घरफिचर्सबुरख्या बाहेरचं जग

बुरख्या बाहेरचं जग

Subscribe

चित्रपटाची गोष्ट चार नायिकांभोवती फिरते. चार बायकांची आणि त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांची ही गोष्ट. आयुष्यात काहीतरी बनण्याचं स्वप्न, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न, ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबरोबर आयुष्य घालवण्याचं स्वप्न, उतारवयात मनातल्या वासनेला वाट करून देऊन आयुष्यात रंग भरण्याचं स्वप्न, आयुष्य आनंदात घालवण्याचं स्वप्न, जे कपडे आवडतात ते बिनदिक्कत घालता येण्याचं स्वप्न, कडकडून किस करण्याचं स्वप्न, भरभरून सेक्स करून शरीराला तृप्त करण्याचं स्वप्न, कुटुंबासाठी, मुलांसाठी चार पैसे कमवण्याचं स्वप्न, नवर्‍याकडून नुसतं शरीर नाही तर मन उपभोगलं जाण्याचं स्वप्न.... अशा कित्येक छोट्या मोठ्या स्वप्नांची ही गोष्ट.

२०१८ संपत आलं आहे. या सालातील स्त्रीचं माणूस म्हणून असणं थोडंफार मान्य करणारी आणि दाखवणारी अशी एखादी हिंदी फिल्म असल्यास ती नक्कीच ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ ठरेल. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ( CBFC ) जेव्हा ह्या चित्रपटाला कात्री लावली आणि प्रदर्शनाची परवानगी नाकारली तेव्हाच लिपस्टिक अंडर माय बुरखाबद्दल उत्सुकता चाळवली गेली. अलंक्रिता श्रीवास्तव दिग्दर्शित “लिपस्टिक अंडर माय बुरखा ” हा चित्रपट कित्येक दिवस अस्वस्थ करून सोडतो. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एका पत्रात म्हटलं आहे की The story is lady-oriented, their fantasy above life, काय म्हणावं यावर ? फँटसी अबोव्ह लाईफ?? आयुष्याच्या पलीकडचं काल्पनिक विश्व… ह्या चित्रपटात बायकांना होणार्‍या जाणिवा, संवेदना आणि त्यांची एक व्यक्ती म्हणून जगता येण्याची धडपड दाखवली आहे. त्यामुळे कुठल्याच अँगलने ती फँटसी नाही. या एक माणूस म्हणून जगण्यासाठी लागणार्‍या साध्या गोष्टी आहेत. ह्यांना फँटसी म्हणणार्‍या बोर्डाला आणि त्यांनी दिलेल्या या शेर्‍यामुळे अजूनही आपण समाज म्हणून कुठे आहोत हे जाणवतं.

चित्रपटाची गोष्ट चार नायिकांभोवती फिरते. चार बायकांची आणि त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांची ही गोष्ट. आयुष्यात काहीतरी बनण्याचं स्वप्न, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न, ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबरोबर आयुष्य घालवण्याचं स्वप्न, उतारवयात मनातल्या वासनेला वाट करून देऊन आयुष्यात रंग भरण्याचं स्वप्न, आयुष्य आनंदात घालवण्याचं स्वप्न, जे कपडे आवडतात ते बिनदिक्कत घालता येण्याचं स्वप्न, कडकडून किस करण्याचं स्वप्न, भरभरून सेक्स करून शरीराला तृप्त करण्याचं स्वप्न, कुटुंबासाठी, मुलांसाठी चार पैसे कमवण्याचं स्वप्न, नवर्‍याकडून नुसतं शरीर नाही तर मन उपभोगलं जाण्याचं स्वप्न…. अशा कित्येक छोट्या मोठ्या स्वप्नांची ही गोष्ट.

- Advertisement -

उत्तम अभिनय, स्ट्राँग फिमेल कॅरेक्टर्स आणि बोल्ड स्क्रिप्ट ही ह्या चित्रपटाची जमेची बाजू. हा चित्रपट कुठेही उपदेशाचे डोस पाजत नाही ना बायका ज्या अडचणींना सामोर्‍या जातात त्यावर काही उपाय देतो. फक्त करून देतो ती जाणीव. अजून आपण किती मागे आहोत आणि सेक्शुअल लिबेरेशनपासून कोसो दूर आहोत ही बोचणी देऊन जातो आणि ही ह्या चित्रपटाची मला सगळ्यात आवडलेली गोष्ट. कोणी येऊन समाज बदलत नाही बसणार आपल्यासाठी. बदल आपल्याला स्वतःमध्ये करावा लागेल. स्वतःलाच स्वतः तयार केलेल्या आदर्श बायकोच्या, आईच्या, बहिणीच्या, स्त्रीच्या, नैतिकतेच्या, जाणिवांच्या, चूक – बरोबर विचारांच्या बेड्यांपासून मुक्त करावं लागेल आणि हेच हा चित्रपट सांगू पाहतो. प्रत्येकाने अनुभवावा असाच हा चित्रपट आहे. काही गोष्टी नक्कीच खटकतात. एक म्हणजे ह्या चित्रपटात सगळेच पुरुष बाईला समजावून न घेणारे आणि तिला काडीचीही किंमत न देणारे दाखवले आहेत. एखादा तरी थोडा समंजस आणि बाईला एक माणूस म्हणून बघू शकणारा पुरुष दाखवायला हरकत नव्हती. असे पुरुष असतात . समरसून प्रेम करणारे आणि बाईचं इंडिपेन्डन्ट अस्तित्व मान्य करणारे! आणि दुसरी म्हणजे शेवटच्या सिनमध्ये सगळ्या जणी सिगरेट पिऊन आपली दुःख गिळून आपल्या आपल्या कन्क्लुजनला येऊन पोहोचतात. सिगरेट पिणे म्हणजे बाईचं लिबरेशन हा मोह डायरेक्टरने टाळायला पाहिजे होता. या काही क्लिशेड बाबी सोडल्या तर चित्रपटाचा कन्टेन्ट उत्तम!

चित्रपटात ठळकपणे दोन कॅरेक्टर्स चटका लावून जातात. पहिली शिरीन. जिचा नवरा सौदीतून परत येणार असतो आणि ज्याला शिरीनच्या शरीरावर आपला मालकी हक्क आहे असं वाटत असतं. तीन मुलांवर अपत्य नको म्हणून साधं आपण कंडोम वापरू एवढं देखील तिला मोकळेपणाने त्याला सांगता येत नाही. रात्री घरी आलं की तिला बेडवर आडवं करून , वेळप्रसंगी तिला नको असताना देखील तिच्यावर बळजबरीने सेक्स करणारा, रेप करणारा स्वतःचं दुसर्‍या बाईबरोबर अफेअर असतानां देखील आपल्या बायकोने ते काहीही न बोलता खपवून घ्यावं आणि नोकरी सोडून फक्त त्याच्या मुलांची आई बनून ह्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करायच्या अशी अपेक्षा ठेवणारा हा तिचा नवरा! थोड्या फार फरकाने का होईना असे कित्येक पुरुष बायकांवर नवरेगिरी करतात. किती बायका आज माझा सेक्सचा मूड नाहीये किंवा मला त्रास होतो आहे असं मोकळेपणाने नवर्‍याला सांगू शकतात?

- Advertisement -

दुसरी बुवाजी. वयाच्या ५५ व्या वर्षी एक बाई ( विधवा ) इरॉटिका वाचते आणि फोनवर सेक्स चॅट करते हे दाखवण्याचं धाडस कौतुकास्पद आहे. वय सरलं तरी शारीरिक गरजा, वासना असतातच की. बाई मग तिचं कितीही वय असो जेव्हा जेव्हा आपल्या शारीरिक गरजांबद्दल बोलते तेव्हा तेव्हा तिच्या चारित्र्यावर लांच्छन लावलं जातं. तिचं सो कॉल्ड कॅरेक्टर खराब आहे असं समजलं जातं. ५५ वर्षी हे चाळे कसे सुचू शकतात? असं माझ्या समोर बसलेली माझ्याच वयाची एक बाई हा चित्रपट बघताना म्हणाली. चांगली शिकलेली, इंडिपेन्डन्ट वाटत होती ती बाई. तिची ही कॉमेंट ऐकून मला फार अस्वथ वाटलं. अजूनही आपण बायका असाच विचार करतो? बाईचं चारित्र्याचं मोजमाप करणारा हा समाज कोण? तिला वाटल्यास ती सेक्सचा आनंद उपभोगेल आणि तिची इच्छा नसताना तीला नाही म्हणण्याचा हक्क आहे. तिचं शरीर, तिच्या भावना, तिचा आवेग आणि तो शमवण्यासाठी तिने निवडलेला पुरुष. लिहिते आहे खरं पण जमणार आहे का? .

शेवटी आपला मार्ग आपणंच शोधायचा. कोण काय म्हणेल याच्यापेक्षा मन काय म्हणतं हे ऐकायची आणि त्या प्रमाणे वागायची गरज आहे आपल्या सगळ्यांना! असे चित्रपट पाहिले की वाटतं की खरच स्वतंत्र आहे का मी? सेक्शुअली लिबरेटेड आहे का? नुसतेच मॉडर्न कपडे घातले, सिगरेट फुंकली, वेगवेगळ्या ब्रँडची दारू ढोसली, सेक्स , स्त्रीवाद , जात , धर्म ह्यांच्या विरुद्ध लिहिलं , बोललं म्हणजे स्वातंत्र्य मिळालं असा होतो का? खूप बेसिक बाबींमध्ये आजही आपण अडकलेल्या आहोतच. स्वतःच स्वतःभोवती वेगवेगळी कुंपणं बनवून ठेवली आहेत आपण. त्यातून बाहेर पडून एक मोकळा श्वास घेण्याची नितांत आवश्यकता आहे. मनाचा ,शरीराचा आवाज ऐकण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाच्या चौकटी, नात्यांच्या सीमारेषा, नैतिकता , चारित्र्य यासारख्या भंपक बेड्यांमधून स्वतःची सुटका करून घेण्याची गरज आहे. स्वप्न बघायची आणि ती पूर्ण होतील यावर विश्वास ठेऊन आनंदाने जगण्याची गरज आहे. आपापल्या बुरख्यातून बाहेर पडून मुक्तपणे ,निर्भीडपणे जगण्याची सुरवात करूया.. नवीन वर्षात हा प्रयत्न नक्कीच करायला हवा.

-सानिया भालेराव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -