घरफिचर्ससंपादकीय : एक होता पँथर...

संपादकीय : एक होता पँथर…

Subscribe

या देशाचा इतिहास सवर्णांनी लिहिलेला असून तो त्यांच्या सोयीचा आहे. जातीच्या चष्म्यातून इतिहासाकडे पाहिले तर उद्या तुम्ही गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही, अशा बेधडक विचारांची मांडणी करणारे ज्येष्ठ साहित्यिक, कवी, समीक्षक समाजचिंतक, विचारवंत पँथर राजा ढाले यांनी महाराष्ट्राच्या विद्रोही इतिहासात महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते. 1970 च्या दशकात राजा ढाले यांनी आधी साहित्यातून त्यांच्यातील बंडखोराची पहिल्यांदा महाराष्ट्राला ओळख करून दिली आणि नंतर दलित पँथरसारखी संघटना स्थापन करून या बंडखोरीतील लढवय्येपणा दाखवून दिला. कधी सत्यकथेचा अंक जाळ, तर कधी दुर्गाबाई भागवत यांच्यावर टीका कर, यासारख्या घटनांतून ढाले सतत बातमीत राहिले आणि दलित नेते म्हणून प्रस्थापित झाले. तशी त्यांची बंडखोरी, लढायची वृत्ती कायम राहिली. त्यांच्याशी बोलणे म्हणजे महाराष्ट्रातील दलित चळवळीच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील वाटचालीचे विवेचन जाणून घेणे असे.

आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात राजा ढाले हे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. 1970 च्या दशकात रिपाइं निष्प्रभ झाला होता. तेव्हा महाराष्ट्रात दलितांवरील बहिष्कारात मोठी वाढ झाली होती. दलित अत्याचारांबाबत वर्तमानपत्रांना फार जाणिवा नव्हत्या. तत्कालीन सरकारलादेखील हे प्रश्न समजत नव्हते. दलित अत्याचारासंदर्भात कुठलीच कारवाई होत नव्हती. त्यामुळे समाजात तीव्र असंतोष होता. त्याला प्रखर वाचा फोडण्याचे काम राजा ढाले यांनी केले. दलित पँथरच्या स्थापनेच्या आधी पुण्यातून निघणार्‍या ‘साधना’ साप्ताहिकात ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या लेखामुळे राजा यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्या लेखातील वादग्रस्त आशय देशातील तमाम शोषितांचा आक्रोश होता. त्यामुळे राजा यांना मोठीच लोकप्रियता लाभली. परिणामी राजा यांच्याकडे चळवळीचे नेतृत्व आपोआप चालून आले.

- Advertisement -

राजा ढाले चांगले कवी, वाचक, संपादक, लेखक होते. त्यांची स्मृती शेवटपर्यंत टिकून हेाती. पुस्तकाचा त्यांचा मोठा संग्रह होता. तर्कशास्त्रावर त्यांची मोठी पकड होती. एखाद्या गोष्टीचा तर्कवाद करताना समोरच्याला ते निष्प्रभ करत. त्यांच्या तावडीतून भलेभले साहित्यिक सुटले नाहीत. राजा ढाले यांनी दलित चळवळीला बौद्धिक पातळीवरच्या संघर्षाची प्रेरणा दिली. लोकांच्या प्रश्नांवर लढणारा हा माणूस होता. दलित पँथर किंवा त्यांनी स्थापन केलेल्या मास मुव्हमेंट संघटनांचा पुढे कित्येक वर्षे कार्यकर्त्यांवर मोठा प्रभाव राहिला. राजा ढाले हे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर 1999 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण निवडून आले नाहीत. 2004 साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली. मराठीतली सत्यकथेची ‘सत्यकथा’ यांनीच लिहिली आणि महाराष्ट्रातल्या एका खेड्यात दलित तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्न करणारा काळा स्वातंत्र्यदिन हा लेखही यांनीच लिहिला. प्राचीन काळात किल्ल्यात राहून गडकिल्ल्यांचे अहोरात्र संरक्षण करणारे आणि युद्धात आघाडीवर भला मोठा फडकणारा ध्वज घेऊन उभे असणारे लोक म्हणजे ढाले, असा खुद्द राजा ढालेंनीच आपल्या आडनावाच्या लोकांचा इतिहास शोधून काढला होता. हे लोक ध्वज खाली पडू देत नसत. एक घायाळ झाला की दुसरा त्याची जागा तडफेने घेऊन ध्वज वरच्यावर झेलत असत. तापसी, मेरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आदी लघुनियतकालिके आज उपलब्ध नाहीत. या अनियतकालिकांत राजा ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन आणि संपादने हे सारे साहित्य विखुरलेले आहे. ढालेंच्या आयुष्याचे तपशील फारसे उपलब्ध नाहीत. स्वतः ढालेंनीही हे निगुतीने जपण्याचा आणि प्रस्थापित होण्याचा खटाटोप केलेला नाही. असे मातीच्या उदरात लुप्त झाल्यासारखे परंतु आतमध्ये अद्याप जिवंत असणारे झरे शोधून त्याचे पाणी सर्वांपर्यंत आणण्याचे काम अतिशय दुष्कर असते. ते हाती घेणे हेच एक दिव्य असते. राजा ढाले यांनी हा दिव्य प्रकार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

सामाजिक उत्क्रांती घडवून आणल्यानंतरही राजकारणात न जाण्याचा निर्धार राजा ढाले यांचे वैशिष्ठ्य. राजकारणामुळे माणूस स्वार्थी बनतो आणि सगळे भ्रष्ट आहेत, हे स्पष्ट दिसते. त्यामुळे आपल्याला सामाजिक क्रांती करायची आहे आणि तळागाळातल्या दलित माणसाला वरती आणायचे आहे, असे नेहमी म्हणणारे राजा ढाले यांना राजकारण मात्र सोडत नव्हते. यातूनच दोनदा निवडणुका लढवण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. दलितांवरील अत्याचारावर केवळ साहित्यातून आसूड ओढून चालणार नाही, त्यासाठी सक्रिय लढाई दिली पाहिजे, या विचाराने अस्वस्थ झालेले ढाले समाजावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात कृतीशील होण्याच्या विचारात होते. त्याच वेळी नामदेव ढसाळ यांच्यातील अंगाराने नवा प्रकाश पाडला आणि दोघांच्या संयुक्त प्रयत्नाने आधी युवक आघाडी स्थापन झाली. त्यानंतर तिचे दलित पँथरमध्ये रूपांतर झाले. अ‍ॅट्रॉसिटीच्या वाढत्या घटनांविरुद्ध आक्रोश, 1974 मधील वरळीतील दंगलीचा विषय अशा अनेक प्रकरणांमधून पँथर नावारूपाला आली. दरम्यानच्या काळात भाई संगारे, रामदास आठवले, अविनाश महातेकर हे नेते म्हणून पँथरमध्ये पुढे आले, पण प्रत्येकाच्या काही ना काही कमजोर्‍या होत्या. मुळाशी असलेल्या लोकांनीच स्वार्थापायी विद्रोह केल्याने चळवळ लयाला गेली. मुळात एकात्मता पाहिजे, तीच नव्हती. त्यामुळे नंतर ते फुटत गेले. दलित पँथरच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून हे चुकत गेले. राजा ढाले मात्र यांच्यात वेगळे होते, ते ध्येयवादी, निश्चयी, प्रामाणिक आणि तत्ववादी होते, त्यामुळेच त्यांचे राजकारणाशी नाते जुळले नाही आणि त्यांचा शेवटही पँथर याच ओळखीने झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -