लेकुरवाळा विठ्ठल, पाताळयंत्री नेते

‘आलू चिप्स’च्या नावानं मिळणार्‍या वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाकिटात नावापुरते आलूचे छिलके, चटपटीत मसाले आणि 95 टक्के हवाच भरलेली असते. पाकीट फोडलं, की आपण हवा खरेदी केली की चिप्स, हेच कळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषाचा वारसा सांगत सांगत जे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, त्याची अवस्थादेखील हवा भरलेल्या पाकिटासारखीच झाली आहे. त्यात सामाजिक भान कमी आणि नुसतीच हवा, असा प्रकार सर्वत्र दिसतो. परवा वंचित बहुजन आघाडीच्या नावानं अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मंदिरं खुली करा, म्हणून केलेलं आंदोलन तर आणखीच भयंकर आहे. त्यात आलू, मसाले तर सोडाच पण आत भरलेली हवा, हीच मुळात महाविषारी आहे..! समाजाला गॅस चेंबरकडे ढकलणारी आहे. महामारीचं खुलेआम प्रमोशन करणारी आहे. अप्रत्यक्षपणे अराजकाला आमंत्रण देणारी आहे.

बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्ताचे नातू आहेत. त्या पार्श्वमीवर तर त्यांचा हा पवित्रा आणखीच भयंकर वाटतो. अर्थात महापुरुषांच्या वारसदारांकडे बघताना आपण वेगळ्या नजरेने बघतो. एकप्रकारचा आदर त्यांच्याप्रती समाजाच्या मनात कळत नकळत असतो. त्यांच्याकडून तसल्याच काही भव्यदिव्य कर्तृत्वाची अपेक्षा करतो. पण बहुधा तसं होताना दिसत नाही. हा प्रकार बहुतेक महापुरुषांच्या वारसदारांच्या बाबतीत घडताना दिसतो. पण तरीही आपल्याला फारसं काही बोलता येत नाही. आपल्याला मूर्तिपूजा आणि व्यक्तिपूजा हा आजार कायम चिकटला आहे.

अर्थात बाबासाहेबांची उंची बाळासाहेबांनीही दाखवावी, अशी अपेक्षा कुणीही करणार नाही. बाबासाहेब युगपुरुष होते. पण किमान समाजाची दिशाभूल तरी त्यांच्या वारसाकडून केली जाणार नाही, अशी अपेक्षा करण्याचा अधिकार तर नक्कीच आहे. पण ‘मंदिरं, मशिदी उघडा’ या त्यांच्या आंदोलनात नेमका कोणत्या कंपनीचा गॅस भरलेला आहे, याबद्दल लोकांच्या मनात संशय आहे. त्यांच्या राजकीय भूमिकांच्या बाबतीत सुरुवातीपासूनच संभ्रम राहात आलेला आहे. अलीकडे तो जास्त घट्ट झाला एवढंच !

बाबासाहेबांच्या नावाचं पेटंट घेवून देशात राजकारण करणारी जी काही नावं आहेत, त्यात रामविलास पासवान, मायावती, रामदास आठवले, गवई आणि बाळासाहेब आंबेडकर ही प्रमुख नावं आहेत. त्यातलं गवई पर्व संपल्यात जमा आहे. मायावती फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा वारसा ओरडून ओरडून सांगत असल्या, तरी त्यांच्या एकूणच राजकारणाची पद्धत अफलातून आहे. सावजी मटणाचा लाल भडक रस्सादेखील त्या बासुंदी म्हणून विकण्यात पटाईत आहेत. वरून बासुंदीमध्ये वापरण्यात आलेलं दूध शंभर टक्के शुद्ध आणि आमच्या गार्डनमधल्या हत्तींचंच आहे, हे देखील त्या पटवून देऊ शकतात. ‘तिलक, तराजू और तलवार.. इनको मारो जुते चार’ पासून ‘हाथी नही गणेश है’ ते थेट ’भगवान परशुराम’ भक्तीपर्यंत त्यांचा देदीप्यमान प्रवास तर सामाजिक बांधिलकीचा अफलातून नमुना आहे. तरीही त्या अजूनही ‘गरिब की बेटी’ आहेत ! फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांच्या वारसदार आहेत..! कारण हत्तीच्या हजार प्रतिमा बरोबरच त्यांनी थोडा फार खर्च फुले, शाहू आंबेडकर यांच्या नावासाठीही केला आहे. मागासवर्गीय राजकारणाचं हे वैशिष्ठ्य दुर्दैवानं खरं आहे !

एकेकाळी रामविलास पासवान हे मागासवर्गीयांचे झुंजार नेते होते. तुफानी वक्ते होते ! ( प्रमोद महाजन आणि रामविलास पासवान हे माझे आवडते वक्ते. या दोन्ही नेत्यांसोबत स्टेज शेअर करण्याचा आणि भाषणं ठोकण्याचा प्रसंग अनेकदा आला. प्रमोद महाजन तर माझ्या ‘रावण’ या कवितेवर झकास कॉमेंट करायचे. असो..) जनता दलाचे नेते आणि मंत्री असताना रामविलास पासवान यांचा स्टेजवरील आवेश पाहण्यासारखा असायचा. राम मंदिराचे हे कट्टर विरोधक. तेव्हा ते रामाचेही कट्टर विरोधक होते. त्यांचा एक डायलॉग पेटंट होता. ‘ना भाजपा मे राम है, ना अयोध्या मे राम है..! असली राम तो इधर हैं.. राम विलास पासवान’ ! आणि टाळ्यांचा कडकडाट व्हायचा ! पण एकेकाळचा हा लाल दिव्यातला स्वयम् घोषित राम, हल्ली माकडांच्या टोळीतील एक मेंबर झाला आहे ! अख्खा परिवार त्यांनी टोळीच्या खुंट्याला बांधून ठेवला आहे. ‘राम राम कहनेसे रोटी मिलती है क्या..?’ असा बुलंद सवाल जाहीर सभेतून करणारे पासवान, आज नेमके कुणाचं खरकटं गोळा करण्यात धन्यता मानत आहेत? सारा देश कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना राम मंदिराचा शिलान्यास करण्याचा आत्मघाती कार्यक्रम अयोध्येत होत होता, तेव्हा हे नेमके काय करत होते ?

लोकांना मूर्ख बनवण्यासाठी देव आणि धर्म हे सर्वात स्वस्त आणि मस्त मटेरियल आहे. त्याचा उपयोग हजारो वर्षांपासून धूर्त लोकांनी करून घेतला. आज तर तो आणखीच वाढला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीला जोर आला. बाबासाहेबांचं नाव तर चलनी नाणं होतं. त्यांच्या प्रेरणेतून जो मागासवर्गीय संघर्ष उभा राहिला त्यातूनच हाती लागलेलं एक मागासवर्गीय प्रॉडक्ट म्हणजे रामदास आठवले. दलित चळवळीचा तेव्हाचा लक्षवेधी पँथर ! शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्यानं पँथरच्या पोटातील भुसा आधीच ओळखला असावा का ? अन्यथा.. सिंह म्हणून सर्कशीत समावेश झाल्यानंतर विदूषकाचे करीयर करण्यात एखाद्या माणसाला एवढा इंटरेस्ट कसा काय असू शकतो? भीमसेन जोशींचा कार्यक्रम म्हणून लोकांनी गर्दी करायची आणि तिथं गेल्यावर मात्र एखाद्याचं रेकणं कानी पडावं, ह्याला काय म्हणायचं ?

बाळासाहेब आंबेडकर यांचं राजकारण मात्र त्या तुलनेत वेगळं होतं, हे मान्य करायलाच हवं. केवळ जातीय कडबोळ्यात अडकून न पडता त्यांनी आरपीआयच्या राजकारणाला व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक बहुजन, ओबीसी, आदिवासी लोकांना आमदार, मंत्री बनवलं. महाराष्ट्रातील रिपब्लिकन नेत्यांमध्ये बाळासाहेब आंबेडकर हे नक्कीच स्वयंभू नेते आहेत, हे वास्तव स्वीकारलंच पाहिजे. आठवले केंद्रीय मंत्री असले, तरी त्यांना फारसं कुणी गांभीर्यानं घेत नाही. कस्तुरीच्या नावानं सुरू झालेल्या त्यांच्या दुकानातून ते हल्ली काहीही विकायला तयार आहेत. अफू असो, गांजा असो की चारशे वीस वाला गुटखा असो, त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांना फक्त त्यांच्या धंद्याशी मतलब ! आणि तरीही त्यांचा पक्ष आणि ते स्वतः म्हणे आंबेडकरवादी आहेत !.. त्यांचा पक्ष हाच म्हणे खरा बाबासाहेबांचा पक्ष आहे !

बाळासाहेब आंबेडकर आणि माझी पहिली भेट एका मोठ्या जाहीर सभेत झाली. लोकसभा निवडणुकीचा टप्पा संपत होता. यवतमाळला तिसर्‍या आघाडीच्या प्रचाराची शेवटची जाहीर सभा होती. (त्याच दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली..) अर्थातच बाळासाहेब आंबेडकर हेच सभेचे मुख्य नेते आणि आकर्षण होते. मी मंडल आयोगाच्या समर्थनासाठी शिवसेना सोडून व्ही. पी. सिंग यांच्या सभेतून जनता दल जॉईन केले होते. त्यामुळे माझीही तशी डिमांड होतीच ! ( त्या निवडणुकीत दोन टप्प्यात मिळून माझ्या स्वतःच्या स्वतंत्रपणे 100 पेक्षा जास्त सभा झाल्या होत्या..) आमची ही शेवटची सभा यवतमाळच्या ग्राउंडवर होती. मोठी गर्दी होती. बाळासाहेबांच्या नंतर मी दुसर्‍या नंबरचा वक्ता होतो. तिथं पहिल्यांदा बाळासाहेबांना ऐकण्याचा योग आला. पण माझा पुरता भ्रमनिरास झाला. त्यांना नेमकं काय बोलायचं होतं, याचा शोध मला अखेपर्यंत लागला नाही. कशाचा कशाशी संबंध नाही. आणि तरीही त्यांच्या नावावर सभेला एवढी गर्दी ? या एका प्रसंगात भारतीय राजकारणाचा एकूणच असली पोत लक्षात यायला हरकत नसावी. बाळासाहेबांच्या मांडणीत त्या तुलनेत आज नाही म्हणायला तशी बर्‍यापैकी सुधारणा झाली असली, तरी वैचारिक गोंधळ कायम आहे. उदा. अलीकडेच त्यांच्या ’वंचित बहुजन आघाडी’ या नव्या राजकीय रेसिपीमधील ‘संघाला घटनेच्या चौकटीत आणा’ म्हणजे नेमकं काय ? याचा आजवर कुणालाही खुलासा करता आलेला नाही.

त्यावरच त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी युतीचं घोंगडं दीर्घकाळ भिजत ठेवलं. घटनेच्या कक्षेत कसं आणायचं हे मात्र सांगितलं नाही. पण वैतागून काँग्रेसनं जेव्हा त्यांना.. ‘ते नेमकं कसं करायचं, याचा ड्राफ्ट बनवून द्या..!’ अशी सरळ मागणी केली.. तेव्हा यांनी चक्क हात वर केले. आणि ड्राफ्ट काँग्रेसनं बनवून आमच्याकडे पाठवावा, अशी मागणी केली. हा प्रकार मला फार अफलातून वाटला. खरं तर काँग्रेसनं हीच मागणी त्यांच्याकडे अगदी सुरुवातीलाच करायला हवी होती. पण बहुधा ते गौडबंगाल काँग्रेसच्यादेखील लक्षात आलं नसावं. अन्यथा सुरुवातीलाच तो फुगा फुटला असता. सारं चित्र स्पष्ट झालं असतं. जसा अण्णा हजारे यांचा लोकपाल, तसाच यांचा संघाला घटनेच्या कक्षेत घेण्याचा गोंधळ..! म्हणजे एखाद्या सासूनं भेदरलेल्या सुनेला दरडावून सांगायचं.. की ‘आजची भाजी भन्नाट झाली पाहिजे. नाहीतरी मी जेवणाला हात लावणार नाही !’ आणि गाल फुगवून बसायचं ! आता हे भन्नाट म्हणजे नेमकं काय ? म्हणजे तिखट, मसालेदार की फिकी ? झणझणीत रस्सेदार की सुकी ? भरली वांगी, की आणखी काही ? अशा सासूच्या मनात नेमकं काय आहे, हे जगातल्या कोणत्याही सुनेला कसं कळणार ? बरं, सुनेनं भित भित विचारलं, की भन्नाट म्हणजे नेमकी कशी..? तुम्ही सांगाल तशी बनवते..! यावर सासूचं उत्तर काय.. तर ‘ते तुझं तू ठरव..’ ! अशावेळी बिचार्‍या सूनेनं काय करावं ? की कच्ची वांगीच सासूच्या घश्यात कोंबावी ? साराच अफलातून प्रकार ! ग्रामीण भागात यासाठी एक झकास म्हण आहे, ‘मनात नाही नांदणं अन् नवर्‍यावर बंदी आणणं..’ !

वास्तविक कोरोनामुळं सारा देश संकटात आहे. मंदिर, मशीद, चर्च, गुरूद्वारा, बुद्ध विहार सारं सारं बंद आहे ! सारी दुनिया ठप्प झाल्यासारखी आहे..! लोकांचे रोजगार गेलेले आहेत. लोक आत्महत्या करत आहेत. कारखाने बंद पडले आहेत. एवढं मोठं संकट समोर आ वासून उभं असताना ज्या लोकांना मंदिर, मशीद उघडण्याची दुर्बुद्धी सुचते, त्यांच्या मधली संवेदना, त्यांचा विवेक कुठेतरी गहाण पडून असावा, असा संशय घ्यायला जागा आहे. पंढरीचा विठ्ठल हा लेकुरवाळा देव आहे. अठरा पगड लोकांचा देव आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही पसरलेल्या भोळ्या भाबड्या वारकर्‍यांचा देव आहे. त्याच खर्‍या वारकर्‍यांनी या वर्षी अत्यंत समंजसपणानं शेकडो वर्षांची परंपरा असलेली वारी या वर्षी रद्द करण्याचा शहाणपणा दाखवलेला आहे !

मात्र बुद्धिजीवी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारी झालीच पाहिजे यासाठी सारखे उड्या मारत होते. जणूकाही यांच्यासारखा विठ्ठलभक्त दुसरा कुणीही नसेल. हा प्रकारच एकंदर किळसवाणा होता. भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी पक्ष या महामारीच्या काळातही एवढ्या खालच्या पातळीवर उतरलेत, की ही माणसं आहेत की सैतान असा प्रश्न कुणालाही पाडवा. उलट हेच फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘वारीत कुणीतरी साप सोडणार’ असं निमित्त सांगून विठ्ठलाच्या पूजेलाच यांनी दांडी मारली होती. एवढा डरपोक आणि दांभिक माणूस आता मात्र वारी झालीच पाहिजे म्हणून थयथयाट करत होता! ही विकृत राजकारणाची परिसीमा आहे! हा सामाजिक निर्लज्जपणा आहे!

तसाही वारकरी संप्रदाय म्हणजे वर्णवादी व्यवस्थेच्या विरोधात उभा झालेला सामाजिक संघर्ष होता. संतांनी उभारलेला समतेचा लढा होता. भक्तीचा मळा होता. त्यामुळेच त्यातील संतांचा छळ झाला, खून झालेत, त्याचं साहित्य नष्ट करण्याचा नीचपणा करण्यात आला. पण सर्वसामान्य लोकांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे हा प्रवाह असल्या विकृतीला पुरून उरला. आजही गावागावात संत ज्ञानेश्वरांचं पसायदान, नामदेव तुकाराम यांचे अभंग, एकनाथाचं भारुड, गोरोबा, सावता, चोखोबा, रैदास, मुक्ताबाई अशा अनेक संतांची भजने लोकांना पाठ आहेत. भाव, भक्ती, करुणा, एकात्मता, समर्पण या गोष्टी संतांच्या शिकवणीमधून घराघरात पोचल्या आहेत. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनीही आपल्या भजन कीर्तनातून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरीकडे फडणवीसांसारखे राजकीय मंबाजी त्या शुद्ध भक्तीचा पुन्हा एकदा खून करायला निघालेले आहेत ! तेव्हा मंबाजी पिसाळला होता, आता फडणीस आणि त्यांचे सहकारी पक्ष पिसाळले आहेत. नेते सत्तेसाठी आंधळे झाले आहेत. त्यांचे ते संभाजी भिडे वारीमध्ये आपले तलवारधारी चेले घुसवून वारीच्या मुख्य भावनेलाच उद्ध्वस्त करायला निघाले आहेत.

वेगवेगळे आयटम साँग सादर करण्यामध्ये भाजपाचा हात कोणीही धरू शकत नाहीत. हे लोक येवढे पाताळयंत्री आहेत, की ज्या गावाला आग लावतील, त्याच गावातील लोकांकडून रॉकेल आणि माचीसचा खर्च वसूल करण्यासाठी वर्गणीदेखील गोळा करतील. आणि या त्यांच्या कारस्थानामधे पासवान, आठवले हे उघड भागीदार आहेत.. तर ओवेसी हे छुपे भागीदार आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतही लोकांना वारंवार ती शंका येत असते. तसे परिस्थितीजन्य पुरावेदेखील दिसतात. अन्यथा बाकी सारे गंभीर विषय बाजूला ठेवून आंबेडकरांनी थेट फडणवीसांच्या तालावर फेर का धरावा ? आपल्या डीजेचा आवाज का वाढवावा ? त्यांनी स्वतःला भिडेंच्या रांगेत आणून का बसवावं ? वारीच्या आत्म्याचा खात्मा करायला निघालेले भिडे यांचे धारकरी आणि विठूचा परिवार कोरोनाच्या विळख्यात ढकलायला निघालेले आंबेडकर नावाचे नवे वारकरी.. यांच्यात फरक तरी कसा करायचा ? त्याचवेळी तिकडे ओवेसी यांचे खासदार इम्तियाज जलीलदेखील मंदिर, मशीद उघडा हीच मागणी करतात, हा निव्वळ योगायोग समजायचा का? सगळ्यांचे राजकीय आयटेम साँग एकच कसे ? सारे एकाच तालावर कसे काय नाचायला लागलेत ?

सत्तेसाठी पिसाळलेल्या लोकांनी कुणाच्या सुपार्‍या घेवून हे उपद्व्याप सुरू केले आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही. अशावेळी, माननीय मुख्यमंत्री आणि सरकारला माझी विनंती आहे, की या लोकांसाठी खालील नियम घालून द्यावेत..आणि.. मग हवे तर यांच्यासाठी खुशाल मंदिरं उघडून द्यावीत..!

भाजपा, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी किंवा मंदिर, मशीद वा अन्य प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी करणार्‍या लोकांकडून एक शपथपत्र लिहून घेण्यात यावे.

फडणवीस, आंबेडकर आणि जलील हे लोक स्वतः आणि यांच्या पक्षांचे प्रमुख नेते त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील मंदिर, मशीद किंवा अन्य प्रार्थना स्थळांमध्ये स्वतः दोन महिने तरी नियमितपणे आणि किमान 2/3 दिवसाआड गर्दीच्या वेळी, किमान दोन तासांसाठी तरी भाविकांच्या सेवेसाठी उपस्थित राहतील, अशी लेखी हमी घ्यावी.

प्रत्येक जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाच्या, मंदिर उघडा म्हणणार्‍या प्रमुख अशा किमान 10 पदाधिकार्‍यांची यादी या लोकांनी सरकारकडे जमा करावी. त्यात आमदार, खासदार, नगरसेवक प्रामुख्याने असावेत.

या दहा जणांच्या यादीत किमान सहा लोक तरी पंडित, पुजारी वगैरे समूहात मोडणारे असावेत, जेणेकरून देवाला विटाळ वगैरे होणार नाही. आणि पूजा करण्याच्या कामी येतील. बाकीचे चार लोक मंदिरात झाडपूस करतील, बिनडोकपणे घंटा वाजवत बसतील अशा लोकांमधून घ्यावेत.

या लोकांना जर उद्या कोरोना झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या कुटुंबाची राहील, असे प्रतिज्ञापत्र त्यांच्या कुटुंबियांकडून घेण्यात यावे.

अशा लोकांचे उपचार कुठल्याही शासकीय दवाखान्यात करण्यात येऊ नयेत. त्यांच्या स्वतःच्या खर्चाने खासगी दवाखान्यातच करण्यात यावेत.

ह्याच निकषावर जे जे पुजारी / मुल्ला वगैरे मंदिर, मशीद उघडा म्हणून बोंब मारत आहेत, त्यांच्याकडूनही असेच लेखी शपथपत्र घ्यावे. आणि त्यानंतर त्यांना खुशाल प्रवेश देण्यात यावा.

तसे हे लोक दुरुस्त होण्याची शक्यता तर नाहीच. पण आपल्या लेकरांच्या चिंतेने व्याकुळ झालेला विठुराया मात्र नक्कीच अस्वस्थ असेल..! आपल्या भक्तांना कसं समजावून सांगावं याचाच विचार करत असेल..! हे कसेही वागोत, पण लेकुरवाळ्या विठुरायाला मात्र भक्तांच्या भल्यासाठी योग्य निर्णय घ्यावाच लागेल ना..?

आणि.. अखेर..
विठ्ठलानं भक्तांसाठी फतवा काढला !

वेड्यासारखं वागू नका
लबाडांच्या नादी लागू नका
आजवर..
मलादेखील
कंट्रोल करता आली नाही
कुठलीही महामारी..!
कॅन्सल करू या वारी..!
यंदा..
तुम्ही घरीच थांबा
मी स्वतःच येतो तुमच्या दारी !

=ज्ञानेश वाकुडकर
=अध्यक्ष,लोकजागर अभियान
=संपर्क – 9822278988