घरफिचर्सलॉकडाऊन गर्भात दडल्या संधी!

लॉकडाऊन गर्भात दडल्या संधी!

Subscribe

कोरोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता हळूहळू उठवण्यात येत आहे. रस्त्यावर बर्‍यापैकी चहलपहल सुरू झाली आहे. लोक कामधंद्याच्या निमित्ताने घरातून बाहेर पडू लागले आहेत. मुंबईतील लोकल बंद असली तरीही बेस्टच्या बस, टॅक्सी, खाजगी वाहनांनी लोक ये-जा करत आहेत. कोरोनाची भीती दिवसेंदिवस कमी होत असल्याचे जाणवत असताना सरकारी, महापालिका स्तरावरून नियमितपणे येणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी मात्र निश्चितच भीतीदायक आहे. राज्यात रोज किमान ८ हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनामुळे मृतांचा आकडा काही कमी होत नाही. दिवसाला २०० ते २५० लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत.

रात्री वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध होणारी ही आकडेवारी अथवा पहाटे वृत्तपत्रातून त्यांना मिळणारी ठळक प्रसिद्धी मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा विचार करायला लावणारी ठरत आहे. रस्त्यावरची रहदारी, उघडलेली दुकाने, नियमित होणारे व्यवहार हे कोरोना गेल्याचे संकेत देत असताना कोरोनाची आकडेवारी मात्र कोणालाही दरदरून घाम येणारी आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की हा कोरोना खरंच जाणार आहे का? की आपल्या जवळचे, नातेवाईक, मित्रमंडळींचे तो असेच नियमित बळी घेणार आहे? कोरोना कसा जाईल? त्याची लस कधी येईल? पुन्हा सर्वसामान्य जीवन जगात येईल का? वास्तविक कोरोना हा अगदी नवा विषाणू नाही. कमीअधिक प्रमाणात त्याची लक्षणे वा त्रास जुन्या कुठल्या तरी आजाराशी जुळणारा असला, तरी त्याची पसरण्याची कुवत अपार आहे. त्याने एका फटक्यात किंवा अवघ्या काही महिन्यात माणसाने मागल्या शतकात मेहनतीने उभे केलेले अवघे जग विस्कटून टाकलेले आहे. महाशक्ती वा प्रगत देश असल्या कल्पनाही धुळीला मिळवलेल्या आहेत.

- Advertisement -

भारतासारखा तुलनेने गरीब देश त्याच्याशी समर्थपणे सामना करीत असताना प्रगत युरोप व अमेरिकेने त्याच्यापुढे गुडघे टेकलेले आहेत. विविध अत्याधुनिक साधने व उपकरणेही तोकडी पडली असताना विपन्नावस्थेतला भारतातला कोट्यवधी नागरिक तुलनेने सुखरूप राहिलेला आहे. अतिशय विचारपूर्वक केलेली गुंतवणूक वा उभारलेले उद्योग व्यापार या रोगाने जमीनदोस्त करून टाकलेले आहेत. युरोपात तर जवळपास जुनी पिढीच कोरोनाने मारून टाकलेली आहे. त्यांनी शोधून काढलेली औषधे व उपचाराच्या सुविधा निकामी ठरवल्या आहेत. हजारो वर्षांपूर्वीचा मानव जसा अगतिक व हताश निराश होता, तशी अवस्था या आजाराने करून टाकली आहे. मग त्याच्यावर मात करण्यासाठी नव्या पद्धती व नवे उपाय शोधण्याला पर्यायच उरलेला नाही. जी स्थिती त्या आजाराची बाधा झालेल्या माणसाला वाचवण्याच्या बाबतीत आहे, त्यापेक्षा त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या विविध व्यवस्था नव्याने उभारण्याची समस्याही किंचित वेगळी नाही. ती कालची अर्थव्यवस्था, उत्पादन पद्धती वा वितरण वा व्यापार शैली यांच्यासह जीवनशैली यांना आता नव्या जगात स्थान नसेल. कित्येक वर्षात व पिढ्यातून तयार झालेल्या आपल्या सवयी कोरोनाने घातक ठरवल्या आहेत. त्यांना बदलताना जगण्याच्या अन्य क्षेत्रातील निकष व नियमही आमूलाग्र बदलावे लागणार आहेत. दोन माणसांमधले अंतर आता कायम जपायचे आहे.

हे अंतर जपताना भावनिकदृष्ठ्या होणारे आघातही सहन करायचे आहेत. नियमितपणे दुसर्‍या व्यक्तीकडे संशयाने बघायचे आहे. तर आपल्याकडेही संशयाने बघणार्‍या नजरा चुकवून दैनंदिन व्यवहार करायचे आहेत. हे व्यवहार करताना नातेसंबंधांना झालेच तर गुंडाळून ठेवायचे. जगायचे तर कशाला, असा प्रश्न वारंवार निर्माण होत राहील असेच एकूण वर्तन करायचे आहे. साहजिकच त्या जगण्याच्या शैली व सवयीलाच फाटा द्यायचा आहे. त्यामुळे त्यावर बेतलेल्या विविध व्यवस्था व रचनाही निरूपयोगी होऊन जातात. माणसाच्या आयुष्यातील जीवनावश्यक वस्तू वा सेवांमुळे व्यापार चालतो. सवयी बदलल्या तर त्या जीवनावश्यक वस्तू व सेवांचे स्वरूपही बदलून जातात. मग तेच बदलणार असेल तर आपोआप त्याचा बाजार बदलतो आणि उत्पादनाच्या प्रणाली बदलाव्या लागतात. अशा अनेक पद्धती, प्रणालींवर समाजाचे व जगाचे अर्थशास्त्र बेतलेले आहे. कोरोनापूर्वीचे जग आणि आजच्या जगातला मोठा फरक कोणता? अर्धे जग चीनमध्ये उत्पादित मालावर विसंबून होते आणि चीनही त्या अर्ध्या जगाला माल पुरवण्यासाठी उत्पादन करण्यावरच आपली अर्थव्यवस्था उभारून बसला होता. जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून आपल्याच देशातले अर्थशास्त्री चीनचे गुणगान करीत होते. बहिष्काराने फरक पडणार नव्हता, तर चीनला रोकड कशाला कमी पडू लागली आहे? त्याचे उत्तर कोरोना आहे.

- Advertisement -

जितका माल चीन उत्पादित करतो, त्यातला बहुतांश जगाला विकण्यावर चिनी जनतेची गुजराण होत असते. उत्पादित मालाला ग्राहक उरला नाही. कारण कोरोनाने त्याला दिवाळखोर केलेले आहे. त्याचा हिशोब वा परिणाम नव्या निकषांवर मोजावा लागणार आहे. त्याचाच पत्ता नसेल वा ते निकषच तयार नसतील, तर भविष्याचे आडाखे बांधता येणार नाहीत. बांधले तरी त्यात मोठी गफलत होऊन जाते. म्हणूनच चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची हेटाळणी करणारे तोंडघशी पडलेले आहेत. कोरोनाने जागतिक आरोग्य संघटनाच जमीनदोस्त करून टाकली आहे आणि त्याच रोगाने राष्ट्रसंघाला निरूपयोगीही ठरवून टाकलेले आहे. युरोपियन देशांची साम्राज्ये दुसर्‍या महायुद्धाने खालसा करून टाकली. वसाहतींवर राज्य करताना युरोपियनांनी जी शासनपद्धती व उत्पादन व्यवस्था उभारली, त्यातून स्थानिकांमध्ये स्वतंत्र होण्याची इर्षा निर्माण केली. त्यांना नंतर शस्त्राने धाकात ठेवणे अशक्य झाल्याने ती साम्राज्ये लयास गेली. आयात-निर्यात, व्यापार किंवा भांडवल यांच्या व्याख्याही नव्याने बनवाव्या लागणार आहेत. बाजारपेठ वा ग्राहकाची नवी व्याख्या होणार आहे, तसाच उत्पादक या शब्दाचा अर्थही बदलून जाणार आहे.

या आर्थिक अराजकामध्ये स्वयंभूपणे उभा राहू शकेल आणि आपली लोकसंख्या व उत्पादक ग्राहक यांचे योग्य समिकरण मांडून जगासमोर उभा ठाकणार, त्यालाच पुढल्या काळात जगाचे नेतृत्व करायला मिळणार आहे. भविष्यातल्या अर्थकारणाला नवी दिशा भारतच देऊ शकेल असे जगातले अनेक अनुभवी लोक उगाच बोलत नाहीत. कारण नव्या जगातले खरेखुरे भांडवल डॉलर, रुपया वा चलनी नाणे नसेल. तर जीताजागता कष्ट उपसू शकणारा मानव समाज हे भांडवल आहे. ती लोकसंख्या भारतापाशी आहे आणि ती अपुर्‍या साधने व उपायांनिशी कोरोनाला समर्थपणे टक्कर देऊन उभी आहे. आज भारतात कोरोनाने कहर केला असे म्हटले जात असतानाही अमेरिकेपेक्षा दैनंदिन बाधितांचा येणारा आकडा कमी आहे आणि कोरोना मृत्यूचे जगातले सर्वात किमान प्रमाणही भारतातच आहे. याचा अर्थ अशा रोगट संकटाशी समर्थपणे दोन हात करण्याची जीवनशैली भारतापाशी आहे. रोगप्रतिबंधक शक्तीचा तो साक्षात्कारच आहे.

एकीकडे चीनपाशी मोठी सज्ज उत्पादक व्यवस्था आहे; पण विश्वासार्हता गमावलेली आहे. दुसरीकडे जगाची निकड असलेल्या कोरोनाच्या लसीचे स्वस्त व कमाल उत्पादन वेगाने करू शकणारी क्षमता भारतापाशी उपलब्ध आहे. त्यातून मिळणारी विश्वासार्हता व्यापारी पद्धतीने कुशलतेने वापरली तर जगाला जीवनावश्यक वस्तूंचा सतत पुरवठा करू शकणारी उत्पादन व्यवस्था अल्पावधीत उभी करण्याची पात्रताही भारतापाशी आहे. यांची एकत्रित गोळाबेरीज केली, तर कोरोनानंतरच्या जागतिक रचनेची कल्पना करता येईल. या स्तरावर भारत कुठे असेल? तुम्ही, आम्ही सर्वसामान्य कुठे असू? आज आपल्यापैकी अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. काही जणांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत. अनेकजण रोजगारासाठी धडपडत आहेत. बर्‍याच जणांना भविष्य अंधारमय दिसत आहे. मात्र या अंधारात निश्चितच उद्याचा प्रकाश दडलेला आहे. एक संधी नाहीशी होते तेव्हा अनेक संधी दारावर उभ्या असतात. लॉकडाऊनमधील काळाचा अनेकांनी सकारात्मक उपयोग करून घेतला. स्वत:ला वेगळ्या मार्गावर नेऊन अर्थार्जन केले. यापुढेही अशा संधी आपली वाट पाहणार आहेत. अर्थात त्यासाठी आपण सज्ज असायला हवे. रात्रीनंतर पहाट होतेच; पण रात्रभर जागे राहून पहाटे डोळा लागला तर मात्र संपूर्ण दिवस हातचा निघून जातो आणि पुन्हा रात्री आ वासून उभी राहते. तेव्हा रात्रभर जागे राहिला असाल तर पहाट होण्याची प्रतीक्षा करा आणि कामाला लागा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -