैविक असते. साखळीतील एका जिवाच्या असण्याने, नसण्याने इतर जीवांवर परिणाम होत असतात. थेट एकमेकांवर अवलंबून असणा-या जीवांची एक परिसंस्था असते. सृष्टीमधील प्रत्येक घटक एकमेकांना काहीतरी देत असते आणि दुस-या घटकाकडून काहीतरी घेत असते. हे देणे घेणे हा सृष्टीचा स्वभावच आहे. एकमेकांपासून भिन्न आहेत म्हणून देणे घेणे शक्य आहे. मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थेतील अनेक जीव नाहीसे होत आहेत तर कैक जीव धोक्यात आले आहेत. परिसंस्थेतील एक जीव नाहीसा होण्याने संपूर्ण परीसंस्थाच धोक्यात येते. आपल्याकडे ‘वाघ’ कमी होत आहेत याबद्दल चिंता व्यक्त केली जाते. वाघ तर माणसाला काही सहाय्यभूत नाही. माणसाच्या दैनंदिन गरजा वाघाच्या असण्यावर, नसण्यावर अवलंबून नाहीत. मग ही चिंता कशासाठी? वाघ ज्या जंगल परीसंस्थेचा सर्वोच्च घटक आहे त्या परिसंस्थेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. वाघ नाहीसे झाल्याने जंगल, जंगलातील इतर प्राणी यांची घडी विस्कटेल. वाघाची भक्ष्य असलेली प्राणीसंख्या वाढेल. जंगले विरळ होऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जंगलावर अवलंबून असणारे मानवासह सर्व जीव धोक्यात येतील.

विविधता हे पृथ्वीतलावरील जीव निर्मिती व उत्क्रांतीचा पाया आहे. आपल्या आजूबाजूला फिरणा-या छोट्या-छोट्या कीटकांच्या कैक प्रजाती पृथ्वीवर आहेत. या कीटकांचा वेगवेगळ्या अन्नसाखळीत मोलाची भूमिका आहे. काही आपल्या पिकांमधील परागीभवनाची प्रक्रिया करून पीक जोमाने येण्यास मदत करतात, काही पिकांवरील शत्रूकीडीला खाऊन पिकांचे रक्षण करतात. कीटकांप्रमाणेच वेगवेगळ्या प्राण्यांची, वनस्पतींची या सृष्टीच्या नियमनात महत्वाची भूमिका आहे.
भारतामध्ये जंगले, गवताळ क्षेत्र, पाणथळी जागा, वाळवंटी प्रदेश, समुद्र किनारा अशी वेगवेगळी भौगोलिक जैवविविधता क्षेत्रे आहेत. त्यामुळे भारतावर एकाच वेळी सर्व ठिकाणी कधीही नैसर्गिक संकट ओढवत नाही. या प्रत्येक भौगोलिक जैवविविधता क्षेत्रात नानाविध प्राणी आणि वनस्पती यांचे वैविध्य आढळते. आपल्याला अनेक वनस्पतीचे महत्व माहीत नसते. त्यामध्ये कोणती औषधी संयुगे आहेत याचे संशोधन झालेले नसते. त्यामुळे ती वनस्पती आपल्याला बिनकामाची वाटते. एक उदाहरण पाहूया. महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात एक वनस्पती आढळते. जिला खूप उग्र असा वास येतो. यामुळे लोक त्याला नरक्या म्हणतात. संशोधनातून कर्करोगासारख्या आजारातून बरा करण्यासाठीचे औषधी संयुग तयार करण्यात ही वनस्पती उपयोगी आहे असे सिद्ध झाले. तेव्हापासून या वनस्पतीला अमृता असे म्हटले जाते. अशाप्रकारे कैक अमृता भारतातील जैवविविधतेत दडलेल्या आहेत. औषधी वनस्पतींच्या आठ हजार प्रजाती येथे उपलब्ध असून त्यापासून पन्नास हजार औषधी संयुगे तयार केली जातात. लाखो लोक अन्नासाठी व रोजगारासाठी यावर अवलंबून आहेत.गावठाण किंवा शहरात, तुमच्या भाजीपाला बाजारात एक फेरफटका मारा. यादी करा की किती प्रकारची भाजीपाला, फळभाजी तिथे विकायला येतात. भलेही तुम्ही त्या खात नसाल, पण यादी तरी करा. अशीच यादी तुम्ही दुसर्‍या शहरात, गावात राहणार्‍या तुमच्या मित्राला करायला सांगा. तुम्ही जर गावात राहत असाल तर, तुमच्या गाव शिवारात एक फेरफटका मारून पहा, किती प्रकारची पिके, झाडे, झुडपे, वनस्पती, पक्षी कीटक आढळतात, याची यादी बनवा. ही यादी जितकी मोठी व बहुविध तेतके तुमचे अन्न, आरोग्य व जीवन समृद्ध.

- Advertisement -

आपल्या परिसरातील जीवांची (वनस्पती, प्राणी) विविधता, आपल्या आहारातील पोषणमूल्य आणि आपले आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध असतो. ज्या शिवारात कारं, बोरं, करवंद, कवठ, अळीव, आंबे, अमोन्या कामोन्या, धामणं तोरणं अशी रानमेवा आहेत. लहान मुलं, तरुण, महिला यांच्या खाण्यात ती आहेत. तेथील लोकांचे आरोग्य तुलनेत सुदृढ असते. अनेकदा आपल्या शिवारातील या समृद्ध ठेव्यांची मोजदादच केली जात नाही. आपलं घर कसं आहे, घरात टीव्ही, दुचाकी, ट्रॅक्टर आहेत का? घरातील किती लोकांकडे स्मार्ट फोन्स आहेत? या सगळ्या गोष्टीवरून श्रीमंती मोजली जाते. मात्र ही निवळ भौतिक संसाधांची मोजमाप आहेत. व्यक्ती किती निरोगी आहेत, किती स्वस्थ आहेत, याची मोजदाद फारशी केली जात नाही. दोन अंकी, तीन अंकी मासिक पगाराची नोकरी आहे, तो आपल्या समाजात आदर्श. निरोगी, निर्व्यसनी, आनंदी जीवन जगणार्‍याकडे मात्र तुच्छेतेने पाहिलं जातं. ते सर्व ठीक आहे हो, पण कमावता किती? असा खोचक प्रश्न विचारून निसर्गाच्या अधिक जवळ जाणार्‍या जीवनशैली अंगिकारलेल्या व्यक्तींचे खाच्चीकरण केलं जातं. अलीकडे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न मोजण्याबरोबरच ‘व्यक्तींचे आनंद’ यांच्या मोजमापाची संकल्पना समोर येत आहे. हा विचार रूढ व्हायला अजून काही वर्षेतरी जातील. त्यासाठी अनेकांचे प्रयत्न लागतील.

युनो सभासद देशाच्या १९९२ मध्ये, ब्राझीलमधील रिओ येथे झालेल्या अधिवेशनात ‘जैवविविधता संवर्धनासाठीच्या’ मुद्यावर करार करण्यात आला. भारत या करारातील सहभागी देश आहे. या कराराला ‘कनव्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी’ असे म्हणतात. युनोने २०११ ते २०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले होते. दरवर्षी जैवविविधता विषयाबाबतची समज वाढविण्यासाठी आणि जैवविविधतेच्या वेगवेगळ्या पैलूविषयी जनजागृती करण्यासाठी २२ मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिवस म्हणून जाहीर केला जातो. यावर्षी ‘आपली जैविविधता, आपलं अन्न आणि आपलं आरोग्य’ असा विषय जैवविविधता दिनासाठी ठरवला गेला आहे. जागतिक, स्थानिक पातळीवर माणसाच्या अर्थपूर्ण जीवनासाठी जैवविविधता महत्वपूर्ण मानली जाते. जैवविविधता ही अशी गोष्ट आहे जिच्यावर देशाचे कृषी क्षेत्र, औषधनिर्मिती उद्योग तसेच औद्योगिक क्षेत्राचेही भवितव्य अवलंबून आहे. म्हणून या वर्षीचे जैवविविधता दिनाचे विषय समर्पक ठरते.

भारतातील जैवविविधतेचा आढावा घेतल्यास एकूण जगातील वनस्पतींच्या वैविधतेत ११ टक्के वैविध्य भारतात आढळते. वनस्पतींच्या ४५,५०० पेक्षा अधिक प्रजाती भारतात आहेत. त्यापैकी ११,०५८ या प्रदेशनिष्ठ आहेत. प्रदेशनिष्ठ म्हणजे त्या जगात अन्यत्र कुठेही आढळत नाहीत. शेती व अन्य उपयोगाकरिता लागवड केल्या जाणा-या १६६ पेक्षा अधिक वनस्पती प्रजातींचे भारत हे उगमस्थान आहे. तर शेती व अन्य उपयोगाच्या ३२० मूळ जंगली प्रजाती येथे आढळतात. भारत जगातील पिकवैविध्य असलेल्या आठ केंद्रापैकी एक असून वनस्पतींचे माहेरघर म्हणूनदेखील ओळखले जाते. सध्या दर वीस मिनिटाला एक प्रजाती नाहीशी होत आहे. मानवजातीच्या आगमनापूर्वी जगातून प्रजाती नष्ट होण्याचे प्रमाण वर्षाला जास्तीत जास्त एक प्रजाती इतके कमी होते. आज माहीत असलेल्या प्रजातींपैकी ५१ टक्के सरपटणारे प्राणी, ५२ टक्के कीटक आणि ७३ टक्के सहपुष्प वनस्पतीसह अनेक सस्तन प्राणी, पक्षी व उभयचर प्रजाती धोक्यात आहेत. काही प्रजाती तर आपल्याला माहिती होण्याच्या आधीच नामशेष होण्याची भीती आहे. नाहीसे झालेल्या वनस्पतीचे औषधी गुणधर्म किंवा अन्य उपयोग आपल्याला कधीच कळणार नाहीत.

कीटकनाशकांचा अतिरेकी वापर आणि अधिवासाचा नाश यामुळे परागीभवन करणा-या मधमाशांसारख्या जीवांचा वेगाने -हास होऊन जगभरातील पीक उत्पादने घटली आहेत. ‘डायक्लोफीनॅक’ या जनावरांच्या औषधातून होणा-या विषबाधेने गिधाडांची संख्या ९२ टक्क्यांनी घटली आहे. शेतातील एकसुरी पीक पद्धत आणि संकरीत वाणांचा वाढता वापर यातून जनुकीय -हास झपाट्याने होत आहे. या सगळ्या गोष्टी मानवासाठी मोठ्या धोक्याची निदर्शके आहेत ही बाब ध्यानात घेतली पाहिजे. एकसुरी पीक पद्धती ऐवजी बहुविध पिके घेण्याला प्रोत्साहन द्यावे. तशी धोरणे व संधी उपलब्ध करून द्यावीत. कृतीम रसायनांच्या कीडनाशकांऐवजी सेंद्रीय कीडनाशके वापरावी. शेंद्रीय कीटनाशके व खते वापरलेल्या धान्य व भाजीपाला यांची प्रतवारी करून त्यांना बाजारउपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. तननाशके पूर्ण पणे बंद केलं गेलं पाहिजे. याला अनेक शेतकर्‍यांचाच विरोध होईल. कारण या तननाशकामुळे खुरपणी, निंदनी यावरील मोठा श्रम आणि खर्च याची बचत होत आहे. मात्र या घातक तननाशकामुळे शेतीतील जैवविविधता कमालीची नाहीशी होत आहे. सरकारी झापडबंद वनीकरण कार्यक्रमांत लोकांचे गरजा, विचार यांना प्राधान्य देऊन स्थानिक जैवविविधता जपण्याचा प्रयत्न करायला हवं. अशा कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांना जैवविविधता साक्षर बनवणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचे गरज आणि महत्व वेळीच ओळखलो नाही तर आपण आपलं अन्न आणि आरोग्य दोन्ही गमवून बसू. या वर्षीच्या २२ मे च्या जैवविविधता दिनी हा वेगळा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा.

 लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -