घरफिचर्सचिरतरुण ... सांगते ऐका :

चिरतरुण … सांगते ऐका :

Subscribe

आपल्याला काही गोष्टी नेहमीच ताज्या टवटवीत वाटतात. त्यामुळेच त्या किती जुन्या आहेत, हे आपल्या ध्यानातच येत नाही. म्हणताना आपण जुनी गाणी म्हणतो, पण तीच कायम गुणगुणत असतो. नवी गाणी कधी ऐकली तरी ती ध्यानात क्वचितच राहतात. काही चित्रपटांचंही तसंच असतं. कित्येक वर्षांपूर्वी येऊन गेलेले ते चित्रपट अजूनही नव्यासारखेच आकर्षक वाटतात. गाण्यांप्रमाणेच म्हणजेच अडीचतीन मिनिटांची मर्यादा असलेली गाणी काही केल्या जुनी वाटतच नाही अगदी त्याचप्रमाणे हे चित्रपट काळे-पांढरे असले तरी, ताजे टवटवीतच वाटतात. त्यांच्या अवीट गोडीमुळं, नव्याने पाहिल्यासारखे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. आता अचानक हे आठवायचं कारण म्हणजं, आता 2019 साल सुरू होऊन महिना होऊन गेला. तरीही सांगते ऐका या चित्रपटाचं आकर्षण काही कमी होत नाही. खरं तर तो प्रदर्शित झाला होता 1959 मध्ये. म्हणजे साठ वर्षं झाली की पुरी. पण बुगडी माझी सांडली गंऽऽ जाता सातार्‍याला ऐकताना वाटतं का तरी हे गाणं साठीपार केलेलं असेल म्हणून? म्हणजेच काही व्यती आपल्याला चिरतरुण असल्यासारख्या भासतात, तसंच या चित्रपटांचं असतं.

तसं पाहायला गेलं तर मराठी चित्रपटांत तमाशाला प्रमुख स्थान असणारा हा काही पहिला चित्रपट नाहा, तसाच गावच्या पाटलाला जुलुमी खलप्रवृत्तीचा दाखवणाराही एकमेव चित्रपट नाही. लोकप्रिय गाणी असलेलेही अनेक चित्रपटा आहेत. पण या सम हा, असं म्हणतात, तसा हा सांगते ऐका च! प्रभात स्टुडिओमध्ये चित्रीकरण झालेला हा बहुधा अखेरचा (किंवा अखेरच्या काही चित्रपटांपैकी एक) चित्रपट असावा. त्यानंतर तेथे फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. या चित्रपटाची मूळ कथा गो. गं. पारखी यांची. तिचे पटकथा-संवाद व्यंकटेश माडगूळकर यांचे आणि गीते ग. दि. माडगूळकर यांची. चित्रपटानं रौप्यमहोत्सव साजरा केल्या नंतर, (तेव्हा एका चित्रपटागृहात रोज तीन खेळांचासात दिवसांचा आठवडा आणि अशा पंचवीस आठवड्यांचा रौप्यमहोत्सव असे. रोज एक करून पंचवीस खेळ झाले म्हणजे नाही.)

- Advertisement -

अनंत माने यांना चित्रपटाचं प्रेक्षकांना नव्यानं आकर्षण वाटावं म्हणून एक गाणं टाकावंसं वाटलं. संगीत दिग्दर्शक वसंत पवार यांना ती त्यांनी सांगितली. पवार तसे गाण्यांचेही जाणकार. त्यांना वामनदादा कर्डक यांचं एक गीत योग्य वाटलं. ते गीत म्हणजे नवारा बायकोतला चटपटीत वाटावा असा झगडा होता. त्यांनी तसं माने यांना सांगितलं. त्यांनाही तो आवडला. आणि नंतर तो विनोदमूर्ती वसंत शिंदे आणि नीलम यांच्यावर चित्रित करण्यात आला. तो गायला होता विठ्ठल शिंदे आणि कुमुदिनी पेडणेकर यांनी. इतर गाणी आशा भोसले, मधुबाला चावला ( नंतर जव्हेरी), विठ्ठल शिदं आणि पंडित विधाते यांनी गायली होती. त्यातली आशा भोसले यांनी गायलेली बुगडी जणू काही अमरपट्टाच घेऊन आली आहे! या गाण्यांखेरज चित्रपटाच्या अखेरीस जो वग होता त्यात सर्व कथाच गाण्यातून सांगण्यात आली होती तोही अत्यंत श्रवणीय आणि अर्थातच प्रेक्षणीयही होता.

कथा तशी साधी सोपीच होती. गावचा जमीनदार पाटील महादेव (साळवी) हा गरीब पुरुष आणि स्त्रियांचीही पिळवणूक करणारा, पण शेवटी तेच त्याच्या अंगलट कसे येते अशी ही कथा. तमाशा फडवाली चिमा (हंसा वाडकर) महादेव पाटलाच्या राजुरी गावात खेळ करत असताना तिचं आणि पाटलाचं वाजतं कारण ती त्याचं म्हणणं ऐकत नाही. आणि शेवटी अगदी अनोख्या प्रकारे त्याच्यावर सूड उगवते. त्याच्याच गावात वगाच्या माध्यमातून त्याचं खरं रूप सर्वांना दाखवून देऊन!
चित्रपटाला सुरुवात तमाशातील गणानंच होते व त्यानंतर चिमाची गवळण. नंतर महादेव पाटील एक चांदीचे नाणे फेकून एक लावणी गायला, नाचायला सांगतो. चिमा त्या नाण्याचा स्वीकार करत नाही आणि नंतर त्यानं काढलेल्या नोटांचाही.

- Advertisement -

त्यामुळं तो चांदीचं कडं देऊ करतो पण चिमा ते लाथाडून टाकते. आठ वर्षांपूर्वी आपल्या बापाचा त्यानं खून करवला असल्याची आठवण त्याला देते. तिच्या बापानं खोटी साक्ष द्यायला नकार दिल्याने हे घडलेले असते. महादेव तिचा आवाज बंदकरायचा प्रयत्न करतो तेव्हा सखाराम (चंद्रकांत मांढरे) त्याला थोपवतो. त्यावर महोदव त्याला डिवचतो की जणू काही तुझ्या बहिणीवरच कुणी हात टाकलाय! सखाराम म्हणतो, बहीण असो वा नसो. ती एक स्त्री आहे. तो ते चांदीचे कडे हे बैलगाडीच्या शर्यत विजेत्याचे आहे आणि ते नंतरच्या विजेत्याकडे जाईल असेही बजावतो.

पाटील संतापून निघून जातो. त्याचा गडी रामजी (वसंत शिंदे) त्याला दिलासा देण्यासाठी म्हणतो की तुमची बैलं सार्‍या खेड्यांत अव्वल आहेत, तीच जिंकतील. त्याची बायको जानकी (रत्नमाला) ही त्याला चांगल्या वर्तनाच्या सखारामला माफ करा असं सांगते. तिकडे सखारामला त्याची बायको हंसा (सुलोचना) मूल नसल्याची खंत बोलून दाखवत असते. उगाच या श्रीमंतांशी भांडू नका असंही सांगते.

नंतरच्या शर्यतीत सखारामची गाडी चिखलात रुतते. पाटील त्याची टिंगल करून पुढे जातो. पण सखाराम रुतलेले चाक बाहेर काढतो आणि पाटलाच्या गाडीला मागे टाकून शर्यत जिंकतो. कृष्णजन्माच्या उत्सवाला पाटील सखाराम आणि हंसाला बोलावतो. गावात शान राहावी म्हणून. पण त्याच वेळी तो सावळ्या रामोशाला (वसेंतराव पहिलवान) बोलावून घेऊन ती दोघं घरी नसताना त्यांच्या घराला आग लावयला सांगतो. आगीची वार्ता कळताच सखाराम धावतो आणि बैलांना वाचवायचा प्रयत्न करतो. पण सखारामला वाचवायचा प्रयत्न करण्याचा आव आणत पाटील त्याला खतम करतो. हंसाबद्दल कळकळ दाखवून तिला आपल्या वाड्यात जानकीला सोबत म्हणून आणतो. सावळ्याला दागिने, पैसे देऊन परत पाठवतो आणि लगेच चोरीचा आरोप करून पोलिसांकरवी अटक करतो. सावळ्याही बदल्याची प्रतिज्ञा करतो.

चिमाला एकजण सखारामच्या मरणाबाबत सांगतो आणि ती अंतःप्रेरणेने लगेच हे पाटलाचेच कृत्य असे सांगते. जानकी गौरींसाठी माहेरी गेलेली असताना पाटील हंसावर बलात्कार करतो. हंसा नंतर निसटते आणि माहेरहून परतणार्‍या जानकीला भेटते. घरी परतताच जानकीच्या ध्यानात सारा प्रकार येतो.दरम्यान सावळ्या तुरुंगातून निसटतो आणि पाटलाला इशारा देतो. परतताना त्याला हंसा बुडताना दिसते. तिला तो वाचवतो आणि चिमाच्या सुपूर्द करतो. तिच्यावरील अन्यायाचा बदला घेईन असे आश्वासन देतो. हंसाला मुलगी होते आणि हंसा मरते. चिमा हंसाच्या मुलीचे नाव हंसा असेच ठेवते. पंधरा वर्षं उलटतात आणि हंसा (जयश्री गडकर) प्रमाणे पाटलाचा मुलगा कृष्णा (सूर्यकांत मांढरे) ही मोठा झालेला असतो. त्याचं लग्नही झालेलं असतं. पण तमाशाच्या शौकापुढं त्याचं बायकोकडं (्नीलम) लक्ष नसतं. संसाच्या कार्यक्रमात तो बुगडी… ऐकतो आणि तिच्या प्रेमात पडतो.

पाटील कृष्णाच्या शोधत येतो तेव्हा चिमा त्याला आता तुझी प्राक्तनापासून सुटका नाही, जे जे होईल ते पाहा, असं त्याला म्हणते. तिला ओळखलंस का? ती तुझीच मुलगी आहे! मोठी हंसा गरोदर होती आठवतंय ना! पाटील चांगलाच अस्वस्थ होतो. आपली मुलगी तमाशात? आणि मुलगा तिच्या प्रेमात… चिमा त्यांना उत्तेजनच देते. कृष्णा अन हंसा चोरून रात्री भेटतच असतात. मी विवाहित माणसाबरोबर जाणार नाही असे हंसा म्हणत असते. मग त्यांच्या सवालजबाब होतो की लाटा आणि चंद्र यांचे काय असावे नाते .. आणि हंसाच खुलासा करते की दोघंही एकाच सागराची लेकरं असल्यानं ते बहीण भाऊ नाहीतर कोण असणार?

नंतरचा वग हे खास आकर्षण ठरलं होतं कारण सार्‍या गावसमोर पाटलाचं खरं रूप उघड होतं आणि चित्रपटाचा कळस तिथंच गाठला जातो पाटील आणि सावळ्या एकमेकांचा जीव घेतात. आणि शेवटी कृष्णाला हंसा भाऊ म्हणून ओवाळते. चित्रपट संपतो. तो संपूर्ण ऐकायला मात्र क्वचितच मिळतो.

आधी सांगितल्याप्रमाणं संगीत हे सांगते ऐका चं खास आकर्षण होतंच पण सर्वांचाच अभिनय अगदी उत्कट असा होता आणि त्यामुळंच प्रेक्षकांना त्यानं भुरळ घातली होती, इतकी की तो नंतर 130 आठवडे चालला आणि तेव्हा तो एक विक्रमच होता. जयश्री गडकरच्या सुरुवातीच्या चित्रपटातील हा एक. त्यात ती खूपच सुरेख दिसली. नृत्ये तर दाद घेतच पण अभिनयाचं कौशल्यही तिनं दाखवलं होतं. चंद्रकांत, साळवी, सुलोचना, रत्नमाला, यांच्याबाबत वेगळं काही सांगण्याचीच आवश्यकता नाही. हे सर्वजण जणू त्या भूमिकांसाठीच होते इतके ते त्यांत मिसळून गेलेले वाटतात.

सूर्यकांत, जयश्री गडकर ही जोडी नंतर अनेक चित्रपटांत दिसली जणू काही मेड फॉर ईच अदर असंच लोकांना वाटायचं. जयश्री गडकर तेव्हा खूपच आटोपशीर होती. (नंतर मात्र तिचा आकार वाढला. एवढा की, दादा कोंडके विच्छामध्ये कटी म्हणजे कशी हेलनसारखी आणि जयश्री गडकरची कंबाऽऽर असं म्हणायचे. असो.) वसंत शिंदे आणि वसंतराव पहिलवान यांनीही आपली काम चोख केली होती आणि या सार्‍यांतून मान्यांची या माध्यमावरील पकड स्पष्ट होत होती. स्टुडिओच्या परसराचा उत्तम आणि पुरेपूर वापर त्यांनी केला. मुख्य तमाशाचा भाग तर खर्‍या थिएटरमध्येच घेतला असावा. अगदी श्रेयनामावलीपासूनच. कारण नावं येतात, ती पडदा बाजूला झाल्यावर एकामागून एक येणार्‍या वेगवेगळ्या पात्रांप्रमाणे.

वसंत पवारांच्या संगीतबाबत वेगळं काय सांगायचं. एकच गोष्ट राम कदम यांनी सांगितलीय. बुगडी माझी सांडली गंऽ च्या चालीच्या वेळी अडचण निर्माण झाली होती. कोणतीच चाल मान्यांना पसंत पडत नव्हती. पवार चांगलेच अस्वस्थ झाले होते. त्यांना काही सुचेनासंच झालं होतं. तेव्हा राम कदम म्हणालेः मी बघतो. आणि त्यांना। सध्या आपण जी ऐकतो ती चाल लावली, ती अनंत मान्यांना आवडली आणि पवारांनीही पसंत असल्यानं तीच वापरायला परवानगी दिली होती! असं चांगलं वातावरण होतं त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये.

-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -