घरफिचर्सएकदा तरी अनुभवावी बरसात की रात

एकदा तरी अनुभवावी बरसात की रात

Subscribe

मधुबाला आपल्या आवडत्या कवीचे गाणे होणार म्हणून रेडिओजवळच बसलेली असते. त्यावेळी ते गाणे म्हणजे आपल्याबरोबर असलेला माणूस म्हणजेच हा कवी गीतकार असणार हे तिला कळते. नंतर एका कार्यक्रमाचे वेळी ती तेथे असल्याचे पाहून तो मैंने शायद तुम्हे पहेलेही कहीं देखा है, हे गाणे गातो आणि ती त्याच्या प्रेमातच पडते. म्हणूनच एकदा तरी ‘बरसात की रात’, अनुभवायला हवी.

पाऊस सुरू झाला की आठवते, सुमन कल्याणपूर आणि कमल बारोट यांचे गरजत बरसत सावन आयो रे, हे गाणे. पावसाचे प्रेम सर्वांनाच असते. (अर्थात काही वेळा यंदाप्रमाणे त्याचा अतिरेक झाला तर मात्र आता थांब रे बाबा असे वाटून ‘नको नको रे पावसा असा घालूस धिंगाणा,’ अशी आळवणी करावी लागते.) पण असे प्रसंग काही वारंवार येत नाहीत हे खरे. रिमझिम पाऊस पडे सारखा, घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा, आला पाऊस मातीच्या वासात ग, आला आला वारा, संगे पावसाच्या धारा, अशी अनेक गाणी आठवतात, तरीही जिंदगी भर नहीं भूलेगी ये बरसात की रात, हे गाणे मात्र खरोखरच आयुष्यभर स्मरणात राहील अशापैकीच एक आहे, हे कुणीही मान्य करेल. हे गाणे आहे बरसात की रात, या नावाच्या चित्रपटातील. 1960 मध्ये तो आला होता, तरी आजही त्याच्या गाण्यांतील गोडी अवीट आहे.

खरं तर चित्रपट चालला तोही त्यातील तब्बल दहा गाण्यांच्या लोकप्रियतेमुळेच. अर्थात त्या गाण्यांमध्येही पाठोपाठ येणार्‍या तीन कव्वाल्या हे प्रमुख आकर्षण होते. याच्या जोडीला मधुबाला, भारत भूषण, श्यामा, रत्ना (जिने नंतर भारत भूषणशी लग्न करून ती रत्ना भूषण झाली), के. एन.सिंग, चंद्रशेखर असे कलाकार होते. तरीही खरे मानकरी म्हणून गीतकार साहीर लुधियानवी आणि संगीत दिग्दर्शक रोशन यांचीच नावे घ्यावी लागतील.

- Advertisement -

चित्रपटाच्या श्रेयनामावलीच्या पार्श्वभूमीलाच हे गाणे आहे. श्यामा आणि रत्ना रियाझ करताना हे गाणे गात असतात आणि बाहेर पाऊस जोरात असतो. त्यावेळीच एकूण पाऊसदेखील अशी वातावरण निर्मिती करतो की, जणू काही तोच चित्रपटातील जणू एक पात्रच असणार, हे कळते.

त्या दोघी बहिणी. त्यांचे पिताजी-उस्तादजी, कव्वालीच्या कलाकारांचे प्रमुख असतात. तमाशा फडाच्या प्रमुखाप्रमाणेच. श्यामाचे भारतभूषणवर प्रेम असते; पण त्याच्याकडून फारसा प्रतिसाद नसतो. उस्तादजींची त्याच्यावर माया असते. तो गीतकार आणि गायकही असतो. नाव आणि पैसा कमवण्यासाठी रेडिओवर प्रयत्न करण्याचे ठरवून आपला मित्राकडे-चंद्रशेखरकडे- जाण्यासाठी आगगाडीत बसतो तेथे त्याची दुसर्‍या एका कव्वालीच्या गीतकाराबरोबर गाठ पडते. तो गीतकार त्याची ओळख करून घेतो. मित्राकडे आल्यावर त्याच्या ओळखीनेच तो प्रयत्न करायला लागतो.

- Advertisement -

एकदा सायंकाळी फिरायला गेलेला असताना अचानक विजा चमकून पाऊस कोसळू लागतो आणि योगायोगाने तेथे त्याची गाठ मधुबालाबरोबर पडते. वीज चमकताच ती त्याला बिलगते. हा प्रसंग तो विसरू शकत नाही. नंतर मित्राकडे परतल्यानंतर त्याला रेडिओवर बोलावणे आल्याचे कळते. तो काय गायचे याचा विचार करायला लागतो. त्यातच त्याला आदल्या रात्रीची आठवण येते आणि तो ‘जिंदगी भर नहीं भूलेगी ये बरसात की रात’, हे गाणे म्हणू लागतो. मधुबाला आपल्या आवडत्या कवीचे गाणे होणार म्हणून रेडिओजवळच बसलेली असते. त्यावेळी ते गाणे म्हणजे आपल्याबरोबर असलेला माणूस म्हणजेच हा कवी गीतकार असणार हे तिला कळते. नंतर एका कार्यक्रमाचे वेळी ती तेथे असल्याचे पाहून तो मैंने शायद तुम्हे पहेलेही कहीं देखा है, हे गाणे गातो आणि ती त्याच्या प्रेमातच पडते.

नंतर तिच्याकडेच मित्राच्या ओळखीने तो तिच्या लहान बहिणीला शिकवण्याचे काम पत्करतो. त्या निमित्ताने त्यांचे प्रेम वाढत जाते. तिच्या वडिलांना-के. एन. सिंग-यांना ते आवडत नाही आणि तिच्या लग्नासाठी प्रयत्न करू लागतात. एकदा लग्न ठरवण्यासाठी लोक आलेले असताना ती सहज बाहेरच्या बाजूला येते आणि तिला भारत भूषण बसलेला दिसतो. आपले लग्न त्याच्याबरोबर होणार नाही, हे कळताच ती बेशुद्ध होते. तिचे वडील त्याला तेथे बघताच त्याला बाहेर हुसकावतात. त्या दोघांना भेटण्याचीही मनाई करतात. ते दोघे पळून जाऊन दुसरीकडे आसरा घेतात; पण त्यांचा सुगावा लागून तिला परतावे लागते. तिचे लग्न ठरते. पण तिचा होणारा पती तिला समजून घेतोे. तो तिला आपण घाई करणार नाही असे सांगतो.

मधुबालाशी ताटातूट झाल्याने निराश झालेला भारतभूषण फिरत असताना एका लोहाराच्या भट्टीपाशी आलेला असतो, तेथे त्या हातोड्याच्या तो मायूंस हूं वादेसे तेरे गाऊ लागतो. त्याची निराशा त्यातून प्रकट होते. इकडे वस्तादजी मुलींबरोबर कार्यक्रमासाठी त्याच गावात येतात आणि योगायोगाने त्यांची गाठ पुन्हा भारतभूषणशी पडते. कवालीचा मुकाबला ठरतो. गाडीत भेटलेला कवीही भारतभूषणची गाणी स्वतःचीच असल्याचे सांगून मिरवत असतो.

कव्वालीच्या मुकाबल्यात उस्तादजींच्या वाट्याला हार येते. पण ते फेरमुकाबल्याची मागणी करतात. पण प्रतिस्पर्धी, पुन्हा हरलात तर तुमच्या मुलींना आमच्याकडे चाकर म्हणून राहावे लागेल, अशी अट घालतो, ती मान्य होते. त्यावर रत्ना आमचीही एक अट आहे, तुम्ही हरलात तर तुमच्या या प्रमुख गायकाला आमच्याकडे जोडे पुसण्याचे काम करावे लागेल. खरे तर तिचे मनातून त्याच्यावर प्रेम असते. तो ती अट मान्य करतो. मग पुन्हा कव्वालीचा मुकाबला सुरू होतो तेव्हा सुरुवातीलाच तो गायक मजी चाहता है चूम लूँ अपनी नजरसे मैं या ओळींनी सुरुवात करतो. बहिणी पेचात पडतात. कारण त्यांना काहीच सुचत नसते. अचानक त्यांच्या एका साथीदार मुलीला भारतभूषण दिसतो. ती खुणेनेच त्या दोघींचे लक्ष तिकडे वेधते. दोघीही खूश होतात. तोही त्याच्या आदाबला प्रतिसाद देतो. त्यांची अडचण ओळखून चटकन दोन ओळी लिहून त्यांच्याकडे पाठवतो. मुकाबला रंगतो. दरवेळी तो त्यांना नव्या ओळी पुरवतो. प्रतिस्पर्धी गायकाची पंचाईत होते. कारण त्यांचा कवी काही न सुचल्याने पळून महिला प्रेक्षकांत पडद्याआड बसलेला असतो. तिथूनही तो हाकलला जातो. त्यामुळे गायक त्याची प्रतीक्षा करत कब आओगे, कब आऽओगेय अशी आळवणी करतो. पण शेवटी तो न आल्याने त्याला पराभव मान्य करावा लागतो.

तो उस्तादजींकडे बूट पुसण्याचे काम करू लागतो. गायकाला असे काम करू देणे उस्तादजींना आवडत नाही, आणि ते मुलीला खडसावतात. रत्नाचे प्रेम त्या कवीवरच असल्याचे त्यांना कळते, आणि त्यांना ते पसंत असते. ते त्या दोघांचा रिश्ता मान्य करतात. भारत भूषणची गाठ आता वारंवार होणार या कल्पनेने श्यामा खुश होऊन मुझे मिल गया बहाना तेरे दीद का कैसि खुशी लेके आया चाँद, ईद का हे गाणे म्हणते. (योगायोगाने उद्या-सोमवारीच ईद आहे.) मधुबालाशी ताटातूट झाल्याने निराश भारतभूषण फिरत फिरत लोहाराच्या भट्टीपाशी येतो, भट्टीच्या आवाजात, हातोड्याच्या तालात त्याला गाणे सुचते. तो निराशेने मायूँस हूं वादेसे तेरे हे गाणे म्हणू लागतो.

आता उस्तादांपुढे मोठ्या कव्वाली मुकाबल्याचे आव्हान असते. त्याची तयारी सारेजण जोमात करतात. नवे प्रतिस्पर्धी खरोखरचेच मोठे कलाकार असतात. त्यामुळे चिंताच असते. मुकाबल्यासाठी खूपच गर्दी जमलेली असते. प्रतिस्पर्धी मना तो कारवाँ की तलाश है, या ओळींनी सुरुवात करतात. त्याला तसेच उत्तर दोघी बहिणी देतात. नंतर स्पर्धा वेगळेच वळण घेते आणि ये इश्क इश्क है, या ओळींनी मुकाबला पुढे सरकतो. एका ठिकाणी बहिणी अडतात, तेव्हा भारत भूषण पुढे होतो आणि पेटी घेऊन गाऊ लागतो. त्याचा आवाज ऐकताच मधुबाला रेडिओ सोडून धावत मुकाबल्याच्या ठिकाणी येते.

भारत भूषणच्या कौशल्यामुळे सारे थक्क होतात. मुकाबला रंगत जातो. मधुबालाला पाहून श्यामाला आश्चर्य तर वाटतेच; पण तिच्या भारतभूषणकडे पाहण्यावरून तिला मधुबालाचे प्रेम तिला जाणवते. ती बेशुद्ध होते. मधुबालाचा शोध घेत बंदूक घेऊनच तिचे वडील तेथे यायला निघतात. इकडे प्रेमाची महती सुरूच असते. वेगवेगळी उदाहरणे दिली जातात, शेवटी प्रेमाची महत्ता वर्णन करताना भारतभूषण म्हणतो म…पी गयी मीरा बिसका प्याला और अर्ज करी के लाज राखो राखो… (साहिरने येथे कव्वालीला एकदम अध्यात्माचा रंग भरल्याने ती वेगळीच उंची गाठते.).. अशा ओळी गातो. मोठे कव्वाल अवाक् होतात आणि भारत भूषण मुकाबला जिंकतो. मोठे कव्वाल खिलाडू वृत्तीने पराभव मान्य करून त्याचा गौरव करतात. मधुबालाच्या वडिलांनाही उपरती होते. नायक नायिकेच्या ‘जिंदगी भर नहीं भूलेगी ये बरसात की रात,’ या लता-रफीच्या गाण्याने सुखान्त शेवट होतो.

अशा गाण्यांनीच अविस्मरणीय केलेला बरसात की रात. रोशन, साहिर, लता, रफी, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, शंकर शंभू अशा ताकदीच्या आणि कोरसमधील गायक गायिकांनी त्यांत चांगलाच रंग भरला आहे. श्यामा आणि रत्नाने कव्वालीतील अदाकारी चांगली दाखवली आहे. मधुबालाला त्यामानाने कमी लांबीची भूमिका आहे, तरीही ती स्मरणात राहते. ‘चलती का नाम गाडी’मध्ये अशोक कुमार, किशोर कुमार, अनूप कुमार यांच्यावरच प्रामुख्याने भर असला तरीही तिची छाप पडते त्याप्रमाणेच. गीतकार-गायक म्हणून भारत भूषणनेही प्रभाव दाखवला आहे..

राज कपूरचा ‘बरसात’ हा चित्रपट पूर्वी आला होता आणि त्यातील गाण्यांमुळे आजही तो रसिकांच्या स्मरणात आहे. त्यानंतर साधारण तपानंतर आलेला ‘बरसात की रात’ कव्वाल्यांमुळे गाजला. यानंतर चित्रपटांमध्ये कव्वाल्यांची जणू लाटच आली. तरी या चित्रपटातील कव्वाल्यांची जादू कायम आहे. पावसाळ्यात या चित्रपटाचा आस्वाद घेणे हा एक सुखद अनुभव आहे.
पाहिला असेल ते बघतीलच; पण ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी शक्य तर बघायला हवा… जमले तर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -