घरफिचर्सकेवळ अविस्मरणीय!

केवळ अविस्मरणीय!

Subscribe

काही चित्रपट असे असतात की, विसरायचं म्हटलं तरी ते शक्य नसतं. अविस्मरणीय असंच त्यांचं वर्णन करावं लागतं. कारण त्यांनी तुम्हाला पुरतं झपाटून टाकलेलं असतं. या ना त्या निमित्तानं त्यांची आठवण येतंच असते. त्यातच तो चित्रपट डेव्हिड लीन यांच्यासारख्या महान दिग्दर्शकाचा असला तर विचारायलाच नको. त्यांचं गारूड उतरायलाच तयार नसतं. म्हणजे त्यांचं नाव काढलं की लगेच ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय, लॉरेन्स ऑफ अरेबिया, डॉ. झिवागो असे चित्रपट डोळ्यासमोर येतात. त्याच माळेतला, रायन्स डॉटर हा एक...

तसं पाहिलं तर आधीच्या चित्रपटांची कथानकंच सारं काही भव्य दिव्य पाहिजेत, अशी मागणीच करायची आणि लीन यांनी त्यांना 70 एम.एम. मध्ये चित्रित करून पुरेपूर न्याय दिला आहे. पण रायन्स डॉटरची कथा तसं म्हटलं तर साधीसुधी प्रेमकथा आणि विवाहबाह्य प्रेमाची कथा वाटावी, अशी आहे. पण खरं तर ती तेवढी साधी नाही. कारण ही कथा घडते आयर्लंडमध्ये आणि तीही सिन फेननं पहिल्या महायुद्धाच्या काळात (इंग्लंडविरुद्ध) केलेल्या रक्तरंजित उठावाच्या त्या काळातली.गाव किरारी, नायिका रोझी रायन तिथलीच. तिचं एका शिक्षकाबरोबर, चार्ल्ससबरोबर् लग्न झालंय. तो तिच्याहून वयाने जरा जास्तच मोठा आहे. तरीही त्याच्या पूर्ण प्रेमात पडली आहे. परंतु विवाहाच्या पहिल्याच रात्रीच त्यांच्यातील शरीरसंबंध तितका आश्वासक ठरत नाही. नंतर ती गावापासून दूर असलेल्या आपल्या पतीबरोबर घरी येते.

तिथं तरी नवरा मोकळेपणानं प्रेम करील. असं तिला वाटत असतं. पण तो थंडपणे घर लावण्यात गर्क होतो. तिची अधीर नजर काळवंडते. रोज रात्री तो वह्यांचे गठ्ठे तपासत बसतो आणि ती विणकाम करत. ती एकदा आपलं प्रेम व्यक्त करते तेव्हा तो समजूतदारपणं म्हणतो की, मला काही तुझं तारुण्य हिरावून घ्यायचं नाहीय. त्याची प्रचिती तिला लवकरच येते. उत्फुल्ल जगण्याची तिची इच्छा कोमेजून जाते. ती त्या अवस्थ्ेत समुद्रकाठी भटकते. गावचा पाद्री तिची अवस्था ओळखतो. विचारतो: तुला आणखी हवंय तरी काय? त्यावर ती म्हणते, हो.. हवंय फादर, मला अधिक हवंय. पण ते अधिक काय ते मात्र मला सांगता येत नाही.

- Advertisement -

आयरिश क्रांतिकारकांच्या बंदोबस्तासाठी आलेल्या ब्रिटिश सेनाधिकार्‍याच्या – रँडॉल्फ डोरियन- रूपात तिला ते अधिक भेटते. बापाच्या बारमध्ये तिला तो आवडतो. ती त्याला व्हिस्की ओतून देते. दूर जाऊन वाचत बसण्याचा आव आणते. गावचा वेडा मायकेल हे पाहत असतो. तो आपला बूट शेजरच्या भिंतीवर आपटू लागतो. त्याची लय वाढतच जाते आणि डोरियनचा चेहरा विकल बनतो. त्याच्या डोक्यात युद्धातले बाँम्बस्फोट घुमू लागतात. आगडोंब उसळतो. त्याला घेरीच येते. रोझी त्याला तेथून बारच्या बाहेर ढकलते. त्याला सावरायला लागते. आणि त्याच प्रक्रियेत एकमेकांच्या मिठीत ते शिरतात. मिलनाचा तो बेभान क्षण तिला वेड लावणारे अप्राप्य प्रेम अर्पण करतो. नंतर त्यांच्या प्रेमाला उधाण चढते. ती घराबाहेर सटकून त्याच्याबरोबर हिंडायला लागते. कधी जंगल तर कधी समुद्रकाठी, कधी खडकातल्या कपारीत वा गुहेत शिरून जग विसरतात. सुरुवातीला चार्ल्स समजत असतो की ती एकटीच घोड्यावरून रपेट करते. तो समंजसपणं तिला विचारतो. तू पाप तर करत नाहीयेस ना? ती त्याला मिठी मारून कृतीनंच उत्तर देते. तो निश्चिंत होतो. पण त्याला डोंगरी फुलं देणार्‍या रोझीच्या टोपीवर समुद्राच्या वाळूचे आलेले कण त्याला सारंकाही सांगून जातात. चार्ल्स विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रकिनार्‍यावर गेलेला असताना त्याला जोडीने उमटलेले पावलांचे ठसे दिसतात. एक युद्धात जायबंदी पाय झालेल्या डोरियनचे आणि दुसरे? या विचारानं तो सैरभैर होतो. डोळ्यापुढं रोझी डोरियनचं चित्र दिसतं. तो घायाळ होतो. रोझी डोरियनचं प्रकरण गावात पसरतं ते वेड्या मायकेलमुळं. त्यानं त्या दोघांना गुहेत जाताना पाहिलेलं असतं. नंतर तो तिथं जातो. त्याला लष्करी फीत मिळते ती कोटाला लावून तो येतो. टवाळांसमोर ती मिरवतो आणि रोझी येताच तिला सॅल्यूट ठोकतो, ती सेनाधिकार्‍याची जोडीदार नाही का? गावकर्‍यांना सत्य उमगतं.

तेवढ्यातच जर्मनांनी क्रांतिकारकांसाठी आणलेले शस्त्रास्त्रांचे पेटारे समुद्रात टाकलेले कळतात. उफाळणार्‍या विक्राळ लाटांमधून आणि भरीला भर म्हणून खडकाळ किनार्‍यावरून ते मिळवायचा प्रयत्न करायचा असतो. क्रांतिकारकांना टॉमची आठवण होते. कारण त्याचा क्रांतिकारकांबरोबरचा फोटो त्याच्या बारमध्ये असतो. ते त्याला गावकर्‍यांची मदत मिळवून द्यायला सांगतात. खरं तर तो फितूर असतो आणि ब्रिटिशांना बातम्या पुरवत असतो. तो लगेच ही बातमीही कळवतो. उभा गाव आता क्रांतिकारकांच्या मदतीसाठी धावतो. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून टॉम देखील त्यांच्यात सामील होतो. मोठ्या प्रयत्नांनी ते पेटारे किनार्‍यावर आणून लॉरीत भरले जातात. पण लॉरी थोडी पुढं जाताच डोरियनच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश लष्कराची तुकडी त्यांना अडवते. तो लॉरी ताब्यात घेतो. क्रांतिकारकांना अटक करतो. चार्ल्स रोझीला जाऊ देतो. इतकं सारं होऊनही रोझीमधील अभिसारिका आपला उद्योग लगेच सुरू करते. आवेगानं डोरियनकडं जाऊन त्याच्या मिठीत शिरते. पण नेमका तेव्हाच खिडकीत आलेला चार्ल्स हे दृश्य बघतो. तो हताश होऊन एका खडकावर जाऊन बसतो. इकडं रोझी चार्ल्सचा तास घेण्याचा प्रयत्न करते. पण मुले तिरस्कारानं निघून जातात. ती घरी येते. फादर कॉलिन्स चार्ल्सला कपडे देऊन घरी पाठवतो. तो आता एक निश्चय करून आलेला. तो रोझीला आता आपण काही एकत्र राहू शकणार नाही, सामानाचे पैसे आपण … असं सांगत असतो.

- Advertisement -

पण तो पुढं काही बोलणार तोच बाहेर गलका ऐकू येतो. सारा गाव संतापानं गोळा झालेला असतो. रोझीनंच डोरियनला माहिती पुरवली अशी त्यांची खात्री असते. शिक्षा? तिची जाहीर विटंबना! हीच शिक्षा तिला योग्य. ते रोझीच्या कपड्यांना हात घालतात. तिचे सोेनेरी केस कापून टाकतात. चार्ल्सला त्यांनी पकडून ठेवलेलं असतं. तो काहीच करू शकत नाही. डोळे तेवढे मिटून घेतो. तेवढ्यात फादर कॉलिन्स येतो आणि गावकर्‍यांना ओरडतो. ते काढता पाय घेतात. तो रोझी आणि चार्ल्सला घरात नेतो आणि गाव सोडून जाण्याचा सल्ला देतो. इतक्यात स्फोटाचा आवाज ऐकू येतो. डोरियनने स्वतःवर गोळी झाडून घेतलेली असते. चार्ल्स-रोझी गाव सोडून जायला निघतात. त्यांना निरोप द्यायला फक्त फादर कॉलिन्स आणि वेडा मायकल येतात. बाकी गावकरी त्यांचं दर्शनही नको म्हणून दारं लावून घेतात. एक मुलगी मात्र हळूच बाहेर येऊन वाटेत एक फूल ठेवून जाते. ती चार्ल्सची विद्यार्थिनी असते आणि तिला या दोघांची काही चूक नाहीय, हे माहीत असतं. तिनंच तर सारं गाव समुद्रावर गेलंय, तुम्ही इथं काय करताय? असं म्टल्यावर ते समुद्रावर गेलेले असतात.

रोझी बापाच्या दुकानात जाऊन त्याचा निरोप घेते. तो मेलेल्या नजरेनं तिच्याकडं पाहतो. केविलवाणेपणं दोन शब्द बोलतो. ज्या मायकेलचा लग्नानंतर औपचारिक मुका घेण्याचे रोझीनं टाळलेलं असतं, ती बसमध्ये बसण्यापूर्वी त्याच्या गालावर कृतज्ञतेनं ओठ टेकते. बस सुरू होते. कॉलिन्स आणि मायकेल जड पावलांनी त्याच वाटेवरून गावाकडे वळतात. चित्रपट संपतो तरी प्रेक्षक सुन्न मनानं काही काळ बसूनच राहतात.असा हा चित्रपट पण या कथेला डेव्हिड लीनचा परिसस्पर्श झाल्यावर ती केवढी प्रभावी होते ते पाहून आपण थक्क होतो. त्याला साथ कलाकारांची. सारा माइल्स (रोझी), रॉबर्ट मिचम (चार्ल्स), जॉन मिल्स (मायकेल), क्रिस्टेफर जोन्स (फादर कॉलिन्स) आणि ट्रेव्हर हॉवर्ड (टोनी रायन) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आणखीही दोन पात्रे आहेत. गावातला एकमेव मोठा रस्ता आणि समुद्र. समुद्राचा एवढा सुंदर तितकाच प्रभावी वापर क्वचितच करून घेतला गेला असेल. समुद्राची सारी सारी रूपं आपल्यासामोर येतात. वातावरण निर्मितीला मोठाच हातभार लावतात. विशेषतः खवळलेल्या समुद्रातून शस्त्रांंचे पेटारे बाहेर काढण्याचे प्रयत्न पाहत असताना श्वास नकळत रोखला जातो. आधीच्या काही दृश्यांत मुलायम वाळूशी लाडानं गोष्टी करणार्‍या आणि हळूच येऊन फेसाळ लाटांनी पायांना स्पर्श करणार्‍या समुद्राचं शांत लोभस, आकर्षक अगदी हवंहवंसं वाटणारं रूप, इथं मात्र खडकाळ किनारा आणि त्यामुळं निर्माण झालेले भोवरे थरकाप निर्माण करतात.

रस्त्याचंही तसंच आहे. खरं तर प्रथम दरिद्री, गलिच्छ आणि जणू परमेश्वाच्या कोपाची अभद्र साथच लाभली आहे, असं वाटणारा तो रस्ता. त्याचं रूप प्रसंगानुरूप होत जातं. शेवटी निर्जन रस्ता आणि त्यावरून गाव सोडून जाणारे चार्ल्स आणि रोझी. आणि परतणारे कॉलिन्स आणि मायकेल हे आठवतच राहतात. अन्य पात्रांनीही अप्रतिम कामगिरी केली आहे. लग्नाच्या रात्रीच्या नृत्याच्या वेळी गावकर्‍यांचा उत्साह अगदी ओसंडून कसा जातो तो बेभान बेताल असला तरी भारून-भारावून टाकणारा असतो. पण अखेरीला फितुरी झाल्याच्या संशयावरून त्याच गावकर्‍यांच्या डोळ्यातील आग, आसमंत जणू जाळून टाकणारा त्यांचा संताप तर धडकी भरवणारच असतो. प्रत्येक दृश्य हे जणू एक सुरेख चित्रच वाटावं एवढा कॅमेर्‍याचा प्रभाव आहे. त्यामुळंच सव्वातीन तासांच्याही वर चालणारा हा चित्रपट अखेरपर्यंत खिळवून ठेवतो. कुठंही कंटाळवाणा होत नाही.चार्ल्सच्या पावलाच्या ठशांवर पावले टाकत जाणारी रोझी, वार्‍यानं उडवलेल्या टोप्या मिळवण्यासाठीची धावपळ कशी अर्थपूर्ण आहे, हे उमगतं. टोपीचा पाठलाग करणारे लोक, आणि नंतर त्याचा प्रतिकात्मक अर्थ आपल्याला कळतो.

-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -