घरफिचर्ससर्वसामान्यांची इच्छाशक्तीच करोनावर मात करेल

सर्वसामान्यांची इच्छाशक्तीच करोनावर मात करेल

Subscribe

अपुर्‍या आरोग्य व्यवस्था व सुविधा देखील करोनाला रोखू शकतात आणि केवळ लॉकडाऊनमुळे रोखता येते, हा प्रयोग भारताने यशस्वी करून दाखवला आहे. अवघे जग आरोग्य सुविधा वाढवित होते आणि आपली साधने नव्या औषधाच्या संशोधनाला खर्च करत होते. तेव्हा भारताने फक्त लॉकडाऊन व गरजूंना कोठारे उघडी करून जगवण्याचा उपाय योजत करोना रोखून दाखवला आहे. तब्बल एक महिना उलटून गेल्यावरही भारताचा रुग्णांचा आकडा इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि मृतांचा आकडा अजून हजारपर्यंत जाऊ शकलेला नाही.

मार्च महिन्याच्या २४ तारखेला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच मध्यरात्रीपासून २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे देशभरात खळबळ माजली होती. सलग २१ दिवस म्हणजे तीन आठवडे घरातच बसायचे आणि घराबाहेर पडायलाही प्रतिबंध होता. त्यामुळे १३० कोटी लोकांना सक्तीने घरात बसवणे अशक्य गोष्ट होती. करोनाचे जगावर होणारे परिणाम बघणार्‍या कुठल्या अडाणी माणसालाही अशा स्थितीत स्वत:ला बंदिस्त करून घेण्यातली सुरक्षा सहज कळते. ती माणसाची किंवा कुठल्याही सजीवाची उपजत जाणीव असते, पण ज्यांच्या त्याच जाणिवा बोथटलेल्या असतात, तेवढ्याच मूठभरांना त्याची जाणीव होऊ शकत नसते आणि असे लोकच नसत्या शंका काढत असतात.

म्हणूनच पंतप्रधान आपल्याला कसले आवाहन करीत आहेत आणि त्यात सक्ती नसून कर्तव्याची अपेक्षा आहे, याचे भान बहुतांश भारतीयांना होते. त्यामुळे आता दीड महिना उलटून गेल्यावर जगाकडून मोदींची पाठ थोपटली जाते आहे, त्याचा खरा मानकरी असाच सामान्य भारतीय नागरिक आहे. कारण नुसती सक्ती, कायदा वा प्रशासनाच्या बळावर हा लॉकडाऊन यशस्वी होऊ शकला नसता. मोदींनी त्याला जन आंदोलन बनवले आणि त्यात सामान्य माणसाला सहभागी करून घेतले. त्यामुळे हे यश मिळाले आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटना असो किंवा जगभरचे पुढारलेले देश असोत, त्यांच्याकडून भारताच्या अफाट लोकसंख्या व गरीब लोकांनी पाळून दाखवलेला लॉकडाऊन कौतुकाचा विषय झाला आहे. अपुर्‍या आरोग्य व्यवस्था व सुविधा देखील करोनाला रोखू शकतात आणि केवळ लॉकडाऊनमुळे रोखता येते, हा प्रयोग भारताने यशस्वी करून दाखवला आहे. अवघे जग आरोग्य सुविधा वाढवित होते आणि आपली साधने नव्या औषधाच्या संशोधनाला खर्च करत होते. तेव्हा भारताने फक्त लॉकडाऊन व गरजूंना कोठारे उघडी करून जगवण्याचा उपाय योजत करोना रोखून दाखवला आहे. तब्बल एक महिना उलटून गेल्यावरही भारताचा रुग्णांचा आकडा इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि मृतांचा आकडा अजून हजारपर्यंत जाऊ शकलेला नाही.

मग महिनाभरात नुसत्या उपासमारीने लाखो लोक मरण्याच्या भाकिताचे काय झाले? अशाच एका विद्वानाने इथून अमेरिकेतील लॉस एन्जलीसच्या दैनिकात तसे भाकीत केले होते आणि त्याला दुजोरा देणारे इथलेही काही माध्यमवीर होतेच. अशा अडकून पडलेल्यांना धीर देण्यासाठी मोदींनी टाळ्या थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. एके दिवशी घरातले दिवे मालवून पणत्या दिवे लावण्याने उभारी आणण्याचा प्रयास केला, त्याची टिंगल करण्यात असे शहाणे गर्क होते. टाळ्या वाजवून करोना पळाला का? असे सवाल कोण विचारत होते आठवते? घरातले दिवे मालवले तर वीज उत्पादन केंद्राचा बोजवारा उडेल म्हणून भीती कोण घालत होते? मित्रांनो आपण करोनाला सहज हरवू शकतो. त्याच्यापेक्षाही घातक असे हे नैराश्याचे विषाणू असतात. या महिन्याभरात त्यांनाच आपण पळवून लावले किंवा पराभूत केले आहे. ती मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. कोट्यवधी सामान्य लोकांच्या सामूहिक इच्छेतले ते बळ आहे.

- Advertisement -

आज 130 कोटी लोकसंख्येला काटेकोर कर्फ्यूमधून जगवणे व आवश्यकतेनुसार साधनांचा पुरवठा करणे किती अशक्य कोटीतले काम आहे. अखंड भारताचा लॉकडाऊन म्हणजे त्याच्या लाखोपटीने अधिक लोकसंख्येला जगवायचे व धीर धरायलाही समजवायचे आहे. तिथे गणिते, विज्ञान वा बुद्धीवाद कामाचा नसतो. कालचे नियोजन आज निरूपयोगी ठरत असते. कालचा किमान पुरवठाही आज चैनीचा वाटावा इतकी हलाखीची परिस्थिती ठरू शकत असते. त्यामुळे क्षणाक्षणाला उपलब्ध साहित्य व त्याचा अधिक गरज असलेल्यांपर्यंत वेळेतला पुरवठा, निर्णायक महत्त्वाचा असतो. आज भारतातला प्रत्येक मुख्यमंत्री, अधिकारी, सामान्य डॉक्टर वा अन्य धोरणकर्ते अंमलदार कुठल्या चक्रव्यूहातून देशाला बाहेर काढू बघत आहेत; त्याचे हे जगडव्याळ वर्णन आहे. कुठे काय किती पोहोचले, त्यापेक्षा कसे पोहोचले त्याची नवलाई अधिक आहे. तिथे प्रत्येक नागरिकाने कुठलेही शब्द बोलल्याखेरीज दुसर्‍याची कृती व भावना समजून घेण्याला प्राधान्य आहे. रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे लाईट घालवून दिवे पेटवण्यातून काय साधले ते कधीच कळणार नाही, पण ते भारतातल्या उपाशी पोटी झोपणार्‍या करोडोंना कळते म्हणून त्यांनी डोक्यावर धड छप्पर नसलेल्या झोपडीच्या दारातही पणती मेणबत्ती पेटवली. दुसरीकडे देशातला सर्वात श्रीमंत म्हटले जाणारे मुकेश अंबानी किंवा उद्योगपती रतन टाटांनीही आरतीचे तबक घेऊन त्या झोपडीवासी उद्ध्वस्त भारतीयाची बरोबरी केली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या दोन पिढ्या कमालीच्या हलाखीत गेलेल्या आहेत. दुष्काळातून किती लोक गाववस्त्या सोडून शहरात पोहोचले आणि रस्त्यावर संसार मांडून त्यांनी पुढला भारत उभा करण्यासाठी योगदान दिले. तेव्हा त्यांनी अनुदानाने आम्हाला जगवा म्हणून वाडगा हाती घेतला नव्हता किंवा त्यांच्या न्यायासाठी कोणी सुखवस्तु बुद्धीमंत झोळी घेऊन भिका मागत फ़िरत नव्हते. अन्नाचे इतके दुर्भिक्ष्य होते की अमेरिकेत गुरांसाठी पिकवले जाणारे गहू भारतीयांना सवलतीच्या दराने अमेरिकेने पुरवले आणि तेच गुरांसाठीचे तांबडे गहू पीएल ४८० नावाने रेशनवर वितरीत व्हायचे. तितक्यातही देश सुखी होता आणि कुठल्याही संकटावर मात करायला उभा रहात होता.

तशाच स्थितीत या भारतीय समाजाने चिनी आक्रमण पचवले आणि पाकिस्तानशी दोन लढाया जिंकून दाखवल्या होत्या. खायला अन्न अपुरे असताना पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी एकवेळचे अन्न सोडा म्हणून आवाहन केले, तरी लोकांनी भूक मारली. हे परके संकट असे निवारून नेलेला, हा भारतीय समाज किंवा त्याची कुवत नेहरूंनी आयडिया ऑफ़ इंडियात लिहून ठेवलेली नाही. मग त्यावर बुद्धी पोसलेल्या विचारवंतांना त्याचा थांगपत्ता कशाला असेल? आणि त्याच कालखंडात तो इन्फ़्लुएन्झा अंगावर चाल करून आला होता. प्रत्येक घरात कोणीतरी आजारी होता आणि आजच्या इतकी अद्ययावत खासगी किंवा सार्वजनिक इस्पितळेही उभारलेली नव्हती, पण एकमेकांना हात देऊन सहाय्य करून प्रसंगावर मात करणारी सामान्य माणसे होती. साधनसामग्री नव्हती वा तुटपूंजी होती, पण इच्छाशक्ती जबरदस्त होती. आजही ती इच्छाशक्ती सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्यामुळेच करोनावर मात करणे फारसे कठीण नाही.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -