आत्महत्येला स्वावलंबी पर्याय !

अंधेरी रेल्वे स्थानकावरून मेट्रोला जोडणार्‍या ब्रिजवर एक माणूस मला भेटला. हळूहळू त्याची ओळख वाढत गेली. तो दृष्टीहिन होता. त्याच्यासमोर वजनकाटा होता. त्यांचा संघर्ष ऐकून थक्क व्हाल. मनाला भिडणारा हा लेख नक्की वाचा ...

blind ashok parab
अशोक परब

अंधेरी रेल्वे स्थानकावरून मेट्रोला जोडणार्‍या ब्रिजवर एक माणूस मला भेटला. हळूहळू त्याची ओळख वाढत गेली. तो दृष्टीहिन होता. त्याच्यासमोर वजनकाटा होता. माणसी दोन रुपये असा भाव होता. पण पुढे जे उलगडत गेले ते काही वेगळेच होते. आत्महत्येला पर्याय म्हणावे असे काही तरी. ओळखी काढण्याचा माझा स्वभाव आहे. त्यामुळे जाता येताना लोकलमध्ये, बसमध्ये कुणी बर्‍यापैकी माणूस दिसला की त्याचे नाव गाव काय हे विचारतो. मी अंधेरीकर. माझं ऑफिस माटुंग्याला. अंधेरीला लोकलने उतरल्यावर मी मेट्रो पकडून आझाद नगरला उतरतो. अंधेरीला उतरल्यावर मेट्रोपर्यंत जाणारा एक ब्रिज आहे. त्यावरून मी नेहमी जातो. तीन वर्षांपूर्वी त्या ब्रिजवर मी एक माणूस पाहिला. तो माणूस अंध होता. त्याच्या पुढ्यात वजनकाटा होता. पुढे काही दिवस गेले. मी त्याच ब्रिजवरून जात होतो. पण त्या माणसाविषयी कुतूहल वाटतच होते.

 दृष्टीहिनतेबद्दल त्यांना विचारायचे होत नव्हते धाडस

त्याच्याविषयी कुठे तरी जवळीक वाटू लागली होती. काही दिवसांनी मी त्या माणसाला माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे विचारले, तुम्ही मराठी आहात. तुम्ही कुठे राहता? तुमचे गाव कुठले ? त्यावर तो माणूस म्हणाला की, मी अशोक परब. मी मालाडला तानाजीनगरमध्ये राहतो. माझं गाव सिंधुदूर्ग जिल्ह्यात कुर्ली. इतकं सांगून तो माझ्याशी मालवणीत बोलू लागला. मीही त्याला म्हणालो, माझंही गाव तुमच्या गावाजवळ आहे. मी जयवंत राणे. त्याचे बोलणे ऐकल्यावर सुरुवातीला मला धक्काच बसला. आपल्या गावचा माणूस म्हणून मग मी त्यांची येताजाता विचारपूस करू लागलो. बर्‍यापैकी ओळख झाली तरी त्यांच्या दृष्टीहिनतेबद्दल त्यांना विचारायचे धाडस होत नव्हते. कारण त्यांना काय वाटेल याची चिंता वाटत असे.

 दृष्टीहिनतेचे कारण ऐकून बसला धक्का 

पण एकदा धाडस करून विचारले. त्यावर ते म्हणाले मी जन्मांध नाही. मी तीन वर्षांचा असताना माझे आईवडील वारले. त्यानंतर काका-काकी मला गावी घेऊन गेले. एकदा इतर मुले ओेले काजू फोडून त्यातले गर खात होती ते मी पाहिले. मलाही गर खावेसे वाटले. म्हणून मी ओला काजू घेतला. तो काठीच्या ढमसाने फोडू लागलो.तेव्हा त्याचा चिक माझ्या दोन्ही डोळ्यात उडाला. डोळे प्रचंड झोंबू लागल्यामुळे मी चोळले. तिथेच सगळा घात झाला. त्या काजूच्या चिकामुळे माझी दृष्टी गेली. माझा पुढचा प्रवास सुरू झाला.

 १२ वीपर्यंत घेतले शिक्षण

अंधशाळेत माझे १२ वीपर्यंत शिक्षण झाले. जीवन पुढे नेटाने जगत राहिलो. आता मी दोन मुलांचा वडील आहे. मुलगी ग्रॅज्युएट झाली आहे. एक मुलगा आहे. हे ऐकूण त्यांना मी म्हणत असे की, आमच्यासारख्या माणसांसाठी तुम्ही खरे प्रेरणास्थान आहात. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही जीवन किती जिद्दीने जगत आहात. त्यावर ते म्हणत, काय करणार, आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.मध्यंतरी ते त्यांच्या जागेवर दिसत नव्हते. मलाही काही कळले नाही. मला वाटले. त्यांनी वजनकाटा घेऊन बसण्याची जागा बदलली असेल.

     जीवनाशी संघर्ष सुरूच 

पण एकदा अचानक ते वाटेत दिसले. मी त्यांना हाक मारून थांबवले. त्यांना विचारले, तुम्ही इतके दिवस कुठे होता? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकूण मला धक्का बसला. ते म्हणाले, माझा मुलगा रेल्वेतून पडला. गेले एकवीस दिवस कोमात आहे. नायर हॉस्पिटलला आहे. आता तिकडूनच येतोय. त्यावेळी काय करावे हे मला सूचेना. तरी माझ्या पाकिटात जी रक्कम होती ती त्यांच्याकडे दिली. त्यांना म्हणालो, काही तरी करूया. त्यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे होता. ऑफिसला गेलो. फोनवरून त्यांच्या मुलाविषयीची माहिती घेतली.

अशोक परब यांच्या जीवन जगण्याच्या जिद्दीला सलाम

त्याची बातमी दै.‘आपलं महानगर’सह आणखी काही वर्तमानपत्रांना दिली. या माध्यमातून परबांना अशा कठीण काळात आवश्यक असलेला आर्थिक निधी उभा झाला. त्यांचा मुलगा तीन महिने नायरमध्ये अ‍ॅडमीट होता. त्यानंतर त्याची प्रकृती बरीच सुुधारली. ते त्याला घरी घेऊन गेले. अगोदरच सोबत असलेलं अंधत्व, आणि त्यात ही कोसळलेली आपत्ती, त्याला आधार देणारी वजनकाट्याची माणसी दोन रुपयांची कमाई, अशा स्थितीत अशोक परब यांच्या जीवन जगण्याच्या जिद्दीला सलाम. सध्या आत्महत्या हा समस्या सोडवण्याचा सोपा पर्याय बनताना दिसत आहे. असे वाटणार्‍यांनी या माणसाच्या जीवनाचा थोडं थांबून जरूर विचार करायला हवा. जीवन जगण्याचा नवा पर्याय जरूर सापडेल.