एक आठवण कराओकेच्या निमित्ताने!

लॉकडाऊन उठून बरेच दिवस लोटले आहेत, पण आमच्या सोसायटीतली आणि आजुबाजूची बरीच माणसं अजून लॉकडाऊन मोडवरच आहेत. ती त्या मोडवर असणं तसं साहजिकही आहे. करोनाबाधितांचे आकडे वाढताहेत. अशा वेळी ती सावध असणं आपण समजून घेणं आवश्यक आहे. शाळा कॉलेजातली मुलं आणि वयस्कर मंडळीही आपापल्या घरात सुखरूप असणं पसंत करताहेत. घरातल्या टीव्हीमुळे, हातातल्या मोबाईलमुळे तसा लोकांचा वेळ वाया जात नाही, पण त्यापेक्षाही वेळ कसा घालवावा यावरचं एक जालिम औषध लोकांना सापडलं आहे ते म्हणजे- कराओके!

Mumbai

लॉकडाऊन उठून बरेच दिवस लोटले आहेत, पण आमच्या सोसायटीतली आणि आजुबाजूची बरीच माणसं अजून लॉकडाऊन मोडवरच आहेत. ती त्या मोडवर असणं तसं साहजिकही आहे. करोनाबाधितांचे आकडे वाढताहेत. अशा वेळी ती सावध असणं आपण समजून घेणं आवश्यक आहे. शाळा कॉलेजातली मुलं आणि वयस्कर मंडळीही आपापल्या घरात सुखरूप असणं पसंत करताहेत. घरातल्या टीव्हीमुळे, हातातल्या मोबाईलमुळे तसा लोकांचा वेळ वाया जात नाही, पण त्यापेक्षाही वेळ कसा घालवावा यावरचं एक जालिम औषध लोकांना सापडलं आहे ते म्हणजे- कराओके!

राजकारण्यांकडून शंभरदा ऐकूनही एकवेळ जीडीपी म्हणजे काय हे कुणाला कळणार नाही, पण कराओके म्हणजे काय हा प्रश्न आता कुणाला पडण्याची शक्यता नाही, इतका या कराओकेचा प्रसार, प्रचार आणि प्रादुर्भाव वातावणात झालेला आहे. फेसबुकवर तर फेसबुक उघडायची खोटी की कराओके सर्वांगावर धो धो बरसतो. वीस पंचविसातले किमान पाच लोक कराओकेच्या साथीने गात असतात. गाणं बजावण्यावर लोकांचं किती दिलोजानसे प्रेम असतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. पण एक गोष्ट मात्र आवर्जुन सांगावी लागेल की या कराओकेवर जास्तीत जास्त आढळतात ते महंमद रफी, किशोरकुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे…किंवा मराठीत सुधीर फडके, अरूण दाते…किंवा फार फार तर जयवंत कुलकर्णी. आजच्या गायक गायिकांच्या वाटेला आजची तरुण मुलंही जात नाहीत.‘फनाह’मधलं ’चांद शिफारिस जो करता हमारी’ गाणारा एखादा निपजतो, पण तो एखादाच. जुनं ते सोनं आणि जुनं तेच सोनं या न्यायाने ही सगळी शौकिन मंडळी गाण्यांच्या जुन्या खजिन्यालाच कवटाळतात हे सत्य इथे कुणालाही उमगतंच उमगतं. त्या दिवशी तर एका ओळखीच्या तरुण मुलीने कमालच केली. तिने चक्क ‘ये रे घना’ गायलं. ते गाणं तसं गाण्यासाठी सोपं नव्हतं, पण तिने ते आवडीने आणि जीव लावून गायल्याचं दिसत होतं. त्या गाण्यावर बर्‍याच जणींनी तिला कौतुकाच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

मी तिचं अभिनंदन नोंदवलंच, पण तिला प्रश्न केला, हे गाणं तू पावसाळ्याच्या आगमनाप्रित्यर्थ गायलंस हे समयोचित झालं, पण नेमकं हेच गाणं तुला का गावंसं वाटलं? तिचं उत्तर होतं, तुमची पिढी खूप फोर्च्युनेट होती की त्या काळात अशी माईलस्टोन गाणी तयार झाली. ही अशीच गाणी मेमोरेबल असतात, जी गाणी गाणं म्हणजे चॅलेंज असतं.‘ये रे घना’सारखं आरती प्रभूंच्या घनगर्द प्रतिभेतून उतरलेलं गाणं गाणार्‍या आजच्या काळातल्या त्या मुलीच्या उत्तरामध्ये असे इंग्लिश शब्द येणं मी समजू शकत होतो. दोष तिचा नव्हता, दोष ती ज्या काळात जन्माला आली त्या कॉर्पोरेट आणि टेक्नॉलॉजिकल काळाचा होता, पण ज्या काळात धडामधुडूम संगीताचा कालाज आणि कोलाहल टिपेला पोहोचला होता त्या काळात तिला ‘ये रे घना’ गावंसं वाटत होतं हे नवलच होतं. जिकडेतिकडे कराओकेचं दणदणीत पीक निघालेलं असताना कुणाकडून तरी ‘ये रे घना’ ऐकायला मिळणं म्हणजे वार्‍याची गारेगार झळूक होती. परवा आणखी एक अशीच सुखद गोष्ट घडली.

एकाने ‘प्यार का मोसम’मधलं ‘तुम बिन जाऊं कहां’ हे गाणं महंमद रफी आणि किशोरकुमार अशा दोघांच्याही शैलीत गाऊन पाठवून दिलं. त्या सिनेमात तसं ते दोघांच्याही आवाजात गाणं आहे. टॅन्डम साँग या प्रकाराप्रमाणे, पण दोघांनीही आपपाल्या शैलीत गायलं आहे. आपापल्या गाण्याच्या प्रकृतीप्रमाणे आणि पूर्णपणे आपल्या ढंगात, पण ज्याने कुणी हे गाणं फेसबुकवर पाठवून दिलं त्याने महंमद रफी आणि किशोरकुमार या दोघांची ह्या गाण्यातली लकब छान उचलली होती. त्याच्या त्या करामतीला खरोखरच दाद द्यावीशी वाटली.‘तुम बिन जाऊं कहां’ या ओळीच्या पुढच्या ‘के दुनिया में आ के’ या ओळीतला ‘दुनिया में’ हा शब्द गाताना महंमद रफी आणि किशोरदा दोघांनाही आपापल्या आणि वेगवेगळ्या ढंगात गायला आहे. रफींनी ‘दुनिया में’ ह्या शब्दातल्या ‘नि’ या अक्षरावर किंचित जोर देत तो किंचितच लांबवला आहे. किशोरदांनी मात्र तो जसाच्या तसा थेट म्हटला आहे, पण ह्या गाण्यातली गंमत अशी की किशोरदांनी हा गाण्याची सुरूवात होताना इंट्रो म्हणून चक्क यॉडलिंग केलं आहे.

संगीतकार आर.डी बर्मनच्या परवानगीने या उदास भाव असलेल्या गाण्यात त्यांनी हे यॉडलिंग केलेलं आहे. खरंतर त्याआधी किशोरदांचं यॉडलिंग हे त्यांनी त्यांच्या धूमधमाल गाण्यांसाठी वापरलं होतं, पण आर.डी.बर्मन हा संगीतातला एक प्रयोगशील कलावंत होता. संगीतात नवनवे प्रयोग करण्याकडे त्यांचा नेहमीच ओढा असायचा. त्यांनी ‘तुम बिन जाऊं कहां’सारख्या गाण्यात यॉडलिंगचा प्रयोग करायचा ठरवलं आणि तो यशस्वीही ठरला.‘तुम बिन जाऊं कहां’ या गाण्याच्या सुरुवातीला किशोरदांच्या त्या यॉडलिंगने गाण्याआधीच त्या गाण्यातलं करूण वातावरण जसं हवं तसं उभं केलं. त्यानंतर पहिल्या अंतर्‍यानंतरही किशोरदांनी आपल्या यॉडलिंगचा एक टप्पा पुढे नेला आणि त्या गाण्यातल्या कारूण्याची छाया आणखी गडद केली. पुढे हाच प्रयोग किशोरदांनी ‘आ गले लग जा’ या सिनेमातल्या ’ना कोई दिल में’ समाया ह्या गाण्यासाठीही केला, पण किशोरदांच्या त्या उदास यॉडलिंगची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही. तेव्हाही संगीतकार आर.डी.बर्मनच होते, पण तो प्रयोग तितकी नोंद घेण्याजोगा झाला नाही.‘तुम बिन जाऊं कहां’ हे गाणं रफींनीही गायलं आहे आणि किशोरदांनीही गायलं आहे म्हणून ते कुणाचं उजवं आणि कुणाचं डावं हे व्यक्तिसापेक्ष आहे. ते ज्याचं त्याने ठरवायचं आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर मला कुणा संगीत चाहत्याने दोघांच्या शैलीची नक्कल करत हे गाणं पाठवलं म्हणून आज हे लिहावंसं, सांगावंसं वाटलं इतकंच!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here