Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स स्त्री विरोधात पुरुष : सत्ता आणि समाजकारण

स्त्री विरोधात पुरुष : सत्ता आणि समाजकारण

सत्तेसाठी महिलांचा वापर करण्याची परंपरा राजकारणाइतकीच जुनी आहे. युद्ध, कलह आणि राजकारणाला कारण महिला असल्याचे इथल्या समाज संस्कृती आणि साहित्याने आधीच ठरवलेले आहे. त्यामुळे नैतिक अनैतिकतेची व्याख्याही इथे सत्तेकडून सोयीनुसार बदलण्यात आलेली आहे. महिलांना न्याय देण्याची गरज इथल्या समाजपुरुष, सत्ता आणि व्यवस्थेला कधीही नसते. महिला ही शोषणाचे साध्य, साधन असते आणि माध्यमही असते. व्यवस्था गरजेनुसार हवा तसा केवळ तिचा वापर करत असते.

Related Story

- Advertisement -

अमेरिकेतील निवडणुकीनंतर ट्रम्प समर्थकांच्या गोंधळामुळे जगातील जुन्या लोकशाहीची स्थितीही इतरांपेक्षा वेगळी नाही, हे स्पष्ट झाले आहे. मोठा काळानंतर सत्तेवरून पायउतार झाल्यावर ट्रम्प समर्थक बिथरणारच होते. मात्र त्यांचे बेलगाम वर्तन प्रतिनिधींच्या सभागृहाच्या पायरीवर धडाका देण्यापर्यंत गेल्याने सत्तेसाठी काहीही आणि सत्तेशिवाय काहीच नाही, यापेक्षा वेगळी अवस्था जगभरातील सत्तापिपासूंमध्ये निर्माण होत नाही. याबाबत सर्वच लोकशाही व्यवस्थेत सत्तेच्या गरजेची तडफड सारखीच असते. आपल्याकडची स्थितीही काही वेगळी नसतेच, सत्तेसाठी काहीही म्हणताना सत्ता नसलेल्या कथित नैतिकतेकडून सत्ताधार्‍यांवर अनैतिकतेचा आरोप होतो. अनैतिकतेच्या आरोपाला कायद्याच्या कसोटीवर सिद्ध करण्याची गरज कायद्याला असते, समाज समुदायाला नाही. कायद्यासाठी प्रत्येक गुन्हा हा दिलेल्या कलमांखालील निर्देशानुसार सिद्ध व्हावा लागतो. मानहानीची रक्कम कायदा ठरवू शकतो, परंतु मानाची नेमकी किती टक्के हानी झाली, हे तपासणारे गणक यंत्र समाजव्यवस्थेत अस्तित्वात नसते. समाजाला त्याची गरजही नसते इथं आरोप हेच साधन आणि साध्य असते. एखाद्या महिलेवर अनैतिकतेचा आरोप करून तिला आत्महत्येच्या गुन्ह्याकडे ढकलणारी समाजव्यवस्था जशी कारण असते तशीच एखाद्या पुरुषावरही अनैतिक वर्तनाचा आरोप करून त्यालाही नामोहरम करण्याची संधी समाजाला मिळते.

देशातील ‘मी टू’ चळवळीनंतर या दोन्ही घटकातील संघर्ष समोर आला होता. यातील सत्य किंवा खरेखोटे तपासण्याची समाजाला गरज नसते. केवळ झालेल्या आरोपातून आपले राजकीय हेतू साध्य करण्याची आवश्यकता इथे महत्वाची असते. त्यामुळे राजकारणातही अनैतिकतेच्या आरोपाचे हत्यार उपसले जाण्याचा इतिहास आपल्या संस्कृतीइतकाच जुना आहे. इथं महिला किंवा पुरुष असा फरक नसतो तर केवळ व्यक्तीचे नैतिक पतन हाच हेतू स्पष्ट असतो. पण नैतिकतेची नेमकी व्याख्या काय, या विषयावर वर्षानुवर्षे चर्चेचे आणि चिंतन मंथनाचे गुर्‍हाळ सुरू आहे, पण त्यातून नैतिकतेची नेमकी व्याख्या कुणालाच करता आलेली नाही. एखादी गोष्टी एखाद्यासाठी नैतिक असेल तर ती दुसर्‍यासाठी तशी असेलच असे नाही. त्यामुळे नैतिकतेला अनेक पदर आहेत, काही वेळा  तर ती समाज घटकांनुसार बदलते, इतकेच नव्हे तर व्यक्तीगणिकही बदलू शकते. त्यामुळे कुणी कुणाला नाव ठेवावे हाही एक प्रश्न असतो. बरेच वेळा नैतिकतेच्या नावाने दुसर्‍यावर आरोप करणार्‍यांची स्थिती ही शेळीच्या शेपटीसारखी असते. ते दुसर्‍याकडे बोट दाखवतात, पण आपली मागील स्थितीही तशीच आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही, किंवा जाणून बुजून ते लक्षात घेत नाहीत. त्यात पुन्हा जेव्हा एखाद्या पुरुषाचा आणि स्त्रीचा विवाहबाह्य संबंध काही कारणामुळे उघड होेतो, त्यातही ती व्यक्ती सेलिब्रिटी त्यातही राजकारणातील नेता असेल तर मग लोकचर्चेला असा काही उत येत की काही विचारू नका. पूर्वी अशा चर्चा नाक्यानाक्यावर रंगायच्या. आता तुमच्या हातातील मोबाईल फक्त एक नाका नाही, तर त्यावर अनेक ग्रुप्स म्हणजे अनेक नाके असतात. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून अनेक नाक्यांवर एकाच वेळी चर्चा करता येते. ही चर्चा करताना ज्यांच्याविषयी आपण चर्चा रंगवत आहोत, त्याविषयी सत्य फारसे कुणाला माहीत असेलच असे नाही, केवळ तर्काच्या आधारावर अशा चर्चा पानाच्या विड्यासारख्या रंगविल्या जातात आणि त्याचा आस्वाद घेतला जातो. काही वेळानंतर त्या विषयाचा चोथा करून थुंकून टाकला जातो.

- Advertisement -

मोनिका लुईन्सकी प्रकरणानंतर अमेरिकेत तत्कालीन राष्ट्रध्यक्षांवरही जगभरातून टीकेला सामोरे जावे लागले. त्या तत्कालीन कथित नैतिकांना, अनैतिकतेवरील नैतिक टीका करण्याचा अधिकार बजावण्यासाठी सोशल मीडियासारखी आजच्यासारखी समाज चव्हाट्याची सोय नव्हती. राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांवर झालेल्या आरोपानंतर समाजमाध्यमांवर दोन गट पडले आहेत. यात सत्ताधार्‍यांचे समर्थक आणि विरोधक समोरासमोर उभे ठाकले आहेत.

अत्याचार किंवा विनयभंगाच्या आरोपाबाबत समाज कमालीचा संवेदन(शील) असतो, यात संवेदनेपेक्षा शीलभंगतेतच समुदायातील बहुसंख्यांकांना रस असतो. मात्र हा रस घेताना आपला चेहरा उघड होऊ नये यासाठी मग नैतिकतेचा नकाब लावून लढाई सुरू केली जाते. मोनिका लुईन्स्की प्रकरणानंतरही जगभरातून टीकेची झोड उठवल्यावर बिल क्लिंटन यांनी आपल्या कथित संबंधांची कबुली जगभरातील माध्यमांसमोर दिली होती. त्यानंतर मोनिकाच्या शीलभंगाबाबत आरोपांच्या फैरी जगभरातील पेपरात झडल्या होत्या.  परंतु प्रश्न हा असतो की, खरंच समाजाला महिलांच्या नैतिकतेविषयी असलेली तळमळ खरी असते का, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराच्या बातम्या वर्तमानपत्रातल्या थोडक्यातल्या पट्ट्यात नेहमीच येत असतात. ती रोजच्या भवतालमध्ये घडणारी सामान्य घटना असते,  इतकी उदासीनता त्याबाबत समाजाकडून दाखवली जाते.

- Advertisement -

महिलांवरील अत्याचार हा येथील इतका सामान्य विषय असतो.  परस्परसहमतीने झालेल्या प्रकारानंतर संबंधित महिलेच्या आरोपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने हा गुन्हा कसा, अशी नुकतीच केलेली टिप्पणी समाजातील नैतिकतेच्या मुद्यातील दांभिकतेचा पर्दाफाश करणारी असते. इथे अत्याचार आणि परस्परसहमती यातील फरकावर न्यायालयाने बोट ठेवले होते. विषय समाज समुदायाचा असल्यावर या फरकातील दांभिकता समाजमाध्यमांवर ठळक होत आहे. राज्यातील अत्याचार आरोप प्रकरणानंतर समाजमाध्यमांवर त्याबाबत ज्या टीका टिप्पण्या केल्या जात आहेत. त्यात करंट अकाऊंट, सेव्हींग अकाऊंट, घरचे, बाहेरचे अशा वर्णनातून ही टीका केली जात आहे. महिलेला समाजातील अकाऊंटवजा वस्तू मानणारी अशी टीका महिलांबाबत समाजपुरुषाच्या मनात असलेली लबाडी उघड करत असते.  ही टीका राजकीयच आहे हे स्पष्ट आहे. सत्तेचे राजकारण कधीही नैतिक अनैतिकतेच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळेच त्यामागे केवळ टीका आणि बदनामी हाच हेतू त्यामागे असतो. जुन्या सत्ताधारी  कुटुंबातील महिलेवरही अराजकीय टीका करणार्‍या मंडळींची मानसिकता आणि सद्यस्थितीतील होणारी टीका यात हे सामाजिक विकृती दर्शवणारे साम्य आहे.

महिलेकडून होणारा आरोप सिद्ध करण्याची समाज समुदायाला आणि राजकारणालाही गरज नसते. झालेल्या आरोपातून आपले राजकीय हेतू साध्य करण्याचीच इथं गरज असते. आतील आरोप हा मानहानीच्या कसोटीवर शिक्षेपेक्षा कमी नसतो. चोरी, घरफोडी, हाणामारीच्या आरोपात आरोपीला बाजू मांडायला कारणांचा नैतिक अधिकार असू शकतो. परिस्थिती, गरजेमुळे चोरी केल्याचे समाजाला ओरडून सांगता येते. त्यासाठी कायदा आणि समाजाकडून सहानुभूती मिळवता येऊ शकते.  मात्र अनैतिकतेच्या आरोपात तशी स्थिती नसते, अनैतिकतेच्या आरोपात बाजू सिद्ध करण्याची वाट पाहिली जात नाही.

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरातील महिलेवर आणि सिने अभिनेत्री कंगनावरही स्तर सोडून होणारी टीका ही आजारी मानसिकताच दर्शवते हे खरेच तसेच धनंजय मुंडेंच्या प्रकरणातही एका महिलेकडून आरोप झाल्यावर त्या महिलेवरही होणारी टीकाही समाजपुरुषाचे मानसिक आजारपण दाखवते. राजकीय, कला आणि सिनेक्षेत्रातील महिलांवर अनैतिक ठरवणे समाजपुरुषासाठी सोपे असते.  कधी सोनिया गांधींना विदेशी ठरवून त्यांच्यावर भारतीय संस्कृतीच्या अधःपतनाचा ठपका ठेवला जातो. स्मृती इराणींवर बिघडलेली बहू म्हणून आरोप केला जातो तर हेमा मालिनींवर मद्यपानाचा आरोप होता. हे आरोप दोन्ही गटातील महिलांवर केले जात असताना त्यात राजकीय हेतू व्यतीरिक्त समाजपुरुषाचे पुरुषी अहंकाराने भरलेले समाजमनही असते. आपल्यातील पुरुष वगळून महिलेला व्यक्ती म्हणून मान्यता देण्याची इच्छा समाजपुरुषाला कधीही नसते.

- Advertisement -